तोरणा –
कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र.10 –
कोरवलीच्या सुरसुंदरी मध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि मंदिरास उठाव देणारी आणखी एक महत्त्वपूर्ण स्वर्गीय अप्सरा या ठिकाणी आहे.तोरणा या शास्त्रीय संज्ञेत बसणारी हि सुरसुंदरी आहे. हे मंदिर उत्तर चालुक्यकालीन असल्याच्या अनेक खाणाखुणा आजही पहावयास मिळतात. अशी मंदिरे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळतात आणि या मंदिराच्या बाहेरील भिंतीवर अनेक स्त्री प्रतिमा आढळतात. त्यांची विविध नावे, विविध प्रकार असतात तोरणा.
कोरवलीची तोरणा थोडीशी भंग पावलेल्या स्थितीत आहे. मनगटापासून दोन्ही हाताचा भाग पुढे खंडित झालेले आहेत. तरीही आपल्या अतिशय मुलायम वर उंचावलेल्या करांच्याद्वारे तिने आपले मूळचे तोरणा म्हणून असलेले अस्तित्व जतन करून ठेवलेले आहे. त्रिभांगा अवस्थेतील ही मनोहारी लावण्यालतिका सौंदर्य आणि तारुण्याने मुसमुसलेली आहे. उंचावलेले तिचे दोन्ही हात कोपऱ्यात काटकोनाकृती झालेले आहेत. मस्तकावरील सुरेखा केशरचना ,अत्यंत बोलका चेहरा वेधक नेत्रकमान यांच्यासह रेखीव नाजूक नक्षीकामाची पण भलीमोठाली कर्णकुंडले तिच्या मुखकमलास विलक्षण कांती देणारी आहेत.हि पूर्णतःनग्न आहे.
गुडघ्याच्या खाली दोन्ही पायांना नाग बंद आहेत. उजवा पाय सरळ व त्यास छेद देणारा डावा पाय पूर्णपणे अडवा दाखविला आहे. अशीही लोभस तोरणा विविध अलंकारांनी सजवलेली आहे तिच्या दंडाला मधील केयूर प्रभावी वाटतात. कटिहार, ग्रीवा आणि हारसूत्र हे गळ्यातील अलंकार तिला साजेसे आहेत. पायामधील पादवलय आणि पादजालक तिच्या पावलांची सुंदरता वाढवणारे आहेत. कोरवलीच्या या तोरण्याचे अगदी खास आणि वेगळे वैशिष्ट्य म्हणजे तिने पायात घातलेल्या खडावा होय. बाकी कोणत्याही सुरसुंदरीला कलाकाराने खडावा चढलेल्या नाहीत.
फक्त कोरवलीलाच नव्हे, तर इतर कोणत्याही मंदिरांवरील सुरसुंदरीच्या पायामध्ये खडावा पहावयास मिळत नाही. महाराष्ट्रात आणि भारतातील सुरसुंदरीच्या वैशिष्ट्यांचा विचार केल्यास कोरवली या तोरणेचा प्रथम क्रमांक लागेल. कोरवली सारख्या खेड्यामध्ये असलेल्या मंदिरावर अशी सुरसुंदरी असणे हे सोलापूरच्या प्राचीन इतिहासाच्या दृष्टीने फार मोठे योगदान ठरते. इतके लोभसवाणे सौंदर्य असणारी ही मदनिका भक्तगणांना असा तरी संदेश देत नसेल ना ?कि स्त्री सौंदर्याच्या मोहापासून मोक्षप्राप्तीचा मार्गावर असणाऱ्या साधकांनी चार हात लांब राहावे.
तोरणा हि वैशिष्ट्यपूर्ण आणि आपल्या अभिजात सौंदर्याची उधळण वर्षानुवर्षे रसिकांवर करीत आहे. जसे एखाद्या सुस्नात सौंदर्यवतीचे लावण्य असते तसेच हिचे लावण्य मनाला भुरळ पाडणारे अनावृत्त सौंदर्य आहे.
डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर