महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,97,867

उंबरखिंडीचे युद्ध, २ फेब्रुवारी १६६१

Views: 1499
2 Min Read

उंबरखिंडीचे युद्ध, २ फेब्रुवारी १६६१ –

शाहिस्तेखानाच्या मनात कोकणावर चाल करून तेथील शिवछत्रपतींची सत्ता निर्मूलन करण्याचे होते. त्या दृष्टीने सन १६६० च्या एप्रिलपासून इस्माइलखानाच्या नेतृत्वाखालीं तीन सहस्र मोगली सेनेने कल्याणला वेढा दिला होता. परंतु त्यात कोणतेही यश आलेले नव्हते. त्यामुळे एखाद्या खंद्या सेनापतीवर हे कार्य सोपवावे म्हणून त्याने कारतलबखानाची यासाठी निवड केली. हा कारतलबखान सन १६५७ मध्य दाराच्या वतीने चालून आलेल्या राणा जसवंतसिंगाशी औरंगजेबाचे जे युद्ध झाले त्यात आपल्या पराक्रमाने तळपला होता. औरंगजेबाने त्याला “चार हजारी ‘ सरदार केले होते.(उंबरखिंडीचे युद्ध)

कार्तलबखानाला चौल, कल्याण, भिवंडी पनवेल, नागोठाणे हे प्रदेश प्रथम हस्तगत करून कोकणातून छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता निर्मूल करण्याचा स्पष्ट आदेश होता, व योग्य वेळी मुख्य सेनापति शाहिस्तेखान त्याची पाठराखण करणार होता.

कारतलबखानाबरोबर तोफा वगरे अवजड सामानही पुष्कळ होते. पुण्याहुन लोहगडच्या मार्गाने बोरघाटाच्या दक्षिणेकडून कारतलबखान कोकणात उतरत होता. महाराजांच्या मोहिमेवर हे मोठेच संकट होते. गुप्तचराच्या या वार्तेने प्रथम कारतलबखानाची व्यवस्था लावणे हे महत्वाचे ठरले.

महाराज राजगडावर असल्यामुळे त्यांना गाठण्यासाठी मोगली सैन्य राजगडावर चालून येण्याचाही संभव होता. त्यामुळे सह्याद्रीवरून हे मोगली सैन्य खाली उतरत असता त्याचा समूळ फडशा पाडणेच आवश्यक होते. यासाठी कारतलबखानाच्या मार्गावरील घनदाट अरण्यांत स्वराज्याचे सैनिक गुप्तपणे राहिले.

अवजड सामानासह दाट झाडीतून प्रवास करतांना कारतलबखानाचे चांगलेच हाल झाले. पण अहंकाराने तो पुढे जात होता. या दाट अरण्यांतून जातांना शिवाजीच्या प्रदेशांत आपण शिरत आहोत, जावळीच्या अरण्यांत अफझलखानाच्या सैन्याची जी दुर्दशा झाली ती आपलीही मराठयांच्या हातून होण्याचा संभव आहे अशी भीतिही त्याच्या मनात डोकावत होती. पर्वतावरून खाली उतरून या सैन्याने निबिड अरण्यातील पाऊलवाट धरली. ते उंबरखिंडीजवळ येताच एकदम रणभेरी वाजल्या व महाराजांचे सैनिक या सैन्यावर तुटून पडले. मध्यान्हापर्यंत कसावसा यावनी सेनेने धीर धरला. पण मग ती पळ काढू लागली. पण महाराजांच्या सैनिकांनी साऱ्या वाटा रोखून धरल्याने त्यांना शरणागतीशिवाय दुसरा मार्ग उरला नाही.

कारतलबखानही घाबरला आणि त्याने जीव मुठीत धरून शरणागतीसाठी दूत पाठवला. “शिवभारत” या ग्रंथात आलेल्या उल्लेखानुसार, या कारतलबखानाची जी प्रार्थना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी निवेदन केली त्यावरून सर्वनाशाच्या भयाने कारतलबखानाची कशी अवस्था झाली होती याची कल्पना येते.

रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment