महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,172

वाघ्या कुत्र्याची समाधी

By Discover Maharashtra Views: 4324 6 Min Read

वाघ्या कुत्र्याची समाधी –

रायगडावरील वाघ्याचे स्मारक हा एक वादाचा विषय . वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वेध घेण्याचा हा प्रयत्न. वाघ्या कुत्र्याची समाधी –

कुत्र्यास वाघ्या हे नाव कोणी दिले : –

वाघ्या कुत्र्याची दंत कथा लिखित स्वरूपात “महाराष्ट देशातील किल्ले ” या १९०५ साली प्रकाशित झालेल्या चि . ग. गोगटे यांच्या पुस्तकात येते. त्यातील मजकूर असा :- महाराज्यांचा अंत झाल्यावर त्यांचे प्रेत पालखीत घालून दहन भूमीवर आणले त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता. दहन विधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालविली आहे , असे त्या कुत्र्याने पाहताच त्याने धावत जाऊन एकदम महाराज्यांच्या चितेत उडी घातली , व आपणास जाळून घेतले ”

इ. स. १९१४ साली राम गणेश गडकरी यांच्या राजसंन्यास या नाटकात या कुत्र्याचे नाव वाघ्या असे ठेऊन त्याला ओळख देण्यात आली. नाटकातील वाघ्या हे पात्र दंतकथेवर आधारित होते. वाघ्याच्या समाधीवर राजसन्यास नाटकामधील वाक्ये कोरण्यात आली “थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्था घरचे श्वान खरोखरीच सर्वांनी मन देण्यासारखे होते. हा इनामी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे. अखेर, प्रभूचे शुभवसान झाल्याबरोबर या मुक्या इनामी जिवाने त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली.

राम गणेश गडकरी यांच्या राजसंन्यास नाटकावरून –

वरील दोन्ही घटनांचा विचार करता महाराष्टामध्ये कुत्र्या विषयी दंत कथा होती हे निश्चित. कुत्रा आगीत स्वतःहून उडी घेईल हे शक्य वाटत नाही. कदाचित छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या निधनानंतर रायगडावरील एखादा कुत्रा मेला असावा आणि त्या संबंधीच्या दंतकथा निर्माण झाल्या असाव्यात.

शिवरायांचे शिवकालीन पाषाणशिल्प :-

इ .स. १६७८ साली शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून महाराष्टात परत येताना कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवाडी येथील गडीला वेढा घातला. हे काम सखोजी गायकवाड या सरदारावर सोपवले होते. बेलवडीचा ठाणेदार येसाजी प्रभू देसाई या युद्धात मारले गेले . तरीही येसाजीची पत्नी मल्लाम्मा हिने स्त्री सैनिकांसह हे युद्ध चालू ठेवले . या युद्धात आपला विजय होणे अशक्य असल्याने मल्लाम्मा हिने शिवरायांशी तह केला . एक महिलेने पतीच्या निधनानंतर विरांगनेप्रमाणे युद्ध केले म्हणून शिवरायांनी तिला सावित्रीबाई हा किताब देऊन गौरवले. तसेच तिच्या पुत्राला दूध-भातासाठी तिचे राज्य परत दिले.

मल्लाम्मा हिने शिवरायांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावांच्या दरवाज्यात , मंदिरात शिवरायांची पाषाण शिल्पे उभी केली. त्यातील एक शिल्प कर्नाटकमध्ये धारवाडच्या उत्तरेस , यादवाड नावाच्या खेड्यात मारुतीच्या दक्षिणाभीमुख देवळाच्या पश्चिमेस असून या शिल्पामध्ये शिवरायांसोबत झेपावत चाललेला एक कुत्रा दाखवला आहे .

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जीवनातील हे एक शिल्प वगळता अन्यत्र कोठे हि कुत्र्यासंबंधी उल्लेख आढळत नाही. शिवाजी महाराज्यांचे जीवन हे युद्ध आणि स्वराज्याचे राजकारण यात व्यस्त होते . त्यामुळे कुत्र्याला महाराज्यांचा लळा लागावा एवढा वेळ महाराज्यांकडे नक्कीच नव्हता.

हिंदू धर्मात देव व संत यांच्या चित्रात आपणास कुत्रा , गाय व इतर प्राणी दिसतात. शिल्पकाराने चित्रात पक्षी देखील कोरलेले आहेत याचा अर्थ महाराज पक्षी पाळत होते असा होत नाही.

छत्रपती शाहू महाराज व खंड्या : –

छत्रपती शाहू महाराज हे श्वान प्रेमी होते. शाहू महाराज शिकारीला गेले असताना त्यांचा कुत्रा खंड्या याने वाघाच्या हल्ल्यापासून शाहूंचे रक्षण केले होते . कालांतराने खंड्या मरण पावल्यानंतर खंड्याची समाधी संगम माउली येथे उभारली गेली. खंड्या कुत्र्याची समाधी पाहता त्याकाळी आपल्या आवडत्या प्राण्याची समाधी बांधली जात होती हे निश्चित.

वाघ्या कुत्र्याच्या आजच्या समाधीची कथा :-

रायगड स्मारक समितीतील मंडळी निधी जमवण्यासाठी इंदूर येथे होळकर संस्थानिकांकडे गेले . शीवस्मारकासाठी पैसे देणे इंग्रजद्रोह होईल म्हणून तुकोजी होळकर यांनी राणीसाहेबांचे लाडके कुत्रे वारले व त्याचे सुतक असल्याचे सांगून भेट टाळत होते. स्मारक समितीतील लोकांनी यावर तोडगा सुचवला कि आपण कुत्र्याचा पुतळा उभारावा त्यामुळे इंग्रज द्रोह होणार नाही. तोडगा उपयोगी पडून तुकोजी होळकरांनी ५००० रुपयांची देणगी दिली आणि समितीने कुत्र्याचा काल्पनिक पुतळा रायगडावर बसवला.

वरील घटनेचा विचार करता तुकोजी होळकर यांनी यापूर्वीच पहिले शिवचरित्र लिहीणाऱ्या केळूस्कर यांच्या शिवचरित्राच्या ४५०० प्रति २४००० रुपयांना विकत घेऊन जगभरातील ग्रंथालयांना मोफत वाटल्या . तसेच पुण्यातील राजश्री शाहूनी पायाभरणी केलेल्या शिवस्मारकाला आर्थिक मदत केली. ते तुकोजी होळकर इंग्रजद्रोह होईल म्हणून घाबरले हे विश्वासार्हाय नाही .

धनगर समाज्यातील बांधवाना कुत्रा हा प्राणी प्रिय असतो. याचाच अर्थ शिवस्मारकाचे उर्वरीत काम शिवमाधीवरील मेघडंबरी व कुत्र्याच्या स्मारकाचे काम करण्यासाठीच तुकोजीराज्यांनी आर्थिक मदत केली . वाघ्याच्या स्मारकावर तुकोजींच्या देणगीचा स्पष्ट उल्लेख आहे.

शिवसामाधीच्या जीर्णोद्धारात आढळली प्राण्याची कवटी –

मुंबईचे श्री. तात्यासाहेब सुळे यांनी शिवसामाधीच्या जीर्णोद्धाराचे शिवधनुष्य उचलले. समाधीचा पाया खोदण्याचे काम चालू असताना साधारण सहा फूट खोदल्यानंतर राख व एका प्राण्याची कवटी मिळाली. तत्कालीन स्मारक कमिटीने हि कवटी कलकत्याला झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कडे परीक्षणासाठी पाठवली . या संस्थेने १२ जाने.१९२६ रोजी पाठविलेल्या त्यांच्या अहवालानुसार हि कवटी व हाडे उदमांजराची असून ती जळलेली नाहीत असे पत्र समितीस पाठविले . या उदमांजराचा मृत्यू शिवसमाधी जेव्हा दुर्लक्षित आणि भंगलेल्या स्तिथीत होती त्यावेळी घडून आला होता .

वाघ्या कुत्र्याच्या विदेशी पुतळा :-

रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हा विदेशी कुत्र्याची प्रतिमा आहे. शिवरायांच्या काळात महाराष्टमध्ये विदेशी कुत्रा आढळून येत नाही . रायगड स्मारक समितीतील मंडळी कुत्र्याच्या प्रतिमेसाठी त्यावेळचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. नानासाहेब करमरकर यांच्याकडे गेले असता . त्यांच्याकडील तयार कुत्र्यांच्या शिल्पामधील एक शिल्प निवडले गेले व ते वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर स्थानपन्न झाले.

वरील सर्व घटनांचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळातील कोणतेही तत्कालीन संदर्भ वाघ्या कुत्र्याबाबत मिळत नाहीत. वाघ्या कुत्र्याची समाधी हि दंतकथेचा आश्रय लाभून तुकोजी होळकरांच्या आर्थिक निधीतून उभी राहिली. छत्रपती शाहू महाराज यांच्या खंड्या कुत्र्याची समाधी हि वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी प्रेरक ठरली .

संदर्भ :-
शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध :- इंद्रजित सावंत .
वाघ्याचे सत्य :- संजय सोनवणी
रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकातून :- प्र. क . घाणेकर
बाबासाहेब पुरंदरे यांचे दि. १९/०२/२००७ रोजीचे सहारा टीव्ही वरील मुलाखतीतील वाघ्या कुत्र्यासंबंधीतील भाष्य

छायाचित्र साभार गुगल

श्री. नागेश सावंत.

Leave a Comment