महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,19,850

शासकांना विश्रांतीची परवानगी नाही !

Views: 1310
5 Min Read

शासकांना विश्रांतीची परवानगी नाही !

विजापूर आणि गोवळकोंड्याची राज्ये जिंकून घेतल्यानंतर , वजिराने औरंगजेबाला पत्र लिहिले , ” देवाच्या दयेने आणि सदैव बुलंद असणाऱ्या तुमच्या नशिबाने दोन मोठी राज्ये आपण जिंकली आहेत ! तेव्हा आता बादशहांनी हिंदुस्थानच्या (उत्तरेतल्या) स्वर्गीय प्रदेशात प्रस्थान करणे हे धोरणात्मक दृष्टीने योग्य ठरेल . असे केल्यास , बादशहांनी मिळवायचे ते सर्व मिळवले आहे आणि आता अजून काही मिळवायचे बाकी राहिलेले नाही याची जगाला खात्री पटेल !”(शासकांना विश्रांतीची परवानगी नाही !)

वजिराच्या या पत्राच्या कडेच्या भागावर औरंगजेबाने आपले उत्तर लिहिले , ” वाडवडिलांपासून मुघल तख्ताची सेवा करत आलेल्या तुझ्यासारख्या नोकराने अशी विनंती करणारे पत्र लिहावे याचे मला नवल वाटते !  “आता काहीही  करायचे शिल्लक राहिलेले नाही ” असे जगाला वाटावे अशी जर तुझी इच्छा असेल तर ते सत्याच्या विरुद्ध होईल. या मर्त्य शरीरात जो पर्यंत शेवटचा श्वास बाकी आहे तोपर्यंत काम  आणि कष्ट यापासून सुटका नाही !”

पद्य :-

“असंख्य ध्येय आणि आशा आकांक्षांच्या पथावर चालणाऱ्या पथिकाला मार्गदर्शकाची गरज नसते
जो पर्यंत देहात प्राण आहेत , तोपर्यंत आयुष्याचा मार्ग सोपा नसतो
माझे मन घराकडे ओढ घेत आहे , परंतु आता दव उडून गेले आहे  तरी ते (वेडे) बागांच्या आठवणीने अस्वस्थ होते !”

शहाजहाँ  दिल्ली-आग्र्यामध्ये बसून राहण्याऐवजी , बाहेर पडून सतत मोहिमा करत राहिला असता तर आजची परिस्थिती निराळी  दिसली असती ! तेव्हा या पुढे अशा प्रकारची विनंती पुन्हा न करण्याची सुबुद्धी तू दाखवलीस आणि किल्ले कब्जा करण्याच्या मोहिमेचा त्रास सहन केलास तर भविष्यात मी स्वतः किल्ल्याच्या वेढ्याच्या कामात लक्ष घालेन

पद्य :-

” प्रेमात बुडालेल्या माणसाला संकटाची / धोक्याची भिती वाटते काय ?
ज्या माणसाने आपले डोकेच गमावले आहे त्याला डोके दुखीची चिंता वाटेल काय ? ”

देवाच्या दयेने मी ज्या ज्या ठिकाणी राहिलो आहे , त्या त्या ठिकाणी असलेल्या चीजवस्तूंपासून मी स्वतःला अलिप्त ठेवत आलेलो आहे , त्यामुळे माझा मृत्यू मी सोपा  करून ठेवला आहे !

पद्य :-

” तुमच्या हृदयाला पडलेले  इहलोकीच्या वस्तूंचे आणि नात्यांचे पाश हळूहळू सोडवा
नाहीतर , एके दिवशी मृत्यू  तुमच्या ध्यानीमनी नसताना अचानक हे सर्व पाश एका क्षणात हिसकावून घेईल !”
(या सुमारास औरंगजेबाचे वय  ६९ वर्षांचे होते )

– ‘ अहकाम – ए – आलमगिरी ‘  अर्थात  आलमगीराच्या ( औरंगजेबाच्या ) आख्यायिका किंवा आठवणी या पुस्तकामधून
* शिवछत्रपतींचा व्यंकोजीस उपदेश *
इ. स. १६५९ रोजी शिवछत्रपतीनी व्यंकोजी राजे यांना लिहिलेल्या पत्रातून देखील “विश्रांती घेणे आणि काहीच न करणे यात पुरुषार्थ नव्हे !” हेच स्पष्ट होते .

शिवछत्रपती लिहितात –

” राजश्री रघुनाथ पंडित त्या प्रांते आहेती ते काही इतर नव्हेती ; आपले पुरातन. तुम्हासी कोण्हे रीतीने वर्तावे हे निपुण जाणितात. आम्हास मानितात तैसे तुम्हाला मानितात . आम्ही त्यांचे ठाई विश्वास ठेविला आहे तैसा विश्वास तुम्हीही ठेऊनु कार्येप्रयोजनास परस्परे अनुकूल व साहाये होऊन वर्तत जाणे . पुरुषार्थ व कीर्ती अर्जणे. रिकामे बैसउनु लोका हाती नाचीज खावउनु काल व्यर्थ न गमावणे . कार्यप्रयोजनाचे दिवस  हे आहेती , वैराग्य (काही उद्योग ना करता देवधर्म करत रहाणे)  उतरवई ( म्हातारपणी ) कराल ते थोडे. आजी उद्योग करून आम्हासही तमासे ( पराक्रम ) दाखवणे. बहुत काय लिहिणे  तुम्ही  सुज्ञ असा ”

वैराग्य उतरवई म्हणजे म्हातारपणी कराल तितके थोडे आहे असे शिवछत्रपती म्हणतात , परंतु शिवछत्रपतींसारख्या कर्तृत्ववान आणि दीर्घोद्योगी महापुरुषांना म्हातारपण येत नाही, त्यामुळे ते सतत कार्यमग्नच असतात ! हा  यातला  गूढ अर्थ आहे !

बहुत काय लिहिणे  तुम्ही  सुज्ञ असा !

टीप :- औरंगजेबाच्या संदर्भातील प्रसंग येथे देण्यामागचा उद्देश हा त्याचे उद्दात्तीकरण करणे हा  नसून , दीर्घोद्योग हे त्याचे स्वभाववैशिष्ठ्य दाखवणे हा आहे. औरंगजेब धर्मवेडा , परधर्मद्वेष्टा , जुलमी व क्रूरकर्मा असा शासक होता,  हे उपलब्ध असलेल्या शेकडो पुराव्यांच्या आधारे सूर्यप्रकाशा इतके  स्पष्ट झाले आहे.(शासकांना विश्रांतीची परवानगी नाही !)

संदर्भ :-

१) Anecdotes of  Aurangzeb (अहकाम ए आलमगिरी) – हमीद -उद-दीन खान बहादूर . इंग्रजी अनुवाद श्री जदुनाथ सरकार
२) शिवछत्रपतींची पत्रे – खंड १- डॉ. सौ. अनुराधा गोविंद कुलकर्णी

चित्रे :-

शिवछत्रपतींनी व्यंकोजीस लिहिलेले पत्र (सौ. कुलकर्णी यांच्या पुस्तकातून )

लेखक :- सत्येन सुभाष वेलणकर, पुणे

Leave a Comment