वीरभद्र | आमची ओळख आम्हाला द्या –
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या गावी मार्केट गल्ली मध्ये प्राचीन असे छोटेखानी मंदिर आहे. सध्या या मंदिराच्या गर्भगृहाचा भाग तेवढाच शिल्लक राहिलेला आहे. या गर्भगृहात भैरव, विष्णू यांच्या मूर्ती भिंतीला टेकून ठेवल्या असून मधोमध शाळुंकेवर पंचलिंग अंकित केलेले शिवलिंग आहे. याच मंदिरात दूर्मिळ स्वरूपाची ही वीरभद्राची मूर्ती आहे. स्थानिक लोक याची पूजा करतात. परंतु ही देवता नेमकी कोणती ? हे त्याची पूजा करणाऱ्याला देखील ज्ञात नसावे यासारखे दुसरे आश्चर्य ते काय म्हणावे? आत्तापर्यंत अशा प्रकारची मूर्ती कोठेही आढळलेली नाही हे विशेष होय .सोलापूर जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारच्या चार स्त्री देवतांच्या मूर्ती प्राप्त झालेल्या आहेत ही पुरुष देवता आहे.
ही देवता वीरभद्र असून अर्ध पर्यकासना स्थित आहे. हा चतुर्भुज असून प्रदक्षणा क्रमाने याच्या खालच्या उजव्या हातात सुरा, वरच्या उजव्या हातात डमरू, डाव्या वरचा हातात त्रिशूळ व डाव्या खालच्या हातात कपाल आहे. या मूर्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उजव्या मांडीखाली मानवाचे शरीर {मुंडके }व डाव्या मांडीखाली मेंढ्याचे{अज} शीर आहे. डोक्यावर जटामुकुट आहे. कानात चक्राकार कुंडले, गळ्यात ग्रीवा ,कटक वलय पादवलय इत्यादी आभूषणे आहेत.
गळ्यात नरमुंडमाला ठसठशीत आहे. मूर्तीचा चेहरा भंगला असला तरीही त्याच्या वरील उग्रभाव स्पष्ट दिसतात .मूर्तीच्या चेहर्यावर पाठीमागील प्रभावळ स्पष्ट दिसते. सध्या ही मूर्ती झिजत चाललेली आहे. तिचे संवर्धन होणे गरजेचे आहे. कारण अशा स्वरूपाची मूर्ती ग्रंथात उल्लेखित नाही. ही मूर्ती वीरभद्राची आहे. कारण दक्षाच्या यज्ञविधी शिवाने विरभद्रा मार्फत विध्वंस करून दक्षाचा शिरच्छेद केला होता. त्याला मेंढ्या चे शिर बसवून जिवंत केले होते. त्याचे हे प्रतीक असावे की, एका मांडीखाली नरमुंड व दुसऱ्या मांडीखाली अजमुंड. त्यामुळे उपरोक्त मूर्तीही वीरभद्राची ठरते .या आधी आपण भद्रकाली चा लेख क्र.७ पाहिला आहे. त्यानुसार ह्या वीरभद्राची ती शक्ती असावी.
टीप :—लेख क्रमांक सात पहावा.
डाॅ.धम्मपाल माशाळकर.
मूर्ती अभ्यासक,मोडी लिपी,धम्मलिपी तज्ञ.सोलापूर