महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,97,192

व्याल मूर्ती

Views: 1579
2 Min Read

व्याल मूर्ती –

मंदिरांच्या भीतीवर, स्तंभांवर, द्वारशाखांवर दिसणारा अक्राळ विक्राळ चेहऱ्याचा हा प्राणी म्हणजेच ‘व्याल‘ होय.व्याल मूर्ती यालाच वारालक, वराल, वीराल,व्रलीका, वरालीक, अशी नावे आहेत. दक्षिण भारतात ‘याली‘ तर ओरिसात याला “बीडाल” म्हणतात.

व्याल निर्मिती नेमकी कधीपासून चालू झाली यावर अभ्यासकांत दुमत आहे. मात्र व्याल ही संकल्पना सिथीयन किंवा ऍकमेनिडियन(इराणी) शिल्पकलेतून गांधार स्थापतींच्या माध्यमातून मौर्यकालखंडात भारतात आली असावी. गुप्तकाळात आणि नंतर मध्ययुगात व्यालाचा वापर वाढला होता. मूळ इराणी परंपरेतील व्यालाला असलेले पंख मात्र भारतीय शिल्पात दिसून येत नाहीत. सांची स्तूपावरील आणि जुनागढ(क्षत्रप काळ) संग्रहालयातील व्याल हे पंखयुक्त आहेत.

नंतरच्या होयसळ, चौल, पल्लव या सर्वच स्थापत्यकारांनी व्यालाचा पुरेपूर वापर केला. दहाव्या शतकातील ब्रह्मपुरीश्वर मंदिरात व्यालाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार बघायला मिळतो. या नंतरच्या विजयनगर स्थापत्यात व्याल मूर्ती सर्वाधिक वापरल्या गेल्या. कलात्मक दृष्ट्या खुजुराहो च्या व्यालमूर्ती डोळ्यात भरतात.

शिल्पशास्त्रातील अभ्यासक याला एक कल्पनाविलास मानतात, याच संकल्पनेतून विष्णूचा हायग्रीव, वराह अवतार, हत्तीची सोंड असलेला श्री गणेश, हनुमान, या देवता सुद्धा उत्क्रांत झालेल्या आहेत. हीच पशु-मानव संकल्पना मूर्तिकारांनी मंदिरांच्या सुशोभिकरणासाठी वापरली आहे.

सुळे व जीभ बाहेर आलेली, आखूड कान, बटबटीत डोळे, उग्र अविर्भाव असे अर्ध मानव अर्ध प्राणी असलेले. माणसाचे धड त्यावर सिंहाचे शीर,सोबतच हत्ती, साप, वाघ, माकड, हरीण, कोंबडा, मोर अश्या अनेक प्राण्यांचे शरीरापासून बनलेले जवळपास विसपेक्षा जास्त प्रकारच्या व्यालमूर्ती श्री ढाके यांनी त्यांच्या प्रबंधात मांडल्या आहेत. वास्तुशिल्पात गजव्याल, अजव्याल, वृषव्याल, अश्वव्याल, सर्पव्याल, नरव्याल,सिंहव्याल, मेशव्याल,खरवव्याल, गंडकीव्याल, अशे अनेक प्रकारचे व्याल आपल्याला भारतात पाहायला मिळतात.

व्याल हे सहसा एकटे खोदले जात नाहीत, कधी ते हत्तीवर आरूढ झालेले, कधी हत्तीच्या पायाखाली चिरडले गेलेले, कधी आपल्या पाठीवर एखादी सुरसुंदरी वाहणारे, कधी झेप घेण्याच्या पवित्र्यात, कधी कोण्या योध्यासोबत युद्ध करताना, तर कधी द्वारशाखेत एकमेकांवर एक असे सलग व्याल खोदले जातात.

सोबत दिलेल्या छायाचित्रांमध्ये असेच काही व्याल मूर्ती दाखवलेले आहेत, पैकी तामिळनाडूच्या धारसुरम इथल्या मंदिरात स्तंभ तोलणारे व्याल किंवा याली हे विशेष असून, सिंहाचे शरीर, हत्तीची सोंड, शिंगे, गाईची शेपटी अस त्यांचं स्वरूप आहे. सोळाव्या शतकानंतर मात्र मंदिरं स्थापत्यातील बाह्य नक्षीकाम मंदावले आणि आपसूकच व्यालमूर्ती सुद्धा मंदिर स्थापत्यातुन नाहीश्या झाल्या.

महेश तानाजी देसाई
भ्रमणगाथा

1 Comment