महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,46,999

उदयगिरी | खंडगिरी

By Discover Maharashtra Views: 1944 5 Min Read

उदयगिरी | खंडगिरी –

निसर्गरम्य ओडिशा म्हटले की कोणार्क, जगन्नाथपुरी आणि भुवनेश्वरची मंदिरे डोळ्यासमोर येतात. परंतु याच ओडिशा म्हणजेच प्राचीन कलिंग देशात जैन धर्माचेसुद्धा अस्तित्व होते. त्याच्या पाऊलखुणा आपल्याला त्यांच्या लयनस्थापत्यातून म्हणजेच कोरीव लेणींमधून आजही दिसून येतात. ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमध्येच जैन लेणींचा एक मोठा समूह आहे. उदयगिरी आणि खंडगिरी लेणी. अतिशय सुंदर, देखण्या आणि ऐतिहासिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या अशा या लेणी आहेत. पर्यटकांसाठी तर हे एक सुंदर ठिकाण आहेच, परंतु अभ्यासकांसाठीसुद्धा हे महत्त्वाचे केंद्र आहे.

इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात इथे खारवेल या बलाढय़ सम्राटाची सत्ता होती. त्या खारवेलाचा इतिहास, त्याचे कर्तृत्व आणि त्याचे सामथ्र्य आपल्याला इथे त्यानेच कोरून ठेवलेल्या शिलालेखातून समजून येते. हे शिलालेख म्हणजे तत्कालीन इतिहास आपल्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा करणारा एक चित्रपटच होऊन जातो. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात या शिलालेखांना म्हणूनच अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

भुवनेश्वरला लागूनच उदयगिरी आणि खंडगिरी या जुळ्या टेकडय़ांवरील जैन लेणी ही यासाठीच महत्त्वाची ठरतात. ही लेणी मुख्यत्वे जैन मुनींच्या निवासासाठी, तसेच प्रार्थना आणि ध्यानधारणेसाठी खोदली गेल्याचे जाणवते. लेण्यांच्या दालनांच्या दरवाज्यावर तोरणे तसेच जैन शुभचिन्हे कोरलेली दिसतात. तसेच राजदरबारातील प्रसंग, राजाची विजयी मिरवणूक, शिकारीचे प्रसंग अशी काही कथन शिल्पे या दालनांच्या दरवाज्यांवर विपुल प्रमाणात कोरलेली आहेत. इथे या जुळ्या डोंगरांवर खोदलेली विविध वैशिष्टय़पूर्ण लेणी आणि या ठिकाणी असलेला तत्कालीन राजा खारवेल याचा शिलालेख या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शिलालेखाची सुरुवात ‘नमो अरिहंतनं.. नमो सव सिधानं’ या जैन नमोकार मंत्रांनी केलेली आहे. १७ ओळींच्या ब्राह्मी लिपीमधील या शिलालेखात अनेक ऐतिहासिक घटनांचे वर्णन आहे.

उदयगिरी आणि खंडगिरी या शेजारीशेजारी असलेल्या टेकडय़ा आहेत. त्यातल्या उदयगिरीवर असलेल्या राणीगुंफा, हाथीगुंफा आणि गणेशगुंफा या लेणी महत्त्वाच्या आहेत. सम्राट खारवेलाचा प्रसिद्ध शिलालेख हाथीगुंफेवरील मोठय़ा खडकावर कोरलेला आहे. राणीगुंफा म्हणजे एक सुंदर दुमजली दालन आहे. जैन मुनींसाठी बांधलेले हे वसतीगृहच आहे. प्रशस्त व्हरांडा आणि बाजूला असलेल्या लहान लहान खोल्या. इथे बऱ्याच दालनांना बाहेर द्वारपाल दिसतात. मध्यवर्ती विभाग जिथे इतर दोन विभागांशी जोडला गेलेला आहे त्या कोनावर शिल्पपट पाहायला मिळतात. यामधे पशुपक्षी, फळांनी डवरलेली झाडे, आनंदानी बागडणारे हत्ती, वाद्य वाजवणाऱ्या सुंदरी इत्यादी शिल्पे फारच प्रभावशाली कोरलेली आहेत.

उदयगिरी टेकडीसमोरच आहे खंडगिरी टेकडी. भुवनेश्वरकडून आल्यावर ही टेकडी डाव्या हाताला आहे. इथे वरती चढून जाण्यासाठी मोठय़ा पायऱ्या खोदलेल्या दिसतात. एका ठरावीक उंचीवर गेल्यावर मग इथे गुहा खोदलेल्या दिसतात. खंडगिरीला एकूण १५ लेणी आहेत. खंडगिरी टेकडीची उंची १२३ फूट एवढी असून एका शिलालेखात याचा उल्लेख ‘खंडित गिरी’ असा आला आहे. तिथे एक इंद्रकेसरी गुहा असून त्याच्या मागे असलेल्या गुहेत २४ र्तीथकरांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. उदयगिरीच्या तुलनेत खंडगिरीवरील लेणी या काहीशा कमी शिल्पकाम असलेल्या आणि काहीशा ओबडधोबड वाटतात. इथे असलेल्या गुंफांचे आकारसुद्धा लहान आहेत. याशिवाय इथे असलेल्या व्याघ्र आणि सर्प गुंफा या त्यांच्या विशिष्ट आकारामुळे प्रसिद्ध आहेत. या टेकडीच्या माथ्यावरून भुवनेश्वरचा सगळा परिसर नजरेस पडतो. पुरातत्त्व खात्याने हा सगळा परिसर अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटका ठेवलेला आहे. ओडिशाच्या भटकंतीमध्ये उदयगिरी-खंडगिरी लेण्यांना भेट देऊन प्राचीन इतिहास आणि एका समृद्ध वारशाची ओळख करून घेणे अनिवार्य आहे.

सम्राट खारवेल आणि लेण्यांचा इतिहास –

इ.स.पूर्व दुसरे शतक (अंदाजे इ.स.पू १७४) हा सम्राट खारवेलाचा काळ समजला जातो. मगधच्या बलाढय़ मौर्य राजवंशाचा हा अवनतीचा काळ आहे. महाराष्ट्रात याच काळात सातवाहन राजवंशाचे राज्य होते. त्याच सुमारास ओडिशामध्ये चेदी राजवंश उदयाला आला. त्यांचे मूळस्थान चेदी जनपद म्हणजेच आताचे बुंदेलखंड हे होते. खारवेल हा याच राजवंशातला कर्तृत्ववान राजा. त्याला कलिंगचक्रवर्ती असे संबोधले जात असे. शिलालेखात एक महत्त्वाची नोंद सापडते ती म्हणजे, पूर्वी मगध नरेश नंद याने कलिंगावर विजय मिळवून तिथली जिनमूर्ती विजयचिन्ह म्हणून मगधाला नेली होती. मगधावरील विजयानंतर खारवेलाने ती बृहस्पती मित्राकडून पुन्हा हस्तगत केली. आणि तिची कलिंगात पुन्हा प्रतिष्ठापना केली. भारतीय इतिहासात मूर्तीचा हा सर्वात प्राचीन प्रस्तरलेखीय पुरावा आहे. सम्राट अशोकाच्या कलिंग विजयानंतर प्रथमच खारवेलाने कलिंगला आपले पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले. त्याच्या काळात कलिंगचा समुद्रमार्गे व्यापारसुद्धा खूपच बहरला होता. भारतभरातल्या अनेक जैन मुनींना पंडितांना बोलावून त्याने एक धर्मसंमेलन भरवले होते. त्या प्रसंगी जैनसंघाने खारवेलाला खेमराजा, भिखुराजा व धर्मराजा अशा पदव्या बहाल केल्या.

आशुतोष बापट

Leave a Comment