महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,15,050

त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर, त्र्यंबकेश्वर

By Discover Maharashtra Views: 1497 2 Min Read

त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर, त्र्यंबकेश्वर –

नाशिक शहरापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेले प्रसिद्ध देवस्थान म्हणजे त्र्यंबकेश्वर. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेले त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मात दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो.(त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर)

प्राचीन काळी त्र्यंबक ही गौतम ऋषींची तपोभूमी होती. त्यांच्यावर झालेल्या गोहत्येच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी ऋषी गौतमांनी कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शिवाकडून गंगेला येथे अवतरित होण्याचे वरदान मागितले. याचा परिणाम म्हणून दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरी नदीचा उगम झाला. गोदावरीच्या उत्पत्तीनंतर भगवान शिव या मंदिरात विराजमान झाले. तीन नेत्रांच्या शिव शंभूच्या उपस्थितीमुळे हे स्थान त्र्यंबक म्हणून ओळखले जाऊ लागले.

त्र्यंबकेश्वर मंदिर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे, दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय आहे. नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५-१७८६ या कालावधीत भूमिज स्थापत्य शैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या भोवती दगडी तटबंदी असून तटबंदीला चार दिशेला चार दरवाजे आहेत. मंदिराची रचना नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या उत्तर व दक्षिण दिशेला देखील प्रवेशद्वार आहेत. गर्भगृहातील शिवलिंग लक्षपूर्वक बघितले तर त्यामध्ये आपल्याला तीन छोटे छोटे लिंग दिसतात त्या लिंगांना ब्रम्हा,विष्णू आणि महेश मानले जाते.

ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर मंदिरा सोबतच त्रिभुवनेश्वर, इंद्राळेश्वर, गायत्री मंदिर, कुशावर्तावरील मंदिरे तसेच संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधी मंदिर ही पुरातन मंदिरे देखील आवर्जून पहावीत अशी आहेत.

Rohan Gadekar

Leave a Comment