महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,28,377

वेरूळ

By Discover Maharashtra Views: 6843 55 Min Read

वेरूळ…

(सदर माहिती मराठी विश्वकोशातून घेतलेली आहे.)

लेण्यांसाठी जगप्रसिद्ध असलेले वेरुळ महाराष्ट्रात औरंगाबादच्या वायव्येस २९ किमी. वर वसले आहे. या गावाजवळून इला नदी वाहते. सर्वसाधारणपणे येथील लेण्यांची निर्मिती इ.स. सहाव्या शतकापासून पुढे टप्प्याटप्प्याने होत गेली. वाकाटकांच्या ऱ्हासानंतर चालुक्य आणि कलचुरी या दोन राजवंशांच्या संघर्षकालातच ही लेणी कोरली गेली. तत्कालीन अस्थिर राजकीय परिस्थिती आणि या लेण्यांचे भौगोलिक स्थान यांतून वेरूळच्या लेण्यांतील व्यामिश्र कला आणि प्रादेशिक परंपरांचा उलगडा होतो. राष्ट्रकूट घराण्याच्या ताम्रपटात (आठवे शतक) या स्थळाचा उल्लेख `एलापुर’ असा केलेला असून त्यात येथील उत्कीर्ण लेण्यांचाही संदर्भ दिला आहे. अजिंठा येथील कलापरंपरा हरिषेण या वाकाटक सम्राटाच्या मृत्यूनंतर म्हणजे पाचव्या शतकाच्या अखेरीस खंडित झाली आणि तेथून बाहेर पडलेले शेकडो कलावंत नव्या राजवटीच्या आश्रयाखाली वेरूळच्या लेण्यांवर काम करू लागले असे एक मत आहे. वेरूळ शिल्पाचा शैलीदृष्ट्या विचार करता हे मत थोड्याफार फरकाने ग्राह्य वाटते.

सहाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात बहुधा कलचुरींच्या आश्रयाखाली हे काम सुरू झाले असावे. रामेश्वर लेण्याच्या समोर सापडलेली कलचुरी नाणी या कयासाला दुजोरा देतात. महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर तेराव्या शतकात वेरूळ गुंफामध्ये वास्तव्य करून होते असा स्थानपोथी मध्ये उल्लेख आहे. वेरूळ हे प्रदीर्घ काळापर्यंत तांत्रिक योगाचाराचे केंद्र होते असेही दिसून येते. यानंतरची वेरूळची जी माहिती मिळते त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले हे वेरूळची पाटीलकी चालवीत होते असे कळते. अठराव्या शतकात अहिल्यादेवी होळकर यांनी इला नदीच्या काठी घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगाचे मंदिर बांधले. अहिल्यादेवींनी माणकेश्वर मंदिराचा (कैलास लेण्याचा) जीर्णोद्धार करून तिथल्या धूपदीपासाठी वर्षासन बांधून दिले अशीही माहिती मिळते. मंदिरावर मध्ययुगीन रंगरंगोटीच्या खुणाही स्पष्ट दिसतात. अगदी अलीकडे या लेण्यांच्या परिसरात सातवाहनकालीन (इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. तिसरे शतक) वास्तूंचे अवशेष सापडल्याची नोंद झाली आहे.

सध्याच्या गावाच्या पश्चिमेला असलेल्या बालाघाटच्या टेकड्यांत औरंगाबाद-वेरूळ या मार्गावरच दक्षिणेकडून उत्तरेकडे लेणी खोदण्यात आलेली असून त्यांची एकंदर संख्या चौतीस आहे. पुरातत्त्वखात्याने क्रमांक न दिलेली अनेक लहानमोठी लेणी या डोंगरात पसरलेली आहेत. मुख्य समूहातील दक्षिणेकडील भागात बारा लेणी असून ती बौद्ध धर्मीयांची आहेत. त्यानंतर सतरा लेणी हिंदू धर्मीयांची असून, त्यानंतर उत्तरेकडील पाच लेणी जैन धर्मीयांची आहेत. वेरूळच्या बौद्ध लेण्यांचा प्रारंभ सहाव्या शतकाच्या सुरुवातीस व्यापक प्रमाणात सुरू झाल्याचे दिसते. परंतु त्यातील अनेक प्रकल्प पुरेशा द्रव्यबळाअभावी इ. स. ६०० च्या आसपास बंद पडले असावेत. बौद्धांनी अर्धवट सोडलेल्या कित्येक गुंफा नंतर हिंदू लेण्यांमध्ये परिवर्तित केल्या गेल्या असाव्यात. हिंदू शिल्पप्रवृत्तीचा पहिला टप्पा प्रामुख्याने पाशुपत शैव संप्रदायाशी निगडित आहे. सहाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते चालुक्यांच्या कलचुरींवरील निर्णायक विजयापर्यंत-म्हणजे सातव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत तो पूर्ण होतो.

दुसरा टप्पा राष्ट्रकूटांच्या प्रवर्धमान शासनकाळात भक्तिसंप्रदायाच्या छटा दाखवणारा तर तिसरा टप्पा ज्यात प्रामुख्याने जैन लेणी येतात तो उत्तर राष्ट्रकूट काळात म्हणजे दहाव्या शतकाच्या शेवटीशेवटी पूर्ण झालेला दिसून येतो. यादवकाळातही काही तुरळक काम येथे झाले असावे. आठव्या शतकात येथील स्थापत्यकलेला बहर आला आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती या काळात झाली. वेरूळच्या लेण्यांमधील १ ते १२ क्रमांकांची लेणी बौद्ध, १३ ते २९ हिंदू आणि ३० ते ३४ जैन, अशी आहेत. क्रमांक १६ चे विख्यात कैलास लेणे आहे. बौद्ध लेणी : यांत बहुतांशी विहारगृहे आहेत फक्त एकच चैत्यगृह आहे. काही विहारगृहे शिल्पांनी आणि अलंकृत स्तंभांनी देखणी झालेली आहेत, तर काही अनेकमजली असल्याने भव्य वाटतात. ही सर्व प्रामुख्याने महायान पंथीयांची आहेत. काही गुंफांमधून वज्रयान प्रतिमांची सुरुवात झालेली दिसून येते.

क्रमांक 1 : हे लेणे शिल्परहित विहार आहे. भिक्षूंना निवासासाठी एकूण आठ खोल्या आहेत. खांबाशिवाय खोदलेली ही गुंफा वेरूळ येथील सर्वात जुनी गुंफा आहे. या लेणीत गाभारा नाही तसेच कुठल्याही प्रकारची मूर्ती अथवा प्रतिमा नाही. वेरूळची ही पहिल्याच क्रमांकाची लेणी अगदी प्राथमिक स्वरूपातील आहे.

क्रमांक 2 : हे लेणे मंदिर आणि निवास अशा दोहोंसाठी उपयोगी पडत असावे. मात्र यात फक्त दोनच खोल्या निवासासाठी आहेत. मागील भिंतीत गर्भगृह व बाजूच्या बुद्धमूर्ती असलेल्या भिंती येथे आहेत. गर्भगृहात धर्मचक्रप्रवर्दनमुद्रेत सिंहासनावर बुद्धाची मूर्ती असून, डाव्या बाजूस अवलोकितेश्वर बोधिसत्त्वाची मूर्ती आहे. उजव्या बाजूच्या दुसऱ्या बोधिसत्त्वाच्या मुकुटात स्तूपाची प्रतिमा आहे. गर्भगृहातील बुद्धमूर्तीच्या वर दोन्ही बाजूंना फुलांची माळ घेतलेल्या गंधर्वांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या बाहेर दोन्ही बाजूंना द्वारपाल असून त्यांतील (डाव्या बाजूचा) अक्षमाला आणि कमलपुष्प घेतलेला पद्मपाणी अवलोकितेश्वर आहे. उजव्या बाजूचा द्वाररक्षक उत्कृष्ट शिरोभूषणांनी अलंकृत केलेला वज्रपाणी अवलोकितेश्वर आहे. ही मूर्ती काहींच्या मते बोधिसत्त्व मंजुश्रीची असावी. या लेणीत गोल स्तंभशीर्षांचे कोरीवकाम आहे.

मुख्य प्रवेशद्वाराच्या आत डाव्या भिंतीमध्ये एका स्त्रीदेवतेची मोठी मूर्ती आहे. गाभाऱ्यात बसलेली बुद्धप्रतिमा असून बुद्धाचे पाय उमललेल्या कमलासनावर टेकलेले आहेत. बुद्ध बसलेले आसन चौकोनाकृती व त्यावर सिंहप्रतिमा कोरलेल्या आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूला चामरधारी बोधिसत्त्वे आहेत. या लेण्याला प्रवेशमंडप असावा पण तो आता अस्तित्वात नाही. यात अत्यंत प्रेक्षणीय अशी जंभालाची (बौद्ध धर्मीयांचा कुबेर) मूर्ती आहे. त्याच्या बाजूस चवरी घेतलेले सेवक आहेत. या प्रवेशमंडपातून आत गेल्यावर बारा खांबांचा चौकोनी मंडप आहे. त्या मंडपाच्या दोन्ही बाजूंस प्रचंड आकाराच्या पाच बुद्धमूर्ती आहेत.

क्रमांक 3 : शिल्पे, शिल्पपट आणि अलंकृत स्तंभ ही या पडझड झालेल्या लेण्याची वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या उत्तरेकडील भिंतीवर एक शिल्पपट आहे. अग्नी, मारेकारी आणि जलप्रवासातील आपत्ती यांच्यापासून अवलोकितेश्वर संरक्षण करीत आहे अशा आशयाचा हा शिल्पपट असून यातच उजव्या बाजूला सिंह, नाग, हत्ती व पिशाच्चे यांसारख्या आपत्तींपासूनही तो रक्षण करतो हे या शिल्पातून दाखविले आहे. बुद्ध आणि बोधिसत्त्वाचे बदलते आणि भौतिकतेकडे झुकणारे स्वरूप या शिल्पपटातून सूचित होते. मध्यभागी असलेल्या मंडपात बारा खांब असून त्यांवर पूर्ण कलश आणि पत्रपल्लवी कोरलेल्या आहेत. मंडपाच्या बाजूच्या दोन्ही भिंतींत आठ तर गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंसही दोन खोल्या असून गर्भगृहात बुद्धमूर्ती आहे. द्वारपालांपैकी डाव्या बाजूची मूर्ती अवलोकितेश्वराची आहे. या लेण्याच्या उत्तरेच्या भिंतीत प्रलंबपाद आसनातील, धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्धमूर्ती व अवलोकितेश्वराचा शिल्पपट आहे. उजव्या भिंतीवर तारा व वज्रयान दैवतसमूहातील देवतेचे शिल्प आहे.

क्रमांक ४ : हे दुमजली लेणे असून दुसऱ्या मजल्यावर बुद्धाची प्रतिमा आणि दोन लहान खोल्या आहेत. बुद्धमूर्तीच्या डाव्या बाजूस कमलनालधारक अवलोकितेश्वर आहे. बोधिसत्त्वांच्या शेजारी स्त्री-सेविका आहेत. याशिवाय कमलपुष्प हातात धरलेली तारा आणि कमंडलू धरलेल्या भृकुटीचे शिल्प आहे.

क्रमांक ५ : हे लेणे सर्वांत प्रचंड (३५•६६ X १७•६७ मी.) आहे. या लेण्याला महारवाडा असे नाव प्रचलित असले, तरी महाविहार याचा हा अपभ्रंश असावा. गाभारा, दालन, मुख्य मंडप आणि दोन्ही बाजूंच्या पडव्या अशी याची विभागणी करता येते. दहा खांबांच्या दोन रांगांमुळे निरुंद पडव्या निर्माण झाल्या आहेत. दर्शनी भागात चार स्तंभ आहेत, तर पाठीमागे अंतराल असून भिंतीत मध्यभागी बुद्धप्रतिमा असलेले मंदिर आहे. अंतरालाला लागून दोन खोल्या, तर मंडपाच्या लगत एकूण सतरा खोल्या आहेत. सर्वसाधारणपणे या लेण्याची रचना चैत्यगृहाप्रमाणे आहे परंतु गाभाऱ्याची बाजू अर्धगोलाकृती नाही. लेण्याचे छतसुद्धा सपाट आहे. चैत्यगृहामध्ये आढळतो तसा स्तूप नाही, प्रदक्षिणापथ ही नाही. गाभाऱ्यात प्रलंबपादासनात बसलेली बुद्धाची मूर्ती धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेत आहे. मंदिराबाहेर डाव्या बाजूची अवलोकितेश्वराची मूर्ती कमलनाल आणि अक्षमाला घेतलेली आणि खांद्यावर मृगाजिन गुंडाळलेली आहे, तर दुसरी मुकुटधारी व अलंकार घातलेली आहे.

क्रमांक ६ : वास्तुविधानाच्या दृष्टीने या लेण्याचे तीन भाग पडतात. यांतील दर्शनी भागाचे स्तंभ शालभंजिकांच्या सुंदर शिल्पांनी अलंकृत केलेले होते असे त्यांच्या अवशिष्ट स्वरपावरून दिसते. मधल्या भागात मंडप, त्यामागे अंतराल आणि त्यामागे बुद्धमंदिर आहे. दोन्ही बाजूंस दोन मोठे मंडप आणि बाजूंना नऊ खोल्या आहेत. मुख्य मंडपाचे छत कोसळल्यानंतर लाकडी छत बसविल्याच्या खुरा येथे दिसून येतात. स्तंभावर घटपल्लव (कलश आणि त्यातून डोकावणारी पाने) कोरलेले असून स्तंभाच्या वरच्या भागावर शार्दूल हस्त (ब्रॅकेट) आहेत. अंतरालात द्वारपाल वज्रपाणी व अवलोकितेश्वर यांच्या भव्य मूर्ती आहेत. त्यावर पुष्पहार घेतलेले विद्याधर आहेत. डावीकडील भिंतीवर तारादेवी आणि उजव्या भिंतीवर महामयूरी यांची सुंदर शिल्पे आहेत. मयूरवाहनाखालील बाजूस पोथी वाचत असलेला भिक्षू कोरलेला असून वर अंतराळात विद्याधर दाखविलेले आहेत. येथील गाभाऱ्याची द्वारशाखा अलंकरणामुळे उल्लेखनीय ठरते. यातील गंगा-यमुना लहान मूर्ती अत्यंत नेटक्या आहेत.

क्रमांक ७ : हे लेणे शिल्परहित असून अपूर्ण आहे.

क्रमांक ८ : या लेण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, गाभाऱ्यातभोवती प्रदक्षिणापथाची सोय हे होय. स्वतंत्र गर्भगृह व बोधिसत्त्व (अवलोकितेश्वर, वज्रपाणी), जंभाल (पांचिक) व हारिती (एक देवता) यांच्या मूर्ती येथे आढळतात. गर्भगृहात प्रलंबपादासनातील बुद्धमूर्ती असून तिच्या दोन्ही बाजूंस वज्रपाणीची आणि मंजुश्रीची मूर्ती आहे. मंजुश्रीच्या शिरोभूषणात स्तूप कोरलेला आहे. या मूर्तीची स्त्री- सेविका तिच्या वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेमुळे लक्षणीय वाटते. अंतराळाच्या उजव्या भिंतीवर महामयूरीची मूर्ती आहे. गर्भगृहासमोर मंडप आहे. यात तारा त्याचप्रमाणे जंभाल व हारिती यांच्या मूर्ती आहेत.

क्रमांक ९ : कोरीव दर्शनी भाग, प्रमाणबद्ध खांब, पद्मपाणी आणि तारा या देवतांचा प्रार्थनापट ही या लेण्याची वैशिष्ट्ये होत.

क्रमांक १० : हे लेणे `विश्वकर्मा’ लेणे किंवा `सुतार’ लेणे या नावाने विख्यात आहे. यात लाकडी बांधणीच्या चैत्यगृहाचा ठसा उमटलेला दिसतो व त्यामुळे या लेण्याला सुतार लेणे असे नाव पडले असावे. हे लेणे चैत्यगृह या प्रकारात समाविष्ट होत असले, तरी पूर्वीच्या चैत्यगृहांचा नालाकृती दर्शनी भाग व रचना आणि या चैत्यगृहाचा त्रिदलसदृश दर्शनी भाग व योजना यांत फरक दिसून येतो. आधीची चैत्यगवाक्षे (कार्ले, भाजे येथील) इथे अभावानेच आढळतात. `हे चैत्यगृह भारतीय शैलगृहामधील अखेरची कलाकृती’ असल्याने चैत्यगृहांच्या मांडणीत किती आणि कसा फरक होत गेला, याचे प्रत्यंतर हे लेणे पाहताना येते. येथे काष्ठकामाची परंपरा खडकाच्या कोरीव कामातही जोपासली गेली. त्यामुळेच या लेण्याच्या दक्षिणेकडील व्हरांड्यात तुळ्या आणि लगी खडकातच कोरलेल्या आहेत. या लेण्याचे सौंदर्य दरवाज्यातून डोकावल्याखेरीज उलगडत नाही. आत प्रशस्त प्रांगण असून त्याच्या दोन्ही अंगांना खांबांचे सोपे आहेत आणि समोरही ओसरी आहे. प्रांगणाच्या तिन्ही बाजूंचे स्तंभ घटपल्लवयुक्त असून ते वरचा मजला तोलन धरतात. प्रवेशमंडपाच्या मागच्या भिंतीत असलेल्या दरवाजातून चैत्यगृहात जाता येते.

हे चैत्यगृह गजपृष्ठाकृती आकाराचे असून त्यामध्ये एक मोठा स्तूप कोरलेला आहे. या स्तूपाच्या दर्शनी भागावर बोधिवृक्षाखाली प्रलंबपादासनातील धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेतील बुद्धमूर्ती (४•८७ मी. उंच) आहे. बुद्धमूर्तीच्या दोन्ही बाजूंस बोधिसत्त्वाच्या मूर्ती व त्यावर आकाशात विहार करणारी गंधर्व -मिथुने बुद्धावर पुष्पवर्षाव करीत आहेत, असे दर्शविले आहे. छताजवळील पाटिकेवर बुद्ध, बोधिसत्त्वांच्या मूर्ती असून त्यांच्या खाली बुटक्या व स्थूल गणांची रांग कोरलेली आहे. त्यावर नागदेव व नागदेवी यांची शिल्पे आहेत. यांच्या मागून बहिर्गोल फासळ्या निघताना दाखविलेल्या आहेत. विश्वकर्मा लेण्याचा दर्शनी भाग इतर लेण्यांहून वेगळा व कलात्मक आहे. वरच्या मजल्याच्या आत जी भिंत आहे तिच्यात मध्यभागी एक द्वार असून त्यातून चैत्यमंदिरात प्रवेश करता येतो. या द्वाराभोवती साधारणतः त्रिकोणी कपाटात मुख्य तोरण आणि गवाक्ष, त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंस कुंभ, अर्धस्तंभ आणि वळणदार पालवी यांचे मिळून झालेले गोष्ठपांजर, तर दरवाज्याच्या माध्यावर स्तंभशीर्ष किंवा प्रस्तर आणि यावर जवळजवळ वर्तुळाकृती गवाक्ष आणि गवाक्ष, प्रस्तर आणि द्वार या सर्वांना सामावून घेणारी त्रिदली महिरप आहे.

दोन दले जोडून त्रिदलासारखी एक नावीन्यपूर्ण आकृती लक्ष वेधून घेते. हिच्या दोन्ही बाजूंना शिखरांच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. गवाक्षाच्या दोन्ही बाजूंस अंतरिक्षात गंधर्व-दांपत्ये कोरलेली आहेत. द्वाराच्या एका बाजूला अवलोकितेश्वर व दुसऱ्या बाजूला वज्रपाणी आहेत. प्रत्येक कोनाड्यात प्रणयी युग्मे कोरलेली आहेत. मिथुने आणि गण यांची रेलचेल आहे. चैत्यमंदिराचे स्तंभ साधे असले तरी त्यांच्यावरील तुला आणि स्तंभशीर्षे यांवर यक्षशिल्पे आहेत. गवाक्षाच्या दर्शनी भागावरील डाव्या कोनाड्यात असलेल्या शिल्पात एक शिलालेख आहे. मात्र तो महायान पंथीयांनी प्रसारित केलेला मंत्र असून तो नंतर कोरलेला असावा, असे त्यांच्या अक्षरवटिकेवरून स्पष्ट होते. हे लेणे म्हणजे एक चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाला वरचा मजला असून सज्जा कोरलेला आहे. सज्जाच्या कठड्यावर अनेक लहान शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. सज्जाच्या आतील भिंतीवर भरतनाट्यम नृत्यप्रकार करणाऱ्या एका नर्तकीचे शिल्प कोरलेले आहे. चैत्यगृहाच्या मुख्य कमानीवर तीन अर्धवलये कोरलेली आहेत. त्यांना त्रिदली बिल्वतोरण असे म्हणतात.

केवळ बौद्धधर्माच्या प्रसाराचा दृष्टिकोन न ठेवता कलाकारांनी सौंदर्याभिरूची या लेण्यात दाखवल्यामुळे सुरुवातीच्या काळात खोदलेल्या इतर लेण्यांपेक्षा स्थापत्यकलेच्या दृष्टीने विश्वकर्मा लेणे सरस आहे. या लेण्याच्या समोर खूप मोठे प्रांगण असून या या प्रांगणाच्या सभोवताली असणाऱ्या दगडी भिंतींमध्ये लेण्याचे प्रवेशद्वार खोदलेले आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला एका कोनाड्याच्या भिंतीवर दोन ओळींमध्ये लिहिलेला ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे. प्रांगणाच्या तीनही बाजूला व्हरांडा आहे. याच्या दोन्ही बाजूंना खोल्या असून मधोमध गर्भगृह आहे. चैत्यगृहामध्ये पाठीमागच्या बाजूला स्तूप आहे. स्तूपावर असणारी छत्रावली नष्ट झालेली आहे. स्तूपाच्या पुढील बाजूस प्रलंबपादासनात सिंहासनावर बसलेली बुद्धाची प्रतिमा आहे.

क्रमांक ११ : हे लेणे `दोन ताल’ या नावानेही प्रसिद्ध आहे. या शेजारचे लेणे तिमजली असल्याने त्याला `तीन ताल’ असे संबोधले जाते. ही दोन्ही लेणी येथील बौद्ध लेण्यांची अखेर दाखवतात. दो ताल लेण्यातील सर्वांत खालचा मजला १८७६ पर्यंत मातीने भरून गेल्याने त्याचे अस्तित्व कळत नसे. भिक्षुगृहे आणि बुद्धप्रतिमायुक्त गर्भगृह यांमुळे या लेण्याचे स्वरूप मंदिर आणि विहार असे दुहेरी राहिलेले आहे. लेण्याच्या दर्शनी भागात आठ खांब कोरलेले असून त्यांच्या मागे अरुंद ओवरी आहे. या ओवरीच्या पाठीमागील भिंतीत पाच लेणी कोरलेली आहेत. पहिले लेणे अपूर्ण, तर दुसऱ्या बुद्धप्रतिमा आहे. ही मूर्ती भव्य असून ध्यानासनात आणि भूमिस्पर्शमुद्रेत आहे. मूर्तीचे आसन गण सावरून धरीत असून जवळच बुद्धाला पायस देणाऱ्या सुजातेचे शिल्प आहे. नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूंस अवलोकितेश्वर आणि वज्रपाणी हे बोधिसत्त्व आहेत. गाभाऱ्याच्या बाजूच्या भिंतीत अनेक बोधिसत्त्वांच्या मूर्ती कोरलेल्या असून, त्यांत मैत्रेय (हातात फूल आणि मुकुटात स्तूप), स्थिरचक्र (हातात तलवार), मंजुश्री (कमळ आणि पुस्तक) व ज्ञानकेतू (ध्वज) या स्पष्टपणे ओळखता येतात. याशिवाय जंभाल (कुबेर) आणि तारा (हातात कमळ) यांचीही शिल्पे येथे आहेत.

जंभालमूर्तीच्या डाव्या हातात धनाची थैली आहे आणि खाली एक व्यक्ती नाण्यांनी भरलेला कलश घेऊन उभी आहे. या मजल्याच्या मध्यभागी असलेल्या सभामंडपाच्या मागील भागाऱ्यात भूमिस्पर्शमुद्रेतील ध्यानस्थ बुद्धमूर्ती आहे. या लेण्याचे वैशिष्ट्य असे की, मंडपाच्या उजव्या आणि समोरच्या भिंतींवर हिंदू देवदेवतांच्या -महिषासुरमर्दिनी, गणेश, काल-प्रतिमा कोरल्या आहेत. बौद्ध धर्माचा प्रभाव नष्ट झाल्याच्या काळातील त्या असाव्यात हे स्पष्ट होते. दोन ताल म्हणून ओळखली जाणारी हे लेणे प्रत्यक्षात तीन मजली आहे. लेण्यात वरपर्यंत जाण्यासाठी दगडात घडवलेल्या पायऱ्या आहेत. पहिल्या मजल्यात विशेष दखल घेण्याजोगे शिल्पकाम नाही, मात्र मजल्याच्या मध्यभागी असणार्याल गर्भगृहात चौकोनी आसनावर भगवान बुद्धाची पद्मासनात योगमुद्रेत बसलेली प्रतिमा आहे. दुसऱ्या मजल्यावर चार गर्भगृहे आहेत. पहिल्या गर्भगृहात असणाऱ्या बुद्धाच्या उजवा हात भूस्पर्श मुद्रेत असून डावा हात योगमुद्रेत मांडीवर ठेवलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचे गर्भगृह आकाराने छोटे आहे. यातही बुद्धप्रतिमा आहे. तिसरे गर्भगृह वरच्यापेक्षा खाली असल्यामुळे दोन तीन पायऱ्या उतरून खाली जावे लागते. चौथ्या गर्भगृहात व्याख्यान मुद्रेत बसलेल्या बुद्धाची प्रतिमा आहे. तिसरा मजला म्हणजे खूप मोठा प्रशस्त विहार आहे. विहारामध्ये ठिकठिकाणी खोदकाम सुरू केल्याच्या खुणा आहेत पण ते अर्धवट अवस्थेत सोडलेले आहे.

क्रमांक १२ : दो ताल लेण्याच्या शेजारी `तीन ताल’ या नावाने ओळखले जाणारे हे तीन मजली लेणे आहे. साधे स्तंभ पण लेण्यात शिल्पाकृतींची रेलचेल हे या लेण्याचे वैशिष्ट्य. याची भव्यता स्तिमित करते. महायान पंथीय बौद्धांची ही शेवटची निर्मिती समजली जाते. लेण्याच्या समोर एक प्रशस्त अंगण आहे. तिन्ही मजल्यांत आठ-आठ उत्कीर्ण स्तंभांच्या रांगा असून बहुतांशी सर्व खांब चौकोनी ताशीव आहेत. साध्या घटकांतून भव्यतेची छाप पाडली जाते. तळमजला रुंद आहे. त्यातील दोन दर्शनी स्तंभ पूर्णघट-चिन्हयुक्त असून उर्वरित सर्व साधे व चौकोनी आहेत. या मजल्यावर भिक्षूंसाठी नऊ खोल्या आहेत. येथील अंतराल लक्षणीय आहे. त्याच्या उजव्या बाजूच्या मागच्या भिंतीत नऊ मूर्तींचा शिल्पपट आहे. मध्यभागी बुद्धप्रतिमा, उजव्या बाजूस पद्मपाणी अवलोकितेश्वर, डाव्या बाजूस वज्रपाणी, त्यांच्या वर तीन मूर्ती. डावीकडील मागच्या भिंतीवर अवलोकितेश्वर आणि मंजुश्रीसमवेत बुद्ध कोरलेला आहे.

अंतराळाच्या मागे गर्भगृहात ध्यानस्थ बुद्धाची भव्य प्रतिमा असून भिंतीवर मैत्रेय, मंजुश्री, स्थिरचक्र आणि ज्ञानकेतू या चार बोधिसत्त्वांची शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस बुद्ध, ध्यानस्थ तारा, तर उजव्या बाजूस चुंडा या स्त्रीबोधिसत्त्व मूर्ती आहेत. वरच्या मजल्याच्या वाटेत भूमिस्पर्शमुद्रेत बुद्ध आहे. याशिवाय उजव्या भिंतीवर जंभाल (कुबेर), अवलोकितेश्वर आणि तारा यांच्या मूर्ती असून, डाव्या भिंतीवर नऊ मूर्तींचा मंडलपट आहे. सर्वांत वरच्या मजल्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिल्पांची रेलचेल आणि स्थापत्यातील योजनाबद्ध रेखीवपणा. भिंतीवर बुद्धप्रतिमा कोरलेल्या असून काही ध्यानमुद्रेत, तर काही धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेत दाखविल्या आहेत. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूंस, प्रत्येकी सात यांप्रमाणे चौदा बुद्धमूर्तींची रांग कोरलेली आहे. या सात बुद्धमूर्ती ध्यानमुद्रेत असून, त्यांच्या मस्तकांच्या वर निरनिराळ्या वृक्षशाखा कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिराच्या दाराच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल आहेत. मंदिरात 3.35 मी. उंचीची भूमिस्पर्शमुद्रेतील बुद्धाची मूर्ती असून बुद्धाच्या मूर्तीभोवती प्रदक्षिणापथ आहे. मूर्तीवर चुन्याच्या गिलाव्याचे अवशेष आढळतात, त्यावरून ही मूर्ती रंगविली जात असावी. छतावरही रंगकामाचे अवशेष आहेत. या रंगकामाचा काळ नववे शतक असा मानला जातो.

परंपरागत गवाक्षापासून वेगळेपण, आखणीतील भव्य परिमाणे, अनेक मजल्यांची खोदकामे आणि शिल्पांची रेलचेल ही वेरुळच्या बौद्ध लेण्यांची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन बाजूला दोन सिंहप्रतिमा आहेत. आत समोरच चौकोनी प्रशस्त प्रांगण आहे. व्हरांड्यातील स्तंभांची रचना चौकोनी आहे. या लेण्याचा पहिला मजला अनेक स्तंभांनी आधारलेला आहे.या मजल्यावर असलेल्या खोल्यांमध्ये दगडी चौथरे व त्यावर डोके टेकण्यासाठी दगडी उशा खोदलेल्या आहेत. या लेण्यात मागच्या बाजूला गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बोधिसत्व कोरलेला आहे. त्याच्या डाव्या हातातील कमलपुष्पावर पुस्तक ठेवलेले आहे. गर्भगृहात आत सिंहासनावर धम्मचक्र परिवर्तन मुद्रेतील बुद्धप्रतिमा आहे.

हिंदू धर्मीय लेणी : लेणी क्रमांक १३ ते २९ ही हिंदू धर्मीयांची आहेत. ही सर्वसाधारणपणे सहाव्या ते आठव्या शतकांतील निर्मिती आहे. यात शैव शिल्पांची आणि शिवाच्या जीवनातील प्रसंगांच्या शिल्पपटांची संख्या अधिक असून वैष्णव शिल्पे तुलनात्मक दृष्ट्या कमी आहेत. राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच्या राजवटी आधीची आणि तिच्या समकालीन व नंतरची असे दोन विभाग कालदृष्ट्या आणि कलादृष्टीने करता येतात. यानुसार लेणी क्र. १४, १७, १८, १९, २०, २१, २२, २५, २७, २८ व २९ ही लेणी राष्ट्रकूटांच्या प्रभावाच्या आधीची असून, ही सहाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील असावीत. शैली व आखणी या दृष्टींनी लेणे क्रमांक २९ (सीता की नहाणी) घारापुरीच्या लेण्यांशी आश्चर्यकारक साम्य दर्शविते. लकुलीश-शिवाच्या प्रतिमांची शिल्पे (लेणी क्र. १८, २१, २९) ही वेरूळवरील लकुलीश-पाशुपत पंथाचा प्रभाव स्पष्ट करतात. आठव्या, दहाव्या व बाराव्या शतकांतील भित्तिचित्रांचे अवशेष हे कैलास लेणे, जैन गुंफा आणि डोंगरमाथ्यावरील गणेश लेण्यांत आढळतात.

क्रमांक १४: हे लेणे `रावण की खाई’ या नावाने ओळखले जाते. त्यातील कैलास पर्वत हलविणाऱ्या रावणाच्या शिल्पपटामुळे त्याला हे नाव पडले असावे. क्रमांक २ च्या बौद्ध लेण्याचा आराखडा जवळजवळ असाच आहे. याच्या बाजूच्या भिंतीत अर्धस्तंभामुळे शिल्पपटांना जणू चौकट लाभली आहे. दर्शनी खांबाचे अर्धे भाग साधे चौकोनी असून वरच्या भागात पूर्णघटाचे अलंकरण आहे. उत्तरेकडील भिंतीत बहुतांशी वैष्णव शिल्पपट आहेत. पहिल्या खणात त्रिशूल घेतलेली दुर्गा आहे; तर त्यानंतरच्या खणात कमलासना गजलक्ष्मी असून तिच्या मस्तकावर चार हत्ती पाणी शिंपडीत आहेत. तिसऱ्यात भूवराहाचा पट आहे. वराहाची भव्यता व आवेश आणि पृथ्वीदेवीची प्रमाणबद्ध मूर्ती यांमुळे हा शिल्पपट देखणा झालेला आहे. त्यानंतरच्या खणात भूदेवी व श्रीदेवी यांसह श्रीविष्णू वैकुंठात बसल्याचे शिल्प आहे. त्यानंतर मकरतोरणाखाली विष्णु-लक्ष्मीची मूर्ती आहे. मुख्य मंदिराच्या दरवाज्याजवळ स्त्री-द्वारपाल असून त्यांच्या बाजूसच मकरावर उभी गंगा, कूर्मावर उभी यमुना आणि भव्य द्वारपाल यांची शिल्पे आहेत. येथे प्रदक्षिणापथ असून त्याच्या भिंतीत शिल्पपट, शिल्पे आणि शिल्पसमूह आहेत. यांत उत्तरेकडील भिंतीत सालंकृत व बालकांसहित सप्तमातृका असून त्या वीरभद्र आणि गणेश या दोहोंच्या मधे खदलेल्या आहेत. दक्षिणेकडील भिंतीतही शिल्पपट आहेत. प्रथम अंधकासुरवध कथेतील शिव दाखविला आहे. या शिल्पातील क्रोध-आवेश या भावांचे चित्रण अप्रतिम आहे. दुसऱ्या शिल्पपटात शिव-पार्वती विहार करीत असलेल्या डोंगरावरून रावणाचे पुष्पक विमान पुढे जाण्यास प्रतिबंध निर्माण झाला, त्या प्रसंगाचे शिल्पांकन आहे.

रावणाचा आवेश आणि जिद्द, शंकराची शांत मुद्रा आणि पार्वतीची भयग्रस्तता व पतीचा आधार घेण्यासाठी त्याला बिलगण्याची कृती या सर्व मुद्रा शिल्पकाराने अत्यंत वास्तव स्वरूपात दाखविल्या आहेत. याशिवाय तंडवनृत्यातील शिवाचे नृत्य पाहण्यास गणे, पार्वती, ब्रह्मा, विष्णू, इंद्र आणि अग्नी उपस्थित आहेत, असा शिल्पपट पुढे आहे. दुसऱ्या एका शिल्पात शिव-पार्वती पट खेळत असल्याचे दाखविले आहे. शिवाचे खेळण्यात लक्ष नसल्याने पार्वती रुसलेली आहे व तिने रुसून मुखकमल फिरविले आहे. शिव तिचा हात धरून आणखी एक खेळ खेळण्यासाठी अनुनय करीत आहे. पार्वतीच्या मुखावरील रुसवा आणि शंकराची अनुनयातली अजिजी शिल्पकाराने छान टिपली आहे. या शेजारच्या खणात भव्य नटराज आणि शेवटच्या खणात महिषादुरमर्दिनीचे शिल्प आहे.

क्रमांक १५ : हे लेणे `दशावतार’ लेणे म्हणून प्रख्यात आहे. गतिमान शिल्पे, राष्ट्रकूट दंतिदुर्गाचा उत्कीर्ण लेख आणि पुराणातील कथा दाखविणारे शिल्पपट ही या लेण्याची वैशिष्ट्ये होत. हे लेणे दुमजली आहे. त्याच्या दर्शनी खांबाच्या माथ्यावर भूमिस्पर्शमुद्रेतील बुद्धाची मूर्ती कोरलेली आहे. या लेण्यासमोर प्रशस्त प्रांगण आहे आणि त्याच्या मध्यभागी एक मंडप आहे. मुख्य मंडपाच्या मागील भिंतीवर राष्ट्रकूल घराण्यातील दंतिदुर्ग राजाचा प्रदीर्घ लेख आहे. राष्ट्रकूट घराण्याची वंशावळ आणि शेवटी दंतिदुर्ग या लेण्यात सैन्यासह येऊन गेल्याचा उल्लेख यात आहे. मंडपावर सिंह, यक्ष, गर्भगृहांच्या प्रतिकृती, गंगा, यमुना इ. मूर्ती आणि जाळीदार खिडक्या आहेत. हे लेणे दुमजली आहे. याच्या उत्तरेकडील कोपऱ्यात जिन्याच्या पायऱ्या असून, मधल्या कट्ट्याच्या भिंतीत कोनाडे आहेत. त्यांत गणेश, शिव -पार्वतीची आलिंगन-मूर्ती, सूर्य, शिव- पार्वती, गजानन-गण, महिषादुरमर्दिनी, अर्धनारीनटेश्वर, दुर्गा, तपस्वी उमा, गणेश, काली इ. मूर्ती आहेत. अंतराळाच्या आत गाभारा आहे. त्याच्या दर्शनी खांबावर आमलक, पूर्णघट, प्रणालिका, यक्ष इ. घटक आहेत. या लेण्यात शिल्पपटांची रेलचेल आहे. उत्तरेकडे शैव आणि दक्षिण भिंतीवर वैष्णव शिल्पे आहेत.

उत्तरेकडील पहिल्या खणात अंधकासुरवधमूर्ती असून ती रौद्रभीषण आहे. शिव अष्टभुज असून हातांत तलवार, डमरू, नीलासुराचे कातडे इ. आयुधे आहेत. शेजारी स्तिमित झालेली पार्वती व नरकपाल धरलेली काली असून, शिवाच्या पायाखाली अपस्मार पुरुष आहे. शिवाच्या गळ्यात रुंडमाला असून त्याने अंधकासुराला त्रिशूलाने विद्ध केलेले आहे. योगेश्वरीच्या जवळ घुबड, तर अंधकासुराच्या पायाजवळ राहूचे मस्तक दाखविलेले आहे. दुसऱ्या खणात तांडवनृत्यातील शिवप्रतिमा आहे. तिसऱ्या खणात शिवलिंग असून छतावर वेलबुट्टीच्या अलंकरणाचे अस्पष्ट अवशेष दिसून येतात. चौथ्या खणात शिव-पार्वती पट खेळतानाचे दृश्य आढळते. दुसऱ्या एका खणात `कल्याणसुंदर’ मूर्ती असून शिवाचा पार्वतीशी झालेला विवाह शिल्पित केलेला आहे. यापुढील शिल्प `रावणानुग्रह’ (रावण कैलास पर्वत हलविण्याचा प्रयत्न करीत आहे व या प्रयत्नात फसल्यावर शिवाने त्याच्यावर अनुग्रह केल्याची कथा) आहे. पाठीमागील भिंतीवर मार्कंडेयानुग्रह आणि गंगावतरण ही शिल्पे आहेत. मार्केंडेय अल्पायुषी असतानाही त्याने शिवाराधना केली.

ठरल्या वेळी यमाने आपले पाश मार्कंडेयाभोवती टाकल्यावर शिवाने आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी यमाला लाथ मारली, तेव्हा तो परत गेला आणि मार्कंडेय चिरंजीव झाला. यमाचे दुसरे नाव `काल’ आहे. त्याचा नाश केल्याचे चित्रण केलेल्या या शिल्पास `कालारि’ असे नाव दिले गेले आहे. क्रोधयुक्त शिव आवेशाने त्रिशुलाचा आघात यमावर करीत आहे. दुसऱ्या खणात गंगावतरणाचा प्रसंग आहे. शिवाने गंगा आपल्या जटापाशात बद्ध केल्याने या चित्रणास `गंगाधर शिव’ असे नाव आहे. तप करणारा सागरही यात कोरलेला आहे मात्र हा शिल्पपट बराचसा विच्छिन्न झालेला आहे. अंतराळाच्या डाव्या भिंतीवर गणेश, तर उजव्या बाजूस कार्तिकेय आहेत. गाभाऱ्याच्या उजव्या बाजूस गजलक्ष्मी, तर डाव्या बाजूस सरस्वती आहे. याशिवाय द्वारपालही आहेत. गाभाऱ्यात भग्नावस्थेतील शिवलिंग आहे. अंतराळाच्या खांबावर मिथुने कोरलेली आहेत. मागच्या भिंतीवर लिंगोद्‌भव शिव आणि त्रिपुरांतक शिव यांच्या मूर्ती आहेत. यातील लिंगोद्‌भव शिवमूर्तीच्या शिल्पात मधोमध ज्योतिर्मय शिवलिंग दिसत असून, उजव्या बाजूस वराहरूपी विष्णू व डाव्या बाजूस ब्रह्मा त्या लिंगाचा आदि-अंत शोधू पाहत आहेत. लिंगातून शिवमहादेव प्रकट झालेला आहे. त्रिपुरांतक शिव-शिल्पात रथारूढ शिव, रथाला सूर्य-चंद्राची चाके, ब्रह्मा सारखी, शिवधनुष्य म्हणून मेरू पर्वत, धनुष्याची दोरी म्हणून वासुकी नाग, विष्णुरूपी बाण आणि रथ नेणारे चार वेद अश्वरूपाने दाखविले आहेत.

उजव्या बाजूच्या भिंतीत अनुक्रमे गोवर्धनधारी कृष्ण, शेषशायी विष्णू, गजेंद्रमोक्ष करणारा विष्णू, भूवराह, त्रिविक्रम विष्णू आणि हिरण्यकश्यपचा वध करणारा नरसिंह ही शिल्पे आहेत. ही वैष्णव शिल्पे अत्यंत प्रमाणबद्ध गतिमान आणि विविध भावमुद्रांचे यथार्थ दर्शन घडविणारी आहेत. गर्भगृहासमोर सुटा नंदी आहे. प्रांगणाच्या उत्तरेतील भिंतीत एक लेणे असून त्याच्या गर्भगृहात शिवलिंग आणि त्याच्यामागे त्रिमूर्तीचे (अघोर, तत्पुरुष, कामदेव) शिल्प आहे. या लेण्यातील शिल्पपटांची शैली आणि दर्जा दोन्ही अनियमित आहेत. जणू विविध कलापरंपरांमधून आलेले वेगवेगळ्या शैलीचे शिल्पकार तेथे काम करून गेले असावेत. त्यावरून कैलास लेण्यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला हात घालण्याआधी भारताच्या विविध भागांतून आलेल्या शिल्पीसंघांचे कसब इथे अजमावून त्यातून त्यांची निवड झाली असावी, असा अंदाज बांधता येईल. येथे काम करणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका शिल्पीसंघाने नंतर पुण्याचे पाताळेश्वर लेणे कोरले असावे असे समजण्यास वाव आहे.

क्रमांक १६ : हे कैलास लेणे म्हणून ओळखले जाते. माणकेश्वर असाही त्याचा उल्लेख सापडतो. सर्वच दृष्टींनी हे लेणे भव्य असून ते वेरूळचा मुकुटमणी मानले जाते. आधी कळस मग पाया, हे वचन ह्या वास्तुरूपात पाहावयास मिळते. या लेण्याच्या निर्मितीस राष्ट्रकूटांचा राजा दंतिदुर्ग याच्या कारकीर्दीत प्रारंभ होऊन, पहिल्या कृष्णराजाने (कार. सु. ७५६-७७३) त्यास पूर्ण रूप दिले. पुढील राजांच्या काळात या शिवमंदिराच्या ओव्या, सरितामंदिर, लंकेश्वर लेणे, मातृकामंदिर इ. खोदण्यात आली. कैलास लेणे हे सौंदर्यशाली शैलमंदिर आहे. या लेण्याच्या कलात्मक आविष्कारात पल्लव-चालुक्यकालीन शैलींची संमिश्र छटा जशी दिसून येते, तसेच विमान, गोपुर इ. घटकांत द्राविड शैली स्पष्ट होते.

क्रमांक १७ : हे लेणे आखणी, स्तंभ आणि शिल्पपट या दृष्टींनी प्रेक्षणीय आहे. यातील गण, शालभंजिका व त्यांच्या बाजूस असलेल्या सेविका व गंधर्व यांच्या कमनीय मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हे एक अत्यंत सुंदर लेणे आहे पण अपूर्णावस्थेत आहे कदाचित इथला खडक हे लेणे खोदण्यासाठी पुरेसा योग्य नसावा. इथले स्तंभ अतिशय आकर्षक आहेत आणि स्तंभांवर शालभंजिकांच्या सुरेख प्रतिमा आहेत तसेच ठिकठिकाणी भारवाहक यक्षसुद्धा कोरलेले आहेत. दरवाजाजवळच भिंतीत गणेशाची अभंग प्रतिमा असून एका हातात परशु, दुसऱ्या हातात कमळ, तिसऱ्या हातात माळ तर चौथ्या हातात लाडवांचे पात्र आहे त्यातले लाडू तो आपल्या सोंडेने खात आहे. तर गणेशाच्या समोरच्या भिंतीवर महिषासुरमर्दिनीची प्रतिमा कोरलेली आहे.एका ठिकाणी भिंतीत ब्रह्मदेवाची विद्याधर आणि सेवकांसह प्रतिमा कोरलेली आहे. लेणीच्या अंतर्भागात नक्षीदार स्तंभ असून त्यावर सुरेख शिल्पे कोरलेली आहेत. स्तंभांवरच्या कमानीचा आकार बुद्ध विहारातील चैत्यकमानींशी विलक्षण साधर्म्य दाखवतो.

क्रमांक १८ ते २० : ही लेणी सर्वसामान्य असून, त्यांत उल्लेखनीय अशी वैशिष्ठे नाहीत. दरवाजाजवळ कुबेराची हातात पैशाची थैली घेतलेली प्रतिमा आहे व आतमध्ये गर्भगृह असून त्यामध्ये शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल कोरलेले आहेत. क्रमांक २१ : हे लेणे `रामेश्वर’ लेणे म्हणून ओळखले जाते. याचे दर्शनी भागाचे खांब कमनीय शालभंजिकांमुळे प्रेक्षणीय झाले आहेत. बाजूच्या खांबांना जोडून असलेल्या कठड्यावर गजथर असून त्यावर एकूण चौदा मिथुने कोरलेली आहेत. कठड्यास लागून असलेल्या भिंतीवर गंगा आणि दुसऱ्या बाजूस यमुना आहे. गंगेची त्रिभंगातील मूर्ती शरीरसौष्ठव व कलात्मक केशरचना यांमुळे लक्ष वेधून घेते. सभामंडपाच्या दोन्ही बाजूंस उंच जोत्यावर दोन लहान उपवर्णक असून, त्यांत डाव्या बाजूला शिव-पार्वतीचा विवाहसोहळा दाखविलेला आहे. पंचाग्निसाधन करणारी उमा, हिमालयाकडे उमामहेश्वरांचा विवाहप्रस्ताव घेऊन गेलेला ब्रह्मा आणि शिव-पार्वती विवाह (कल्याणसुंदर) हे तिन्ही पट अप्रतिम आहेत. विशेषतः विवाहप्रसंगी पार्वतीच्या चेहऱ्यावर दर्शविलेला सलज्ज भाव अत्यंत विलोभनीय आहे. याशिवाय महिषासुरमर्दिनी आणि मोरावर बसलेला कार्तिकेय यांची शिल्पे आहेत. त्याचा अग्नीशी असलेला संबंध अजमुख सेवक सूचित करतात. अंतराळाजवळ रावणानुग्रहाचा शिवमूर्तीपट आहे.

दक्षिण दालनात सप्तमातृका, नटराज आणि कंकाल-काली यांची शिल्पे आहेत. सप्तमातृका दालनाजवळ शिव-पार्वती पट खेळत असल्याचे शिल्प आहे. हे लेणे सुद्धा वेरूळ बघताना आवर्जून बघावे असेच आहे. लेणीच्या प्रांगणात एका चौथऱ्यावर बसलेल्या नंदीचे मोठे सुरेख शिल्प आहे. प्रांगण, ओसरी, ओसरीतील कोरीव सभामंडप आणि आत वेगवेगळ्या खणांत विभाजीत झालेला सभामंडप अशी याची रचना. ओसरीच्या एका बाजूला गंगेची अतिशय देखणी मूर्ती आहे. गंगेचे वाहन असलेल्या मकरावर गंगा उभी आहे. मकराच्या मुखातून हत्तीची सोंड बाहेर आलीय तर मकराचे पाय मात्र सिंहाचे आहेत. गंगेने नेसलेले झिरझिरीत उत्तरीय तिचा प्रवाहीपणा दाखवते. वेगामुळे ते विस्कळीत होऊ नये म्हणून तिने ते हाताभोवती लपेटलेले आहे तर तोल सांभाळायला तिने एका सेवकाच्या मस्तकी हात ठेवला आहे. तर बाजूला सेविका आणि आकाशी गंधर्व कोरलेले आहेत. गंगेच्या समोरच्या बाजूलाच कासवावर आरूढ असलेली यमुनेची मूर्ती कोरलेली आहे. ही मूर्ती जवळपास गंगेसारखीच असून ती बऱ्याच प्रमाणात भग्न झालेली आहे.

ओसरीचा कठडा कोरीव कामाने सुशोभित केलेला आहे. कठड्यातून कोरीव स्तंभ निर्मिलेले असून प्रत्येक स्तंभांवर शालभंजिकांच्या प्रमाणबद्ध अशा देखण्या मूर्ती झुकलेल्या अवस्थेत कोरलेल्या आहेत. प्रत्येक मूर्तीच्या दिमतीला सेवक आहेत. लेणीच्या अंतर्भागात डावी उजवीकडे दोन खण असून एका खणात शिवपार्वती विवाहाची कथा अगदी सविस्तर पद्धतीने तीन शिल्पपटांद्वारे मांडली आहे. तर उजव्या बाजूला शिवपार्वतीची अक्षक्रीडा तर त्याच्या आतल्या बाजूला सप्तमातृकापट आहे तर मधल्या भागात गर्भगृह असून बाहेरच्या बाजूला द्वारपाल असून आतमध्ये रामेश्वर शिवलिंग आहे. शिवपार्वती विवाह ही कथा तीन टप्यांत कोरलेली आहे. उजवीकडच्या कोपऱ्यात पार्वती तप करताना दाखवलेली असून तिच्याशेजारी बटूवेषधारी शिव हाती कमंडलू घेऊन लग्नाची मागणी घालताना दाखवलेला आहे. तर याच शिल्पपटाच्या डाव्या कोपऱ्यात साक्षात ब्रह्मदेव पार्वतीचा पिता हिमवान पर्वताकडे शिवाचे स्थळ घेऊन आलेला दाखवलेला आहे. ब्रह्माकडून शिवासाठी पार्वतीची मागणी आल्याने झालेला आनंद हिमवानाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आहे. तर ह्या दोन्ही शिल्पांच्या मधल्या भागात शिवपार्वतीचा विवाहविधी प्रत्यक्ष कोरलेला आहे. शिवाच्या बाजूस लक्ष्मी-विष्णु शची-इंद्र अस देव आलेले आहेत पर शिव पार्वतीच्या मध्ये कन्यादान करण्यासाठी हाती कमंडलू घेऊन हिमवान पर्वत उभा आहे तर पौरिहित्य ब्रह्मदेव करत आहे. या शिल्पपटाच्या खालच्या बाजूस शिवगण दाखवलेले आहेत. या शिल्पपटाच्या उजव्या कोपऱ्यात उभ्या अवस्थेतील कार्तिकेयाची सुरेख मूर्ती कोरलेली आहे. त्याचे वाहन मोर शेजारी उभे असून कार्तिकेयाने डाव्या हाती कोंबडा पकडलेला आहे.

कार्तिकेयाच्या दोन्ही बाजूला मेंढी आणि बोकड यांची तोंडे असलेले त्याचे नैगमेष आणि छगवक्त्र नावाचे दोन सेवक त्याची आज्ञा झेलण्यासाठी तत्पर उभे आहेत. कार्तिकेयाच्या समोरच महिषासुरमर्दिनीची सुरेख मूर्ती कोरलेली आहे. देवीच्या एका हाती विष्णूने दिलेले चक्र तर दुसऱ्या हाती शंकराने दिलेला त्रिशूळ आहे. महिषासुराच्या पाठीवर उजवा पाय रोवून तर त्याच्या तोंडावर डावा हात दाबून धरून ती त्याचा वध करते आहे. बाजूलाच देवीचे सेवक हत्यारे घेऊन उभे आहात तर आकाशातून विद्याधर हा सोहळा बघत आहेत. गर्भगृहाच्या दुसऱ्या बाजूच्या खणाच्या सुरुवातीला शिव पार्वतीच्या अक्षक्रिडेचा दोन पातळ्यांत देखावा कोरलेला आहे. खालच्या बाजूला मध्यभागी नंदी दाखवलेला असून इतर शिवगण त्याची उगाच पाय धरणे, शेपटी ओढणे अशा नाना प्रकारांनी खोड्या काढताना कोरलेले आहेत तर वरच्या पातळीत शिवपार्वतीचा सारीपाट खेळ मांडलेला आहे. शंकराच्या खेळातील लबाडीमुळे वा चातुर्यामुळे चिडलेली पार्वती निघून जायचा प्रयत्न करते आहे तर शंकर तिचा पदर धरून तिला आग्रहाने बसवून ठेवत आहे आणि फक्त आता फक्त एकच डाव खेळ असे एक बोट उंचावून तिची मनधरणी करत आहे. तर आजूबाजूला सेवक मोठ्या कौतुकाने ही क्रिडा बघत आहेत. इथल्या शेजारच्या दालनात शंकराचे कटीसममुद्रानृत्य दाखवलेले आहे.

अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे. दोन्ही पाय गुढघ्यात मुडपून डावा पाय किंचीत वर उचलून शंकर मोठे विलोभनीय नृत्य करतोय. त्याचे दोन्ही हात कंबरेभोवती आलेले आहेत. शिवाच्या बाजूला पार्वती एक लहान मूल कडेवर घेऊन उभी आहे तर आजूबाजूला गणेश आणि वादकांच्या मूर्ती आहेत. कटीसममुद्रानृत्य शिल्पाच्या शेजारच्या भिंतीवर सप्तमातृकापट कोरलेला आहे. या शिल्पपटाच्या सुरुवातीला सप्तमातृकांच्या बाजूला वीरभद्राची मूर्ती असून वाराही, ऐंद्री, वामनी, नारसिंही या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, कौमारी आणि चामुंडा या पूर्णपणे अनार्य अशा सप्तमातृका कोरलेल्या आहेत व शेवटी गणेशाची मूर्ती आहे. शाक्तपंथाचे प्रतिकच जणू हा पट. सप्तमातृका मूळाच्या अनार्य देवता. कोकणात ह्यांनाच साती आसरा अथवा जलदेवता म्हणत असावेत. प्रत्येक मातृका अतिशय देखणी आणि सालंकृत असून प्रत्येकीजवळ तिचे बाळ आहे तर खालच्या बाजूला वराह, हंस, मोर घुबड असे प्रत्येकीचे वाहन तिच्या मूर्तीखाली कोरलेले आहे. काल-काली सप्तमातृका म्हणजे मातेचे जीवनशक्तीचे प्रतिकच. याच जीवनमरणाच्या फेर्यातला दर्शवण्यासाठी या शिल्पपटाच्या बाजूला असितांग भैरव-काल कालीचे म्हणजे प्रत्यक्ष मृत्युचे शिल्प कोरलेले आहे. भयानक डोळे असलेल्या पूर्णपणे अस्थिपंजर असलेल्या कालाच्या हाती रूंद व टोकदार कट्यार आहे. एक सापळा त्याच्या पायाला मिठी मारून बसलेला आहे आणि त्याच्या मागे असलेली काली त्या सापळ्याला खेचून काढत आहे. तर तिच्याच बाजूला एक सापळा उभा आहे. जन्ममृत्युची जणू ही दोन प्रतिकेच असे हे सप्तमातृका आणि असितांग काल काली शिल्पपट आहेत.

क्रमांक २२ : हे लेणे `नीलकंठ’ या नावाने ओळखले जाते. तेथील नंदी-मंडपाच्या उजव्या बाजूच्या मंडपात सप्तमातृकांची शिल्पे आहेत. शिवाय गणेश, कार्तिकेय, गजलक्ष्मी आणि कमलासना देवी यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात शिवलिंग आहे. ह्या लेणीच्या प्रांगणात नंदीची मूर्ती चौथऱ्यावर कोरलेली असून आतल्या दालनात वीरभद्र आणि गणेशमूर्तीसह सप्तमातृका आहेत. यातली वाराही ही वाराहमुखी दाखवलेली असून ब्राह्मणी त्रिमुखी आहे. प्रत्येकीजवळ तीचे बालक कोरलेले आहे. लेणीच्या आतल्या भागात गाभारा असून आतमध्ये शिवलिंग आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही भिंतींवर जय विजय शैलीत द्वारपाल कोरलेले आहेत. तर जवळच गजान्तलक्ष्मी आणि सरस्वतीच्या प्रतिमा आहेत. इथून पुढची काही लेणी भव्य आहेत पण आतमध्ये पाहण्यासारखे काही नाही पण जवळपास प्रत्येकीत गाभाऱ्यासह शिवलिंग आहे तर ओसरीतले स्तंभ कोरलेले आहेत.

क्रमांक २३ व २४ : ही फारशी वैशिष्ट्यपूर्ण लेणी नाहीत. क्रमांक चोवीसच्या लेण्यात चार शिवमंदिरे असून त्यांत योनिपीठे आहेत. याला `तेली की घाणी’ असेही म्हणतात.

क्रमांक २५ : हे लेणे आकाराने विस्तृत असून मंडपात कुबेर, स्तंभावर शालभंजिका, छतावर गजलक्ष्मी व आतील छतावर सूर्य यांची शिल्पे आहेत. गर्भगृहासमोर दोन द्वारपाल असून सूर्याचे शिल्प कलात्मक आहे.

क्रमांक २६ : याची रचना एकविसाव्या लेण्यासारखीच आहे. दर्शनी भागात घटपल्लवयुक्त स्तंभ, दोन अर्धस्तंभ व प्रवेशद्वारात गजमुखे कोरलेली आहेत. याच्या प्रवेशद्वारापाशी द्वारपालांची दोन भव्य शिल्पे आहेत.

क्रमांक २७ : हे लेणे `जानवसा’ लेणे अथवा `जानवसा घर’ म्हणून ओळखले जाते. याच्या जवळच क्र. २९ चे `सीता की नहाणी’ या नावाने संबोधले जाणारे लेणे शिव – पार्वती विवाहाचा शिल्पपट असल्याने या विवाहाच्या संदर्भात या लेण्याला जानवसा असे म्हणत असावेत. सभामंडपाच्या दरवाजाच्या एका बाजूस नांगरधारी बलराम, एकानंशा व कृष्ण आणि दुसऱ्या बाजूस ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे मोठे शिल्पपट आहेत. शिवाय शेषशायी विष्णू, वराह यांच्या मूर्ती आहेत. याच दरवाज्याच्या दोन बाजूंस खिडक्या असून त्यांच्यावर महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे. गर्भगृहात फक्त अधिष्ठान आहे, मूर्ती नाही. या लेणीमध्ये काही निवासकक्ष कोरलेले आहेत. विश्रांतीकक्ष असल्याने हे लेणे मूळचे बौद्ध लेणे असल्याचे वाटते. कालांतराने याचे वैष्णव लेणीत रूपांतर झालेले आहे. शैव लेणींचे प्राबल्य असलेल्या वेरूळ मधले हे एक वैष्णव लेणे. याची निर्मिती राष्ट्रकूटांच्या काळात न होता यादवकाळात झालेली असावी. या लेणीच्या वरच जलप्रपात कोसळत असल्याने तसेच येथला दगड ठिसूळ असल्याने इथल्या मूर्ती बऱ्याच ओबडधोबड झालेल्या आहेत.

क्रमांक 28 : हे लेणे पावसाळ्यातील जवळच्या धबधब्यामुळे रम्य वाटते. लेण्याच्या दरवाजाच्या बाजूस गंगा, यमुना यांची भग्न शिल्पे असून सभामंडपात योगासनातील अष्टभुजा शाक्त देवी, गर्भगृहाशी संलग्न द्वारपाल आणि गर्भगृहात योनिपट आहेत. देवीच्या हातांत खड्‌ग, भुजंग, त्रिशूल, नरमुंड इ. आहेत.

क्रमांक २९ : हिंदू धर्मीय लेण्यांमध्ये `सीता की नहाणी’ या नावाने हे लेणे (४५•११ X ४५•४१ मी.) प्रसिद्ध आहे. यातील शिल्पे भव्य असूनही कलाहीन आहेत. अग्रमंडपाच्या अधिष्ठानावर भव्य सिंहशिल्पे आहेत, तर भिंतीवर रावणानुग्रह आणि अंधकासुरवध यांचे शिल्पपट आहेत. सभामंडपाच्या मागील गर्भगृहात शिवलिंग आहे. दक्षिणेकडील पार्श्वमंडपात शिव-पार्वती विवाह, अक्षक्रीडेत रमलेले शिव-पार्वती असून उत्तरेकडील पार्श्वमंडपात कमळावर पद्मासनात बसलेला लकुलीश शिव आहे. त्याचा उजवा हात व्याख्यानमुद्रेत असून त्याच्या डाव्या हातात लगुड (लाकडाचा दंड) आहे. जटामुकुट, वनमाला आणि यज्ञोपवीत घातलेली ही मूर्ती ऊर्ध्वरेतस अथवा ऊर्ध्वमेढ्र आहे. समोर अपूर्णावस्थेतील नटराज शिवाचे शिल्प आहे. भव्यता, अग्रमंडप, सभामंडप आदी विकसित वास्तुघटक आणि शिल्पांतील गतिमानता व चेहऱ्यांवरील विविध भाव या दृष्टींनी ही लेणी वैशिष्ठपूर्ण आहेत. तसेच या लेण्यांतून शाक्त, शैव व वैष्णव या तिन्ही पंथीयांचे शिल्पांकन दृष्टीस पडते. काही लेण्यांत भित्तिचित्रे आढळतात. हे लेणे अतिशय भव्य आहे.

वेरूळ लेण्यांच्या भटकंतीत हे लेणे आवर्जून पाहायलाच पाहिजे असे आहे. या लेण्यांत तीन बाजूंनी प्रवेश करता येतो त्यापैकी एक मुख्य प्रवेशद्वार लेण्यांच्या समोरच आहे तर त्याच्या डावीकडेच घळीसारखा खडक फोडून दुसरे प्रवेशद्वार केले आहे तर तिसरे प्रवेशद्वार लेण्यांच्या आतील बाजूस उजवीकडेने कातळ फोडून केले आहे व हा मार्ग दरीकडच्या चिंचोळ्या वाटेने पुढील लेणीकडे सरकतो. त्याच्या दोन्ही बाजूंस सिंह कोरलेले आहेत. अत्यंत देखणी अशी ही सिंहशिल्पे आहेत. हे लेणे आतल्या बाजूने प्रचंड मोठे आहे. भव्य असा सभामंडप, मंडपातील कोरीव स्तंभ व चौबाजूंनी भव्य द्वारपालांनी घेरलेले गर्भगृह व आतमध्ये शिवलिंग अशी याची रचना. प्रवेशद्वारातून आत जाताच डावीकडच्या बाजूस कोरलेले शिल्प आहे ते अंधकासुर वधाचे हे शिल्प अतिशय प्रत्ययकारी आहे. खवळलेल्या, क्रोधाने दग्ध झालेल्या आठ हात असलेल्या शंकराने एक पाय मुडपून आपल्या हातातली तलवार जोराने अंधकासुराच्या छातीतून आरपार खुपसलेली आहे. शिवाचे खोबणीतून बाहेर आलेले डोळे, कपाळावरचा उमलू पाहणारा तिसरा डोळा व भयानकपणे विचकलेले दात त्याला आलेला भयानक क्रोध दर्शवत आहेत. तर आपला अंतःकाळ आता जवळ आलेला आहे हे ओळखून अंधकासुर दोन्ही हात जोडून त्याची क्षमा मागतोय.

शिवाच्या उजवीकडे खालच्या बाजूला पार्वती बसली असून पतीचा हा पराक्रम पाहून तिला वाटत असलेले कौतुक तिच्या चेहऱ्यावर विलसत आहे. शिवाने एका हातात वाडगा धरलेला असून अंधकासुराचे पडत असलेले रक्त तो त्यात गोळा करतो आहे. अंधकासुराचे पापी रक्त पार्वतीच्या अंगाला लागू न देणे म्हणूनच ही योजना. शिवाच्या दुसऱ्या हातांमधली तलवार डोक्यावर धरलेले चाबूकरूपी गजचर्म ही आयुधेपण अतिशय प्रेक्षणीय अशी आहेत. अंधकासुरवध शिल्पाच्या बरोबर समोर आहे ती रावणानुग्रह किंवा कैलासउत्थापन शिल्प. कैलासपर्वतावर शंकर पार्वती शांतपणे बसलेले असून उन्मत्त झालेला रावण कैलास पर्वतापाशी पाठमोरा होऊन आपल्या २० हातांनी कैलास पर्वत हलवण्याच्या प्रयत्न करत आहे. रावणाच्या डावी उजवीकडे असलेले शिवगण भयचकित झालेले असून काही रावणावर हल्ला करायचा प्रयत्न करत आहेत तर काही शंकराची हात जोडून प्रार्थना करत आहेत. दुसऱ्या पातळीवर शंकर पार्वतीच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल कोरलेले असून चामरधारी सेविका शांतपणे चवरी ढाळत उभी आहे. तर एकदम वरच्या पातळीत दोन्ही बाजूस सप्तमातृका, काल व विद्याधर दाखवले असून त्यापैकी हाडाचा सापळा असलेली चामुंडा व कालची मूर्ती सहजी ओळखू येतेय.

शंकराने आपल्या उजव्या पायाने पायाने कैलासाला दाबून धरलेले असून डाव्या हाताने पार्वतीला घट्ट धरून ठेवलेले आहे. चेहऱ्यावरील भाव अत्यंत निराकार किंवा अतिशय शांत असेच कोरलेले आहेत. तर पार्वतीही पतीने सावरून घेतल्यामुळे आश्वस्त झालेली आहे. ही रावणानुग्रहमूर्ती वेरूळ लेणी समूहाच्या इतरही बऱ्याच लेणीत कोरलेली असून दिसायली जरी सारखीच वाटली तरी प्रत्येकीत काही वेगळे बारकावे आहेतच. इथून पुढे देखण्या स्तंभांवर सभामंडप तोलून धरलेला दिसून येतो. त्यापैकी एका बाजूला नटराजाची भव्य मूर्ती कोरलेली असून ती अपूर्णावस्थेत असल्याने इतकी आकर्षक वाटत नाही तर याच्या समोरील भिंतीवर लकुलीश शिवाची मूर्ती आहे. मंडपातील स्तंभांवरही काही कोरीव शिल्पे आहेत. एका स्तंभावर नटराजाची मूर्ती आहे तर दुसऱ्या स्तंभांवर कल्याणसुंदर शिवाची मूर्ती कोरलेली आहे. लकुलीश हा शिवाचा एक अवतार समजला जातो. हा कमळावर बसलेला असून नागसेवकांनी कमळाचा देठ घट्ट धरून ठेवला आहे. शिवाला दोनच हात दाखवले असून त्याचा उजवा हात व्याख्यान मुद्रेत आहे तर दुसऱ्या हातात त्याने लगूड अथवा लाकडी सोटा उचलून धरला आहे. गळ्यात नागरूपी हार असून कपाळी अस्पष्टसा असा तिसरा डोळा दिसतो आहे. हे शिवाचे योगी स्वरूप. लकुलीश शिव प्रतिमा ही बुद्धासारखीच दिसते. किंबहुना बुद्धप्रतिमेवरूनच शिवाचे हे रूप तयार झाले असावे. कित्येक महायानकालीन बौद्ध लेण्यांत पद्मपाणी बुद्धाची अगदी अशीच प्रतिमा कोरलेली आढळते. सभामंडपाच्या डाव्या बाजूला भिंतीवर कासवावर उभी राहिलेली यमुनेची प्रतिमा कोरलेली आहे. एका हातात तिने शंख वा फूल धरीले आहे तर दुसरा हात सैलसर असा कमरेच्या बाजूला मुक्त सोडलेला आहे. तिने अगदी तलम वस्त्र नेसलेले असुन यात तिच्या प्रवाहीपणा प्रकट होतो तर बाजूला एक सेविका दाखवलेली असून वर आकाशगामी गंधर्व कोरलेले आहेत. या बाजूलाच यमुनेच्या पुढ्यात परत दोन्ही बाजूंना सिंह कोरलेले आहेत तर चार पायऱ्या खाली उतरून जाताच अजून एक लेणे आहे पण यात कसलीही मूर्ती कोरलेली नाही. हे कसलेतरी कोठार असावे. मध्यभागी गर्भगृह असून ते छताला भिडलेले आहे व आतमध्ये शिवाची पिंडी अधिष्ठित आहे. गर्भगृहाच्या चारही बाजूंनी अतिशय भव्य असे द्वारपाल कोरलेले आहेत. द्वारपालांबरोबरच सेविकांची चित्रे पण कोरलेली आहेत तर त्यांच्या डोक्यावर गंधर्व विहरतांना दाखवलेले आहेत. इतके भव्य द्वारपाल कैलास एकाश्ममंदिरातही नाहीत. गर्भगृहाच्या पाठीमागच्या बाजूस उजव्या बाजूच्या भिंतीत शिवपार्वती विवाहाचा एक देखणा शिल्पपट कोरलेला आहे. मध्यभागी पार्वतीचा हात हाती घेऊन शिव उभा असून पार्वती शिवाच्या बाजूने वळली आहे. पार्वतीच्या डाव्या बाजूले तिचे पिता हिमालय पर्वत व आई मैना उभी आहे तर शंकराच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेव विवाहाचे पौरोहित्य करत बसलेला आहे तर त्याच्या शेजारी विष्णू उभा आहे. विष्णूच्या डोक्यावर स्वर्गातून आलेला ऐरावतारूढ इंद्र तर त्याच्या शेजारी मकरवाहन गंगा आलेली आहे तर त्यांच्याहीवर अप्सरा, गंधर्व आलेले आहेत तर डाव्याबाजूला वरच्या बाजूस यम,वायु,अग्नी, निऋती, कुबेर, वरूण इत्यादी अष्टदिक्पाल त्यांच्या रेडा, बैल, बोकड, नर आदी वाहनांवर आरूढ होऊन विवाहसोहळ्यात आप्तेष्ट म्हणून आलेले दाखवलेले आहेत. याच शिल्पाच्या बाहेरील बाजूस सरस्वतीची उभ्या अवस्थेतील मूर्ती कोरलेली आहे. याच्या समोरच अजून एक शिल्पपट आहे. यात शिवपार्वती विवाहानंतरचा प्रसंग दोन पातळ्यांत कोरलेला आहे. खालच्या पातळीत मंगलघटांची मांडणी केलेली आहे तर डावी उजवीकडे विष्णू आणि ब्रह्मदेव आहेत तर मध्यभागी नंदी असून शिवगण त्याची थट्टा करतांना दाखवलेले आहेत. तर वरच्या पातळीत शिवपार्वती मजेने गप्पा मारत बसलेले असून शिवाने पार्वतीचा हात थट्टापूर्वक घट्ट पकडून ठेवला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर मिष्किल हास्य विलसत आहे तर पार्वतीची मुद्रा लाजरी आहे. शिवगण आणि पार्वतीच्या सख्या मोठ्या कौतुकभरल्या नजरेने ह्या दोघांकडेही पाहात आहेत. तर आकाशातून अप्सरा, गंधर्वसुद्धा हा सोहळा मोठ्या कौतुकाने पाहात आहेत. या बाजूनेच एक जिना दरीच्या कडेने बारीक वाटेने उतरून पुढील लेणीकडे जातो. जैन लेणी : क्रमांक ३० ते ३४ ही जैन धर्मीयांची लेणी आहेत. ती मुख्यत्वे दिगंबर पंथीयांची आहेत. क्रमांक ३० : हे लेणे (३९•६२ X २४•३८ मी.) म्हणजेच छोटा कैलास. हे कैलासप्रमाणेच द्राविड धर्तीचे मंदिर आहे. गोपुराच्या उजव्या आणि डाव्या भिंतींवर शिल्पे आहेत. डावीकडे प्रथम तीर्थंकर ऋषभनाथ यांची यक्षिणी चक्रेश्वरी असून तिचे वाहन गरुड आहे आणि तिने पद्म, चक्र, शंख, गदा व खड्‌ग ही आयुधे धारण केली आहेत. उजवीकडे समभंगातील तीर्थंकरांच्या तीन मूर्ती आहेत. लेण्यात अग्रमंडप, मुख्य मंडप व गर्भगृह हे वास्तुघटक आहेत. अग्रमंडपाच्या पाठीमागील भिंतीवर सौधर्मेंद्र यक्षाच्या दोन नृत्यमूर्ती आहेत. सभामंडपाच्या भिंतीवर गंधर्वमिथुने कोरलेली आहेत. याच्या दरवाजाच्या बाजूवर शंखनिधी आणि पद्मनिधी आहेत. गर्भगृहात महावीर यांची मुख्य मूर्ती असून बाजूला इतर तीर्थंकरांच्या प्रतिमा आहेत. त्यांत पार्श्वनाथ, गोमटेश्वर यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. परंतु उत्तरेकडील भिंतीत योगासनातील अष्टभुजा देवीची मूर्ती आहे. तिने उजव्या तीन हातांत अनुक्रमे त्रिशूळ, पाश, खड्‌ग धारण केले असून चौथा हात वरदमुद्रेत आहे. डाव्या हातांत पाश, घंटा असून एक हात अभयमुद्रेत आहे. अग्रमंडपात गदाधारी द्वारपाल असून छतावर भित्तिचित्रांचे अवशेष आढळतात. या लेण्याजवळ एक अपूर्ण लेणे आहे. या लेण्यात चतुर्मुख तीर्थंकर, छतावरील कमलपुष्प, पूर्णघट कोरलेले स्तंभ, अग्रमंडपातील कक्षासन आणि जोत्यावरील हत्ती अशी मोजकी शिल्पे आढळतात. एकाच कातळात कोरलेले लहानसे मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला नक्षीदार उपमंडप अशी याची रचना. हे लेणेसुद्धा आधी कळस मग पाया अशा पद्धतीने खोदले गेले आहे. ह्या लेणीतील मंदिरात सभामंडप, गर्भगृह आणि वर दक्षिणी पद्धतीची शिखररचना आहे. गाभाऱ्यात महावीरांची मूर्ती आहे. हे मंदिर कमालीचे सुंदर आणि नक्षीदार आहे. इथेही बौद्ध लेण्यांप्रमाणेच पिंपळाकार कमानी दिसतात. पण बौद्ध लेण्यांच्या कलेकडून जैन लेण्यांच्या कलेकडे स्थित्यंतर होताना काळाच्या प्रवाहात मूळचे कमानदार निमुळते आकार डेरेदार झालेले दिसतात तर स्तंभांवरील नक्षीकाम देखणे झालेले दिसते तसेच विश्रांतीकक्ष दिसून येत नाहीत. लेणीतच उजव्या बाजूला एक कैलाश लेणीप्रमाणेच एक भव स्तंभ असून त्यावर चतुर्मुखी ब्रह्मयक्षाची प्रतिमा कोरलेली आहे तर डाव्या बाजूला एकाच पाषाणात घडवलेली हत्तीची सुस्थितीतील मूर्ती आहे. मंदिराच्या सभोवतालच्या भिंती ह्या इंद्रसभेच्या बाहेरच्या बाजूस असणाऱ्या अशा आहेत. भिंतींवर महावीर, पार्श्वनाथ यांच्या जीवनातले अनेक प्रसंग कोरलेले आहेत. पार्श्वनाथ हे तेवीसावे तीर्थंकर. यांची तपस्या भंग करण्यासाठी कमठ या राक्षसाने हरतऱ्हेने प्रयत्न केले. त्यावेळी धरणेंद्र यक्ष आणि त्याची पद्मावती यांनी पार्श्वनाथांचे संरक्षण केले. धरणेंद्राने आपला सप्तफणा पार्श्वनाथांच्या मस्तकी धारण केला आहे आणि आपल्या शरीराच्या वेटोळ्यांनी त्यांच्या शरीराचे कमठापासून संरक्षण केले आहे. बुद्ध, बुद्धशत्रू मार आणि बुद्धाचे नागराज अनुयायी नंद आणि अनुपनंद यांच्यासारखीच ही कथा. अजूनही कित्येक प्रसंग ह्या लेणीच्या भिंतींवर कोरलेले आहेत. इथले मूर्तीकाम अतिशय सुरेख आहे. ह्या लेणीचा अंर्तभाग हाच इंद्रसभेचा बाह्यभाग आहे. किंबहुना ही पाचही लेणी इतकी अभिन्न आहेत की यांचे वर्णन लिहितांना यांचा वेगळा विचार करून लिहिणे अशक्य आहे. वास्तविक हे लेणीसंकुल म्हणजे वेगवेगळ्या लेणी नसून एकाच लेणीचे हे वेगवेगळे विभाग आहेत असेच समजावे. क्रमांक ३१ : क्रमांक ३१ ते ३४ ही लेणी एकमेकांस लागून खोदलेली आहेत. पहिल्या लेण्याच्या दर्शनी भागात चार खांब आहेत. सभामंडपात गोमटेश्वराची कार्योत्सर्गमुद्रेत उभी मूर्ती असून तिच्या समोर पार्श्वनाथ तीर्थंकराची प्रतिमा आहे. गर्भगृहात महावीराची ध्यानमुद्रेतील प्रतिमा असून वर पुष्पमाला घेतलेले गंधर्व विहार करीत आहेत. गर्भगृहाच्या बाहेर डाव्या बाजूस वटवृक्षाखाली असलेली मातंगाची, तर उजव्या बाजूला आम्रवृक्षाखाली सिंहासनारूढ सिद्धायिकेची मूर्ती कोरली आहे. जैन परंपरेप्रमाणे महावीर तीर्थंकराशी मातंग यक्ष म्हणून, तर सिद्धायिका शासनदेवता म्हणून निगडित आहेत. क्रमांक ३२ : हे इंद्रसभा नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या प्रांगणात मधोमध एका उंच चौथऱ्यावर तीर्थंकराचे सर्वतोभद्र प्रतिमागृह आहे.या प्रतिमागृहाला चारही बाजूंस दोन खांब असलेले अग्रमंडप आहेत. मंदिरावर द्राविड पद्धतीचे शिखर आहे. मंदिरनिर्मितीचे तंत्र कैलासाप्रमाणेच म्हणजे वरून खाली आहे. प्रांगणाच्या तिन्ही बाजूंस दुमजली लेणी कोरलेली आहेत. या लेण्यांच्या कक्षासनांवर कैलासाशी साम्य दर्शविणारी गजमुखे कोरलेली आहेत. प्रांगणाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील भिंतींत पार्श्वनाथ, गोमटेश्वर, सिद्धायिका, मातंग यक्ष आणि इतर काही तीर्थंकर यांची शिल्पे आहेत. मुख्य लेण्यात गेल्यावर अग्रमंडपात एक महत्त्वाचा पुरावा दिसून येतो. एका खांबावर तांबड्या गेरूने तीर्थंकर प्रतिमेचे रेखाटन केल्याचे दिसते. त्यानुसार मूर्ती घडविली जाई, असे स्पष्ट होते. याच मंडपातील दुसऱ्या एका खांबावर तीर्थंकार प्रतिमेखाली `नागवर्मकृत प्रतिमा’ असा उत्कीर्ण लेख असून, दुसऱ्या एका खांबावर `श्री सोहिलब्रह्मचारिणी शांतिभट्टारक प्रतिमेयम्‌’ असा लेख शांतिनाथ तीर्थंकराच्या प्रतिमेखाली आहे. देवनागरीतील हा शिलालेख यादवकाळातील असावा. राष्ट्रकूटांच्या अस्तानंतर येथे यादवांचे साम्राज्य आले व तेव्हाही ह्या जैन लेणीत मूर्ती कोरणे सुरुच होते. श्री सोहिल ब्रह्मचारिणा शांति भट्टारक प्रतिमेयम – म्हणजे सोहिल नामक ब्रह्मचार्यासने शांतिनाथ तीर्थकरांची ही मूर्ती कोरली आहे. याच लेण्याच्या तळमजल्याच्या गर्भगृहात महावीराची मूर्ती आहे. वरच्या मजल्यावर चढताना अर्ध्या वाटेतील प्रतिमागृहात महावीर, पार्श्वनाथ, गोमटेश्वर, सिद्धायिका आणि मातंग यक्ष यांच्या प्रतिमा आहेत; तर वरच्या मजल्यावरील अग्रमंडपात मातंग आणि सिद्धायिका यांच्या समोरासमोर भव्य प्रतिमा आहेत. मंडपाचे खांब घटपल्लव आणि इतर शिल्पे यांनी सुशोभित केले आहेत, छतावर कमळ कोरलेले आहे. मंडपाच्या मागील भिंतीत पार्श्वनाथ, महावीर व गोमटेश्वर यांच्या प्रतिमा आहेत. या मंडपाच्या छतावर चित्रकारीचे पुसट अवशेष दिसतात. वास्तविक जैन धर्मामध्ये इंद्र आदी देवतांचे बरेच उल्लेख आहेत पण ह्या लेण्यामध्ये इंद्राचा तसा काहीही संबंध नाही. येथील गर्भगृहाच्या दाराच्या डावीकडे हत्तीवर बसलेल्या मातंग यक्षाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे तर दुसऱ्या बाजूला सिद्धायिकेची सुंदर मूर्ती आहे. ह्या दोन मूर्तींकडे पाहूनच ह्यांना इंद्र आणि इंद्राणीच्या मूर्ती समजले गेले आणि लेण्याचे नामकरण इंद्रसभा असे झाले. इंद्राशी काहीही संबंध नसला तरीही ह्या लेणीचे काम अगदी इंद्राच्या राज्यसभेला साजेसे असे कमालीचे देखणे आणि सुबक झालेले आहे. इंद्रसभा हे लेणेसुद्धा जगन्नाथसभेसारखेच दुमजली असून त्याची रचना पण त्यासारखीच आहे. मात्र इंद्रसभेतल्या मूर्तीचे कोरीव काम अतिशय सुबक आहे तर इथल्या स्तंभांवरचे नक्षीकाम कमालीचे नाजूक आहे. इंद्रसभेतील इतर मूर्तीमध्ये पार्श्वनाथ, गोमटेश्वर, महावीर इत्यादी तीर्थकरांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या असून स्तंभांवर अतिशय देखणे नक्षीकाम केले आहे. इंद्रसभेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथल्या ओसरीतील मातंग यक्ष आणि सिद्धायिकेच्या प्रतिमा. हत्तीवर मातंग यक्ष एक पाय खाली सोडून बसलेला आहे. मस्तकी मुकूट, गळ्यांत हार, बाजूबंद, कमरपट्टा त्याने परिधान केलेला आहे तर जानव्यासदृश एक हार त्यांच्या खांद्यावरून पोटाच्या बाजूने गेलेला दिसतो आहे. त्याचे वाहन असलेल्या हत्तीच्या मस्तकीही मोत्यांचे दागिने दिसत आहेत तर बाजूलाच दोन सेवक आज्ञापालनासाठी उभे आहेत. यक्षाच्या डोक्यावर वटवृक्षाच्या पर्णसंभाराने छाया धरली असून पानांच्या शिराही अगदी स्पष्टपणे कोरलेल्या आहेत तर त्या वॄक्षाच्या डेऱ्यावर मयुर पक्षी विहरतांना दाखवले आहेत. अशा ह्या सुंदर मूर्तीला इंद्र समजले जाणे यात काहीच नवल नाही. ही अतिसुंदर मूर्ती कोरतांनाही यक्षांची स्थूल तनु, सुटलेले पोट, मोठे डोळे आणि ठेंगणेपणा आदी मूळ वैशिष्ट्ये येथेही कायम ठेवलेली आहेत. ओसरीत एका बाजूला सिद्धायिकेची तितकीच देखणी मूर्ती कोरलेली आहे. सिद्धायिका ही सिंहावर आरूढ असून एक हात तिने आशीर्वादपर मुद्रेत उंचावला असून दुसर्यास हाताने तीचे लहान मूल ती सांभाळत्ये आहे. हिच्याही अंगाखांद्यावर अनेक अलंकार असून बाजूला सेवक हीची आज्ञा झेलण्यासाठी सज्ज आहेत. हिच्या मस्तकी आम्रवृक्षाच्या पर्णसंभार दाखवलेला असून वृक्षाला फळेही लागलेली आहेत. जणू मातृरूपी शक्तीचे हे एक प्रतिकच आहे. वृक्षात मधूनच फळ खायला आलेले एक मर्कट कोरलेले असून वरच्या बाजूला मोर कोरलेले आहेत. सिद्धायिका ही सुद्धा देवी नसून यक्षिणीच मानली जाते. ह्या लेणीतसुद्धा काही चित्रे कोरलेली आहेत. इथली चित्रे बरीचशी खराब झाल्यामुळे तशी अस्पष्टशी आहेत. जगन्नाथसभेच्या वरच्या मजल्यावरून इंद्रसभेच्या वरच्या मजल्यावर आपला प्रवेश होतो व दुसऱ्या बाजूने एका जिन्याने आपण इंद्रसभेच्या तळमजल्यावर येतो. क्रमांक ३३ : `जगन्नाथ सभा’ ह्या नावाचे हे लेणे दुमजली आहे. तळमजल्यातील लेण्यात मातंग आणि सिद्धायिका यांची उत्कृष्ट शिल्पे आहेत. वरच्या मजल्यावर बारा खांबांचा मंडप असून भिंतीत व गर्भगृहात तीर्थंकर प्रतिमा आहेत. महावीर प्रतिमेलाच जगन्नाथ समजून या लेण्याला त्याचे नाव दिले गेले असावे. हे भव्य लेणे दुमजली असून आतमध्ये नक्षीदार स्तंभांवर तोलले गेले आहे. दर्शनी बाजूस अर्धभिंत आहे. दोन्ही मजल्यांवर नक्षीदार खांब असून त्यांवर अतिशय सुबक असे नक्षीकाम केलेले आहे. ओवरीतच हत्तीवर बसलेल्या मातंग यक्षाची प्रतिमा कोरलेली असून दुसऱ्या बाजूला सिद्धायिकेची प्रतिमा कोरलेली आहे. या दुमजली लेण्याची खालची आणि वरची बाजू जवळपास सारखीच असून सर्व लेण्यांत तीर्थंकर, यक्ष, यक्षिणी यांच्या एकसारख्याच प्रतिमा कोरलेल्या आहेत. ओसरी, सभांडप आणि गर्भगृहात महावीरांची मूर्ती अशी या लेणीची रचना. इथल्या भिंतीवर मूर्तींच्या जोडीने चित्रे सुद्धा रंगवलेली आढळतात. त्यात महावीरांच्या जीवनातील काही प्रसंग चित्रबद्ध केलेले आहेत. इथल्या छतांवरही देखणी चित्रे रंगवलेली असून अजिंठ्यातील चित्रांशी यांचे बरेच साध्यर्म्य दिसून येते. मात्र यात कथांपेक्षा नक्षीकाम, वादक, नर्तक, प्राणी अशीच चित्रे काढलेली आढळून येतात. क्रमांक ३४ : हे शेवटचे जैन लेणे अग्रमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह या योजनेचे असून, येथेही तीर्थंकर आणि गोमटेश्वर ह्यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. काही अपवाद वगळल्यास या लेण्यांतील मूर्ती साचेबंद वाटतात. विशेषतः तीर्थंकरांच्या मूर्तींत विविधता नसून निर्जीवपणा जाणवतो. हे लेणे तसे लहानसेच असून एका बाजूला पार्श्वनाथ व दुसऱ्या बाजूला गोमटेश्वर अशा प्रतिमा आहेत. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृहात महावीरांची प्रतिमा आहे. हत्तीवर बसलेला मातंग यक्ष आणि सिद्धायिका देवीबरोबरच इथे जैन अनुयायी , आकाशगामी गंधर्व आणि साधेसेच पण नक्षीदार स्तंभ येथे कोरलेले आहेत. छतावर कमळफुलांची नक्षी आहे. वर वर्णन केलेल्या मुख्य लेणी समूहाव्यतिरिक्त वेरूळला याच लेण्यांच्या परिसरात इतरही छोटीछोटी लेणी आहेत. उदा. तेली की घाणी (क्र.२४) जवळ दोन लेणी असून त्यांत गर्भगृहात त्रिमूर्ती, तर मंडपात पंचाग्निसाधन करणारी उमा कोरलेली आहे. याशिवाय गणेशमूर्तीही आहे. लेणे क्रमांक २९ (सीता की नहाणी) च्या वरच्या बाजूस डोंगर-पठारावर `गणेश लेणी’ या नावाने संबोधल्या जाणाऱ्या लेण्यांचा समूह आहे. यांतील एकात गर्भगृहात शिवलिंग असून या लेण्याचे वैशिष्ट्य असे, की याच्या मंडपाच्या छतावर लिंगोद्‌भव शिव, समुद्रमंथन यांची भित्तिचित्रे आहेत. दुसऱ्या एका लेण्यात गर्भगृहात गणेशाची मूर्ती आहे, तर इतर काहींमध्ये महेशमूर्ती उत्कर्णी केलेल्या आहेत. आणखी काही अंतरावर `योगेश्वरी’ नावाच्या लेण्यांचा समूह आहे. ही लेणी आकाराने लहान असून त्यांत शिवलिंग आणि महेशमूर्ती आढळून येतात. ही सर्व लेणी, त्याचप्रमाणे यांतील चित्रकारी अकराव्या-बाराव्या शतकांतील असावी. स्थापत्य आणि शिल्प यांच्यातील जोम नष्ट झाल्याचा हा काळ होता.

(सदर माहिती मराठी विश्वकोशातून घेतलेली आहे)

Leave a Comment