दोन दुर्मिळ शिल्पे –
चित्रात दिसणारी ही दोन्ही वैशिष्ठ्यपूर्ण आणि दुर्मिळ शिल्पे पुण्याजवळच्या पुरंदर तालुक्यातील ‘माळशिरस‘ गावचे ग्रामदैवत असलेल्या, ज्याला ‘पुण्याचे वेरुळ’ म्हणतात त्या भुलेश्वर मंदिरातील आहेत. खरे तर या मंदिरातील सर्वच शिल्पे अफलातून आहेत, संपूर्ण मंदीरच शिल्पकलेचा उत्कृष्ट अविष्कार आहे. यादवकालीन या मंदिरात अलौकिक अष्मशिल्पांचे भांडार आहे.दोन दुर्मिळ शिल्पे.
शिल्प १
पहिले शिल्प एका स्त्रीचे आहे. ते शिल्प मंदिरात प्रदक्षिणेच्या मार्गावर डावीकडून जाताना, जिथे सोमसूत्री प्रक्षिणा करताना थांबून मागे परतावे लागते तिथे, तीर्थ कुंडाजवळच्या भिंतीवर उत्तराभिमुख आहे. असेच दुसरे शिल्प याच मंदिरातून बाहेर पडताना लागणा-या तीन पाय-यांपैकी पहिल्या पायरीजवळील खांबावर, अडचणीच्या जागी स्थापिलेले आहे. अंधा-या जागी असल्याने हे सुदैवाने अभंग राहिले आहे. सोबतच्या चित्रातील खंडित शिल्प तीर्थकुंडाजवळचे आहे.
हे स्त्रीचे शिल्प आहे हे तिच्या देहयष्टीवरुन स्पष्ट होते. ही स्त्री अनार्य, आदिवासी, असभ्य, काहीशी क्रुद्ध, दुष्ट, विकृत दिसते. तिचे नाक नकटे आणि ओठ जाड व राठ आहेत. तिच्या कपाळाची, गालाची, हाताची, खांद्याची हाडे वर आलेली आहेत. तिचे स्तन घनगोल, घोटीव, आकर्षक नसून ते कठोर, लंब, लोंबलेले आहेत. मुर्तीच्या डोळ्यातील व मुद्रेवरील भाव अभद्र, अमंगळ, क्रुद्ध, अप्रसन्न आहेत. तिने देहावर धारण केलेली, शिरोभूषणे, कंठभूषणे, कर्णभूषणे, बाहुभूषणे, कटीमेखला हे अलंकारही तिच्या वृत्तीला व स्वभावाला साजेसे आहेत. ही स्त्री गर्भवती असून तिच्या उदरातील गर्भ मानवी नसून विंचवाचा आहे. ही स्त्री पालथ्या पडलेल्या कुणा बालकाच्या पाठीवर निर्दयपणे आपला डावा पाय रोऊन उभी आहे. प्रत्यक्षात मुर्तीचा कटीखलचा भाग आणि कोपरापासून पुढचे दोन्ही हात अस्तित्वातच नाहीत. केवळ डाव्या पायाचे पाऊल तेवढे दिसते. पावलावर एक जाडजूड कडे धारण केलेले दिसते. या शिल्पाविषयी जानपद कीवदंती अशी की, ‘ या दुष्ट कुलटेने मत्सराने आपल्या सवतीच्या मुलाला लाथ मारली म्हणून तिच्या उदरातील गर्भ विंचवाचा झाला.’ असे शिल्प आन्यत्र दिसत नाही.
शिल्प २
दुसरे शिल्प स्त्रिदेहातील गणेशाचे आहे. असे शिल्प अन्यत्र क्वचितच असेल. पुण्यात सोमवारपेठेत गणेशाचे असेच एक वेगळे रूप पहायला मिळते. तिथल्या गणेशाला तीन सोंडा आहेत म्हणून त्याला ‘त्रिशुंड गणपती’ म्हणतात. असा गणपती सुद्धा भारतात अन्यत्र नसावा.
भुलेश्वर मंदिरात देवाला डाव्या हाताने प्रदक्षिणा घालायला आपण वळलो की समोरच्या पट्टीवर हे अद्भुत शिल्प दिसते. गणेशाच्या या मुद्रेला ‘गणेशी’, ‘ वैनायकी ‘ असे म्हणतात. ‘त्रिशुंड गणेश’, ‘वैनायकी किंवा गणेशी’ ही गणपतीची तंत्रशास्त्रातील रूपे असावीत.
ही गणेशीमूर्ती आतिशय रेखीव, डौलदार, प्रमाणबद्ध आहे. चतुर्भुज गणेशी सुखासनावर विराजमान झाली आहे. मस्तकावर रत्नजडित मुकुट धारण केला असून उभय शूर्पकर्ण मुखमंडलाची शोभा वाढवतात. आशीर्वाद देणारा उजवा आणि मोदकधारी डावा हात अदृष्य झालाय. वरच्या उजव्या हातात परशु आहे तर डाव्या हाती अन्य शस्त्र धरले आहे. शुंडा डावीकडे वळलेली आहे. घनगोल वक्षावरून नाभीस्थानापर्यंत रुळणारा हार मूर्तीची शोभा वाढवतो. गणेशीच्या पायाजवळ सुंदर मूषक बसला आहे.
वरील दोन्ही शिल्पांचे अध्यात्मिक, पौराणिक, तांत्रिक, ऐतिहासिक संदर्भ अभ्यासकांनी, जाणकारांनी सांगावे, त्यावर काही भाष्य करावे अशी अपेक्षा आहे. वाचकांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत आहे…..
(प्रकाशचित्रेः श्री ललित कणसकर यांच्या सौजन्याने उपलब्ध )
©️ लेखकः – दिवाकर बुरसे, पुणे