वासुदेव मंदिर, वाटेगाव –
वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं जन्मगांव, धार्मिक आणि अध्यात्मिक असणारे हे वाटेगांव अजून एका विशेष मंदिरामूळं देशभरात प्रसिद्ध आहे ते म्हणजे संपूर्ण भारतात एकमेव असे असणारे वासुदेव मंदिर.
भोगावती नदीकाठी उत्तराभिमूख असणारे हे मंदिर २०० वर्षांपुर्वी उभारण्यात आले आहे. गावातील दिवेकर कुटुंबाचे हे देवस्थान असून मंदिराचा मंडप हा पूर्ण सागवानी लाकडाचा आहे. मंदिराची लांबी ६० फूट आणि रुंदी ३० फूट आहे. मंदिराचे शिखर ५० फूट उंचीचे असून अलीकडेच शिखराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे.
शांत हास्यमुद्रा असणारी ही मूर्ती पंचधातूची असून ती स्थानिक कलाकारांनीच तयार केली आहे. श्रीमद् भागवतात वर्णन केल्याप्रमाणे ध्यान करण्यास मूर्ती कशी असावी याप्रमाणे तयार केली आहे. दिवेकर घराण्याचे मूळ पुरूष श्री. वासुदेव स्वामी यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यांची समाधी मंदिराच्या समोरच आहे. मंदिराचे आवारात विविध प्रकारची फूलझाडे असून त्याच्या सुवासांनी मंदिर परिसर अजूनच प्रसन्न वाटतो.
वासुदेव मंदिरामध्ये पहाटे काकड आरती पासून रात्री शेजारती पर्यंत १२ ही महिने रोजचा नित्यक्रम सुरू असतो. वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात त्यामध्ये प्रामुख्याने ज्ञानेश्वरी सप्ताह , एकनाथ भागवत सप्ताह , दत जयंती, श्रीराम नवमी , हनुमान जयंती , श्रीकृष्ण जन्माष्टमी , गुरूपौर्णिमा ( व्यास पूजा ) , गोवर्धन पूजा , श्री वासुदेव मूर्ती स्थापना वाढदिवस , तसेच कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपूरी पौर्णिमा असा तब्बल एक महिना चालणारा अतिशय दुर्मिळ असा दिपोत्सव असे विविध कार्यक्रम साजरे केले जातात…
दिपोत्सव म्हणजे खूप आनंददायी अनुभव असतो. अगणित पण त्या, समया , रंगमाळा , दिपमाळा , टांगते कंदील असे अनेक प्रकारचे दिवे रोज रात्री लावले जातात . जवळपास एक हजार दिव्यांनी मंदिर आणि परिसर उजळून निघतो . रोज एक हजार वाती आणि पाच किलो गोडेतेल यासाठी वापरले जाते . गाभा-यात तूपाचे दिवे लावले जातात . हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करत असतात.
© अक्षय बापुले.