महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,02,619

एक अपरिचित स्थळ, वाळणकुंड

Views: 1589
13 Min Read

एक अपरिचित स्थळ, वाळणकुंड –

महाराष्ट्राचं भाग्यतीर्थ असलेला शिवतीर्थ रायगड म्हणजे शौर्य परंपरेचा अनमोल वारसदार. रायगडच्या अंगाशी लगट करत आजही याच्या कुशीत वसलेली कित्येक ठिकाणे आपल्याला इतिहासाचा पाठ सांगत आहेत. यातील बरीच ठिकाणे ‘अपरिचित’ या सदरात मोडावी इतकी दुर्लक्षित असतात. शिवतीर्थाच्या याच परिसरातील अशाच एका स्थळाला भेट देण्याचा योग नुकताच आला. आपल्या अनोख्या वैशिष्टयाने आणि दैवी आख्यायिकेने समृद्ध असलेले परंतु तरीही बरेच अपरिचित असलेले हे स्थळ म्हणजे महाड़ जवळील ‘ वाळणकोंड ‘.(एक अपरिचित स्थळ, वाळणकुंड)

शिवजयंतीच्या निमित्ताने शिवविचारांचा प्रसारहेतु ऐतिहासिक महाड़ परिसरातील ‘ दादली ‘ मधील छोटेसे व्याख्यान उरकुन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जीवलग श्री परीक्षित साळुंखे यांच्यासोबत महाड परिसर अभ्यासात्मक सफ़रीवर आम्ही निघालो. सोबत महाराष्ट्राच्या सुदूर टोकावरील जळगाव मधील शिवप्रेमी  हर्शल पाटील सुद्धा होते. देशाचे घटनाकार श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्याग्रहाने इतिहासात प्रसिद्ध झालेले चवदार तळे आणि शिल्पकलेचा अप्रतिम नमूना असलेली कातळात कोरलेली गांधार पाले लेणी पाहुन आम्ही राष्ट्रीय महमार्गावरून महाड – करंजखोल – बिरवाडी मार्गे पाने गावच्या मार्गावर सुसाट वेगात निघालो. वाटेत असलेली परिसरातील काही ऐतिहासिक स्थळे पाहात दुपारी तीन वाजता रायगडाच्या कुशीत अन लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाळणकोंड नावाच्या एका आगळ्या वेगळ्या स्थळाजवळ आलो. वाटेत लांबुनच दिसलेला रायगड अन त्यावरील वस्तुंची बाह्यरेखा दृष्ट लागावी अशी विलोभनिय.

रायगडला विळखा घालणाऱ्या प्रसीद्ध काळ नदीचा प्रवाह पावसाळ्यात आपल्या मार्गातील खडकांना खरवडत बेभान होऊन सिंधु सागराकडे झेपावत असतो. उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या नदीच्या पात्रातील काळा करंद खड़क म्हणजे दुरवर पसरलेली काळ्या रत्न मोत्यांची खाण वाटावा इतका अप्रतिम. नदीच्या पात्रातील या खड़कामधे निर्माण झालेले रांजण खळगे निसर्गाच्या कलेचा उत्कृष्ट नमूना. पूर्वेला सह्याद्रीमधील अती रौद्र आग्याची नाळ, सिंगापुर नाळ आणि बोराट्याची नाळ या डोंगर उतारावरून चौखुर उधळत भयान वेगाने काळ नदीला बिलगण्यास येणाऱ्या आत्ममग्न त्रिनाळी. पर्जन्यकाळातील उफानलेल्या जलसरींनी कातरलेले या डोंगरांचे कड़े पाहताच उरात धड़की भरावी इतके भयानक. डोंगर उतारावरील हा जलप्रवाह ओढ्या नाल्यांनी पुढे काळ नदीत केव्हा विसावतो हे कळत देखील नाही. बाजुलाच शिवलिंगाच्या आकाराचा सह्यसखा किल्ले लिंगाणा आजुबाजूच्या परिसरावर आपली नजर राखून खंबीरपने उभा आहे.

काधिकाळी स्वराज्यद्रोह्यांचं निवासस्थान अर्थात स्वराज्याचा कैदखाना असलेला लिंगाणा आता प्रस्तरारोहन करणाऱ्या काही मोजक्या विरांना वगळता एकाकी पडलेला जाणवतो. पुणे आणि रायगड जिल्ह्याची हद्द विभागणी करणाऱ्या या डोंगररांगेमधे मानवी वावर फार कमी. त्यामुळे नैसर्गिक सौंदर्य आणि जैव विविधतेची विपुल देणगी ठासुन भरलेली. पश्चिमेला स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगड, दक्षिणेला महाड नगरी आणि उत्तरेला पाने गावाची वस्ती आशा भौगोलिक परिघात वसलेलं वाळण कुंड येणाऱ्या जाणाऱ्याला वरदायिनी मातेची आख्यायिका सांगत वर्षानुवर्षे स्थित आहे. काळ नदीच्या गर्भकोषात अगदी मुख्य पात्रातच वसलेले, दापोली आणि पंधेरी या दोन गावांच्या पश्चिमेला अगदी मध्यावरील हे स्थळ अलीकडे काही हौशी पर्यटकांच्या आणि भाविकांच्या दृष्टीने पर्यटन स्थळ झाले आहे. नवसाची देवी म्हणून परिसरातील भाविकांत भक्तिभाव उत्पन्न करणाऱ्या वरदायिनी मातेचं हे जागृत देवस्थान येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण करत असल्याची भावना आजही इथे जिवंत आहे. नदीच्या मध्यावर असलेला खोल डोह आणि त्यातील मत्स्य यांभोवती एकवटलेली या स्थळाची कथाही मोठी रंजक आहे.

या वरदायिनी देवीबाबत पुराणकाळापासून सर्वश्रुत असलेली आख्यायिका या देवीची महती सांगते. सत्ययुगात या डोहात असलेल्या पाण्याखाली वरदायिनी देवीचं भव्य मंदिर होते. आजही ते मंदिर या डोहात अगदी तळाशी असल्याचे म्हटले जाते. देवीच्या पूजा – अर्चा करण्यासाठी मंदिराचे पुजारी पुजेच्या साहित्याने भरलेले ताट घेऊन दररोज या जलप्रवाहातून डोहात उतरत असे. विशेष म्हणजे या पुजेच्या ताटात पेटता दिवाही असे. मात्र देवीच्या कृपाशीर्वादाने कोणताही अडथळा न येता ही पूजा निर्विघ्नपणे पार पडली जात असे. वरदायिनी माता देवी ही नवसाची देवी म्हणून ओळखली जाते. पुराणकाळातही देवीला केलेला नवस पूर्णत्वास जायचा. अनेक भक्त देवीला विशिष्ट मागणी घालायचे. अर्थात हे मागणे केवळ स्वतःच्या समृध्हीसाठीच नसून यात सामाजिक कार्याचाही भाग असे. यात धार्मिक कार्याच्या उपयोगासाठी बहुतांशी सोन्या चांदीच्या भांड्यांची मागणी केली जायची. अर्थात देवीचं माहात्म्य प्रचंड असल्याने जनतेच्या कार्याप्रीत्यर्थ भक्तांची ही मगणीही विना अडथळा पूर्ण व्हायची. कार्य पूर्ण होताच पुन्हा ही भांडी देवीला अर्पण केली जात. पुढच्या वेळी नव्याने पुन्हा मागणी केली जायची.

मात्र, एकदा देविने दिलेल्या भांड्यांपैकी सोन्या चांदीची काही भांडी पुन्हा देवीला परत केली गेली नाहीत. देवीच्या नित्य नियमांमधे विघ्न पडले आणी भक्तांनी दिलेला विश्वासालाही तडा गेला. यामुळे वरदायिनी माता भक्तांवर रुष्ट झाली आणि देविने सर्वांना दृष्टांत दिला. ‘ इथून पुढे मी याच काळ नदीच्या या डोहाकडेला स्वयंभू अवतारात प्रकट होइन. इथपर कोणीही डोहात उतरून माझी आराधना करू शकत नाही. मी या डोहाच्या खोल जलात मत्स्य रुपात चिरंतन वास करून भाविकांच्या मनोकामना पूर्ण करेन. माझ्या मत्स्य रुपाला ‘बाळ’ असे संबोधले जाईल. हे मत्स्य देवरूपात असल्याने स्वअरिष्ट टाळण्यासाठी कोणीही याची हत्या करता कामा नये. ‘ तेव्हापासून या डोहाच्या तळाशी वास करून असलेली वरदायिनी माता देवी डोहाच्या पूर्व किनाऱ्यावर वास करून आहे. पुराणकाळातील या कथांना विश्वासाच्या तराजुत किती जोखावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे मात्र आज हे स्थळ या देवीच्या महात्म्यासाठी भाविकांत ओळखले जाते हे नक्की.

सुमारे शंभर एक मीटर लांब आणि विसेक मीटर रुंद असलेला हा वाळण कुंड डोह उत्तरेच्या बाजूला निमुळता आहे तर दक्षिणेला त्याचा पसारा वाढता आहे. दैवी पार्श्वभूमी असल्याने सध्या या डोहातील पाण्याचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. आजुबाजूचे स्थानिक काही वेळा केवळ पिण्यासाठी याचा वापर करतात. बाकी इतर कोणत्याही कामासाठी यातील जलाचा वापर टाळला जातो. भाविकांकडून यातील माशांना लाह्या, पोहे खाऊ घातले जातात. कुंडात प्रचंड प्रमाणात मासे आहेत यामुळे पाणी स्वच्छही बरेच आहे. या कुंडात मत्स्य रुपात देवी वास करत असल्यामुळे कोणीही यांना हानी पोहोचवत नाही. कोणत्याही प्रकारे या माशांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. तरीही या माशांच्या संदर्भात घडलेली एक ऐतिहासिक बाब इथल्या स्थानिकांनी आम्हाला सांगितली.

भयान जंगलाने वेढलेल्या या डोहातील माशांची शिकार करण्याच्या हेतुने सन १८३४ मधे पाच ब्रिटिश अधिकारी आले. हा पूर्ण परिसर जरी वनखात्याच्या ताब्यात असला तरी पण ब्रिटिशांना कुठेही संचारण्यास परवानगी होती. या पाचही ब्रिटिशांनी डोहातील भले मोठे मासे मारण्याचा आपला डाव तडीस नेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला परंपरागत पद्धतीने गळदोरी लावून मासे पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र एकही मासा गळाला लागला नाही. बराच प्रयत्न करूनही मासे यांच्या गळाला दादा देईनात. त्यामुळे त्यांनी आपल्याकडील बंदुकीने माशांवर हल्ला केला. अर्थात हा शुद्ध दूधखुळेपणा होता, पण चिडलेल्या ब्रिटिशांनी कोणत्याही स्थीतीत इथल्या माशांची शिकार करायचा चंग बांधला होता. बंदुकीमधून गोळ्यांच्या अनेक फैरी झाडूनही त्यांच्या हाती एकही मासा गवसला नाही.

अखेर इंग्रजांनी आपला पराभव या माशांपुढे ( मत्स्य रूपी देवीपुढे ) मान्य केला आणि ते तिथून निघुन गेले. ते ब्रिटिश जरी तेथून निघुन गेले असले तरी त्यांनी केलेल्या कृत्याचा परिणाम त्यांना भोगावाच लागणार होता. ते पाचही अधिकारी पुढे विशाळगडावर गेले. मात्र गडावर येताच त्यांचं अंग तापाने फणफणु लागले. दातावर दात आपटु लागले आणि भ्रमिष्टासारख्या वगणुकीने त्यांनी आजुबाजूच्या लोकांनाही त्रास देण्यास सुरुवात केली. अनेक दिवस औषध पाणी करूनही त्यांच्या आरोग्यास उतार पडला नाही. शेवटी त्यातच त्या पाचही जणांचा मृत्यु झाला. वरदायिनी मातेने जणू त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा दिली. ही संपूर्ण घटना त्यावेळी कागदपत्रांत नोंदवूनही ठेवली गेली आहे असे इथल्या स्थानिकांकडून कळले मात्र आम्हाला काही तो कागद पाहन्यास उपलब्ध झाल नाही. पण जरी दंतकथा असली तरी त्यातील देवत्वाची प्रचिती देणारा भाव महत्वाचा. कदाचित पुढे केव्हतरी तो कागद पाहन्यास उपलब्ध होईलही.

या काळ नदीच्या खड़काळ पात्रात असलेला हा डोह म्हणजे निसर्गाचा अनोखा आविष्कार आहे. भर उन्हाळ्यातही यातील पाण्याची पातळी घटत नाही. एरवी सारा आसमंत पाण्यासाठी टाहो फोडत असताना हा डोह मात्र तुडुंब भरलेला असतो हेच याचे आश्चर्य आहे. उन्हाळ्यात नदीचे पात्र कोरडे ठणठणीत असते. यामुळे नदीतून ऐलतीरी पैलतीरी जाने सहज शक्य आहे. मात्र पूर्वी पावसाळ्यात ही नदी पार करने प्रचंड अवघड आणि धोक्याचे होते. त्यामुळे दोन्ही बाजूची येजा पावसाळ्यात पूर्णतः बंद असे. पण युती शासनाच्या काळात तत्कालीन मंत्री श्री प्रभाकर मोरे यांच्या नवसाला देवी पावल्याने त्यांनी कबुल केल्याप्रमाणे १९९६ साली या नदीवर झूलता पुल बांधला. नदीच्या प्रचंड प्रवाहातही तग धरणाऱ्या मजबूत बांधकामाचा हा पुल आजही तितक्याच मजबूतीने उभा आहे. दोन भव्य कॉंक्रीट चौथऱ्यावर उभारलेला हा पुल जाडसर तारांनी तोलुन धरला आहे. ( लंडन ब्रिज च्या धर्तीवर केबल स्टेडची रचना असलेला पुल ). काळाच्या ओघात यावरील लोखंडी प्लेट मोड़कळीस आल्या आहेत. लोखंडाला गंज चढला आहे. त्यामुळे त्याच्या डागडुजीची सध्या नितांत आवश्यकता आहे. पुलाच्या पूर्वेकडील चौथऱ्याखाली वरदायिनी देवीच्या सेवकांची ठाणी आहेत. शेंदुर लावालेल्या चार पाच शीळा म्हणजेच देवीचे सेवक म्हणून पूजले जातात. पुलाच्या बाजुलाच नव्याने उभारलेली भव्य ध्वजकाठी असून त्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकत असतो.

डोहाच्या पूर्वेकडिल काठावर उभारलेल्या पुरुषभर उंचीच्या तात्पुरत्या शेड मधे स्वयंभू अवतरलेली वरदायिनी मातेची शिळा आहे. साधारण एक मीटर लांब आणि अर्धा मीटर रुंद असलेली ही लांबट शिळा सध्या शेंदुर लावून पूजली जाते. शिळेवर अनेक पितळी मुखवटे असून परिसरातील भाविकांनी आपला नवस पूर्ण झाल्यावर वाहिलेले आहेत. सोबतच श्री महालक्ष्मीची एक सुरेख धातुची मूर्तिही आहे. बाजुलाच भाविकांना विश्रांती घेता यावी म्हणून एक पत्र्याचे शेड उभारले आहे. तेही तात्पुरत्या स्वरूपाचे असून त्याचे खांब नटबोल्ट मधे स्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पाण्याच्या वेगाने हे लोखंडी नटबोल्टही निखळले असून त्यांचीही नव्याने उभारणी गरजेची आहे. स्वयंभू शिळा वगळता इथले देवीचे संपूर्ण साहित्य पाऊस सुरु होण्या अगोदर सुरक्षित ठिकाणी हलवले जाते.

नदीच्या पाण्याच्या प्रचंड वेगापुढे तग धरने कठिन असल्याने इथे कोणतेही पक्के बांधकाम करने शक्य होत नाही. देवीचा नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आपल्या नैवेद्याची तयारी करता यावी म्हणून काही वर्षापुर्वी देवीचा कौल घेऊन नदी पात्राच्या बाहेर पूर्वेकडे एक पक्क्या बांधकामातील इमारत उभारली आहे. सध्या देवीचं सर्व सण कार्य याच इमारतीत पार पाडली जातात. परिसरात जागृत स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवीच्या पुजेची सर्व व्यवस्था बाजूच्याच पंधेरी गावातील श्री दिनकर लाड आणि दापोली गावातील श्री कोंडीराम गुणाजी रेनोसे हे दोन बुजुर्ग पुजारी पाहतात. या परिसराची ख़डान खड़ा माहीती असलेले हे बुजुर्ग म्हणजे वृद्धावस्थेकडे झुकलेले इथले स्थानिक पुराण पुरुष म्हटले तर वावगे ठरणार नाही.

शिवकाळात रायगड ते राजगड असलेला राजमार्ग याच वाळण कुंडावरून जात होता. त्यामुळे स्वतः छ. शिवराय आणि इतरही अनेक महनीय व्यक्तिमत्वे इथेच पायउतार होऊन वरदायिनी देवीचा आशीर्वाद घेत असतील. अनेक सरदारांनी केलेला नवस इथे फेडला गेला असेल अनेकांनी या देवीच्या नावाने पितळी मुखवटे अर्पण केले असतील. त्यामुळे या स्थळाचे धार्मिकते बरोबरच ऐतिहासिक महत्वही मोठे समृध्ह आहे. अलीकडे काही हौशी गडभ्रमणकार शिवप्रेमी राजगड ते रायगड असा पायी ट्रेक करताना या देवीच्या आशीर्वादाचे कृपाछत्र घेऊन झुलत्या पुलावरून पुढे होतात. नुकताच बा रायगड परिवरातील काही धाडसी सदस्यांनीही याच मार्गाने हा ट्रेक पूर्ण केला आहे.

या स्थळाचा असा समृद्ध वारसा असतानाही याकडे पर्यटकांचा कल मात्र अभावानेच आढळतो. परिसरात असलेली नीरव शांतता काही प्रेमी युगुलांना आकर्षित करते तर चार दोन भाविकांचे पाय देवीच्या दर्शनाला इकडे वळतात. बाकी सगळा शुकशुकाट जाणवतो. वाळण कुंडाकडे जाणारे अरुंद रस्तेही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या स्थळाचा पर्यटन दृष्टया विकास करावयाचा असल्यास इथल्या पायाभूत सुविधांवर प्रचंड काम करावे लागणार आहे. शासन आणि स्थानिक यावर नक्कीच यशस्वी तोडगा काढतील……

वाळण कुंड परिसराचा हा समृद्ध पण दुर्लक्षित वारसा पहातच आम्ही देवीच्या पुढे क्षणभर विश्रांती घेतली. तिथल्या पुजारी काकां बरोबर बऱ्याच गप्पाही मारल्या. देवीच्या पुढील दोन नारळ फस्त केले. खोबरऱ्याचा किस करून माशांना खाऊ घातला. आजुबाजुला दिसणारे डोंगर अन त्यांची स्थानिक भाषेतील नावे यांची माहिती घेतली. तीनही नाळी आणि त्यांच्या राखरखीत सौंदर्याला डोळेभरून पाहिले. लिंगाण्याच्या अजस्त्रपणाला निरखले. रस्त्याच्या पलीकडे उभ्या कधिमधी जाणाऱ्या वाहनांना न्याहाळातच आम्ही उठलो. एरवी कधीच इकडे येणे झाले नसते मात्र परीक्षित दादांच्या आग्रहाने हे स्थळ पाहायला मिळाले. सोबत जळगावकर हर्शल पाटील होतेच. एकंदरीतच एक उत्कृष्ट स्थळ पाहिल्याचे समाधान मिळाले. परीक्षित दादांनी दुचाकिला हात घातला आणि वरदायिनी मातेला पुन्हा एकदा त्रिवार दंडवत घालून आमची दुचाकी भन्नाट वेगाने महाड़ जवळ करू लागली. उजव्या बाजूला असलेला रायगड़चा भवानी कडा आणि गडावरील वास्तु यांच्या दर्शनाने मन केव्हाच शिवरायांच्या स्माधिपुढे ध्यानस्थ झांले होते……..

संतोष काशिद.
मो. ९९२३९७५०५३

Leave a Comment