शिवचरित्राची संस्कृत साधने आणि शकावल्या.
पुस्तक लेखमाला क्रमांक – १२..
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचताना आपल्याला लक्ष्यात येते की याचा मूळ गाभा हा संस्कृत श्लोक आहेत.याचे कारण शिवचरित्रचे जे अस्सल मूळ साधन “शिवभारत” लिहिले गेलेय ते संस्कृत मध्येच आहे. शिवरायांचे समकालीन कविंद्र परमानंद यांनी शिवरायांच्या आज्ञेवरून लिहिलेले हे संस्कृत काव्य म्हणजे जणू महाभारताच आहे. इतके ते विस्तृत आणि मर्मबंधयुक्त आहे.त्यात एकूण ३२ अध्याय आहेत.पहिला अध्याय हा शहाजीराजे यांच्या जन्मापासून सुरुवात होऊन त्यानंतर शिवचरित्रातील विविध घटना यांचा एकंदर सखोल घटनाक्रम देऊन मग बत्तीसाव्या अध्यायात प्रभानवल्ली प्रांत हस्तगत करणे . हे सर्व या शिवभारतात अभ्यासायला मिळते. स.म.दिवेकर यांनी संपादित केलेले “शिवभारत” सध्या मराठी भाषांतरासाहित शिवचरित्राच्या अभ्यासकांना उपलब्ध आहेच.शिवचरित्राची संस्कृत साधने आणि शकावल्या.
त्यानंतरचे दुसरे समकालीन संस्कृत काव्य म्हणजे कवी जयराम पिंडे लिखित “पर्णालपर्वतग्रहणाख्यान” ! यात एकूण पाच अध्याय आहेत.ज्यात पन्हाळा किल्ले वरील हिरोजी फर्जंद यांची मोहीम, प्रतापराव गुजर यांचा नेसरीचा पराक्रम , बहलोलखानावर केलेला हल्ला आणि बागलाण मोहिमेतील काही माहिती उपलब्ध आहे.
तर अशी ही समकालीन दोन्ही संस्कृत काव्यरचना मराठी भाषांतर करून श्री स.म.दिवेकर यांनी इतिहास अभ्यासकांना जणू शिवचरित्रामधील संदर्भांचा खजिनाच उपलब्ध करून दिलाय.
शिवचरित्र लिहिणारे अभ्यासक या दोन्ही संस्कृत समकालीन चरित्रांशिवाय शिवचरित्राच्या मूळ गाभ्यात शिरुच शकत नाहीत.
त्यानंतर १९२५ साली स.मा. दिवेकर आणि द.वि.आपटे यांच्या प्रयत्नातून अजून एका अमूल्य ग्रंथाची निर्मिती झाली. “शिवचरित्र प्रदीप”!!
या संपादित ग्रंथात लोकमान्य टिळक , राजवाडे , बेंद्रे, साने, कृ.वा.पुरंदरे यांनी लिहिलेल्या शिवजन्म तिथी, जेधे शकावली, शिवमुद्रा आणि बरयाच अभ्यासपूर्ण लेखांचा लेखाजोगा आहे.शिवचरित्र अभ्यासकांना हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. त्याकाळी हे झालेले अमूल्य संशोधन आहे. हा ग्रंथ आता पुन्हा अभ्यासकांसाठी उपलब्ध करून भारत इतिहास संशोधन मंडळाने आताच्या पिढीवर खूपच मोठे उपकार करून ठेवले आहेत.
या तिन्ही ग्रंथाचा अभ्यास केल्यावर मला विशेष माहिती द्यावीशी वाटतेय ती “जेधे शकावली” ची.
या शकावली ची सर्वप्रथम लोकांना माहिती करून दिली ती लोकमान्य टिळक यांनी ! १९१६ साली मोडी मध्ये लिहिलेल्या “जेधे शकावली” चा सविस्तर अभ्यास करून त्यांनी शिवजन्माच्या तिथी संदर्भात अतिशय महत्वाची माहिती त्याकाळी उपलब्ध करून दिली.
“जेधे शकावली” मध्ये औरंगजेब च्या जन्मापासून (१६१८) ते अगदी जिंजीचा वेढा(१६९७) पर्यंतच्या पुराव्यानिशी सिद्ध झालेल्या ऐतिहासिक घटनांची नोंद आढळते.तर “जेधे करीना” म्हणजे वीर कान्होजी जेधे यांच्या कारीच्या जेधे घराण्याचा इतिहास.त्यामुळे १६ व्या शतकाच्या इतिहासाची ही दोन्हीही विश्वसनीय साधने आहेत.
जेधे करीना आणि शकावली दोन्हीही मोडी लिपीत असल्या तरीही त्याचे मराठी भाषांतर सध्या उपलब्ध आहे.एका बाजूस मोडी पान आणि त्याचेच मराठी भाषांतर हे डॉ.कुलकर्णी यांनी आताच्या अभ्यासकांसाठी केलेले आहे.
तसेच या सर्व संधर्भासाहित माहितीला अनुसरून अजून एक महत्वाचा ग्रंथ म्हणजेच श्री अविनाश सोवनी लिखित “ऐतिहासिक शकवल्या”.
यात त्यांनी एकूण ९ शकावल्या संपादित केलेल्या आहेत.या शकावली अर्थातच शिवकालीन घटनांचा योग्य धांडोळा घेणाऱ्यांसाठी हा संक्षिप्त पण अतिशय महत्वपूर्ण ग्रंथच म्हणावा लागेल.
पुढील लेखमालेत आपण शिवचरित्राच्या अजून काही महत्वाच्या साधनांचा धांडोळा घेणार आहोत.
आपणही योग्य संदर्भ ग्रंथ वाचन करीत राहावे आणि योग्य माहितीचे आकलन करीत राहावे हाच या पोस्ट मधील एकमेव उद्देश.
बहुत काय लिहिणे?अगत्य असू द्यावे.
किरण शेलार.