इंग्रज सत्तेला आव्हान देणारे उमाजी नाईक…
उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे 7 सप्टेंबर 1791 रोजी (रामोशी समाजात ) झाला. वडील दादोजी नाईक-खोमणे, आई लक्ष्मीबाई. वयाच्या 10 व्या वर्षी कुस्तीगीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. सातारा गादीचे छत्रपती राजे प्रतापसिंह यांच्याकडून नसरापूरला राममंदिरात त्यांचा गौरव करण्यात आला.
इंग्रजाना हाकलून लावण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडणारा पहिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचे कार्य क्रांतीवीरांना बळ देणारे ठरले.
१६ फेब्रुवारी १८३१ला इंग्रजाविरुद्ध त्यांनी बंड उभारले. शिवशाहीपासून पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी नाईक घराण्याकडे होती. कोणताही ह्ल्ला परतून लावण्याची त्यांची नेहमी तयारी असे. उमाजी उंचपुरे धिप्पाड होते. चांगले कुस्तीगीर असल्याने रोज दंड बैठकांचा व्यायाम करी. दांडपट्टा, कु-हाडी, तीरकामठा, गोफण, भाला फेक, घोड्यावर बसणे. तलवार चालवणे ही कला त्यांनी वडिलांकडून लवकरच अवगत केली होती.
1803 मध्ये दुस-या बाजीरावाल स्थानापन्न करुन इंग्रजाचा पाल्य म्हणून काम सुरु केले होते. बाजीरावाने पुरंदर किल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडुन काढून आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले होते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजांचे अत्याचार वाढत होते. त्यामुळे उमाजी नाईक जनतेच्या बाजूने लढण्यासाठी पुढे झाले. भारताच्या इतिहासात 1857 च्या उठावा अगोदर क्रांतीची स्वप्ने पाहणारे व 14 वर्षे इंग्रजाना सळो की पळो करुन सोडणारे पहिले क्रांतीकारक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
सातारा जिल्ह्यात चतुरसिंग भोसले यांच्या नेतृत्वाखाली तर, पुरंदर भागात उमाजी नाईक यांनी लुटालुट सुरु केली.1824 मध्ये कडेकोट बंदोबस्त असूनही भांबुर्ड्याची तिजोरी लुटली. आँक्टोबर महिन्यात जेजुरीच्या पोलीस चौकीवर हल्ला करुन बंदुका पळविल्या.जेणेकरुन इंग्रज हैराण होतील अशा मोहिमा ते आखीत. उमाजीला पकडून देण्यासाठी इंग्रजानी मोठे बक्षिस जाहीर केले. सर्वसामान्य लोकांना कुठलाही त्रास होणार नाही याची ते काळजी घेत.
इंग्रजाना हाकलून देण्याचे त्यांचे ध्येय होते. भुजबा, पांड्या हे उमाजीचे साथीदार होते. त्यांच्या मदतीने स्वराज्य स्थापन करुन राज्याच्या खर्चासाठी त्यांनी खंडणी गोळा केली. लोकांनी इंग्रजांना वसूल देऊ नये. कर भरल्यास घरे जाळून टाकण्याच हूकूम केला. आपला स्वतःचा दरबार भरविण्यास सुरवात केली. लोक त्यांना मानीत होते. राज्याचा विस्तार होत होता. ठिक ठिकाणी चौक्या बसवल्या. भोगा, पांडू, कृष्णा, अमृता, सत्तू, येसाजी यांच्या स्वतंत्र लहान लहान टोळ्या होत्या. सत्तूची स्वतःची टोळी उमाजींचा उद्देश कळल्यावर त्यांना नेता मानून त्यांच्या कार्यांत सहभागी झाली.
महाराष्ट्राच्या भूमीत इंग्रजाना पहिला हादरा आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न उमाजीने केला. उमाजी नाईक यांचे बालपणच शौर्याचा वैभवशाली वारसा असलेल्या पुरंदर किल्ल्याच्या परिसरात गेला. अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याची हिम्मत त्यांना शिवरायांच्या चरित्रातूनच मिळाली होती. वयाच्या १८ व्या वर्षी इंग्रजाच्या विरोधात उठाव करण्याचे धाडस त्यांनी दाखविले. विठुजी नाईक, कृष्णा नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळस्कर यांना बरोबर घेऊन जेजुरीत खंडोबारायावर भंडारा उधळीत इंग्रजा विरोधात बंड करण्याची शपथ घेतली.
कोणत्याही महिलेवर अन्याय झाला तर ते भावासारखे धाऊन जात. त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्या बाबत आपुलकीची भावना निर्माण होत होती. इंग्रजाना त्रास दिल्याने उमाजी यांना 1818 रोजी एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याच काळात ते लिहायला व वाचायला शिकले. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांच्या सरकार विरोधातील कारवाया आणखी वाढल्या. उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्यांच्या सोबत येऊ लागली.
राजे उमाजी नाईक यांनी 16 फेब्रुवारी 1831 रोजी इंग्रजी सत्तेविरोधात जाहीरनामाच प्रसिदध केला. लोकांनी इंग्रजी नोक-या सोडाव्यात. त्यांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा देऊ नये. देशवासियांनी एकाचवेळी जागोजागी गोंधळ घालून आराजकता माजवावी. इंग्रज राजवट लवकरच संपुष्टात येत आहे. त्यांना कोणी मदत करु नये. इंग्रजाना मदत केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करील.असे सांगून नवीन स्वराज्य उभारण्याचा प्रयत्न केला. स्वतःची फौज उभी केली. उमाजीने राज्यात स्वतःचा ध्वज निर्माण केला. शिवाजी राजांचे हुबेहुब अनुकरण करीत राज्य स्थापना केलं. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. जनताही उमाजींना मदत करु लागली. उमाजींचा जाहीरनामा इंग्रजांना हादरावणारा होता. 1829 साली सरकारने त्यांच्याशी समझोता करुन त्याला 120 बिघे जमीन दिली. गुन्हे माफ केले. नाईक पदवी दिली. जातीतील काही साथीदारांना नोक-या दिल्या. काही काळ त्यांनी ते मान्य केले.
उमाजींनी केलेल्या या उठावामुळे इंग्रज हादरुन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पुन्हा उमाजी स्वराज्य निर्माण करीन यांची भिती त्यांना वाटू लागली.उमाजीला पकडण्यासाठी माँन्कीटसने दिवेघाटाच्या माध्यावर सैन्याची छावणी टाकून तो शोध घेत होता. भोर, पानवडी, काळदरी, पिंगोरीच्या डोंगर द-यातून उमाजी नाईक यांचा वावर होता. उमाजीं नाईक यांची तडफ, बेडरपणा, लढाऊ वृती, शिवनीती, प्रामाणिकपणा, जाज्वल्य देशप्रेम, चपळाई, खंडोबा प्रती असलेली देशभक्ती आणि जनतेत असलेला आदरयुक्त दरारा, सैन्यावरचा वचक यामुळे त्यांनी स्वराज्याचा दुसरा लढा उभारला होता.
पुन्हा जनतेचे राज्य उमाजींच्या रुपाने येईल अशी शक्यता होती. पण महाराष्ट्राच्या मातीत आणखी काही नवीनच घडणार होते. फितुरीचा जुनाच शाप या मातीत आहे. काळोजी नाईक आणि नाना चव्हाणांनी गुप्त माहिती पुरवली. जोडीला जिजाला मदतीला घेऊन अखेर इंग्रजानी डाव साधला. 15 डिसेंबर1831 रोजी भोर तालुक्यातील उत्रोली गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजानी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीत काळ्या खोलीत ठेवण्यात आले. इंग्रज अधिकारी माँकिन टाँस याने उमाजीची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे.
उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवून न्यायधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून उमाजी नाईक यांना फाशीची शिक्षा सुनावली. खडकमाळ आळीत मामलेदार कचेरी समोर देशासाठी हसत हसत नरवीर उमाजी नाईक 3 फेब्रुवारी 1832 रोजी फासावर चढले. त्यावेळी त्यांचे वय होते 43 वर्षाचे. इंग्रजानी त्यांचे साथीदार खुशाबा नाईक व बाबू सोळस्कर यांनाही फाशी दिली. इतरांना दहशत बसावी म्हणून त्यांचा देह पिंपळाच्या झाडाला तसाच तीन दिवस लटकत ठेवला होता. अशा प्रकारे धगधगत्या क्रांतीकारकाच्या बंडाचा शेवट झाला.
लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे