महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,752

वा. सि. बेंद्रे उर्फ वासुदेव सिताराम बेंद्रे

By Discover Maharashtra Views: 4453 12 Min Read

सि. बेंद्रे उर्फ वासुदेव सिताराम बेंद्रे
साधन चिकित्साकार, शिवअभ्यासक, आणि जेष्ठ इतिहासकार
जन्म १३/०२/१८९६, पेण – रायगड

वासुदेव सिताराम बेंद्रे यांचा जन्म सध्याच्या रायगड जिल्ह्यातील “पेण” येथे १३ फेब्रुवारी १८९६ साली झाला. “पेण” येथील प्राथमिक शिक्षणा नंतर मैट्रीक पर्यंतचे त्यांचे शिक्षण मुंबई येथील विल्सन हायस्कूल मध्ये झाले. ते १९१३ मध्ये म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी सर्व जगतातील Short-hand परीक्षेत पहिल्या नंबरने सुवर्णपदक घेऊन उतीर्ण झाले. या त्यांच्या विक्रमामुळे त्यांना पुढे नोकरी करितानिराळा प्रयत्न करावा लागला नाही. तर नोकऱ्या त्यांच्यापुढे चालून आल्या निरनिराळे मोठे युरोपियन अधिकारी श्री.बेन्द्रे यांच्या गुणाकडे आकर्षित होत व हा तरुण आपल्या हाता खाली असावा अशी मागणी करीत. परंतु श्री. बेंद्रे ह्यांनी शिक्षणखात्या मध्येच स्थायिक होण्याचे ठरविले. पुढे इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात या प्रावीण्याचा निश्चित उपयोग झाला असे दिसते.
१९१८ मध्ये जेंव्हा पुण्याला आले तेव्हा सरकारी दप्तरात तर ते काम करीत होतेच पण भारत इतिहास संशोधक मंडळाशीही संलग्न होते. १७ व्या शतकाचा इतिहास हे ‘संशोधनांचे-क्षेत्र’ बेंद्रे यांनी प्रामुख्याने निवडले. एक साधन संग्राहक,साधनसंपादक, साधनचिकित्सक,संशोधक व इतिहासकार या विविध भूमिका समर्थपणे पार पाडल्या. वि.का.राजवाडे यांना गुरुस्थानी मानून संशोधनाचे काम त्यांनी सुरु केले व आपल्या गुरूंचीच संशोधनाची परंपरा पुढे चालविली. आपल्या गुरुंप्रमाणेच महाराष्ट्राच्या राष्ट्रीय इतिहासाची रचना करणे हे बेंद्रे यांचे ध्येय होते. महाराष्ट्राच्या ‘शास्त्रशुद्ध व वास्तव-बोधी इतिहास’ रचनेसाठी इतिहास लेखन कलेची कोणतीही जुनी परंपरा स्वीकारून चालणार नाही तर नवीन परंपरा व पद्धती स्वीकारावयास हवी हीं जाणीव बेंद्रे यांना होती. यासाठी प्रथम साधने जुळविणे ‘साधन-निष्पत्ति’ होणे आवश्यक आहे हे त्यांनी सांगितले. साधन-निष्पत्ति नंतर उपलब्ध झालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्ण परीक्षण करून इतिहास रचनेचा पाया शुद्ध रचण्याकडे त्यांनी लक्ष दिले. ‘ जुन्या कागदपत्रांची परीक्षा पक्की व नक्की ‘ करण्यास त्यांनी महत्व दिले. यातूनच सन १९२८ मध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड ‘साधन- चिकित्सा’ या ग्रंथाचा जन्म झाला.ह्या पुस्तकाबद्दल म्हंटले तर त्यांनी त्याच्या तरुणपणात लिहिलेले पहिले पुस्तक परंतु आज त्या पुस्तकाला इतिहास कलेचे बायबल आहे असे म्हंटले गेले.
इतिहास संशोधक बेंद्रे ह्यांचे अगाध कार्य, चिकाटी व इतिहासा विषयीचा त्यांचा अभ्यास पाहून, १९३८ मध्ये मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉन (ज्यांच्या नावाचे ब्रेबॉन स्टेडियम आजही मुंबईत प्रसिद्ध आहे) च्या इच्छेवरून श्री.वा.सी.बेंद्रे यांना सरकारी खास शिष्यवृत्ती देऊन “हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर” म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला पाठवले. टंक लेखनासारख्या अनुभवाचा त्यांना या प्रसंगी खूप फायदा झाला. दोन वर्षात मराठ्यांच्या विशेषतः संभाजी महाराजांच्याखास इतिहास विषयक साधनांचे संशोधन व त्या करिता इंडिया हाउस व ब्रिटीश म्युझियम मधील ऐतिहासिक साधनांचे सुमारे २५ खंड होतील एवढी सामुग्री परत आणली. इंग्लंड मधील वास्तव्यामुळे श्री.बेंद्रे यांचे संशोधन-संकलन क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले. त्यामुळे त्यांच्या इतिहास विषयक संशोधन कार्यातील ही शिष्यवृत्ती आणि तेथील वास्तव्य हा महाराष्ट्रातील इतिहास संशोधनाचा महत्त्वाचा टप्पाच मानावा लागतो.
संशोधक बेंद्रे ह्यांचा ऐतिहासिक कागदपत्रांचा गाढा अभ्यास त्या वेळेच्या सरकारच्या लक्षात येऊन सरकारने त्यांना १९४८ मध्ये पेशवे दप्तरात संशोधन अधिकारी नेमले. पेशवे दप्तरखान्याचे अधिकारी असताना बेंद्रे ह्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या दृष्टीने अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडली आहे. पेशवे दप्तरात सुमारे ४ कोटी ऐतिहासिक कागदपत्रांचे विस्कळीत संकलन होते. ह्या कागदपत्रांचे कॅटलॉगिंग करणे ,विषय-वार विभागणी करणे, हे अभ्यासकाच्या उपयुक्ततेचे कार्य हे श्री.वा.सी.बेंद्रे यांनीच मार्गी लावले. या नोंदणी मध्ये शास्त्र-शुद्धता आणि बिनचूकपणा येणे अत्यंत महत्त्वाचे होते. अनेक प्रकारच्या कागदपत्रांचा अभ्यास करून ‘ सर्व कागदांची विषय वारीने विभागणी करून त्याचा वन लाइन कॅटलॉग कसा तयार करावा त्याची विस्तृत माहिती इंग्रजीत लिहून काढली. कॅटलॉग कसा करावा याच्या विस्तृत माहितीचे पुस्तक तयार केले. ‘Alienation office Records and Poona Dafter’ हेच ते पुस्तक होय. इ.स. १९५० साली शासनाने प्रसिद्ध केलेले हे पुस्तक आजही वस्तुसंग्रहालय आणि अभ्यासक ह्यांना उपयुक्त ठरत आहे. त्यांचा “Report on the Peshwa dafter or Guide to the records” हा अहवालही उपयुक्त ठरला आहे..
१९४८ मध्ये त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांनी सरकारी कामातून निवृत्ती घेतल्यानंतर वर्ष-दीड वर्षातच त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. बाळासाहेब खेर यांचा त्यांना आदेश आला की, तंजावरच्या रेकॉर्डसची तपासणी करून त्याची व्यवस्था व अहवाल करून देण्यास त्यांच्या नावाची शिफारस केली आहे, तरी ती त्यांनी स्वीकारावी व त्यांची सर्व व्यवस्था सरकार करणार आहे असे त्यांना सांगितले गेले. श्री.वा.सी.बेंद्रे यांची त्या कामासाठी चार वर्षाच्या मुदतीसाठी दरमहा ५०० रुपये वेतनावर नेमणूक झाली होती परंतु त्यांनी ते काम अवघ्या दीड वर्षातच उरकले व सर्व उपयुक्त कागद निवडून मद्रास रेकॉर्डकडे पाठविले. महत्त्वाच्या कागदांची व एकंदर रूमालांची यादी करून सरकारकडे पाठविली. चांगले काम करणार्या माणसाची शिफारस केल्याबद्दल खेर यांना मद्रासचे मुख्यमंत्री श्री. राजगोपालाचारी यांचे पत्र आले, तेव्हां खेरांना अतिशय आनंद होऊन त्यांनी श्री.बेंद्रे यांचा गौरव केला.
जेव्हां लंडनमधील मराठ्यांच्या इतिहासाची साधने तपासण्याची आणि ती संकलित करण्याची श्री.बेंद्रे ह्यांना संधी मिळाली तेव्हां अशी साधने तपासतांना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने किंबहुना महाराष्ट्राच्या दृष्टीने एकअतिशय बहुमोल असा ठेवा प्राप्त झाला. तो पर्यंत इब्राहीम खान नावाच्या एका परकीय व्यक्तीचे चित्र “शिवाजी महाराजांचे” चित्र म्हणून महाराष्ट्राच्या इतिहास विषयक पुस्तकातून छापलेले होते. हे चित्र मनुची ह्या चित्रकाराच्या संबंधात होते. या वरून त्याच आकृतीचे चेहरे रंगवून मुसलमान पेहराव चढवलेली तथाकथित शिवाजी महाराजांची बरीच चित्रे प्रसारात आली होती. संदर्भहीन असे महाराजांचे चित्र समाजात पूजिले जात होते. इ.स.१९१९ मध्ये श्री बेंद्रे संभाजी महाराजांच्या चरित्र लेखनाची तयारी करीत होते. ग्रंथ चाळताना त्यांच्या समोर मैंकेनझीने संपादित केलेल्या ग्रंथाचे काही भाग होते,त्यात व्हैलेनट्यीन ह्या डच गव्हर्नरने लिहिलेले ६३-६४ सुरतेच्या डच बखरीत तो गव्हर्नर होता. त्याच्या आणि महाराजांच्या भेटी प्रसंगी काढून घेतलेले चित्र आणि व्हैलेनटाइनचे पत्र श्री बेंद्रे ह्यांना ह्या पत्रात मिळाले. श्री. बेंद्रे यांनी मूळ चित्राचे तितक्याच आकाराचे एक छायाचित्र काढून घेतले शिवाजीराजांचे ह्या चित्रातील कल्ले हे कोणत्याही चित्रात दिसणारे नाहीत. पांढर्या अंगरख्यावर शिवरायांनी चक्क उपरणे टाकले आहे. अंगावरील दागिने हे अस्सल मराठी पद्धतीचे आहेत. इंग्लंड मध्ये या चित्राची त्यांनी खात्री करून घेतली.ह्या चित्राच्या प्राप्तीमुळे श्री बेंद्रे ह्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्वाची देणगीच मिळाली! शिवाजी महाराजांच्या या चित्रामुळे “इब्राहिमखान”पुस्तकातून हटला गेला.बेंद्रे यांनी प्राप्त केलेल्या शिवरायांची स्थापना इतिहासविषयक पुस्तकातून आणि घराघरातून झाली. शिक्षण संस्थांनाच काय पण शासकीय यंत्रणेलाही त्यांच्या कार्यालयातील शिवाजी महाराजांच्या चित्र मागील अज्ञात गोष्टी आणि डच गव्हर्नरचे लेखन याची माहिती नसेल. ह्या चित्राची प्राप्ती ही बेंद्रे ह्यांची एक अतिशय महत्वाची कामगिरी मानावी लागेल. पुढे श्री बेंद्रे ह्यांनी ह्या चित्राच्या प्रसारास प्रारंभ केला. चित्राच्या आकाराच्या प्रती काढण्यासाठी त्यांनी इंडिया हाउस कडून परवानगी मिळवली.सरकारी छापखान्यातून अशा प्रती छापण्याची त्यांनी योजना केली.इ.स. १९३३ मधील शिवजयंतीच्या निमित्ताने साहित्याचार्य न.ची.केळकर ह्यांनी हे चित्र समाजापुढे आणण्यासाठी पुण्यातील शिवाजी मंदिरात कार्यक्रम योजला. तेथे या चित्राचे समारंभपूर्वक प्रकाशन केले.पुण्याच्या शिवाजी मंदिरात प्रेक्षक आले ते त्यांच्या राजाचे खरे रूप पाहण्यासाठी .शिवाजी महाराजांचे सत्य चित्र श्री.तात्यासाहेब केळकरांनी त्या दिवशी प्रकाशित केले.शिवाजी महाराजांची अधिकृत प्रतिमा म्हणून आज सर्वत्र ज्या छायाचित्राला मान्यता मिळाली आहे ते छायाचित्र इतिहासकार वासुदेवराव बेंद्रे यांनीच एकेकाळी हस्तगत केले होते व स्वतःच्या नावाने प्रसिद्ध केले होते श्री. बेंद्रे यांनी सर्व मराठीतील वृत्तपत्रांकडे शिवरायांचे हे चित्र पाठवले आणि सर्व भाषांतील वृत्तपत्रांनी व्हॅलेंटाईनच्या पत्रासह ते छापले. रायगडचा राजा तेव्हांपासून खर्या रुपात घरोघरी गेला. आज मंत्र्यांच्या खोल्यांमधून आणि सरकारी कार्यालयांतून श्री. बेंद्रे यांनी शोधून काढलेलेच शिवाजीराजांचे चित्र लावलेले असते. भारतीय चित्रकारांनी त्यांच्या विविध आकाराच्या प्रतिकृती काढल्या आहेत.याचे सर्व श्रेय श्री वा.सी.बेंद्रे ह्यांनाच जाते. तेव्हा व्हैलेनट्इनच्या संबंधातील शिवाजी महाराजांचे चित्र आणि त्यासंबंधीचा लेख(पत्र ) प्रसिद्ध करून श्री वा.सी.बेंद्रे यांनी अत्यंत महत्वाची कामगिरी केली व मराठ्यांच्या इतिहासाला तितकेच मोलाचे योगदान दिले.
पूर्वीच्या ऐतिहासिक नाटकांचा विचार करता ती बहुतांशी बखर वांडमयाच्या आधारे, ऐकीव व परंपरागत चालत आलेल्या माहितीच्या आधारे सजवलेली होती. संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी भाषेत पुष्कळ नाटके लिहिली गेली,त्यातील बहुतेक नाटकात संभाजी व्यसनाधीन, बदफैली ,व्यभिचारी, दुर्वतर्नी, असाच नाटककाराने उभा केला होता .श्री बेंद्रे ह्यांना हे भावत नव्हते. संभाजी महाराजांचे चरित्र संशोधित केले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात बरेच दिवस घोळत असावा. मंडळातील त्यांचे स्नेही श्री पांडोबा पटवर्धन यांनी या विषयाच्या संशोधना साठी त्यांचे कडे विशेष आग्रह धरला होता. या विषयाकडे श्री बेंद्रे यांचे लक्ष इ.स. १९१८ पासून वेधले गेले. यासाठी ते कोठेही असोत साधने जमवीतच गेले.
अखेरीस अडी-अडचणीन वर मात करून परदेशातही शोध घेऊन या विषया संबंधीची हजारो साधने त्यांनी एकत्रित केली, आणि त्यावर आधारित असा संभाजी महाराजांचा चरित्र ग्रंथ इ.स. १९५८ मध्ये लिहून पूर्ण केला. म्हणजे त्यांची सुमारे ४० वर्षे या विषयासाठी खर्ची पडली. ह्या ग्रंथाने समाजात विलक्षण खळबळ उडवून दिली. इ.स.१९६० मध्ये “संभाजी” चे खरे चरित्र आपणा सर्वांसमोर प्रसिद्ध झाले. ह्या ग्रंथाने समाजात महाराष्ट्र इतिहास संशोधन क्षेत्रात श्री.वा.सी.बेंद्रे यांचे नाव संभाजी महाराजांवरील त्यांचे प्रदीर्घ संशोधन व संभाजी महाराजांची पारंपारिक प्रतिमा बदलून नवी प्रतिमा उभे करणारे म्हणून प्रसिद्ध आहे. त्यातून संभाजी महाराजांची व्यक्ति रेखाच बदलली. त्यामुळे संभाजी महाराजांची पराक्रमी, संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारी,धोरणी,मुत्सद्दी अशी तेजस्वी प्रतिमा उंचावली गेली. संभाजी महाराजांचे चरित्र प्रकाशित करून श्री वा.सी.बेंद्रे यांनी महत्तम कामगिरी केली आहे. संभाजी महाराजांची व्यक्तिरेखाच बदलली गेल्यामुळे आधीचे वांडमयीन न लेखन त्याज्य ठरले. श्री बेंद्रे यांनी सर्व विवेचन साधार आणि संशोधनाच्या पायावर उभे केले. या चरित्रामुळे स्वाभिमानी, धर्मनिष्ठ, पराक्रमी, संस्कृत जाणकार अशा संभाजी राजा बद्दलचे सर्व गैरसमज दूर झाले .त्या आधारे संभाजी महाराजांच्या जीवनातील सर्व विसंगती त्यांनी निपटून काढल्या. श्री बेंद्रे यांनी यासाठी ऐतिहासिक कागदाचा चिंटोराही दुर्लक्षित केला नाही. हे चरित्र खरया अर्थाने गाजले. अभ्यासकांना पुनरभ्यास करण्यास त्याने प्रवृत्त केले. चरित्रातील नव्या अभ्यासावर आधारित “इथे ओशाळला मृत्यू ” किंवा “रायगडाला जेव्हां जाग येते ” अशी मनोविज्ञानाचा आधार घेतलेली आणि संभाजी महाराजांची नवीनच व्यक्तिरेखा साकारणारी प्रा.कानेटकरान सारख्यांची नाटके रंगमंचावर यशस्वी होवू लागली.श्री शिवाजी सावंतांच्या ‘छाव्याने ” हेच दर्शविले.या नव्या कलाकृतीं बरोबर नव्या इतिहास अभ्यासकांना अधिक वाव मिळाला. “शिवपुत्र संभाजी” सारख्या पी.एच.डी च्या ग्रंथासाठीही डौ.सौ.कमल गोखले यांनी संशोधना साठी बेंद्रे यांच्याच संशोधनाचा आधार घेतला. आपण पाहिलं तर नंतरच्या काळामध्ये कमलाताई गोखल्यांचा प्रबंध असेल ,कानेटकरांची नाटके असतील, संभाजी महाराजांचे खरं स्वरूप दाखवणारी ठरली ,पण त्याचा पाया रचला तो इतिहास संशोधक बेंद्रे यांच्या संभाजी महाराजांच्या संशोधित चरित्र ग्रंथाने ने रचलेला आहे. इतिहास साधनांच्या प्रचंड पर्वताच्या उत्खननाच्या उलाढालींत जुना लोकप्रसिद्ध धर्मवीर परंतु दुर्गुणी संभाजी न सापडता एक महान विभूति असलेला संभाजी गवसला.धर्मांकरितां आत्यंतिक यातनांच्या अग्नीमध्यें शौर्याने व धीराने उभा राहून प्राणविसर्जित करणारा संभाजी दुर्व्यसनी ,खुनी व धर्मभोळा म्हणून आजपर्यंत इतिहासलेखकांनी व नाटककारांनी दाखविला आहे ; तत्वचिंतकाच्या दृष्टीनें हें एक न उलगडलेले कोडें होते. जिवंतपणी शरीराचे तुकडे होत असतां ,डोळे काढले जात असतां, शरीर सोलले जात असतां जो धर्मनिष्ठेनें देहातीत रहातो व आपल्या धर्मनिष्ठेच्या अंतिम कसोटीस उतरतो तो आयुष्यभर देहधर्माचा दास म्हणून वागतो,ही घटना सुसंगत वाटत नाहीं ,अतर्क्य वाटते.आतां श्री.बेंद्रे यांनी या वैचारिक कोडयांतून कायमची सुटका केली आहे.मराठ्यांच्या विषयीं गैरसमज असलेला मुसलमान इतिहासकार काफिखान संभाजीस शिवाजीपेक्षां सवाई समजतो ,याचा उलगडा या चरित्राने होतो. हे चरित्र खरया अर्थाने गाजले,अभ्यासकांना पुनरभ्यास करण्यास त्याने प्रवृत्त केले. ह्या ग्रंथास सुद्धा साहित्य अकादमीने पुरस्कृत केले आहे.
पोस्ट साभार – साधना बेंद्रे
Facebook page – वा. सि. बेंद्रे
Leave a Comment