वैजेश्वर महादेव मंदिर, वावी –
नाशिक जिल्ह्यातील सिन्नरपासून शिर्डीरोडवर वीस किलोमीटर अंतरावर वावी हे गाव लागते. वावी हे प्राचीन मंदिर असलेल्या वैजेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. दिल्ली दरवाज्यातून गावात प्रवेश केल्यानंतर काही अंतरावर शाहीर परशुरामाच्या स्मारका शेजारी तटबंदीत उभे असलेले वैजेश्वर मंदिर आपले लक्ष वेधून घेते. वैजेश्वर मंदिर जीर्णोद्धाराच्या वेळीच दगडी तटबंदी उभारण्यात आली आहे. तटबंदीत उत्तराभिमुख लाकडी प्रवेशद्वार बसविण्यात आले असून प्रथमदर्शनी हे मंदिर वाड्यासारखे भासते.(वैजेश्वर महादेव मंदिर)
मंदिराचे घुमटदार शिखर मुघल-मराठा काळातील असून हे नंतरच्या काळात उभारले गेले आहे. वैजेश्वर मंदिराच्या रचनेपैकी गर्भगृह व अंतराळ एवढेच आज शिल्लक आहे. सभामंडपाचा मूळ भागात आज शिल्लक नाही. त्यामुळे सभामंडपाच्या जागी विस्तीर्ण असे लाकडी सभामंडपाचे काम झाले आहे. अंतराळातील पूर्वेकडील अर्ध स्तंभावर सात ओळींचा शिलालेख कोरलेला आहे. वैजेश्वर मंदिर हे शके ११३९ म्हणजे इसवी सन १२१७ या सुमारास उभारले गेले असे शिलालेख सांगत आहे.
मंदिराच्या गाभाऱ्याचे दगडी प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून सुंदर नक्षीकामाने सजलेले आहे. मंदिरातील गर्भगृहातील शिवलिंग वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण हे शिवलिंग पूर्वाभिमुख आहे. वावी जसे प्राचीन मंदिर असलेल्या वैजेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे तसेच वावीला भोसलेंची वावी असेही म्हटले जाते. भोसल्यांचा वाडाही गावात होता मात्र तो आता नामशेष झाला आहे. सिन्नरला कधी गेलात तर ऐतिहासिक वावी गावातील वैजेश्वर मंदिराला एकदा नक्की भेट द्या.
संदर्भ – ‘वारसायन’, श्री रमेश पडवळ
©️ रोहन गाडेकर