महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,542

तुंग किल्ला | Tung Fort Pune

By Discover Maharashtra Views: 4483 10 Min Read

तुंग किल्ला | Tung Fort Pune

मावळ प्रांतातील तुंग किल्ला (Tung Fort) हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणा-या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड ,विसापूर ,पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो.

या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली पण, हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.

तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिरा जवळून जाते. या मंदिरात ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोडाच अंतरावर गडावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या वाटेत थोडाच अंतरावर हनुमान मंदिर लागते.पुढे गोमुखी रचनेचा दरवाजा आहे. येथून आत शिरल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. उजवीकडे गणेशाचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा खंदक आढळतो. येथूनच बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे.बालेकिल्ल्यावर तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच जमिनीत खोदलेली गुहा आहे.

पवन मावळात वसलेला हा किल्ला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा उत्तुंग सुळ्क्यामुळे लक्षवेधी झालेला आहे. लोणावळ्याच्या दक्षिणेला मुळशी – भांबुडर्य़ापर्यंत एक वाट गेली आहे, जिच्यावर विसावली आहेत तुंग, कोरीगड, धनगडसारखी अपरिचित अन् अनगड दुर्गशिल्पे! तुंग हा ३००० फूट उंचीचा गिरीदुर्ग पुण्यापासून साधारण ६० किमीवर तर मुंबईपासून १३० कि.मी.वर वसलेला आहे. तुंग म्हणजे उत्तुंग उंच ! त्याच्या याच नैसर्गिक आकार उंचीमुळे गडाला चोहोबाजूंनी तटबंदीची गरज पडली नाही. यामुळे पश्चिमेस खाली उतरलेल्या गडाच्या अंगासच तट-बुरुज घालून हा भाग संरक्षित केला आहे. गडाचे हे उत्तुंग, कठीणपण लक्षात घेऊनच शिवाजी महाराजांनी गडाचे ‘कठीणगड’ असे नामकरण केले. किल्ल्याची नावावरून आपल्या सर्वांना असेच वाटेल की, किल्ला चढायला खरोखरच कठीण आहे मात्र किल्ला चढण्यास फारच सोपा आहे. पवन मावळ प्रांतातीळ तुंग किला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो.

पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो. कामशेतहुन एस.टी. महामंडाळाची कामशेत-मोरवे गाडी पकडून मोरवे गावाच्या अलीकडच्या चावसर गावात तुंगवाडी फाट्यावर उतरावे. येथून पाऊण तासांची पायपीट केल्यावर आपण तुंगवाडीत पोहचतो. किंवा लोणावळा येथून भांबूर्डे अथवा आंबवणेकडे जाणारी एस.टी पकडून २६ कि.मी. अंतरावरील घुसळलखांब फाट्यापाशी उतरावे. या फाट्यापासून दीड तासांची पायपीट केल्यावर आपण ८ कि.मी. अंतरवरील तुंगवाडीत पोहोचतो. तुंगी किंवा तुंगवाडी हे तुंग किल्ल्याच्या पायथ्याचे गाव! शंभर एक उंबऱ्याचे हे गाव! गडाची एकेकाळची बाजारपेठ असल्याने गावात आजही प्राचीन मंदिरे, जोती नजरेस पडतात. इथल्याच शिवारात ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांची ती ‘पवनाकाठचा धोंडी’ आकारास आली.

तुंग गडाच्या हवालदाराचीच ही संघर्षकथा! तुंगला येणापूर्वी एकदा ती वाचली तर सारा पवन मावळ ओळखीचा होऊन जातो. या गावातच गडाला खेटून भैरवनाथाचे मंदिर! तुंगवारीच्या मुक्कामासाठी सोयीचे! कौलारू छताच्या या मंदिराला मोठा सभामंडप. अंगणात ओळीने कुणा अज्ञात वीरांच्या स्मरणार्थ तयार केलेले वीरगळ! गावच्या रक्षणासाठी वा अन्य लढाईत कोणी मरण पावल्यास त्याच्या स्मरणार्थ अखंड दगडात चबुतरे (स्मारक) तयार करण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. याला ‘वीरगळ’ असे म्हणतात. इथे भैरवनाथाच्या मंदिरासमोर असे दहा-बारा वीरगळ आहेत. यातील एकाला स्थानिक लोक ‘तुळाजीराव’ असेही म्हणतात. या वीरगळांसोबत काही सतीचे हात असलेल्या शिळाही आहेत. वीर पुरुषाच्या मागे त्याची पत्नी सती गेल्यास तिच्या स्मरणार्थ ही सतीशिळा! असेच काही वीरगळ या भैरवनाथ मंदिराच्या मागे एका जुन्या वृक्षाच्या पायथ्याशीही आहेत.

तुंगी गाव आणि हे मंदिर पाहात आपली मुक्कामाची पथारी लावायची आणि गडाकडे निघायचे. वाटेत काही वस्तीवजा घरे लागतात. त्यातील शेवटच्या वस्तीनंतर मारुतीचे मंदिर आहे. तिथून आपली वाट माथ्यावर दिसणाऱ्या सरळ कातळकड्याकडे जाते.येथुन गडावर जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात. तुंगच्या तीनही बाजूंनी पवनेचा वेढा, तर दक्षिणेला ताशीव उभा कडा आहे. या उभ्या कडय़ातूनच या कठीणगडाची कठीण चढाई सुरू होते. गावातीलच हनुमान मंदिरापासून ही वाट निघते. या मंदिरासमोर मातीने बुजलेले एक पुरातन पाण्याचे टाके आहे. या शिवाय मंदिरा पाठीमागील झुडुपात काही अवशेष असुन त्यात अस्पष्ट झालेला एक पर्शिअन शिलालेख आहे. गडाकडे जाणारी ही वाट कडय़ामध्ये खोबण्या, पायऱ्या खोदत तयार केलेली आहे. या वाटेवर एक-दोन ठिकाणी पाण्याच्या खोदलेल्या टाक्या व दगडातच कोरलेली एक पहारेकऱ्याची खोली दिसून येते. या दरम्यान लागणारी मारुती व गणपतीची छोटी घुमटी आपल्याला दिशा दाखवत सोबत करते. शेवटी कडय़ातली ही वाट संपवत आपण गडाच्या दरवाजात पोहोचतो. प्रवेशदारासमोरच काही दगडी पायऱ्या असुन प्रवेशदाराची कमान फार वाईच अवस्थेत आहे.

कडय़ाला समांतर अशा एकापाठोपाठ दोन दरवाजे अशी रचना केल्याने हे दरवाजे इथे पोहोचेपर्यंत कळत नाहीत. दरवाजाची ही रचना शिवकालीन गोमुखी पद्धतीची वाटते. या दोनही दरवाजावर कोणतेही द्वारशिल्प नसुन दाराच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजांच्या कमानी अद्याप शाबूत असुन वेळेत संवर्धन न केल्यास इतर गडांच्या दरवाजाप्रमाणे त्या देखील कोसळतील. गडाची रचना निसर्गतः चार टप्प्यात झालेली असुन पहिला टप्पा हा दरवाजाच्या खालील अंगास तर उरलेले तीन टप्पे दरवाजाच्या वरील अंगास आहेत. गडाच्या या खालच्या टप्प्याच्या शेवटी एक भला मोठा बुरुज तटबंदीत बांधलेला आहे. किल्ल्याच्या इतर भागातही अजून चार बुरुज दिसून येतात. शिखरवजा या गडाचा घेर मुळातच कमी. पूर्व-पश्चिम माची आणि त्याच्या पूर्व टोकावर शिवलिंगातील शाळुंकेप्रमाणे उंचावलेला बालेकिल्ला. यात सदर, किल्लेदाराचा वाडा, गणेश मंदिर, त्याच्या शेजारचे बांधीव तळे, खोदीव टाक्या असे एकेक अवशेष शोधावे लागतात.

दरवाजातून आत आल्यावर समोरच पत्र्याचे छप्पर असणारे गणपतीचे छोटेसे मंदीर आहे. या मंदिराच्या मागील बाजुस कातळात खोदलेले एक मोठे टाके असुन त्यात उतरण्यासाठी दगडी पायऱ्या बांधल्या आहेत.मंदिराच्या समोर एक मोठा दगडी चौथरा व काही दगडी अवशेष दिसून येतात. येथे बहुधा गडाची सदर असावी. माचीतले हे सारे अवशेष पाहून झाल्यावर गडाच्या बालेकिल्ल्यावर निघावे. येथुन वर जाताना गडाच्या उजव्या अंगास दगडात कोरलेले एक २० X ३० आकाराचे एक मोठे खांबटाके आहे पण ते पुर्णपणे गाळ आणि पालापाचोळा याने भरलेले आहे. तळातून तुंग किल्ल्याचे हे टोक अगदी तासून टोकदार केल्याचे भासते. प्रत्यक्षात वर पोहोचल्यावर तर बालेकिल्ल्याची ही जागा खुपच लहान वाटते. त्यामध्येच गडदेवता तुंगाईचे मंदिर! यामुळे मंदिराभोवती जेमतेम प्रदक्षिणा घालण्याएवढीच जागा आहे. थोडे इकडे-तिकडे झाले की कडेलोट. मंदिरासमोर या उभ्या कडय़ातच बारा फूट लांब आणि सात-आठ फूट रुंदीची एक भुयारवजा खोली खोदली आहे. काहींच्या मते हे पाण्याचे टाके आहे. या खोलीच्या तळाशी हवा व प्रकाशासाठी एक छिद्रही दिसते यामुळे बहुधा ही धान्य-साहित्य साठविणे, टेहळणी किंवा संरक्षणासाठी ऐन कडय़ात खोदलेली खोली असणार!

पावसाळा सोडल्यास गडावर राहण्यासाठी ही एक चांगली जागा आहे. गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून पवना धरणाचा विस्तीर्ण जलाशय्, लोहगडविसापूर ही दुर्गजोडी, तिकोना किल्ला हा सारा परिसर अतिशय सुरेख दिसतो. या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. ह्या किल्ल्यावर काही महत्वाची किंवा मोठी घटना घडल्याचा उल्लेख येत नाही. किल्ल्यावरही शिबंदीला फारशी जागा नाही. त्यामुळे ह्या किल्ल्याचा वापर चौकीची जागा असा होत असावा. हा गड कधी अस्तित्वात आला याचा नेमका पुरावा मिळत नाही. पण गडाच्या पोटातील खोदकामे पाहता तो नि:संशय प्राचीन असावा.

तुंगचा पहिला उल्लेख निजामशाहीत मिळतो. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या घोडदौडीतही तो लवकरच सहभागी झाला. इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी लोहगड,विसापूर, सोनगड, तळा,माहुली व कर्नाळा या किल्ल्यांबरोबरच हा किल्ला देखील स्वराज्यात सामील करून घेतला. या किल्ल्याचा उपयोग पवनमावळावर देख्ररेख ठेवण्यासाठी होत असे. इ.स.१६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली. पण हे किल्ले मात्र ते जिंकू शकले नाही. ११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता.

पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला पण हा गड पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला. औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीत अन्य गडांबरोबर तुंगही मुघलांच्या कब्जात गेला. या वेळी औरंगजेबाने याचे नाव ठेवले – बंकीगड! पण बंकीगड नाव क्षणभंगुर ठरले. औरंगजेबाची पाठ फिरताच मराठय़ांनी पुन्हा तुंगवर भगवा फडकवला आणि पुढे तो ब्रिटिशांच्या सत्तेनंतरही भोर संस्थानच्या रूपाने अखेपर्यंत फडकत राहिला. या साऱ्या राजवटींची पायधूळ या गडाने आपल्या माथी लावली. नावातच उत्तुंग असलेल्या या गडाचे बारसे शिवरायांनी कठीणगड केले ते किती सार्थ आहे, ते पाहण्यासाठी एकदा तरी या गडावर जायलाच हवे. संपूर्ण गड फिरण्यास दीड ते दोन तास पुरतात.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment