महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,05,766

विसावा मारुती मंदिर

Views: 485
3 Min Read

विसावा मारुती मंदिर | Visava Maruti Mandir –

पुणे या नावाला एक वेगळाच वलय आहे. पेशवाईच्या काळात पुणे हे एक महत्वाचे सत्ता केंद्र होते. असे असले तरी पुण्याला स्वतःचा एक इतिहास आहे. पुणे विविध कालखंडात विविध नावांनी ओळखले जायचे. जुन्या कागदपत्रांमध्ये पुण्यविषय, पुणकविषय असे उल्लेख येतात. नंतरच्या काळात पुण्याला पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. तसेच पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणूनही प्रसिद्ध आहे. परंतु इ.स. १८१० सालच्या पुण्यातल्या देवदेवतांची आणि त्यांच्या देवळांची संख्या बघितली, तर पुणे शहराला देवळांचे शहर म्हणूनही ओळखायला हरकत नाही. यातील काही मंदिरांची नावे फार चित्र-विचित्र आहेत. तत्कालिन परिस्थतीनुसार, तिथं घडलेल्या घटनांनुसार येथील मंदिरांना अशी नावे देण्यात आली आहे. असेच एक वेगळे नाव असलेले मंदिर सदाशिव पेठ, पूना हॉस्पिटल समोर आहे. रहदारीच्या रस्त्यावर असल्यामुळे आणि त्याच्या विचित्र नावामुळे ते पटकन लक्षात येते, ते म्हणजे विसावा मारुती मंदिर होय.

सदर मंदिर छोटेखानी आहे. हे मंदिर नक्की कधी बांधले याचा पुरावा सध्यातरी उपलब्ध नाही. या मंदिरामध्ये शेंदूरचर्चित मारुतीची ३ / ४ फुटी मूर्ती आहे. मारुतीच्या गळ्यात माळ आहे. लांब गुंडाळलेलं शेपूट आहे आणि ही मूर्ती चपेटदान मुद्रा स्वरूपात आहे. चपेटदान मुद्रा म्हणजे एक हात चापट मारण्याच्या स्थितीत उंचावलेला. अशा मूर्तीच्या पायाखाली राक्षस किंवा राक्षसीण असते. या राक्षसिणीबद्दल अशी आख्यायिका प्रसिद्ध की, ती लंकेची ग्रामदेवता आहे. तिला मारून मारुतीने लंकेवर स्वारी केली. काही ठिकाणी या राक्षसीणीला पनवती म्हणतात. तर राक्षसाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की, रामायणात मेघनादने लक्ष्मणावर आपल्या मायावी शक्तीचा प्रहार केला, त्यामुळे लक्ष्मण जखमी होऊन मूर्च्छित अवस्थेत जमिनीवर पडला. लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान संजीवनी आणण्यासाठी जात असतांना वाटेत त्याला एका ऋषींचा आश्रम दिसला. हा ऋषी म्हणजे मायावी रूप धारण केलेला कालनेमी राक्षस होता. ऋषी वेषात असलेल्या कालनेमीने हनुमानाच्या कामात विघ्न आणण्यासाठी एक कट रचला. हनुमानाने संजीवनी कशी मिळेल त्याबद्दल त्या ऋषीरुपी राक्षसाला विचारले. पण त्याआधी तहान लागली आहे तरी प्यायला पाणी द्यावे अशी विनंती केली. आश्रमात पाणी कमी असल्यामुळे ऋषींनी हनुमानाला तलावामध्ये जाऊन आंघोळ करून आणि पाणी घेऊन यायला सांगितले.

ऋषींनी सांगितल्या प्रमाणे हनुमान तलावाच्या आत आंघोळ करण्यासाठी शिरताच एका भल्या मोठ्या मगरीने हनुमानाचा पाय आपल्या जबड्यात धरला. त्यावर हनुमानाने आपल्या शेपटीच्या एका फटक्यात त्या मगरीला यमसदनी पाठवले. मगरीचा वध झाल्यावर त्या मगरीच्या देहातून एक अप्सरा प्रकट झाली. तिने हनुमानाचा नमस्कार करून हा मायावी रूपातील राक्षस कालनेमी आहे हे सांगितले. त्यानंतर हनुमानाने आश्रमात जाऊन कालनेमी राक्षसाचे डोके शेपटीत गुंडाळून, त्याला गरगर फिरवून जमिनीवर आपटले आणि पायाखाली चिरडून त्याचा वध केला. या मंदिरातील मूर्तीच्या पायाखाली राक्षस आहे.
या मंदिराच्या नावामागे अशी आख्यायिका सांगितली जाते की, पूर्वी या जागेजवळ स्मशानभूमी होती. स्मशानात मृत व्यक्तीला तिरडीवरून घेऊन जाताना खांदेकरी लोक खांदेपालट करण्यासाठी या मंदिराच्या आवारात थोडी विश्रांती घेत आणि मग पुढे जात. त्यामुळे कालांतराने या मारुतीला विसावा मारुती नाव पडले.

पत्ता : https://maps.app.goo.gl/AXx5crLLWxfbJAeP6

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment