श्री उपाशी विठोबा, पेरुगेट, सदाशिव पेठ –
सदाशिव पेठेतील पेरुगेट जवळ असलेलं हे विठोबाचे स्थान, पुण्यातील एक महत्त्वाचं मंदिर आहे. या विठ्ठलाला हे नाव पडण्यामागे एक गोष्ट आहे. आज आषाढी एकादशी निमित्त आपण या विठू माऊलीची माहिती जाणून घेऊयात. पेशवेकाळात गिरमे नावाचे एक सराफ होते. विठ्ठलाचे भक्त असल्याने ते दरवर्षी पंढरपूरला जात. कालांतराने वयोमानानुसार पंढरीच्या वारीला खंड पडला. परंतु हताश न होता, त्यांनी आपल्या जवळ असलेले सगळे पैसे खर्च करुन सदाशिव पेठेतील या भागात जागा विकत घेतला. तिथे सन १७९० मध्ये श्रीविठ्ठलाचे मंदिर बांधले व तिथेच राहू लागले.(श्री उपाशी विठोबा, पेरुगेट)
गिरमे दिवस रात्र विठ्ठलाची भक्ती करत. त्यांनी त्यांचा आहारही कमी केला. सकाळी व-याचे तांदूळ, दाणे आणि रात्री एक खारीक एवढाच त्यांचा आहार होता. या काळात शुक्रवार पेठेत राहणारे नाना गोडबोले विठ्ठलाच्या पुढे भजन-किर्तन करत असत. त्यांची ही भक्ति बघून गिरमे यांचा मंदिराची मालकी गोडबोले यांना दिली. गोडबोले यांनी नुसती मालकीच स्वीकारली नाही तर गिरमे यांचे उपवासाचे व्रत देखील अंगीकारले.
जेव्हा गोडबोले विठ्ठलासमोर किर्तन भजन करत तेव्हा गंगाधरबुवा काळे त्यांच्यामागे टाक धरत. गोडबोले यांना आपल्यामागे मंदिराची व्यवस्था काळे यांना दिली. गिरमे आणि गोडबोले यांनी सुरु केलेले उपवासाचे व्रत काळेंनीही चालू ठेवले. ते फक्त ताक आणि लाह्याचे पीठ खात. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वंशजांनी मंदिराची व्यवस्था पाहिल व आजही बघत आहेत.
अशा प्रकारे या तिघांनीही उपवासाचे व्रत शेवटपर्यंत पेलले. यामुळेच या विठोबाला “उपाशी विठोबा” असे नाव पडले. रस्तारुंदीत मंदिराचा बराचसा भाग गेला. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे मंदिराचा गाभारा आहे. आत श्रीविठ्ठल रुख्मिणी यांची काळ्या पाषाणात घडवलेली सुबक मुर्ती आहे.शेजारी राही-विठ्ठल-रखुमाई च्या छोट्या रेखीव मूर्ती आहेत. खास महिरपी कमानी असलेल्या मखरात माऊली विराजमान झाले आहेत.
गाभा-यासमोर छोटा सभामंडप आहे. त्यात गरुड देवाची मूर्ती आहे. सभामंडप लाकडी खांबांवर तोलला असून छतावर काचेच्या हंड्या टांगलेल्या दिसतात. भिंतींवर संतांचे चित्र रेखाटले आहे.
तर अशा या ऐतिहासिक २०० वर्ष जूने विठ्ठल मंदिराला आवर्जून भेट द्या !
संदर्भ : पुणे नगर संशोधन वृत्त.
© वारसा प्रसारक मंडळी