महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,36,679

वासुदेव बळवंतांना जन्मठेप

By Discover Maharashtra Views: 1589 2 Min Read

वासुदेव बळवंतांना जन्मठेप

९ जानेवारी १८८० : क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन ब्रिटीश सरकारने वासुदेव बळवंतांना जन्मठेप शिक्षा सुनावली.

ब्रिटीश सरकारच्या नाकीनऊ आणणारे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके गाणगापुरास आहेत, ही बातमी ब्रिटिश सरकारच्या कानावर गेली. सरकारने त्यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले आणि मेजर डॅन्यीएलला त्या मोहिमेवर धाडले. वासुदेव बळवंत हे धानुरला (गाणगापुरला) आहेत, असे समजताच त्याने गावाला वेढा दिला; पण वासुदेव बळवंत तेथून पळून गेले; तथापि त्यांचे कागदपत्र मात्र शत्रूच्या हाती पडले. त्यांत मुंबईच्या लष्कराचा एक नकाशा, गव्हर्नरचा खून, इतर यूरोपीयांचे खून यांबद्दल १०,००० ते ५,००० पासूनची बक्षिसे जाहीर केली होती, शिवाय हैदराबाद येथील मौलवी मुहम्मदसाहेब या प्रतिष्ठित गृहस्थास वासुदेवांची शिफारस करणारे एक पत्र होते.

मौलवीसाहेब निजामाच्या सैन्यातील अरब, रोहिले आणि शीख यांच्या पलटणीचे मुख्य सेनाधिकारी होते. वासुदेव बळवंताचे हे सर्व गुप्त बेत कळल्यामुळे मे. डॅन्यीएलने निजामाचा पोलीस आयुक्त अब्दुल हक याच्या मदतीने वासुदेवांचा पाठलाग सुरू केला. फितुरीमुळे त्यांना त्यांचा ठावठिकाणा मिळाला आणि विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी या गावी एका बौद्ध विहारात त्यांना निद्रिस्त अवस्थेत त्यांच्या काही अनुयायांसह पकडण्यात आले (२१ जुलै १८७९).

पुणे येथे त्यांच्यावर दंड संहितेच्या १२१ए, १२२, १२४ए इ. कलमांन्वये खटला चालविण्यात आला. ९ जानेवारी १८८० रोजी न्या. न्यूनहॅम यांनी त्यांना जन्मठेपेची- काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली. पुढे त्यांची रवानगी एडनच्या तुरुंगात झाली. तेथून आत्महत्या करण्याचा व पळून जाण्याचा वासुदेव बळवंताचा प्रयत्न फसला. तुरुंगातील हाल, एडनची उष्ण हवा यांमुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि क्षयरोगाने त्यांना पछाडले. त्यातच अखेरीस त्यांनी अन्नग्रहण सोडले. ते एडन येथील कारावासातच मरण पावले.

– प्रसन्न खरे.

संदर्भ : मराठी विश्वकोश

Leave a Comment