महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,66,169

वटेश्वर महादेव मंदिर, धोडंबे

By Discover Maharashtra Views: 1437 2 Min Read

वटेश्वर महादेव मंदिर, धोडंबे –

नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध अश्या धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले धोडंबे हे साधारण पाच हजार लोक वस्तीचे एक गावं. नाशिकहून मुंबई-आग्रा महामार्गावर ५० कि.मी. अंतरावर वडाळभोई गाव लागते. डाव्या हाताने वडाळभोईतून भायाळेमार्गे धोडंबेकडे जाता येते. वडाळीभोईतून धोडंबे हे अंतर आठ कि.मी. आहे तर चांदवड ते धोडंबे हे अंतर २६ कि.मी. आहे. कदरू आणि विनता नदीच्या संगमावर धोडंबे गाव वसले आहे. धोडप किल्ल्यामुळे गावाला धोडंबे असे नाव पडले असावे तसेच धौम्य ऋषींमुळे गावाला धोडंबे हे नाव पडले असेही ग्रामस्थ सांगतात. धोडंबेत महादेव अन् विष्णू यांची शेजारी शेजारी अशी दोन हेमाडपंती मंदिरे असून हे धोडंबेचे वेगळेपण म्हणता येईल.(वटेश्वर महादेव मंदिर, धोडंबे)

गावात हेमाडपंती वटेश्वर हे महादेव व शेजारी विष्णू मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे फक्त २ ते ३ फूट अंतर ठेवून आहेत. मंदिराच्या आजूबाजूला अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. महादेव मंदिरा बाहेर अनेक समाधी आहेत. मंदिर १२व्या शतकातील असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना असून अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृह व सभामंडप दोन्ही ही तारकाकृती आहेत. त्यामुळे मंदिराच्या बाह्यअंगावर क्षिप्त-उक्षिप्त भाग तयार झाले असून त्यावरील मूर्ती, नक्षीकाम बघण्यात वेगळाच आनंद मिळतो. येथील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील अप्सरा ह्या विविध प्रकारच्या प्राण्यांवर आरूढ झालेल्या असून सोबत सेविका देखील आहेत.

मंदिराच्या प्रवेशद्वारा शेजारील दोन खांबांच्यावर यक्ष मंदिराला आधार देत असल्याचे दिसते तर प्रवेशद्वाराच्या गणेशपट्टीवर ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींव्यतिरिक्त इतरही पौराणिक देवता सुबक रीतीने कोरलेल्या पहायला मिळतात. या सुंदर शिल्पां इतकीच खांबाची रचना अन् भिंतीवरील नक्षीकाम अन् मंदिराच्या बाह्यांगावरील स्त्री शिल्पांचे अनेक प्रकार थक्क करतात. मंदिराचा वरचा भाग नव्याने बांधलेला असला तरी त्याचे अलंकरण साधे पण आकर्षक आहे. मंदिराच्या मागे विनिता नदी वाहते.

महादेव मंदिरात काही वर्षांपूर्वी दरोडेखोरांनी चांदीचा मुकुट व पंचधातूची नागाची मूर्ती असा सुमारे तीन ते चार लाखांचा ऐवज चोरला होता. यावेळी मंदिरात झोपलेल्या एका वृद्धाला दरोडेखोरांनी ठार केले होते. त्यामुळे आता ग्रामस्थांकडूनच मंदिराची विशेष काळजी घेतली जाते. दगडातील अप्रतिम नक्षीकाम पाहताना थक्क करणारे हेमाडपंती शैलीतील प्राचीन वटेश्वर मंदिर अन् खव्यासाठी प्रसिद्ध असलेले धोडंबे आपली वेगळी ओळख आजही टिकवून आहे.

संदर्भ: ‘वारसायन’, श्री. रमेश पडवळ

©️ रोहन गाडेकर

Leave a Comment