महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,47,365

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

By Discover Maharashtra Views: 2852 7 Min Read

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज….

तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे असे होते. त्यांचा जन्म  ३० एप्रिल १९०९ रोजी  अमरावती जिल्ह्यातील मोझरी या गावी झाला .ते राष्ट्रसंत म्हणून ओळखले जात. अंधश्रद्धा  व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला होता. ते आपल्या काव्यातून मराठी आणि हिंदी भाषेचा वापर करत. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. अडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. अडकोजी महाराजांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव बदलून तुकडोजी असे नामांतर केले. विदर्भात जरी ते रहात असले तरी सर्व देशभर हिंडून अध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय एकात्मतेचे ते प्रबोधन करत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला .सन १९४२च्या भारत छोडो आंदोलन दरम्यान त्यांना काही काळ अटक झाली होती. “आते है नाथ हमारे” हे त्यांनी रचलेले पद त्या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रभावी ठरले होते .भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली होती. ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा त्यांनी अभ्यास केला होता. त्याविषयी त्यांनी उपाययोजनाही सुचविल्या होत्या. ईश्वर भक्ती, सद्गुणांचा उद्देश, सामाजिक जागृती इत्यादी विषय त्यांनी आपल्या कीर्तनातून हाताळले .म्हणूनच त्यांना जनतेने ” राष्ट्रसंत “अशी पदवी देऊन गौरविले .

परंपरागत अनिष्ट रूढी, जाती धर्म ,पंथ  भेद ,अंधश्रद्धा इत्यादी समाज विघातक गोष्टीवर त्यांनी कठोर प्रहार केले. त्यामुळे सर्व धर्माचे ,सर्व पंथांचे लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले. देशभक्तीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी अविश्रांत कष्ट केले. गावोगावी गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. व्यायामाचे महत्त्व सांगण्यासाठी त्यांनी ग्रंथ  लिहिला .राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार त्यांनी १९३६ सालच्या सत्याग्रहात भाग घेऊन केला.  गांधीजींच्या सहवासात राजेंद्रबाबू, पंडित नेहरू या  राष्ट्रीय नेत्यांच्या मतांच्या प्रचारार्थ त्यांनी विपुल ग्रंथरचना केली. स्वातंत्र्यानंतर जाती निर्मुलनासाठी  त्यांनी विशेष लक्ष पुरवले. विश्वहिंदू परिषदेचे ते अध्यक्ष झाले. महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, भक्त, कवी व समाजसुधारक म्हणून ते प्रसिद्ध होते.  ठाकूर घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणापासूनच त्यांना ध्यान, भजन, पुजन या गोष्टींची आवड निर्माण झाली. मराठी तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. वरखेडला जि. अमरावती आजोळी असताना आडकूजी महाराजांना त्यांनी गुरू केले. पुढे किर्तन, भजनासाठी ते स्वतःच कविता रचू लागले. एके दिवशी गुरूमहाराजांनी माणिकला ‘तुकड्या’ म्हणून हाक मारली व म्हटले, की ‘तुका म्हणे’ असे किती दिवस म्हणशील? ‘तुकड्या म्हणे’ असे म्हणत जा. ‘तुकड्या म्हणे’ या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. सर्वधर्मसमभाव हेही  या राष्ट्रसंतांच्या  विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते . त्यासाठी तुकडोजी महाराजांनी  सामुदायिक /सर्वधर्मीय  प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.

महिलांची उन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या  विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता.  कुटुंबव्यवस्था , समाजव्यवस्था , राष्ट्रव्यवस्था  ही स्त्रीवर कशी अवलंबून असते  हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले . त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आपल्या किर्तनातून मांडले. तुकडोजी महाराजांनी  आपल्या लेखनातून  व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला . ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झालेला आहे. ईश्वरभक्ती, सद्‌गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती इ. विषय त्यांनी आपल्या कीर्तनांतून हाताळले, म्हणूनच त्यांना जनतेने ‘राष्ट्रसंत’ अशी उपाधी देऊन गौरविले.

तुकडोजी महाराजांचे कवित्व अस्सल होते. कीर्तने व खंजिरी भजने यांच्या माध्यमातून समाजसेवा हेच तुकडोजींचे ध्येय होते. त्यासाठी परंपरागत अनिष्ट रूढी, जातिधर्मपंथभेद, अंधश्रद्धा इ. समाजघातक गोष्टींवर कठोर प्रहार करून ईश्वराचे विशुद्ध स्वरूप त्यांनी लोकांसमोर मांडले. त्यामुळे सर्व धर्माचे, सर्व पंथांचे लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले. आत्मसंयमाचा आणि देशभक्तीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी अविश्रांत श्रम केले. गावोगावी ‘गुरुदेव सेवा मंडळे’ स्थापली. व्यायामाचे महत्व सांगण्यासाठी “आदेशरचना” हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार त्यांनी १९३० सालच्या सत्याग्रहात भाग घेऊन केला. गांधीजींसारख्या राष्ट्रनेत्यांबरोबर त्यांचा संबंध आला. तुकडोजी महाराजांनी राष्ट्रकार्याकरिताच आपले जीवन समर्पित केले.

भारत सेवक समाजात त्यांनी गुलझारीलाल नदाजींबरोबर काम केले. आपल्या मतांच्या प्रचारार्थ त्यांनी विपुल ग्रंथरचना केली. त्यांची . चाळीस पुस्तके प्रसिद्ध आहेत. ४१ अध्यायांचे ४,६७५ ओवीसंख्या असलेले ” ग्रामग्रंथ” हे त्यांचे प्रसिद्ध काव्य होय. त्यांनी हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांत काव्यरचना केली. त्यांचे कवित्व जातिवंत असून ते आधुनिक संतप्रवृत्तीचे निदर्शक आहे. १९४२ च्या आंदोलनात भाग घेतल्याने त्यांना काहीकाळ तुरुंगवासही भोगावा लागला. तुरुंगात त्यांनी” सुविचार स्मरणी” हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यानंतर भूदान, अस्पृश्योद्धार, जातिनिर्मूलन इ. कार्यांकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले.

विश्वधर्म व विश्वशांती परिषदेसाठी १९५५ मध्ये ते जपानला गेले. त्यांच्या भजनाने अनेक पाश्च्यात्य व पौर्वात्य विद्वान मोहित झाले. १९६६ मध्ये प्रयाग येथे विश्वहिंदू परिषदेचे ते अध्यक्ष झाले. सर्व धर्म, पंथ, जाती यांच्या पलीकडे असलेल्या ईश्वराचे स्वरूप ते आपल्या भजनांतून प्रकट करीत. ईश्वराचे ज्ञान करून घेऊन व्यक्तिविकास व समाजजागृती केली पाहिजे, असे ते म्हणत. धार्मिक एकात्मता निर्माण करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. गुरुकुंज आश्रमात (मोझरी, जि. अमरावती) ११ आॅक्टोबर १९६८ रोजी त्यांचे निधन झाले. तेथेच त्यांची समाधी आहे. महाराष्ट्र सरकारने अमरावती विद्यापीठास संत   तुकडोजी महाराज विद्यापिठ असे नाव दिले आहे.

तुकडोजी महाराज यांचे हे काव्य अतिशय प्रसिद्ध होते – या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली

ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥

भूमीवरी पडावे, तार्‍यांकडे पहावे

प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

पहारे आणि तिजोर्‍या, त्यातूनी होती चोर्‍या

दारास नाही दोर्‍या, या झोपडीत माझ्या॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला

भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने

आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा

कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥

पाहून सौख्य माझे,देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे ,या झोपडीत माझ्या ॥॥

असे सुंदर काव्य करणारे अंधश्रद्धा निर्मूलन,जातिभेद निर्मूलन यांसाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करणारे* *आधुनिक काळातील संत शिरोमणी तुकडोजी महाराज

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a Comment