महादेव मंदिराचे गाव, कोळगाव –
कोळगाव हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असणारे अंदाजे पाच हजार लोकवस्तीचे गाव. गेवराई तालुक्यातील नगर जिल्ह्याच्या सीमेवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वर असलेले पाडळसिंगी ते पाथर्डी रस्त्यावरील इतर गावासारखेच हे एक खेडेगाव. प्रत्येक गावाचे काही एक वैशिष्ट्य असते त्या प्रमाणे या गावाचे देखील एक वैशिष्ट्ये आढळून येते ते म्हणजे या छोट्याशा गावामध्ये चार पुरातन यादवकालीन महादेव मंदिरे असून त्यातील एक लहान परंतु वेगळ्या धाटणीचे शिवमंदिर आहे.(महादेव मंदिराचे गाव)
सिद्धेश्वर, कल्पेश्वर, वृद्धेश्वर आणि पंचलिंगेश्वर अशी या चार नावाने ही शिव मंदिरे गावात प्रसिद्ध आहेत. यातील पंचलिंगेश्वर महादेव मंदिर हे अत्यंत लहान असून त्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर पाच लिंग स्वरूपात शाळुंका आहेत. या पंचलिंगेश्वर मंदिराच्या बाजूला महादेवाचा अवतार असलेले श्री खंडोबा म्हणजेच मल्हारी म्हाळसाकांत देवतेचे एक छोटेखानी मंदिर असून त्या मंदिरांमधील पाषाणाच्या मल्हारी व म्हाळसा यांच्या मूर्ती भव्य असून अत्यंत आकर्षक आहेत.
गावांमधील इतर तीन शिवमंदिरे ही पाचशे मीटरच्या परिसरात गणिताच्या त्रिमिती परिसरात बांधलेली दिसून येतात. ही सर्व शिवमंदिरे यादवकालीन असून सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी त्यांची रचना दिसून येते. मंदिराच्या गर्भगृहाची द्वारशाखा वगळता इतर ठिकाणी फारसे शिल्पांकन आपल्याला दिसून येत नाही. कल्पेश्वर मंदिराजवळ एक वीरगळ आडवी पडलेली असून ही वीरगळ आपल्या मनात कुतुहल निर्माण करते. या वीरगळीचा काही भाग जमिनीत गाडलेला असून उर्वरित भागावर चंद्र-सूर्य, नांगर व शिलालेख कोरलेला आहे. नांगर हे राष्ट्रकुटांचे राजचिन्ह होते. त्यामुळे ही मंदिरे यादवकालीन की राष्ट्रकूट कालीन आहेत यावर संशोधन होणे गरजेचे आहे.
या मंदिरांची काही प्रमाणात पडझड झाली असून डागडुजी करण्याची आवश्यकता दिसून येते. गावचा हा वारसा गावकऱ्यांनीच जपणे व संवर्धन करणे गरजेचे आहे कारण या वास्तू गावचा वैभवशाली इतिहास सांगत असतात. अशा या मंदिरांच्या कोळगावला एकदा अवश्य भेट द्यावी.
©️ रोहन गाडेकर