🚩 ऊमाजींचा स्वातंत्र्यासाठीचा जाहिरनामा🚩
__________________________
ई. स. 1831 च्या फेब्रुवारीच्या शेवटी ऊमाजी एक नवा कार्यक्रम घेऊन विलक्षण धाडसाने व आत्मविश्वासाने ईंग्रजांना सामोरे जाण्यास सिद्ध झाला.ऊमाजीने स्वतःच्या व भुजाजीच्या नावाने ता. 16 फेब्रुवारी 1631 ला एक जाहिरनामा जाहीर केला . त्यात तो स्वतःस स्वतंत्र सरकारचा प्रमुख म्हणवुन घेत असे . ईग्रज सरकारचे दिवस भरले असून आत्ता रामोंशाच्या नेतृत्वाखाली नवी व्यवस्था निर्माण होत आहे . त्यामध्ये सर्वांनी सामिल व्हावे अशी ऊमाजीची हाक होती.
_____ जाहिरनामा _______
ऊमाजी , भुजाजी अन कृष्णाजी यांचा बाभुळसर नावाच्या खेडेगावाजवळ मुक्काम असताना एका ब्राह्मणाकडून जाहिरनामा तयार करवून घेतला . त्यातील कलमे पुढिलप्रमाणे _______________
1) युरोपियन दिसले की त्यांना ठार मारावे , मग ते शिपाई असोत की नसोत . हि कामगिरी मोठ्या प्रमाणावर करणा-या व चांगल्या रितीने करणारास नवीन सरकारमधून जहागिरी , ईनामे व रोख पैशांची बक्षिसे मिळतील.
2) ज्यांची वंशपरंपरागत वतने , तनखे ई. कंपनी सरकारमुळे गेली असतील ती सर्व , त्यांनी नव्या सरकारला पाठिंबा दिल्यास त्यांची त्यांना परत केली जातील.
3) कंपनी सरकारच्या सेवेतील पायदळ व घोडदळातील शिपायांनी कंपनीची हूकुमत झुगारून द्यावी आणि युरोपियन अधिक-यांना पकडावे आणि हे मानायचे नसेल तर नव्या सरकारच्या शिक्षा भोगण्यास तयार असावे .
4)हिंदुस्थानच्या सर्व रयतेने एकदम एकाच वेळी जन आंदोलन करून देशात गोंधळ व अराजक माजेल असे करावे .
5) युरोपियनांच्या मालमत्ता कोणीही लुटाव्यात किंवा नष्ट कराव्यात .कोणाकडुनही त्यांना मिळालेल्या लुटीचा हिशेब मागण्यात येणार नाही. ईंग्रज सरकारचे सर्व खजिने लुटावेत ह्या लुटींचेही हिशेब घेतले जाणार नाहीत.
6) कोणत्याही गावाने ईंग्रजांना महसुल द्यावयाचा नाही . तसे केल्यास त्या गावाचा विध्वंस केला जाईल .
7) जी जात अथवा मुसलमान या जाहिरनाम्यांविरूद्ध वागतील ते आपणहुन आपल्यावर मोठे संकट वा दैवी आपत्ती ओढावून घेतील .
8) शास्त्रातच असे सांगितले आहे की, ईग्रंजाचे राज्य नष्ट होणार आणि ते लोक लवकरच जाऊन नव्या न्यायधिष्टित राज्याची स्थापना होईल .
हा जाहिरनामा ऊमाजीने प्रसिद्ध करण्यासाठी फलटण भागात एका गावच्या पाटलांस दिला . त्याने तो ईंदापूरच्या मामलेदारास दिला . त्याने तो सासवडला आणि तेथुन तो पुण्यात पोहचला.
जाहिरनाम्याची मूळ मराठी प्रत ऊपलब्ध नाही . पण त्या पुण्यास पोहचलेल्या जाहिरनाम्याचे कॅप्टन मॅकिनटाॅशने आपल्या ऊमाजीवरील डायरीत ईंग्रजीत भाषांतर केले . त्या पुस्तकाच्यामार्फतच आज आपणांस त्या जाहिरनाम्याचा मराठी अनुवाद वाचावयास भेटतो .
जो ऊमाजी आपल्या रयतेकरीता जाहिरनामा काढतो . त्याचा मराठी अनुवाद आपणांस भेटू नये ? ऊमाजीबद्दल मॅकिनटाॅशने लिहीले नसते तर दंतकथापलीकडील व भोळ्या समजुतींपलिकडील खरा ऊमाजी आपणांस समजला असता का ?
ऊमाजीचे नाव संपुर्ण हिंदुस्थानी रयत किती जाणून होती ते खंडेरायासच ठाऊक ! ऊमाजी मात्र ख-या अर्थाने संसारवेलीवर बिल्वदळ वाहुन लढत होता .
ऊमाजीने काढलेला हा देशाच्या स्वातंत्र्याचा पहिलावहिला जाहिरनामा !
ऊमाजीने स्वातंत्र्यासाठी केलेले हे देशातील पहिलेच बंड !
ऊमाजीच्या 03 फेब्रुवारी 1832 च्या मृत्यूनंतर ह्या देशात स्वातंत्र्याचे बंड निर्माण होण्यास थेट 1857 चे साल ऊजाडले .
जेव्हा सबंध हिंदूस्थानची रयत 1857 ला बंड पुकारून स्वतंत्र होण्यास धडपडत होती !
तेव्हा ते स्वातंत्र्याचे स्वप्न ऊराशी कवटाळुन एक रामोशी फौलादी फक्कड 25 वर्षांपूर्वी केव्हाच खडकमाळला पिपंळावर चार दिवस फासावर लटकत झोपी गेला होता .
साभार : आद्यक्रांतीवीर ऊमाजी नाईक ( श्री. शिवाजी एक्के ).
प्रकाशचित्र : नरवीर ऊमाजीची वीरमुर्ती .
स्थल : आद्यक्रांतीवीर ऊमाजी नाईक ह्यांचे समाधीस्थल . खोमणेमळा . भिवडी . ता. पुरंदर .
✒#दुर्गभ्रमणगाथा_समुह.
सतिश शिंदे सह्याद्रीवेडा .