महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,27,920

वासोटा | Vasota Fort

By Discover Maharashtra Views: 5487 15 Min Read

वासोटा | Vasota Fort

सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली असुन सुमारे दोन हजार वर्षापूर्वीपासून सह्याद्रीच्या कडेकपारीत दळणवळणासाठी कोकणातून घाटावर जाणाऱ्या अनेक घाटवाटा आढळतात. या घाटवाटांच्या रक्षणासाठी सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर निरनिराळ्या काळात अनेक गडकिल्यांचे साज चढले. यातील काही किल्ल्यांचा संबंध तर थेट पुराणकाळाशी जोडला जातो. यात पुराणकाळातील वसिष्ठ ऋषींशी नाते सांगणारा एक दुर्ग म्हणजे किल्ले वासोटा. वसिष्ठ डोंगराच्या नावाचा अपभ्रंश होऊन वासोटा नाव झाल्याचे मानले जाते. कोयना नदीच्या खोऱ्यात गर्द जंगलाने वेढलेला वनदुर्ग व गिरीदुर्ग अशा मिश्र प्रकारात मोडणारा हा दुर्ग व्याघ्रगड नावानेही ओळखला जातो. नागेश्वरला भेट दिल्याशिवाय वासोट्याची दुर्गभ्रमंती खऱ्या अर्थाने पुर्ण होऊच शकत नाही पण हा संपुर्ण परीसर व्याघ्रप्रकल्प व कोयना अभयारण्य परिसरात येत असल्याने येथे मुक्काम करण्यास बंदी आहे. त्यामुळे वासोटा किल्ल्याची वासोटा-नागेश्वर हि १२ तासाची खडतर दुर्गभ्रमंती एका दिवसात पुर्ण करावी लागते.

वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक परंपरागत मार्ग असले तरी आज घाटमाथ्यावरुन साताऱ्यातील बामणोली येथुन तर कोकणातील चिपळूण जवळील चोरवणे येथुन गडावर जाण्यासाठी दोन प्रमुख रुळलेले मार्ग आहेत. सातारा-कास-बामणोली असा गाडीमार्ग असुन सातारा- बामणोली अंतर ३८ कि.मी. तर कास ते बामणोली हे अंतर १४ कि.मी. आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी बोटीने कोयना धरणाचा जलाशय ओलांडुन वनखात्याचे प्रवेशशुल्क भरून वासोट्याकडे जाता येते. या वाटेने बामणोली-मेट इंदवली-वासोटा-नागेश्वर-वासोटा-मेट इंदवली–बामणोली अशी भ्रमंती एका दिवसात सहज पुर्ण करता येते पण यासाठी बामणोली मुक्कामी येणे गरजेचे आहे.

बामणोलीला भैरवनाथ मंदिरात मुक्काम करता येईल. इथे काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. हा संपुर्ण परिसर सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या अखत्यारीत असल्याने वासोट्याला पावसाळ्यात म्हणजे १५ जुन ते १५ ऑक्टोबर या कालावधीत तसेच ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या कालावधीत जाण्याची परवानगी मिळत नाही. अभयारण्यात प्रवेश करण्याची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी १.३० पर्यंत असुन परवानगीच्या सोपस्कारामुळे भ्रमंती सकाळी ८ पुर्वी सुरु करता येत नाही. बामणोली येथून मेट इंदवलीला जाणाऱ्या १२ व्यक्ती सामावणाऱ्या बोटीसाठी ३५४०/- रुपये आकारले जातात. हा दर १ व्यक्ती व १२ व्यक्तीसाठी एकच असुन दोन लहान समुह एकत्र मिळून जाण्याचे ठरवले तर बोटवाले अडवणुक करतात. याशिवाय अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी वनखात्याचे प्रती व्यक्ती शुल्क ३०/- रुपये असुन बोटीसाठी १५०/- व मार्गदर्शक ३००/- असे आहेत. याशिवाय कॅमेऱ्याचे शुल्क वेगळे आकारले जाते.

बामणोली – मेट इंदवली – वासोटा – नागेश्वर – मेट इंदवली हा ट्रेक करणार असल्यास सूर्य मावळण्यापूर्वी बामणोलीला न आल्यास वनखात्याकडून दंड आकारला जातो शिवाय बोट चालवणारे जास्त पैशासाठी अडवणूक करतात. कोयना धरणाचा जलाशय बोटीने पार करून मेट इंदवलीला पोहोचायला साधारण एक तास लागतो. मेट इंदवली येथुन वनखात्याच्या कार्यालयामागून जाणारी वाट छप्पर नसलेल्या हनुमान व गणपती मंदिरापाशी येते. किल्ल्यावरील पाणी पिण्यायोग्य नसल्याने येथील ओढ्यात पाणी भरून घ्यावे. हा ओढा पार करून घनदाट जंगलातील उभी चढण चढत साधारण १.३० तासात आपण नागेश्वर फ़ाट्यावर येतो. येथून उजवीकडे जाणारी वाट नागेश्वरला जाते तर सरळ चढत जाणारी वाट अर्ध्या तासात आपल्याला गडावर घेऊन जाते. मेट इदंवली या पायथ्यापासुन ठळक पायवाटेने २.३० तासात आपण गडावर पोहोचतो.

आता आपण कोकणातुन वर येणाऱ्या दुसऱ्या वाटेचा पर्याय पाहु. रात्री चोरवणे गावात विठ्ठल मंदीरात मुक्काम केल्यास चोरवणे-नागेश्वर-वासोटा-नागेश्वर-चोरवणे अशी भ्रमंती आपण एका दिवसात सहज पुर्ण करू शकतो. चिपळूण ते चोरवणे हे अंतर ३० कि.मी. असुन चोरवणे गावातील विठ्ठल मंदिराकडून एक रस्ता गावासमोरील टेकडाच्या पठारावर जातो. या पठारावर नागेश्वर सुळक्याकडे जाणाऱ्या पायऱ्या असुन खाजगी वाहन सोबत असल्यास आपण या वाहनाने ३ कि.मी अंतरावर असलेल्या या पायऱ्यापर्यंत पोहोचतो. खाजगी वाहनामुळे आपली या भ्रमंतीमधील जाण्यायेण्याची दीड तासाची पायपीट कमी होते व आपली भ्रमंती १० तासात सहज पुर्ण होते पण त्यासाठी सकाळी लवकर सुरवात करावी हे उत्तम. या वाटेने जाताना नागेश्वर शिवाय वाटेत पाण्याची कुठेही सोय नसल्याने पुरेसे पाणी सोबत ठेवणे गरजेचे आहे. चोरवणे गावातील विठ्ठल मंदिरासमोर असलेल्या दुकानात पूर्वसूचना दिल्यास आपली चहानाश्ता तसेच जेवणाची उत्तम सोय होते. यासाठी प्रमोद जाधव ८२७५६२६५१० यांच्याशी संपर्क साधावा व प्रसंगी मदतीसाठी त्यांना कल्पना देऊनच या वाटेने गडावर जावे.

चोरवणे गावातुन वासोटा किल्ला व नागेश्वर सुळक्याचे सुंदर दर्शन होते. चोरवणे येथील वाटेने बांधीव पायऱ्या,पायवाट,उभा चढ, लोखंडी शिड्या,कोरीव पायऱ्या, घसारा असा प्रवास करत २.३० तासात आपण नागेश्वर सुळक्यासमोर असलेल्या पठारावर पोहोचतो. येथुन उजवीकडील वाट वासोटा किल्ल्याकडे तर डावीकडील वाट नागेश्वर सुळक्याखाली असलेल्या गुहेकडे जाते. पठारावर नागेश्वर कुंडाकडे असा फलक असुन येथुन उजवीकडे खाली उतरणारी वाट आपल्याला नागेश्वर कुंडापाशी घेऊन जाते. कुंडात कचरा पडु नये यासाठी वरून जाळी अंथरली असुन या कुंडात वर्षभर पाणी असते. पठारावरून काही पायऱ्या पार करत आपण नागेश्वर सुळक्याखाली पोहोचतो. हि वाट देखील पुर्णपणे मळलेली आहे. नागेश्वर सुळक्याच्या पोटात ५०-६० माणसे मुक्काम करू शकतील अशी एक मोठी नैसर्गिक गुहा असून तेथे शिवलिंग आहे. या शिवलिंगावर गुहेच्या छतावरून बारा महिने पाण्याच्या थेंबांचा अभिषेक होत असतो. जुन्या अनेक वर्णनात या गुहेत असलेल्या शिवपार्वती मुर्तीचा उल्लेख येतो पण सध्या या गुहेत शिवलिंग वगळता कोणतीही मुर्ती अस्तित्वात नाही.

गुहेतून समोर वासोटा किल्ला व वसिष्ठी नदीचे खोरे नजरेस पडते. दर श्रावणी सोमवारी तसेच शिवरात्रीला हजारो भावीक या नागेश्वरच्या दर्शनाला येतात. चोरवणे ते नागेश्वर सुळका असा उभा चढ पार करून आल्याने काही काळ नागेश्वर गुहेत विश्रांती घ्यावी लागते. नागेश्वरहून समोर वासोटा व त्या अलीकडे एक छोटा सुळका आपले लक्ष वेधून घेतो. हा सुळका खोटा नागेश्वर म्हणुन ओळखला जातो. बहुतेक दुर्गप्रेमी प्रथम नागेश्वराचे दर्शन घेऊन नंतरच वासोट्याला जातात पण त्यासाठी तंगडतोड करण्याची तयारी मात्र हवी. या वाटेचा सुरवातीचा काही भाग वगळता उर्वरित वाट घनदाट जंगलातुन जाते. या वाटेवर जंगलात काही ठिकाणी वास्तु अवशेष दिसुन येतात. या बहुदा वाटेवरील चौक्या असाव्यात. काही ठिकाणी वाट घसाऱ्याची असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.

नागेश्वर समोरील या डोंगराच्या धारेवरून पुढे खोट्या नागेश्वरच्या पायथ्याला वळसा घालत साधारण ३ कि.मी.अंतर पार करत दीड तासात आपण मेट इंदवली येथुन वासोटा किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर पोहोचतो. या ठिकाणी असलेल्या चौकीचा चौथरा आजही पहायला मिळतो. येथुन किल्ल्यावर जाणारी वाट जांभ्या दगडांनी बांधुन काढली आहे. या वाटेने अर्धा तास वर चढल्यावर जंगल संपुन आपण किल्ल्याच्या माथ्याखाली असलेल्या पठारावर पोहोचतो. पठारावर आल्यावर समोरच तटबंदीत असलेला किल्ल्याच्या दरवाजा व त्याच्याकडे जाणाऱ्या खडकात खोदलेल्या पायऱ्या नजरेस पडतात. या पायऱ्यांच्या अलीकडे एक वाट उजवीकडे जाताना दिसते. या वाटेवर हत्तीमुख कोरलेले शिल्प पडलेले असुन वाटेच्या टोकाला किल्ल्याचा मूळ प्रवेशमार्गावर असलेला पुर्वाभिमुख दरवाजा आहे.

किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी एकुण दोन दरवाजाची रचना असुन या दरवाजाची मोठया प्रमाणात पडझड झाल्याने व येथील तटबंदी ढासळल्याने आपल्याला थेट दुसऱ्या दरवाजाखाली असलेल्या पायऱ्यापर्यंत जाता येते. पहिला दरवाजा एका बुरुजाच्या आधारे कडयालगत बांधलेला असुन दुसरा उत्तराभिमुख दरवाजा मात्र दोन बुरुजात बांधलेला आहे. या दोन्ही दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या उध्वस्त झालेल्या देवड्या पहायला मिळतात. वाटेवर कपारीखाली मातीत बुजलेले पाण्याचे लहान टाके पहायला मिळते. पायऱ्या चढुन दुसऱ्या भग्न दरवाजातुन गडात प्रवेश केल्यावर समोरच चौथऱ्यावर छप्पर नसलेले मारुती मंदीर पहायला मिळते. या मंदीराकडून समोर,उजवीकडे व डावीकडे जाणाऱ्या तीन वाटा असुन या तीन वाटांनी आपल्याला संपुर्ण किल्ला पहाता येतो.

किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ३६२५ फुट असुन त्रिकोणी आकाराचा हा किल्ला साधारण १२ एकर परिसरावर पसरला आहे. डावीकडील वाटेने सुरवात केल्यावर वाटेच्या सुरवातीला एक बुजत चाललेली चौकोनी आकाराची बांधीव विहीर असुन या विहिरीत उतरण्यासाठी पायरीमार्ग आहे. विहिरीच्या पुढील भागात चुना मळण्याचा घाणा व त्याचे चाक आहे.येथुन डावीकडील तटबंदीच्या कडेने पुढे आल्यावर खडकात खोदलेले एक लांबलचक जोडटाके पहायला मिळते. भिंत बांधून या टाक्याचे दोन भाग केले असुन टाक्यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. टाक्याकडील झाडीतून वाट काढत आपण किल्ल्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाची तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक असुन येथुन समोरच जुना वासोटा किल्ल्याचा डोंगर दिसतो. जुना वासोटा डोंगराला असलेला अर्धवर्तुळाकार कडा बाबुकडा म्हणुन ओळखला जातो. या बाबुकड्याच्या पायथ्यातूनच वसिष्ठी नदीचा उगम होतो. या बुरुजावरून दिसणारा धरणाचा परीसर व घनदाट जंगल एखादया चित्राप्रमाणे भासतो.

जुना वासोटा गडावर जाणारी वाट आज अस्तित्वात नसुन या गडावर पाण्याची सोय नाही. तसेच या भागात घनदाट झाडी व वन्यप्राणी असल्याने त्या भागात शिरण्यास वनखात्याची सख्त मनाई आहे. या गडावर फारसे अवशेष नसुन पुर्वी या ठिकाणी गेलेल्या काही जणांनी तेथे तटबंदीचे अवशेष आणि तोफा असल्याचे नोंदविले आहे. येथून परत मारुती मंदिरापाशी येउन उजव्या बाजुच्या वाटेने किल्ल्याच्या उत्तर टोकावर असलेल्या काळकाईच्या ठाण्याकडे जाता येते. या वाटेवर सर्वप्रथम डाव्या बाजुला एक मोठा तलाव दिसतो. या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या असुन त्यातील पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. तलावाच्या आसपास ३-४ दगडी ढोणी पहायला मिळतात. येथुन पुढे गेल्यावर जांभ्या दगडाने बांधलेले महादेवाचे सुंदर मंदिर असुन या मंदिराच्या अलीकडे एक भिंती शिल्लक असलेली कोठारासारखी वास्तू पाहायला मिळते.

मंदिराच्या पुढील भागात बांधीव बुरुज असुन येथून खाली उतरणाऱ्या पायऱ्या व चिंचोळी वाट आपल्याला माचीवर घेऊन जाते. या माचीवर प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे असुन या दोन दरवाजांची चौकट आजही शिल्लक आहे. हि माची काळकाईचे ठाणे म्हणुन ओळखली जाते. या माचीवरून घनदाट जंगलांनी व्यापलेला चकदेव पर्वत, रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे दुर्गत्रिकुट व कोयनेचा जलाशय नजरेस पडतो. येथून नागेश्वर सुळका व दूरपर्यंतचा परिसर दिसतो. येथुन मारुती मंदिराकडे परत आल्यावर सरळ जाणारी वाट आपल्याला किल्ल्यावरील उध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते. गडावर सर्वत्र झाडी वाढलेली असल्याने गडावरच्या वास्तू त्यात हरवुन गेल्या आहेत. येथे झाडीत लपलेला एका मोठ्या चौसोपी वाड्याचा चौथरा व भिंती,त्यात असलेले कोनाडे तसेच शौचकुप व पाण्याचे टाके यासारखे अवशेष पाहायला मिळतात. हा बहुधा खासे लोकांसाठी राहण्याचा वाडा असावा.

पूढे ही वाट तटबंदी उजव्या बाजुला ठेवत किल्ल्याच्या पश्चिम टोकावर असलेल्या कड्यापाशी जाते. या वाटेवर बुजत चाललेले पाण्याचे टाके पहायला मिळते. पश्चिम टोकावरून मारुती मंदिराकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास २ तास पुरेसे होतात. परत जाण्यासाठी वासोट्यावरून नागेश्वरमार्गे परत कोकणात उतरता येते. कोकणातील चोरवणे येथुन किल्ल्यावर येण्याचा मार्ग जास्त सोयीस्कर असुन त्यासाठी खाजगी वाहन सोबत असायला हवे. हा मार्ग कमी खर्चाचा व कमी वेळ घेणारा आहे.

इतिहासात असणाऱ्या वासोटा किल्ल्याच्या नोंदी पहाता हा एक महत्वाचा किल्ला असल्याचे दिसुन येते. या किल्ल्याची बांधणी कोल्हापूरचा शिलाहार राजा दुसरा भोज (११७८-९३) याच्या काळात झाली असावी असे मानले जाते. या किल्ल्याचा उल्लेख राष्ट्रकुट राजा अविधेय याच्या पांडरंगपल्ली ताम्रपटात वासाटा असा आलेला आहे. त्यानंतर सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात तो शिर्के आणि मोरे या आदिलशाहीतील सरदारांच्या ताब्यात होता. १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा पराभव करून जावळी परिसरातील इतर मुलूख काबीज केला पण त्यावेळी वासोटा मात्र ताब्यात आला नसावा. अफझलखानच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने अफझलखानाची गलबते ताब्यात घेण्यासाठी राजापुरवर हल्ला केला असता येथील इंग्रजांनी हि गलबते व त्यावरील माल आपला असल्याचा बनाव करून गलबते देण्यास नकार दिला.

पुढे शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यात पन्हाळ्यात अडकले असताना जिजाबाईंनी बांदलांचे सैन्य पाठवून हा गड ६ जुलै १६६० रोजी स्वराज्यात आणला व त्याचे नाव व्याघ्रगड ठेवले. गडाची दुर्गमता पहाता शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला. महाराज पन्हाळ्यावर अडकले असताना राजापुर वखारीतल्या इंग्रजांनी सिद्दी जोहरला मदत म्हणून लांब पल्ल्याच्या तोफा व त्या डागण्यासाठी गोलंदाज पुरविले. त्यामुळे इंग्रजांना अद्दल घडविण्यासाठी कोकण स्वारीत महाराजांनी राजापुरची वखार लुटताना रेव्हिंग्टन, ग्रिफर्ड या इंग्रज अधिकाऱ्याना अटक करून वासोटा येथे कैदेत ठेवले. सप्टेंबर १६७९ मध्ये शिवाजी महाराजांना या किल्ल्यावर २६००० रुपये भरलेले ४ मोहरांचे हंडे सापडले होते. महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब महाराष्ट्रात आला असता त्याने किल्ले अजिंक्यतारा व सज्जनगडाला वेढा घातला. यावेळी सज्जनगडावरील समर्थांच्या पुजेतील देव सुरक्षितपणे वासोट्यावर हलवण्यात आले. यानंतर रायगडावरुन जिंजीला जाताना राजाराम महाराज वासोटा किल्ल्यावर आल्याचे ओझरते उल्लेख येतात.

पुढे पेशवे आणि औंधचे पंतप्रतिनिधी यांच्या भांडणात पेशव्यांनी सरदार बापु गोखले याला पंतप्रतिनिधीवर पाठवले. बापु गोखले यांनी प्रतिनिधींचा पराभव केला पण पंत प्रतिनिधींची उपपत्नी ताई तेलीण हिने वासोटा किल्ल्यावर रसद व दारुगोळा जमा करुन बंड पुकारले. बापु गोखले हे बंड मोडण्यासाठी वासोट्याच्या पायथ्याशी पोहचले. हि झुंज आठ- दहा महिने सुरु राहिली. यावेळी बापु गोखलें यांनी वासोट्याशेजारी असलेल्या जुना वासोटा या टेकडीवर तोफ चढवून मारा सुरु केला तेव्हा ताई तेलीणीने शरणागती पत्करली व वासोटा किल्ला बापु गोखले याच्या ताब्यात आला. ताई तेलीणीला कैद करुन मानाने पेशव्यांकडे पाठवले गेले. या संबंधी वासोटा किल्ल्याचा एक गमतीदार उल्लेख आहे. तो असा श्रीमंत प्रतिनिधींचा अजिंक्य किल्ला वासोटा |ताई तेलीण मारील सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा|.

इ.स.१८१७ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने काही दिवस छत्रपती प्रतापसिंह व त्यांच्या कुटुंबियांना या किल्ल्यात ठेवले होते. त्यानंतर इ.स.१८१८ मधे मराठ्यांनी कॉर्नेट हंटर आणि मॉरिसन या मद्रासच्या दोन इंग्रज अधिकाऱ्यांना हैद्राबादवरुन पुण्याकडे जात असताना खडकीजवळ पकडले व मंगळगडावर नेले व नंतर त्यांना वासोट्यास कैदेत ठेवले. त्यांना सोडविण्यासाठी जनरल प्रिझलर व त्याच्या मदतीला ग्रँट डफ, एलफिस्टन हे अधिकारी सैन्यासह वासोट्याच्या पायथ्याशी आले. सुरवातीला इंग्रजांनी पायथ्याहूनच मारा केला पण किल्लेदार भास्करपंत यांनी कडवा प्रतिकार केला. शेवटी जनरल प्रिझलर याने बापु गोखल्याप्रमाणे २९ मार्च १८१८ रोजी शेजारच्या जुन्या वासोटा टेकडीवर तोफा चढवून त्यांच्या मारगिरीने हा किल्ला हस्तगत केला. तोफेच्या माऱ्यामुळे किल्ल्यावरील वास्तु मोठया प्रमाणात उध्वस्त झाल्या. ग्रँट डफच्या म्हणण्यानुसार हा भडीमार वीस तास चालला होता. किल्ला हस्तगत तेव्हा दोन लाखाची लुट व सातारा छत्रपतींचे तीन लाखाचे जडजवाहिर इंग्रजांच्या ताब्यात आले.

ता.क.किल्ला दुर्गम असला तरी शनिवार रविवार हौशी पर्यटकांची किल्ल्यावर मोठया प्रमाणात गर्दी असते. यात गडप्रेमीपेक्षा सेल्फीप्रेमी व निसर्गातील गाणी ऐकण्यापेक्षा मोबाईलवर गाणी वाजवणारे मोठया प्रमाणात असतात. हि गर्दी १५०-२०० लोकांपेक्षा जास्त असल्याने किल्लादेखील नीट पहाता येत नाही. या अशा गर्दीमुळे वन्यप्राणी वाटेच्या आसपास थांबण्याची अजिबात शक्यता नाही.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment