महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,23,977

उत्तर मराठेशाहीतील विमा पद्धती

Views: 2453
3 Min Read

उत्तर मराठेशाहीतील विमा पद्धती –

इसवी सन १९१९ मध्ये सर दोराबजी टाटा यांनी न्यू इंडिया अशुरन्स (New India Assurance company) या जनरल इन्शुरन्स कंपनीची स्थापना केली. या घटनेला आता शंभर वर्षाहून जास्त काळ लोटला आहे. जनरल इन्शुरन्सचा व्यवहार करणारी खाजगी संस्था ही त्याकाळातील एक आधुनिक व मुलुखावेगळी संकल्पना म्हणून त्याचे उद्योग जगतातून व सर्वसामान्यांकडून स्वागत झाले असावे यात शंका नाही. व्यापारी संस्था ज्यावेळी एका ठिकाणहून दुसरीकडे कच्चा वा पक्का माल पाठवतात तेव्हा त्याचा विमा केला जातो.मित्रानो, न्यू इंडिया अशुरन्स कंपनी स्थापित होण्याच्या आधी सव्वाशे वर्षांपूर्वी विमा उतरवण्याची पद्धत आपल्याकडे हिंदुस्थानात अस्तित्वात होती हे आपल्याला कदाचित ठाऊक नसेल. उत्तर मराठेशाहीतील वर्ष इसवी सन १७९२ मधला हा प्रसंग आहे !(उत्तर मराठेशाहीतील विमा पद्धती)

सन १७९२च्या दरम्यान पेशव्यांच्या कुटुंबापैकी एका व्यक्तीस एक पंचरत्नांचा (किंवा तत्सम) आगळावेगळा व अत्यंत किंमती असा दागिना हवा होता. असा दागिना उत्तरेत जयपूरच्या सराफी बाजारात उपलब्ध असावा अशी शक्यता असल्याने मराठ्यांचा दूत जयपूर येथे पोंचला. तेथे चौकशी केल्यावर हवी तशी चीज न मिळाल्याने त्याने काशी बनारस येथे चौकशी केली. काशी येथील एका सराफाकडे तशी वस्तू आढळून आली. तेव्हा मराठी जासूदाने तो दागिना पेशव्यांच्या पसंतीसाठी पुण्यास पाठवण्याची विनंती केली. परंतु तो दागिना अति मूल्यवान असल्याने व किंमत खूपच जास्त असल्याने तो सराफ दागिना पाठवायला का कू करू लागला. पण मराठ्यांचा दरारा व दबदबा एव्हढा होता की ‘मराठे है तो मुमकिन है’ ही म्हण त्याकाळात सुद्धा प्रचलित होती.

जासूदांच्या सांगण्यावरून तो सराफ चीज द्यायला तयार झाला, पण एका अटीवर! त्या व्यापाऱ्याने सांगितले की या किंमती वस्तुंची ने आण करण्यासाठी विमा उतरावा लागेल. काशीमध्ये त्याचा योग्य तो विमा उतरवून पुण्याच्या दुसऱ्या सराफाकडे दागिना पाठवावा. पुण्यास शनिवारवाड्यात तो दागिना दाखवण्यास पाठवला जावा. पेशव्यांच्या व्यक्तील दागिना पसंत पडल्यास पुण्यातील व्यापाराकडे मोबदल्याची पैसे देतील, पसंत न पडल्यास सरकारातून फक्त विम्याचे पैसे देण्यात यावेत व दागिना परत काशीस पाठवला जावा. असा करार मराठी दूताबरोबर केला गेला.

मित्रानो,सांगायचा मुद्दा म्हणजे या घटनेवरून अठराव्या शतकात सुद्धा हिंदुस्थानातील व्यापाराची पद्धत कशी प्रगत होती याची आपल्याला प्रचिती येते.त्या काळात सुद्धा मौल्यवान वस्तूंची वाहतूक करताना त्या वस्तूंचा रीतसर विमा उतरवण्याची पद्धत प्रचलित होती. तसेच काशीच्या व्यापाऱ्यांचे पुण्यातील व्यापाऱ्यांशी  संबंध होते. ही घटना डिसेंबर १७९२च्या एका पत्रात नमूद केलेली आहे.

संदर्भ:शिंदेशाही इतिहासाची साधने भाग १०,पत्रक्रमांक १३५,

मूळ संपादक आनंद फाळके

लेखन व संकलन:प्रमोद करजगी

Leave a Comment