महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,170

श्रीमंत उदाबाई होळकर वाघमारे वाडा, खडकी-पिंपळगाव

By Discover Maharashtra Views: 1513 5 Min Read

श्रीमंत उदाबाई होळकर वाघमारे वाडा, खडकी-पिंपळगाव –

मंचर मधील पिंपळगाव फाट्यावरून जवळच सात कि.मी अंतरावर पिंपळगावला पोहचता येते. येथुन   घोड नदि ओलांडली की आपण खडकी येतो. सतराव्या शतकातील पेशवेकालीन  ऐतिहासिक वारसा असलेले मोठे प्रवेशद्वार आपल्या डाव्या हाताला निदर्शनास पडते. याच वेशीतुन आपण मुख्य गावठाणात आपण प्रवेश करतो. मुळातच खडकी गाव घोड नदि माईच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेले असल्याने येथील नैसर्गिक सुंदरता पाहण्यायोग्य असुन हा भु -भाग कृषी प्रधान आहे.श्रीमंत उदाबाई होळकर वाघमारे वाडा.

खडकी गावच्या ऐतिहासिक वास्तूचे कागदोपत्री पुरावे मला पहावयास मिळाले नाही परंतु दोन ठिकाणी कोरलेले शिलालेख व वाड्याच्या मुख्य प्रवेश व्दारावर कोरलेले दगडी शिल्प खुप काही सांगुन जातात. व हेच खरे येथील ऐतिहासिक वास्तूचे भक्कम पुरावे म्हणता येतील. या वाड्याच्या भिंती व प्रवेशद्वार पहाता हा निश्चितच भुईकोट किल्ला असल्याचा भास होतो. कारण या वाड्याचा विस्तार खुप मोठा असल्याच्या खुणा आपणास जागो जागी निदर्शनास येतात. येथील असलेला वाडा व नदीवर बांधण्यात आलेला जवळपास  अर्धा कि.मी लांबीचा घाट आपले विशेष लक्ष वेधून घेतो. येथील इतिहास म्हणजे हा किल्लेसदृश वाडा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) यांनी आपल्या राज्यकाळात बांधला असे गावक-यांकडून सांगितले जाते.

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) व श्रीमंत गौतमाबाई होळकर यांच्या कन्या श्रीमंत उदाबाई होळकर यांचा विवाह बाबुराव मानाजी वाघमारे – पाटील यांच्याशी झाला होता. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) यांनी कन्या श्रीमंत उदाबाई हीस माहेरची चोळीबांगडी म्हणून हा वाडा व जमीन आई वडिलांनाई बक्षीस स्वरुपात मुलीला देऊन टाकली. त्यामुळे आज आपणास वास्तु दिसता त्या होळकर कालीन वास्तू शिलालेखाच्या माध्यमातून असल्याचे समजते.

याच काळातील बांधलेले महादेव मंदिर, त्यामधील घुंगरमाळेने सजवलेला नंदी ,लक्ष्मी नारायण मंदिर ,काळ भैरनाथ मंदिर व भैरवाची जिर्ण झालेली मुर्ती, राममंदिर  ,बिरोबा मंदिर कि ज्या मंदिरास नुकताच क दर्जा प्राप्त झाला आहे अशी विविध मंदिरे याच वाड्यात पहावयास मिळतात.

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) यांचे नातू अवचितराव वाघमारे – पाटील( श्रीमंत उदाबाई आणि बाबुराव मानाजी वाघमारे – पाटील यांचे पुत्र ) यांनी पितृ उध्दरातीर्थ बांधलेली समाधी तर आखिवरेखीव शिल्पांत उभारलेली असून  हि समाधी होळकर कालीन स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुनाच असल्याचे दर्शन घडते. या समाधी नक्षी कामामध्ये मध्ये मराठा व राजपूत कलाकृती दिसून येते व तसेच या समाधी गर्भगृहा मध्ये एक महादेव पिंड असून समाधीस्थलावर होळकर कालीन शिलालेख नजरेस पडतो. छत्रीनूमा समाधीवर असलेल्या शिलालेखाचा उल्लेख पुढील प्रमाणे सहज वाचता येतो.

श्री गणेशाय नम : प्रतापि महाराज मळहारराजा जसि लक्षुमिगौतमा नाम तया उदरी रत्नकन्या विराजे उदाबाई हे नाम पृथ्वीत गाजे . सके १७११ सौम्य नाम संवत्सरे चौत्र शुद्ध ९ नवमी मंदवासरे ते दीवसी बाबूरावा वल्द ( वडील ) मानाजी पाटील वाघमारे मोकदम तक्षिम दिड मौजे खडकी तर्फे महाळुंगे तस्ये भार्या उदाईवा पुत्र अवचितराव पाटील वाघमारे याणी पित्रु उद्धारार्थ परलोकसाधनार्थ छत्रीचे काम केले असे .

येथील प्रवेशद्वार वरील व बिरोबा मंदिरावरील होळकर कालीन दगडी नक्षीकाम आज हि पाहण्यासारखे आहे.

येथील होळकर कालीन नदीघाट हा गावाची शोभा वाढवताना दिसतो, कि ज्याची रचना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी घोड नदीवर केलेली असून या घाटाचे सौंदर्य आपणास पिंपळगावातील उत्तरेकडील नदिकाठावरून न्याहाळता येते. या परिसरात असलेले दगडी तोडतील कोरीव मोठे मोठे तीन नंदी खास आकर्षण ठरतात.नदीघाट वेशीतुन आपणास पायरी मार्गाने एका वेशीतुन नदी पात्रता उतरता येते. याच वेशीवर होळकर कालीन भव्य शिलालेख आढळतो. हा नदीघाट खूपच भव्य दिव्य व निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.

येथील होळकर कालीन वास्तूमुळे या गावास पर्यटनाचा दर्जा प्राप्त झालेला असल्याने येथील नष्ट होत चाललेल्या वास्तुंना संवर्धित करणे खुप गरजेचे आहे. खडकी ग्रामस्थ बंधूंनी वेळीच योग्य पाऊले उचलली तर निश्चितच आंबेगाव तालुक्यातील उच्च दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणुन खडकी गाव लवकरच उदयास येईल. बोटींगसाठी हा परीसर उत्तम असून खडकी आणि पिंपळगाव ग्रामस्थांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे. की जेणेकरून खुप मोठ्या प्रमाणात येथे रोजगार संधी उपलब्ध होईल.

येथील परिसराची भटकंती करताना मला श्री बाळासाहेब पोखरकर (निवृत्त अभियंता जिल्हा परिषद पुणे) सध्या ते रोटरी क्लब मंचर उत्तर पुणे जिल्ह्यातील उपप्रांतपाल म्हणून कार्यरत असून त्यांनी रोटरी परिवारातर्फे अनेक  सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवत त्यांनी ट्रेकिंग , भटकंती , पोहणे याबाबतची प्रचंड आवड जोपासलेली असून त्यांची मला खुप मदत झाली त्याबद्दल खुप खुप आभार.

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर (माजी सैनिक खोडद)

Leave a Comment