महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,781

छत्रपती शिवरायांच्या मस्तकावरील व्रण

Views: 2536
3 Min Read

छत्रपती शिवरायांच्या मस्तकावरील व्रण –

छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे ,त्याच्या शरीराची ठेवण , उंची याविषयीचे वर्णन काही समकालीन व्यक्तींनी केलेले आढळून येते . छत्रपती शिवाजी महाराजांची चित्र देखील समकालीन चित्रकारांनी काढलेली आढळून येतात . त्याआधारे छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे याविषयी अंदाज बांधता येतात. शिवाजी महाराजांच्या डोक्यावर एक जखमेचा व्रण असल्याच्या नोंदी आढळून येतात . प्रतापगडाच्या युद्धात महाराजांनच्या मस्तकावर अफझलखानाच्या तरवारीचा वार होऊन एक छोटी जखम झाली होती त्याचे वर्णन आपल्याला “ सप्तप्रकरणात्मक चरित्र “ या बखरीत आढळून येते. सप्तप्रकरणात्मक चरित्र या बखरीत छत्रपतींच्या मस्तकावर अफझलखानाद्वारे झालेला आघाताचा व त्याद्वारे झालेल्या जखमेचे वर्णन पुढीलप्रमाणे आढळून येते.(छत्रपती शिवरायांच्या मस्तकावरील व्रण)

खानांनी भेटण्यातच हातीं धरून पुढे वोढून घेऊन डावे हाताखाली दाबून धरले , आणि हातीं तरवार कट्यार होती ते कटार चालविली. तेसमयीं महाराजांचे आंगात जिरे होती , आंग चपळाईने चोरून घेतांच वार कायम न जाला. खानांनीच अगोदर दगा व पुरुषार्थ केला , फार चांगले जालें , म्हणून हातांत वाघनखें होतीं त्या हातानी बहुत जलदी करून पाठीमागून हात पोटावरी चालविला . झगा बारीक होता . व पोटालाही मोठा ( होता ) . वार कारगार होऊन लागलीच आंतडी बाहेर आली. तेव्हां बगलेंत दाबून धरिलें होतें तें लौकर सोडून ढकलून दिल्हे . ‘ शिवाजीने दगा केला , शिपाईगिरीची शर्थ केली , ‘ ऐसें बोलोन डावे हातें पोटला सावरून फिरंगेचा वार ‘ आब हमारी तलवार देखो ‘ म्हणून महाराजावरि चालविला . डोईत जिरे होती ती किंचित तुटोन जखम गव्हाइतकी लागली. महाराजानीं सफाई करून ‘ तुम तो बडे और पठाण , आब हमारी भवानी शिवाजीकी देखो ‘ म्हणून तलवारीचा वार खांद्यावर केला. त्यांनी पोटापर्यंत वार जाला. खान पुरे होऊन मुर्दा पडला. हे पाहून महाराज निघते जाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात हि महाराजांना झालेली एकमेव जखम होती .

९१ कलमी बखरीमध्ये शिवाजी महाराजांच्या या मस्तकावरील जखमेवरून जीजाबाईंनी शिवाजी महाराजांस ओळखल्याचा उल्लेख येतो . महाराज आग्र्यातील औरंगजेबाच्या कैदेतून निसटून सुखरूप राजगडावर एका बैराग्याच्या वेशात पोहचले. राजगडावर असलेल्या पहारेकऱ्यानकडे महाराजांनी जीजाबाईंच्या भेटीची परवानगी मागितली. जीजाबाईंनकडून परवानगी मिळताच महाराज सरळ आत गेले व आईच्या पायावर स्वतःस झोकून दिले . जिजाबाईंनी त्यांच्या शिवबास ओळखले नाही व एक बैरागी आपल्या पायावर डोके ठेवत आहे हे पाहून त्या चकीत झाल्या . शिवाजी महाराजांनी आपल्या डोक्यावर असलेले मुंडासे काढून जीजाबाईंनच्या मांडीवर आपले डोके ठेवले. अफझलखानवधाच्या प्रसंगी महाराजांनच्या डोक्यावरील झालेल्या जखमेचा तो व्रण पाहून जिजाबाईंनी त्यांच्या शिवबास ओळखले. महाराज सुखरूप राजगडावर आलेले पाहून त्यांना आनंद झाला.

नागेश सावंत

Leave a Comment