महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,214

उत्तरेश्वर देवालय कोल्हापूर | Uttareshwar Temple, Kolhapur

Views: 1426
3 Min Read

उत्तरेश्वर पेठ व उत्तरेश्वर देवालय कोल्हापूर | Uttareshwar Temple, Kolhapur –

कालानुक्रमाने प्राचीन ब्रह्मपुरी केंद्रानंतर उत्तरेश्वर हे केंद्र अस्तित्वांत आले असावे असे म्हंटले जाते. कारण वसाहतीसाठी ही जागा ब्रह्मपुरी इतकी योग्य नाही. सर्वात सोयीच्या जागेवर प्रथम वसाहत निर्माण केली जाते मग अन्य सोयीच्या जागेवर वसाहत होते, हा सर्वसामान्य नियम आहे. ही जागा नदीपासून उंचावर आहे; परंतु ब्रह्मपुरी टेकडी आहे इतक्या उंचीवर ही जागा नाही. शिवाय नदीपासून लांब देखील आहे. महापुराच्या वेळी याच्या दक्षिण, पश्चिम व उत्तर बाजूस नदीचे पाणी पसरते. ब्रह्मपुरी नंतर उत्तरेश्वर जवळही फार त्यामुळे प्राचीन काळी खेडे वसले असावे.(उत्तरेश्वर देवालय, कोल्हापूर | Uttareshwar Temple, Kolhapur)

ब्रह्मपुरीप्रमाणे या भागातही उत्खनन करते वेळी अनेक जुने अवशेष सापडले; पण येथे त्यावेळी उत्खनन कमी झाले आणि आतां इतक्या दाट वस्तीत उत्खनन होणे शक्य नाही. याच उत्खननात उत्तरेश्वर महादेव मंदिराचे पायाचे बांधकाम पन्नास ते साठ फूट असल्याचे दिसून आले. या केंद्राला ‘उत्तरेश्वर’ हे नाव कधी पडले हे सांगता येत नाही.

उत्तरेश्वर मंदिर –

उत्तरेश्वर पेठेत एका टेकडीवर जे देवालय आहे ते हेच शंकराचे फार जुने असे पूर्वाभिमुख उत्तरेश्वर देवालय. हे भक्कम असे चौरसाकृती मंदिर असून, शंकराची पिंडी इतकी मोठी आहे की, तशी पिंड दुसरीकडे क्वचितच पहावयास मिळते. तिची सध्याची उंची ५ फूट ३ इंच असून, रूंदी ५ फूट आहे. पूजेला सोयीचे व्हावे म्हणून तिची उंची कमी केल्याचे सांगितले जाते. पिंडीच्या समोर नंदी आणि आणि पश्चिमेला दोन्ही कोपऱ्यात उजवीकडे गणपती व डावीकडे पार्वती यांच्या मूर्ती आहेत. बाहेर सभामंडपात विरुद्ध बाजूस ‘अकरा’ मारुतीचे लहानखुरे मंदिर आहे! देवालयाच्या मागील बाजूस सळसळणारा भला मोठा ९०-१०० वर्ष जुना पिंपळ वृक्ष आहे. मंदिरात न्यायमूर्ति रानडे यांनी काही काळ वास्तव्य केले होते. त्यांनी आपल्या मृत्युपत्रात या देवाच्या पूजाअर्चेसाठी थोडी आर्थिक तरतूद करून ठेवली आहे.

हे देवालय केंव्हा बांधले गेले यासंबंधी काहीच पुरावा नाही; म्हणून उत्तरेश्वर हे नाव केंव्हा संबोधले गेले हे सांगता येत नाही. अशी माहिती मला मिळाली होती; परंतु कोल्हापूरचे प्रसिद्ध चित्रकार शामकांत जाधव यांनी लिहिलेला उत्तरेश्वर वरील एक लेख त्यांच्या पत्नींकडून मिळाला. त्यात असे लिहिले आहे की, ‘हे मंदिर चालुक्य राजा पुलकेशी याने इ. स. ६१० च्या सुमारास बांधले, अशी माहिती प्रसिद्ध इतिहास संशोधक कै. ग. ह. खरे यांनी दिली आहे.’

उत्तरेश्वर हे नाव ब्रह्मपुरीतील लोकांनी ठेवलेले नाही. कारण उत्तरेश्वर हे ब्रह्मपुरीच्या दक्षिणेला आहे. असे म्हणता येईल की, अंबाबाईचे देऊळ वगैरे भागांत वस्ती झाल्यावर तेथील लोकांनी ‘उत्तरेश्वर’ हे नाव ठेवले असावे. एकोणिसाव्या शतकांतील नगरपालिकेच्या कचेरीत काही जुन्या कागदपत्रात या भागाला ‘लगमापूर’ असे नाव वापरले आहे अशी माहिती मिळाली; पण हे नाव फार काळ रूढ राहिले नाही. लगमा हे ‘लक्ष्मी’ चे एक स्वरूप आहे.

आषाढ-श्रावणात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी येथे होते. एका टेकडीवर वसलेले असे हे जुने मंदिर कोल्हापूरकरांचे श्रद्धास्थान आहे.

– ©वैभव राजेंद्र गुरव

Leave a Comment