महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,14,614

सेनेचा सामना मूळचा माढ्याच्या वसंतराव कानडेंचा !

Views: 3781
4 Min Read

सेनेचा सामना मूळचा सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या वसंतराव कानडेंचा

19 जून 1966 साली मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. पुढे त्यांना आपल्या पक्षाचे वर्तमानपत्र असावे असे वाटले. मग त्याचे नाव काय असावे ? असा विषय चर्चेला आला. अनेकांनी अनेक नावे सुचवली. मात्र एकेदिवशी खुद्द बाळासाहेबांनी सर्वांना सांगितले, आपल्या पेपरचे नाव सामना असावे. झाले, त्यानुसार पेपरची नोंदणी करण्याकरिता एक शिष्टमंडळ दिल्लीला गेले. त्यांनी आपली कागदपत्रे सादर करून आपणाला सामना हे नाव मिळावे अशी मागणी केली. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले, सेनेचा सामना या नावाने माढा येथील वसंतराव कानडे यांच्याकडून अगोदरच नोंदणी झालेली आहे.

• सामनाचे जनक माढा जि. सोलापूर येथील वसंतराव नरहरि कानडे

माढा येथील वसंतराव नरहरी कानडे हे व्यासंगी व्यक्तिमत्व. त्यांची बैठकही तशी मोठ्या माणसात होती. केसरी वगैरे पेपरला त्यांनी लिखाण केल्यानंतर त्यांना आपला स्वतचा पेपर असावा असे वाटू लागले. त्यानुसार त्यांनी “ सामना” हे शिर्षक घेऊन दिल्ली येथे रजि. नंबर 24 एम. 24/ 75 एन.टी. याप्रमाणे आपल्या साप्ताहिकाची नोंदणी केली. आणि लगेचच 10 आक्टोंबर 1975 वार शुक्रवार यादिवशी महाराष्ट्राचे युवक कल्याण राज्यमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे यांच्याहस्ते आपल्या पहिल्या सामना या साप्ताहिकाचे प्रकाशन केले. त्यावेळी सामना अंकाची किंमत होती – 20 पैसे.

पहिल्या अंकात त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील कर्तबगार मंडळी सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव जगताप, माजी आमदार बाबुराव पाटील अनगरकर यांच्या कामाची स्तुति करून जिल्ह्याच्या विकासाची अपेक्षा व्यक्त केली. पुढेही सामना हे साप्ताहिक म्हणून सतत प्रकाशित होत होते. वसंतराव हे आपल्या परखड लिखाणासाठी प्रसिद्ध होते. तसेच राजकीय बैठक असल्याने ते काही काळ माढ्याचे सरपंचही राहिले. त्यानंतर त्यांनी आपला मुक्काम बार्शीला हलविला तरी सामना वेळेवर निघत होताच.

• सामना नावाची बाळासाहेबांची संकल्पना

स्थापनेपासूनच शिवसेना ही संघर्ष करत पुढे आलेली आहे. त्याकाळी देशात कॉंग्रेसचा फार मोठा दबदबा होता. शिवाय मुंबईत कॉंग्रेसनेते स.का. पाटील, कामगार नेते जॉर्ज फर्नांडिश तसेच पुढे दत्ता सामंत यांचे वजन होते. आपले विचार आपल्या लोकापर्यंत पोहोचवून परिस्थितीशी सामना करावा या विचाराने त्यांना सामना हे नाव आठवले. शिवाय 1974 साली आलेला जब्बार पटेल यांचा सामना नावाचा चित्रपटही त्यांना भावाला असावा.

दिल्लीतील मंडळी परत आली. 1966 सालची शिवसेना आता गावोगावी पोहोचली होती. त्यानुसार सामना नावाचे शिर्षक आपणाला हवे आहे. त्यासाठी आता शोधाशोध सुरू झाली. याबाबत मी वसंतरावांचे चिरंजीव श्री शिवराज कानडे यांच्याशी फोनवर बोललो, तेव्हा ते म्हणाले, याबाबत चर्चा करण्यासाठी खुद्द राजसाहेब ठाकरे माढयाला आले होते.
शिवाय दुसर्‍या एका मतानुसार सेना नेते सुभाष देसाई एकदा तुळजापूरला येणार असल्याने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वसंतराव कानडेची भेट घेण्याचा मानस व्यक्त केलेला होता. लागलीच माढयाचे शिवसैनिक श्री प्रकाशराव गोरे हे श्री वसंतरावांना घेऊन तुळजापूरच्या विश्रामगृहावर पोहोचले. सुभाष देसाई यांनी त्यांना बाळासाहेबांची सामना नावाबद्दलची ईच्छा व्यक्त केली. हे शब्द ऐकताच वसंतराव म्हणाले “ सामना दिला”.
त्यानुसार 1988 साली बांद्रा येथील कोर्टात याविषयीची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. आणि त्यानंतर 23 जानेवारी 1988 साली शिवसेनेचे मुखपत्र म्हणून “ सामना ” प्रकाशित झाला. पाहिल्याच आवृतीत 1.5 लाख पेपर छापून सामन्याची घोडदौड सुरू झाली. तर अशारीतीने आपल्या जहाल शब्दाने भल्याभल्यांना घायाळ करणारा ‘सामना’ वसंतरावाकडून बाळासाहेबाकडे गेला.

माहिती साभार – Dr. Satish Kadam

Leave a Comment