मराठा आरमारातील प्रमुख दोन नौका कोणत्या ?
मराठा आरमारातील प्रमुख दोन लढाऊ नौका.. गुराब आणि गलबत.
गुराबा या आकाराने मोठ्या असतात, परिणामी यांच्यावर दारुगोळा आणि साधनसामग्री जास्त ठेवता येते, त्या मानाने गलबते आकाराने लहान आणि निमुळती असतात. गलबतांच्या आकारमानामूळे जरी दारुगोळा आणि तोफा या कमी असल्या तरी त्यांच्या जलद हालचाली आणि वेग यांच्यामूळे शत्रूनौकांना शह देणे सहज शक्य होत असे.. सदर रेखाचित्रातील लाल रंगाचा भाग पाण्याच्या खाली रहात असून त्यांच्यावर नौकेची रचना कशी असे याचा अंदाज बांधता येऊ शकतो.. ! मराठ्यांनी स्वतःची जशी जमिनीवरची युद्धपद्धती ठरवली होती तशी आता समुद्रावरची युद्धपद्धती ते ठरवत होते. सुरवातीची पद्धत अतिशय सोपी होती. खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी देऊ शकतील अश्या बोटी बनवण्याच्या मागे ते लागले होते. तेंव्हा ‘वाऱ्यावीण प्रयोजन नाही’ अश्या ‘फरगात’ (फ्रीगेट्स) न बनवता ‘गुराबे’ आणि ‘गलबते’ बनवायची तयारी जोमाने सुरु झाली होती. ह्यासोबत तरांडे, तारू, शिबाड, मचवा, पगार, वाघोर, तिरकटी आणि पाल असे नौकांचे प्रकार आज्ञापत्रात आढळतात.two major boats in the Maratha Navy.
गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकत.
मराठा आरमारातील प्रमुख दोन नौका
गलबत हे आकाराने अजून लहान असते. ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हालचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.
मराठ्यांची नवी जहाजे खाडीमधून आता खुल्या समुद्रात संचार करू लागली होती. गनीम समोर आल्यावर काय करावे कसे वागावे ह्याबाबत स्पष्ट निर्देश आरमाराला दिले गेले होते. भर समुद्रात गनीम समोर आला तर एकत्र येऊन कस्त करून त्याच्याशी झुंजायचे, मात्र वाऱ्याची दिशा आपल्या विरुद्ध दिशेने असल्यास, गलबत योग्य चालवता येत नसल्यास गानिमाशी गाठ न घालिता जवळच्या जलदुर्गाच्या आश्रयाला यावे. राजे म्हणतात,”तरांडीयास आणि लोकांस सर्वथा दगा होऊ देऊ नये. आपण राखून गनीम घ्यावा.”
बरेचदा चकवा म्हणून शत्रू तहाचे निशाण दाखवतो आणि हरलो असे दाखवतो तेंव्हा लगेचच उडी घालून त्याच्या नजीक जाऊ नये, किंवा गनिमाला सुद्धा जवळ बोलावू नये, असे प्रशिक्षण आरमारास दिलेले होते. काही दगाफटका व्हायची शक्यता दिसल्यास कसलीही तमा न बाळगता तोफांच्या माराखाली तरांडे फोडून टाकावे असे स्पष्ट आदेश सरखेलांना होते.
माहीती संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे