श्रीकृष्ण –
कोरवलीचा वेणूगोपाल लेख क्र. २० –
कोरवलीच्या मंदिरावर एकूण १८ स्वर्गीय देवांगणा वेगवेगळ्या स्थितीत मोहक हालचालींमध्ये आभूषणे आणि वस्त्रप्रावरणामध्ये दाखवलेल्या आहेत. या जोडीलाच मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या बाह्य भिंतीवर प्रथम चर्तुभुज वेणुगोपाल अंकित केलेला आहे. फार वैशिष्ट्यपूर्ण असणारी ही मूर्ती असून त्यामधून वैष्णव पंथीय व शैव पंथीय संघर्षातून साधलेला समन्वय सूचित करण्यात आलेला आहे .कारण हे मंदिर शिवाचे आहे आणि बाहेर वेणुगोपाल अंकित केलेला आहे. त्याच्या हातात असलेल्या शंख व चक्र आयुधांमुळेमुळे तो विष्णू ही आहे. हातातील वेणुमुळे तो श्रीकृष्ण आहे. सहसा सुरसुंदरीच्या गोतावळ्यामध्ये अशी मूर्ती आढळत नाही.(श्रीकृष्ण | कोरवलीचा वेणूगोपाल)
सुरसुंदरीच्या बरोबरीने देवदेवता, गणेश.अष्टदिकपाल अंकीत केलेली असतात, परंतु या ठिकाणी असणारा वेणुगोपाल हा महत्त्वपूर्ण ठरतो . वेणुगोपाल एकटाच उभे असल्याचे दिसतो. त्रिभांगा अवस्थेतील वेणुगोपालची मूर्ती आकर्षक आहेच पण नखशिकांत आभूषणांनी नटलेली आहे. मस्तकावर मुकुट धारण केलेला आहे. लंबगोलाकार चेहऱ्याला साजेशी कर्णभूषणे घातली आहेत. बारकाईने निरीक्षण केल्यास असे दिसते की, इतर सुरसुंदरीच्या कर्ण भूषणा सारखीच गोलाकार आणि बारीक नक्षीकाम केलेली कर्णभूषणे कृष्णाने ल्यायलेली आहेत.
उदबाहूमध्ये डावीकडे चक्र आणि उजवीकडे शंख असून आयले प्रलंबबाहू कृष्णाने वेणू पकडण्यासाठी उचललेले आहेत. गोकुळातील गोपींना ज्याच्या सुमधूर नादामुळे वेड लागले होते, तोच वेणू,पावा,बासरी येथेही आहे. गोपाळाने दोन्हि करामध्ये तिला पकडून तिचे एक टोक सहज आपल्या अधराजवळ नेलेले असून वेणूवादन हा गोपाळ करीत आहे असे दिसते. भरदार व रूंद खांद्याचाआणि पुष्ठ छातीचा हा वेणूगोपाळ कमरेत किंचित झुकून वेणू वाजवीत आहे.उजवा पाय सरळ रेषेत तर डावा पाय काटकोनात शोधून आडवा केलेला आहे. या आडव्या केलेल्या डाव्या पायाशी चार कामधेनू उभ्या असून वेणूच्या नादाने त्या भारावून गेल्या आहेत आणि मान किंचित वर उचलून त्या वेणुगोपालाकडे पहात उभ्या आहेत.
बळकट पौरूषी व्यक्तिमत्त्वाचे दाखले या शिल्पावर रेखाटण्यात कलाकार यशस्वी झाला आहे .मोजकी परंतु साजेशी आभूषणू या शिल्पावर कलाकाराने खुबीने चडविली आहेत.किरीट मुकुट, स्कंदमाला, केयुर, करवलंय स्पष्टपणे रेखाटले आहे. गळ्यामध्ये एकच ठसठशीत अलंकार चढविला आहे .वेणूगोपाल म्हणजे श्रीकृष्ण होय. त्यामुळे त्याच्या गळ्यात खांद्यापासून थेट पायापर्यंत वनमाला दाखवली आहे.
कटिसूत्र,उरुद्दाम,मुक्तदाम ,पादवलय आणि पादजालक यांचा समन्वय साधलेली ही मूर्ती कोरवलीच्या बाह्यभिंतीवर वेणूगोपाळ या नावाने स्थित आहे. सुरसुंदरी आणि चर्तुभुज वेणुगोपाल अशा एकूण १९ प्रतिमा कोरवली येथील मंदिरावर पहावयास मिळतात.
अशा प्रकारे कोरवलीच्या मंदिरावरील सुरसुंदरी आपण पाहिल्या आहेत.निश्चितच कलाप्रेमी ह्या मंदिराला भेट देतील हि आशा व्यक्त करतो.
डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर