लोणावळा खंडाळा येथील मराठा कालखंडातील अज्ञात व्यक्तीची समाधी – छत्री :
लोणावळा व खंडाळ्याच्या मधोमध जुन्या मुंबई पुणे रस्त्याच्या लगतच एका खाजगी गृह संकुलाच्या आवारात ही छत्री आहे. उत्तर मराठा कालखंडातील म्हणजे १८ व्या शतकातील मराठा वास्तूरचना-कलेतील ही वास्तू.
आजूबाजूला बंगले होण्यापूर्वी ही छत्री लोणावळ्याकडून खंडाळ्यात जाताना उजव्या हाताला रस्त्यावरुनही थोड्या उंचीवर अगदी स्पष्ट दिसत असे, ही जागाच ह्या उद्देशाने निश्चित केली गेली असावी.
सोसायटीच्या आवारात असल्यामुळे नियमित झाडलोट व स्वच्छता राखली जाते. खालील भाग सपाटीकरणासाठी बांधून घेतला असल्यामुळे खाली नेमकं काय होतं/आहे, हे कळून येत नाही. शिलालेख किंवा या वास्तूबद्दल एक शब्दही माहिती करुन घेण्याची काहीही सोय येथे नाही. ही वास्तू कोणाची, कोणी बांधली हे आजूबाजूच्या लोकांना माहित नाही. (किंवा असे म्हणता येईल की, ज्या कोणाला हे माहित असावे, त्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोहचू शकलो नाही.) ही वास्तू कोणी, केव्हा, कोणासाठी, का बांधली ह्यां प्रश्नार्थक ‘क’ चे कोडे लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. पाहुयात किती यश मिळते ते !
लोणावळा-खंडाळा परिसरात मराठा कालखंडातील एक सुंदर वास्तू आहे, हेच खुप महत्त्वाचे वाटले त्यामुळे येथे शेअर करत आहे.
पत्ता – रहेजा सोसायटी, मयूर रेट्रीट जवळ, जुना मुंबई पुणे रस्ता.
(सुचना – खाजगी बंगल्यांच्या सोसायटीच्या आत हे स्मारक असल्याने, आत जाण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक.)
– दिपक पटेकर