वाळणकोंड –
रायगडाच्या घेऱ्यात असलेल्या या स्थानाचे वर्णन मी एका शब्दात करेल ‘अद्भुत’. बिरवाडीहून लिंगाणापायथ्याच्या दापोली किंवा वारंगीकडे जाताना रस्त्याला लागूनच, काळ नदीच्या पात्रात हे पुरातन स्थान आहे. इथे नदीत शंभर मीटर लांब व जवळपास तीस मीटर रुंद असा मोठ्ठा आणि अतिशय खोल असा डोह आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूस ताशीव, गुळगुळीत खोल दगडी कडे, मोठमोठाले रांजणखळगे, समोर दिसणारी राकट डोंगररांग जिचा आकार शिवाजीमहाराजांच्या चेहऱ्याच्या प्रतिमेसारखा दिसतो, बाजूला लिंगाणा, सह्याद्रीच्या डोंगररांगेतून कोकणात उतरणाऱ्या अनेक नाळा असे अद्भुत दृश्य इथून दिसते. पलीकडच्या काठावर मंदिर. मंदिर म्हणजे तीन बाजूंनी तात्पुरते पत्र्याचे शेड. दरवर्षी पावसाळ्यात ही काळ नदी आपल्या नावाप्रमाणे रौद्र रूप धारण करते तेव्हा हा सगळा परिसर पाण्याखाली जातो. त्यामुळे येथे कायमस्वरूपी मंदिर बांधणे शक्य नाही, वाहून जाईल. त्यामुळे पावसाळा आला की पत्रे वगैरे सगळं काढून घेतात. एका मोठ्या शिळेवर – कातळावर देवीचे स्वयंभू स्थान आहे. हिला वरदायिनी देवी म्हणतात. मुळात हा साती आसरा आहे. ह्या स्थानाबद्दल अनेक अद्भुत अशा दंतकथा आहेत.वाळणकोंड.
एक आख्यायिका आहे ती अशी – सत्ययुगात या डोहात पाण्याखाली तळाशी या देवीचं मुख्य स्थान होतं. अजूनही आहे म्हणतात. पुजारी रोज पूजेसाठी डोहात उतरून जायचा, पाण्याखालीही दिवा पेटता असायचा. देवी नवसाला पावायची. धार्मिक, सामाजिक वा इतर कार्यासाठी लागणारे सामान आदल्या दिवशी येऊन प्रार्थनापूर्वक मागितल्यावर ते डोहातून वर येऊन मिळत असे. कार्य झाल्यावर पुन्हा येऊन ते डोहात बुडवायचे. पण एकदा डोहातून आलेली सोन्याचांदीची भांडी कोणीतरी परत आणली नाही. तेव्हा विश्वासाला तडा गेल्यामुळे देवीने पुजाऱ्याला दृष्टांत दिला की आतापासून डोहात उतरून तिची आराधना करता येणार नाही. डोहातून सामान मिळणे बंद झाले. डोहाच्या काठावर स्वयंभू अवतारात प्रकट होऊन देवी मत्स्यरूपात डोहाच्या तळाशी कायमची चिरंतन वास करून राहिली.
पावसाळ्याशिवाय काळ नदीला फारसं पाणी नसतं. मात्र वाळणकोंडचा हा डोह पाण्याने सदैव भरलेला असतो. खूप खोल आहे. या डोहाच्या पाण्यात विशिष्ट प्रकारचे मासे आहेत. त्यांना देवमासे – देवाचे मासे म्हणतात. मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे की ते फक्त इथेच आढळतात. आख्यायिकेत देवीने सांगितलेय की हे मासे म्हणजे तिची बाळं आहेत. म्हणून या माशांना कोणीही पकडत नाही, मारत नाही. अजूनही. या डोहातील पाणीही फार क्वचित पिण्यासाठी वापरतात, इतर कामांसाठी बिलकुल वापरत नाही. स्थानिकांची या स्थानावर खूप श्रद्धा आहे.
या माशांबद्दलही दंतकथा आहे की या डोहात एकूण सात प्रकारचे मासे आहेत. पाण्याच्या वरच्या भागात दिसणारे छोटे मासे आहेत, पाण्याच्या खाली माशांचा आकार मोठा होत जातो. डोहाच्या तळाशी सर्वात मोठे मासे आहेत, त्यांचा आकार मनुष्याएवढा आहे. दंतकथेचा भाग सोडला तर डोहाच्या आत वर दिसणाऱ्या माशांपेक्षा मोठे मासे आहेत असे म्हणतात. श्री.संतोष काशीद यांच्या लेखात वाचले आहे की १८३४ मध्ये पाच ब्रिटिश अधिकारी इकडे मुद्दाम या माशांची शिकार करायला आले. गळ लावला तरी बराच वेळ गळाला मासे लागेनात. तेव्हा चिडून त्यांनी गोळ्या घातल्या. तरीही एकही मासा मिळाला नाही. तेव्हा शेवटी ते विशाळगडावर निघून गेले. तिथे ते तापाने फणफणले. सगळे औषधोपचार केले पण त्यांचा मृत्यू झाला. स्थानिकांकडून त्यांना ही माहिती मिळाली. लोकं माशांना बघण्यासाठी पाण्यात मुरमुरे वगैरे टाकतात.
हा डोह खरंच गूढ आहे. असा जबरदस्त डोह, रांजणखळगे, अशी जागा दुसरीकडे पाहिली नाही. इथला पूलही प्रसिद्ध आहे. तो पंचवीसएक वर्षांपूर्वी बसवला. त्यावरून जाताना पूल थोडासा हलतो, खाली खोल डोह. हे स्थान शांतच राहावे, इथे जास्ती नवीन बांधकाम होऊ नये. अजून एक, हे वाळणकोंड आहे. वाळणकुंड नाही. कोंड म्हणजे वाडी-वस्ती. या भागात अनेक कोंड आहेत. वाळणकोंडला आम्ही बराच वेळ दिला होता.
– प्रणव कुलकर्णी.