महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,23,363

भास्कराचार्य व लीलावती यांच्या समाध्या

By Discover Maharashtra Views: 1647 5 Min Read

भास्कराचार्य व लीलावती यांच्या समाध्या –

खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेले पिंपळगाव हरेश्वर . गावाच्या नावातच हरेश्वर असल्याने या गावाला धार्मिक वारसा लाभला असावा हे चटकन लक्षात येते. ते खरे पण आहे. या गावाच्या ईशान्येला साधारणतः दीड किमी अंतरावर बहुळा व डुब्बा या नद्यांच्या संगमावर हरिहरेश्वराचे मंदिर आहे. या मंदिर निर्मितीचा कालखंड पेशवाई पूर्व असला तरी त्याचे पौराणिक महत्व बरेच प्राचीन सांगितले जाते.भास्कराचार्य व लीलावती यांच्या समाध्या.

येथील शिवपिंड ही अन्य शिवपिंडीपेक्षा वेगळी आहे, कारण येथे हरी म्हणजे विष्णू व हर म्हणजे शिव यांची प्रत्यक्षभेट झाली होती म्हणून पिंडीवरील लिंगाचे दोन भाग स्पष्टपणे दिसतात. म्हणून येथे शैव आणि वैष्णव यांची वर्षभर मांदियाळी असते.आषाढी एकादशीला जशी भक्तमंडळी धावून येते तसाच जनसागर शिवरात्रीला पण उसळतो.

हे झाले धार्मिक बाबतीत, परंतु या मंदिर परिसरात दोन सुबक समाधी मंदिरे आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण ही बाब निश्चितच दुर्लक्षित करण्यासारखी नाही.  या दोन समाध्यांपैकी एक आहे थोर गणितज्ञ भास्कराचार्य यांची, तर दुसरी त्यांची कन्या लिलावती यांची !

भास्कराचार्य हे प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध गणिती व ज्योतिषी .  इसवी सन 1114 ते 1185 हा त्यांचा कालखंड मानला जातो. त्यांचा मुख्य ग्रंथ सिद्धांत शिरोमणी हा होय. या ग्रंथामध्ये लीलावती, बीजगणित, ग्रहगणित व गोलाध्याय असे चार भाग आहेत. हे चार भाग म्हणजे अंकगणित, बीजगणित, ग्रहांच्या स्थितीशी संबंधित गणित व  गुरुत्वाकर्षणाशी संबंधित गणित असे आहेत .

गुरुत्वाकर्षणाचे महत्त्व न्यूटनच्या अगोदर कित्येक शतकांपूर्वी भास्कराचार्यांनी शोधून काढले होते. भास्कराचार्य यांनी आपल्या ग्रंथात गुरुत्वाकर्षणा विषयी लिहिले आहे की पृथ्वी आकाशीय पदार्थांना विशिष्ट शक्तीच्या आधारे आपल्याकडे खेचून घेते त्यामुळे आकाशातील पिंड पृथ्वीवर येऊन पडतात.

असे म्हणतात की भास्कराचार्य उज्जैन येथील वेधशाळेचे अध्यक्षपद होते.  त्यांना भारतातील सर्वश्रेष्ठ गणिती मानले जाते. त्यांच्या जीवनाविषयी विस्तृत माहिती उपलब्ध नाही.

त्यांचा जन्म विज्जलगड अर्थात चाळीसगाव जवळील पाटण येथे झाला असे डॉक्टर भाऊ दाजी यांच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. डॉ. भाऊ दाजी यांनी पाटण येथील हेमाडपंती मंदिरातील शिलालेखाचे वाचन केले. त्यावरून ही बाब स्पष्ट होते. या शिलालेखातून भास्कराचार्य यांनी आपले वडील महेश्वर यांचेकडून गणित, ज्योतिष, वेध, काव्य, व्याकरण इत्यादी विषयांचे ज्ञान प्राप्त केले होते असे स्पष्ट झाले आहे. इसवी सन 1150 मध्ये त्यांनी लिलावती या ग्रंथाची निर्मिती केली होती व वयाच्या 69 व्या वर्षी करण कुतुहल या ग्रंथाची निर्मिती केली होती.

प्राचीन वैज्ञानिक परंपरा वर्धिष्णू करणाऱ्या भास्कराचार्यांचे गणित व खगोलशास्त्र यातील योगदान अतुलनीय आहे. भारताने त्यांच्या सन्मानार्थ 7जून 1969 रोजी आकाशात सोडलेल्या उपग्रहाला भास्कर- 1 व दिनांक 20 नोव्हेंबर 1981 रोजी सोडलेल्या उपग्रहाला भास्कर 2 असे नाव देऊन जगभरामध्ये त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. भास्कराचार्य यांच्या मृत्यू संबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. असे म्हणतात की भास्कराचार्य यांचे देहावसान उज्जैन येथे झाले. परंतु पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वर मंदिरातील भास्कराचार्य व त्यांची कन्या लीलावती यांच्या समाध्या पाहिल्यानंतर  विचारांना एक वेगळीच चालना मिळते .

प्राचीन काळी पाटणादेवी हे भरभराटीस आलेले नगर होते. त्याचा व्यापार मराठवाडा, नाशिक, बागलाण, ठाणे-कल्याण या भागाशी होता तसा विदर्भातील नगरांशी  देखील होता असे पुराव्याअंती सिद्ध झाले आहे. कोकणातील व्यापारी हे देशावर  पाटण या नगरामध्ये येऊन अजिंठा पर्वत पायथ्याने जोगेश्वरी, मुर्डेश्वर, हरिहरेश्वर, रुद्रेश्वर अगदी लोणार व तिथून पुढे विदर्भात जात असावेत. या पायथ्याने व्यापारी मार्ग जात असावा.

त्यामुळे पितळखोरा, जोगेश्वरी, रुद्रेश्वर, अजिंठा या लेण्यांची निर्मिती झाली असावी कारण लेणी निर्मितीसाठी जसा राजाश्रय होता तसा व्यापाऱ्यांचा पण आश्रय होता. या संपूर्ण परिसरातून या व्यापारी मार्गाने अनेक व्यापारी तसेच विद्वान लोकांचे येणे जाणे होत असावे. त्यामुळे भास्कराचार्य व त्यांची कन्या लीलावती यांचा वावर या परिसरात नेहमी असावा. म्हणूनच भास्कराचार्य व त्यांची कन्या लिलावती यांची समाधी पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिरात असणे हे तर्कसुसंगत वाटते.

यावर अजून संशोधन होणे गरजेचे आहे . काही असो, या परिसरात पाऊल ठेवल्यावर एक वेगळीच अनुभूती येते. भास्कराचार्य यांच्या समाधीसमोर उभे राहिल्यानंतर नतमस्तक होतांना प्राचीन भारतीय गणित व विज्ञानाचा वारसा आजच्या पिढीला सोदाहरण पटवून देणाऱ्या या महान विभूतीच्या पदाने पुनीत झालेल्या मृत्तिकेला स्पर्श करतांना कृतकृत्य झाल्याचे समाधान नकळतपणे चेहऱ्यावर विलसते.

– संजीव बावसकर, नगरदेवळे, जळगाव

Leave a Comment