कोर्टी येथील वीरगळ –
कोर्टी ता.पंढरपूर येथील शिवमंदिरा समोर ओढ्या शेजारी मागील महिन्यात विरगळी सापडल्या होत्या, गावल्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या एका ठिकाणी उभ्या केल्या आहेत. या मधील एक वीरगळ अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. सदर वीरगळ चार भागात विभागलेली असून, विरगळींवरील एकून शिल्पांकन बघता कोर्टी येथील वीरगळ कोण्या मोठ्या व्यक्तीची असावी असा अंदाज बांधता येतो.
विरगळीच्या सर्वात खालच्या भागात घोडदळ युद्ध पहायला मिळतं. यामध्ये वीर घोड्यावर स्वार होऊन शत्रू सैन्यावर तुटून पडला आहे. त्या लढाईमध्ये वीर विजयी झालेला असावा. त्या वरील भागात आपल्याला घोडदळ आणि पायदळ युद्ध पाहायला मिळत. या युद्धात वीराला वीर मरण आलेले असावे. त्या वरील भाग स्वर्गारोहणाचा असून स्वर्गातील अप्सरा वीराला पालखीतून स्वर्गात घेऊन जाताना बघायला मिळतात. पालखीचा मान मिळालाय म्हणजे विरगळा वरील वीर सेनापती किव्हा सैन्याचा महत्त्वाचा अधिकारी असावा. यात पालखीचा दोन्ही बाजूस ३/३ अप्सरां बघायला मिळतात.
सर्वात वरील भागात वीर शिवलिंगा समोर नमस्कार मुद्रेत असून त्याचा मागे अप्सरा दाखवलेली आहे. विराच्या डोक्यावर इथे मुकुट कोरलेला पाहायला मिळतो, यावरून वीर राजघराण्यातील पुरुष असावा असाही अंदाज येतो. विराचा डाव्या बाजूस अजून एक अप्सरा हातात पुष्पमाळा घेऊन उभी आहे. बाजूला शिवलिंग आहे. शिवलिंगाचा समोर नंदी असून पुजारी पूजा करतांना दाखवलं आहे. पुजाऱ्यांच्या मागे एक सेविका उभी आहे.
विरगळीच्या वरच्या भागात कलश आहे, कलश हा मोक्ष प्राप्तीचा संकेत असून. वीराला मोक्षप्राप्ती झाल्याचे यातून स्पष्ट होते.
अभ्यासक- Shraddha Hande .