वीर मारुती, पुणे –
पेशवाईमुळे पुण्याला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. पुणे जे आत्ताच्या काळात महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पाहिले जाते, त्यात बराच मोठा वाटा पेशवाईला जातो. पुण्यातील वाडे, मंदीर, वस्त्या, पेठा या सर्वांवरच पेशवाईची छाप आहे असे म्हणता येईल. पुण्यातील बऱ्याच वस्तूंचा संबंध कुठे ना कुठे पेशव्यांशी जुळलेला आहे.(वीर मारुती)
पानिपतचे युद्ध हे पेशव्यांच्या वैभवशाली इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. परंतु पुढील १०० वर्षात खैबर खिंडीतून हिंदुस्थानवर होणारी आक्रमण थांबली. पानिपत युद्धानंतर मराठी सैन्य विखुरले गेले. छोट्या-मोठ्या गटांनी किंवा एक एकटा सैनिक आपल्या घराकडे परत येत होता. या युद्धात प्रत्येक घरातील एक तरी माणूस सहभागी होते. त्यामुळे आपसूकच घरातील लोक त्यांच्या सुखरूप परताव्यासाठी नवस करत असत. पानिपतातील वीर योध्यांच्या सुखरूप परतव्यासाठी ज्या मारुतीला नवस बोलले गेले तो वीरांचा मारुती “वीर मारुती”. योद्धा परत आल्यावर घरातील लोक येथे नवस पूर्ण करायला येत आणि ही परंपरा अजुनही वीरांचे वंशज कायम ठेऊन आहे असे म्हणतात. हे मंदिर अहिल्यादेवी शाळेजवळ आहे.
मंदिरात मारुतीरायाची जवळपास मीटर भर उंचीची पाषाणाची मूर्ती आहे. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी मूर्तीवरचे शेंदूराचे कवच निसटले आणि मारुतीरायाची विलोभनीय मूर्ती समोर आली. या मूर्तीला मिशी असून एक हात पोटाकडे तर दुसऱ्या हातात शेपटी पकडली आहे. मूर्तीच्या पायाखाली पनवती किंवा साडेसाती देखील इथे पहावयास मिळते. डोक्यावर सुबक मुकुट आणि कानांत कर्णाभूषणे असणारी आवेशपूर्ण अशी मूर्ती आहे.
हनुमानाच्या उजवीकडे अर्धा मीटर उंचीची शनी प्रतिमा आहे हा चतुर्भुज शनी कोंबड्यावर बसलेला असून कोंबड्याच्या चोचीत माळ आहे. शनीचे डावे उजवे समोरचे हात गुडघ्यांवर ठेवलेले आहेत तसेच वरच्या उजव्या हातात बाण व डाव्या हातात धनुष्य घेतलेला आहे. हनुमान, पनवती व शनी एकत्रित असणारी जागा क्वचितच आढळते. पूर्वी या मारुतीला ढिगावरचा मारुती किंवा विसाव्याचा मारुती म्हणत असत. एकेकाळी उपेक्षित असणाऱ्या या ठिकाणचे माहात्म्य जाणून काही स्थानिक मंडळी या मंदिराची देखभाल करत आहेत.
संदर्भ –
मुठेकाठचे पुणे : प्र. के. घाणेकर
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी
पत्ता :
https://goo.gl/maps/L7yGvSibkR9TYhx18
आठवणी इतिहासाच्या