महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,49,219

विशाळगड​ | Vishalgad Fort

By Discover Maharashtra Views: 6037 19 Min Read

विशाळगड​ | Vishalgad Fort

सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला विशाळगड​ (Vishalgad Fort) केवळ एका दरीने सह्याद्री पासुन सुटावलेला आहे. कोकणातील बंदरे व घाटमाथ्यावरील बाजारपेठ यांना जोडणाऱ्या अणुस्करा घाट व आंबा घाट यांच्या रक्षणासाठी शिलाहार काळात खेळणा उर्फ विशाळगडची निर्मीती केली गेली.

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथुन गजापूर मार्गे थेट विशाळगड च्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहनाने अथवा बसने जाता येते. कोल्हापुरहून शाहुवाडी-पावनखिंड-गजापूरमार्गे हे अंतर ८० कि.मी. तर रत्नागिरी-साखरपामार्गे ८५ कि.मी. आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असुन एक वाट कोकणातील माचाळ गावातुन कोकण दरवाजाने गडावर येते. हि वाट दूरची व चढणीची असुन या वाटेने गडावर येण्यासाठी अडीच तास लागतात तर दुसरी वाट विशाळगड​ (Vishalgad Fort) समोरील वाहनतळावर आहे. या वाटेने १५ मिनिटात आपण गडावर पोहोचतो. खाजगी वाहनाने अथवा बसने आल्यास आपण गडासमोर असलेल्या वाहनतळावर पोहोचतो. येथुन गडाची तटबंदी व बुरुज तसेच वरील बाजुस दोन बुरुजांमध्ये असलेला मुंढा दरवाजा याचे सुंदर दर्शन घडते. शासनाने बरेचसे पैसे खर्च करून सिमेंट थापुन गडाच्या दुरुस्तीचे काम केले आहे.

विशाळगडासमोर असलेला वहानतळ आणि गड यांच्यामध्ये दरी असून यांना जोडणारा पुल बांधण्यात आला आहे. हि सोय गडावरील दर्ग्यात जाणाऱ्या भक्तांसाठी असुन आपल्या सारख्या दुर्गप्रेमींसाठी गडावर जाण्यासाठी दरीत उतरून गडावर जाणारा मुळचा पायरीमार्ग आहे. पुलाच्या अलीकडे असलेल्या दुकानामागुन दरीत उतरणारी वाट आहे. या वाटेने खाली उतरल्यावर दरीत एक लहानशी घुमटी असुन त्यात देवीचा तांदळा स्थापन केला आहे. येथुन गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची वाट असुन या वाटेवर उजवीकडे कातळात खोदलेली लहान कपारीत देवीची स्थापना केलेली आहे. या भागात असलेली तटबंदी पहाता येथे गडाचा दरवाजा अथवा चौकी असावी. पायऱ्या चढुन आपण पुलाच्या गडाच्या दिशेला असलेल्या टोकावर येतो. येथुन गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहे. सरळ जाणारी वाट नव्याने बसवलेल्या शिडीने वर जाते तर उजवीकडील पायऱ्यांची वाट वळसा घालुन किल्ल्याच्या मुख्य दरवाजाने गडावर जाते.

आपण पायऱ्यांच्या वाटेने आपल्या गडफेरीस सुरवात करायची. पायऱ्यांच्या या वाटेवर डावीकडे आपल्याला एक झीज झालेली विरगळ पहायला मिळते. या वाटेने डोंगरउतारावरून खाली दरीपर्यंत बांधत नेलेली तटबंदी पहात आपण गडाच्या उध्वस्त उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो. हा दरवाजा आज पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याचे व शेजारील बुरुजाचे अस्तित्व दर्शविणाऱ्या केवळ खुणा शिल्लक आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस लांबलचक चौथरे बांधले असुन त्यापुढे विशाळगड​ (Vishalgad Fort) गडाचा दुसरा दरवाजा असावा. दरवाजे पार करून आपण शिडीने येणाऱ्या वाटेच्या वरील बाजुस येतो. या भागात आपल्याला गडाची मोठया प्रमाणात तटबंदी व त्यातील बुरुज पहायला मिळतात. तटबंदीचा काही भाग नव्याने दुरुस्त केलेला आहे. येथुन वाटेने सरळ न जाता आपण तटबंदीच्या काठावरून पुढे जात या भागातील तटबंदी व बुरुज पाहुन घ्यावे. येथे एकुण आठ बुरुज असुन त्यातील तीन बुरुजांना दुहेरी तटबंदी आहे. या भागात आपल्याला चौकीचे अवशेष तसेच एक लहान बांधीव टाके पहायला मिळते. हा भाग फिरून झाल्यावर मागे फिरून पायऱ्यांच्या वाटेवर यावे व पुढे निघावे. या वाटेने ५ मिनिटे चालल्यावर वाटेला दोन फाटे फुटतात.

सरळ जाणारी वाट दर्ग्याकडे जाते तर डावीकडील वाट अमृतेश्वर मंदिराकडे जाते. आपण सर्वप्रथम किल्ल्याचा डावीकडील भाग पाहुन घ्यावा. अमृतेश्वर मंदिराकडे जाणारी वाट घडीव दगडात बांधलेली असुन प्रशस्त आहे. या वाटेने १० मिनिटे चालत गेल्यावर शेवटच्या टप्प्यात असलेल्या काही पायऱ्या उतरून आपण अमृतेश्वर मंदिराच्या आवारात पोहोचतो. अमृतेश्वर मंदीर हे शिवमंदिर असुन ते दोन लहान टेकाडाच्या खोलगट भागात बांधलेले आहे. मंदिराला प्रकारची भिंत असुन या भिंतीजवळ अर्धवट गाडलेली एक मोठी तोफ आहे. मंदिरात शिवलिंग,गणपती व अजुन दोन कोरीव मुर्ती असुन बाहेरील बाजुस नंदी आहे. मंदिरासमोर कातळात कोरलेली पाण्याची टाकी असुन वरून वहात आलेले पाणी या टाक्यात साठविण्याची सोय केलेली आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. अमृतराव प्रतिनिधी यांनी इ.स.१७५१ ते १७६२ दरम्यान हे मंदीर बांधले. मंदीर पाहुन मागे न फिरता सरळ खाली उतरत गेल्यावर आपण दरीत येतो. या दरीला पाताळदरी नाव असुन दरीच्या काठावर असलेल्या तटबंदीत पाणी वाहुन जाण्यासाठी बांधलेल्या दोन कमानी पहायला मिळतात. या दरीत उजवीकडे आपल्याला दोन चौथरे व त्यावर बांधलेली तुळशी वृंदावने पहायला मिळतात. हे दोन चौथरे म्हणजे बाजीप्रभु व त्यांचे बंधु फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधी आहेत.

घोडखिंडीत त्यांना वीरमरण आल्यावर महाराजांनी त्यांची पार्थिवे विशाळगडावर आणुन या ठिकाणी अंत्यसंस्कार केले. या समाधीशेजारी कोरडी पडलेली एक लहान गोलाकार विहीर आहे. पाताळदरीच्या दुसऱ्या बाजुस असलेल्या टेकडीवर चढत गेल्यावर आपण टेकडीच्या माथ्यावर असलेल्या हनुमान मंदिराकडे पोहोचतो. या मंदिराचा केवळ गाभारा व बाहेरील भिंती शिल्लक असुन वरील छप्पर पुर्णपणे नष्ट झाले आहे. मंदीराच्या आवारात एक तळघर असुन काही अंतरावर एक मोठी कोरीव शिळा आहे. मंदीर पाहुन टेकडी उतरून खाली आल्यावर अमृतेश्वर मंदीर असलेल्या टेकडीवर न चढता डावीकडील टेकडीच्या माथ्यावर यावे. येथुन सरळ जाणारी वाट आपल्याला भगवंतेश्वर मंदिराकडे घेऊन जाते. या वाटेने जाताना आपल्याला डावीकडे अजुन दोन समाधी पहायला मिळतात.

स्थानिक लोक यांना मामाभाचे समाधी म्हणुन ओळखतात पण हे मामा भाचे कोण ते मात्र त्यांना सांगता येत नाही. या समाधी पाहुन आपण भगवंतेश्वर मंदीर परीसरात येतो. भगवंतेश्वर या शिवमंदिरात शिवलिंग व नंदी याशिवाय शिवाच्या दोन मुर्ती, ब्रम्हाची व एक कासव मुर्ती पहायला मिळते. मंदिरात कासवाच्या पाठीवर एक व गाभाऱ्याच्या दरवाजाजवळ एक असे दोन शिलालेख पहायला मिळतात. दरवाजाकडील शिलालेखात आबाजी जाधव शके १७०१ विशाळगड ही अक्षरे सहजपणे वाचता येतात. मंदिराजवळ विठ्ठल मंदीर व गणेश मंदीर अशी अजुन दोन मंदीरे असुन यातील गणेश मंदीर नव्याने बांधलेले आहे. गणेश मंदिराच्या आवारात फुटकी तोफ पडलेली आहे. विठ्ठल मंदिराच्या लाकडी बांधकामावर मोठया प्रमाणात कोरीव काम केलेले आहे. गणेश मंदिराच्या उजव्या बाजुस काही अंतरावर गोलाकार आकाराची प्रशस्त विहीर असुन या विहिरीत उतरायला पायऱ्या व लहान दरवाजा आहे. हि विहीर अर्धचंद्र टाके म्हणुन ओळखली जाते. विहिरीच्या आतील भागात नक्षीदार कमानी असुन एका कमानीत शिवलिंग ठेवलेले आहे. विहिरीच्या पुढील बाजुस पंतप्रतिनीधींचा वाडा असुन या वाडयाच्या भिंतीत असलेल्या लहान दरवाजाने आत जाता येते. १०० x ८० फुट लांबीरुंदीच्या या चौसोपी राजवाड्याचा आज केवळ मधला चौक, जोते व भिंती शिल्लक आहेत.

वाड्याचा मुख्य दरवाजा पुर्वाभिमुख असुन दरवाजा जवळच्या डावीकडील भिंतीत एक भुयार पहायला मिळते. या भुयारातुन जाणारी वाट वाडयाच्या पुर्व बाजुस असलेल्या चौकोनी विहिरीत उतरते. हा भुयारी मार्ग आजही वापरात असुन या विहिरीच्या भिंतीत देखील कमानी बांधलेल्या आहेत. विहिरीत उतरण्यासाठी बाहेरील बाजूने देखील पायऱ्या आहेत. येथुन राजवाड्याच्या वरील बाजुस असलेल्या टेकडीवर गेले असता येथे मोठया प्रमाणात घरांचे अवशेष दिसुन येतात. शिवकाळात विशाळगड​ (Vishalgad Fort) नांदता असताना गडाची मुख्य वस्ती याच ठिकाणी असावी. येथुन मागे फिरून भगवंतेश्वर मंदिराकडे यावे व दर्ग्याच्या दिशेने निघावे. वाटेत डावीकडे एका उध्वस्त वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. या वाडयाच्या आवारात एक लहान कोरडी पडलेली विहीर आहे. विहिरीपुढे काही अंतरावर डावीकडे दर्ग्याकडे जाण्यासाठी जुना फरसबंदी मार्ग आहे पण आता या वाटेच्या वरील भागात अनधिकृत बांधकामे झाली असल्याने वरील वाट बंद झाली आहे. आपण नव्याने बांधलेल्या सिमेंटच्या वाटेने दर्ग्याकडे निघावे. या वाटेने जाताना डावीकडे मोकळ्या मैदानात एक विहीर पहायला मिळते.

गडावर आलेल्या भक्तांना सध्या याच विहिरीचे पाणी पुरवले जाते. येथुन दुकाने व हॉटेल यांच्या गर्दीतुन वाट काढत आपण मलिक रेहान दर्ग्याकडे येतो. येथील चौकातुन समोरील वाट राम मंदिराकडे डावीकडील वाट दर्ग्यात तर उजवीकडील वाट गडाच्या पुर्व भागात असलेल्या मुंढा दरवाजाकडे जाते. आपण सरळ जाऊन आधी राममंदिर पाहुन घ्यावे. राम मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार केलेला असुन मंदिरा समोरील दगडी चौथऱ्यावर हनुमान मुर्ती व शेजारी काही जुने मंदिराचे अवशेष आहेत. मंदीर पाहून पुन्हा दर्ग्यापाशी यावे. दर्ग्याची मुळ वास्तु जुनी असुन इ. स. १६३९ मध्ये राजापूर येथील व्यापारी कोर्डूशेठ बल्लार यांनी या इमारतीचा जीर्णोध्दार करविला असे वाचनात येते पण याचे संदर्भ मिळत नाहीत. इ.स.१९४१ साली राजापुरचे शेख अह्मेद मोहंमद बक्क यांनी या दर्ग्याचा जीर्णोद्धार केल्याचे उल्लेख येतात. दर्गा पाहुन चौकातुन उजवीकडील वाटेने मुंढा दरवाजाकडे जाताना एका चौथऱ्यावर काही झीज झालेले विरगळ पाहायला मिळतात.

विरगळ पाहुन उजवीकडील बोळातून बाहेर जाणारी वाट आपल्याला मुंढा दरवाजाकडे घेऊन जाते. या संपुर्ण परिसराचा भक्त मंडळीनी उकिरडा करून ठेवला आहे. येथे दर्शनाला येणाऱ्या बहुतांशी लोकांचा दारू पिणे –कोंबड कापणे- त्याचा नैवद्य खाणे व शेवटी फुगलेली पोटे गडावर साफ करणे असाच कार्यक्रम असतो. या घाणीतून वाट काढताच आपण मुंढा दरवाजाकडे जाताना उजवीकडे एक साचपाण्याचा तलाव पहायला मिळतो. दोन बुरुजामध्ये असलेल्या या दरवाजाचे शासनाने संवर्धन केलेले असुन याच्या शेजारी असलेले उर्वरीत बांधकाम मात्र पुर्णपणे नष्ट झाले आहे. विशाळगड​ (Vishalgad Fort) गडाच्या पायथ्याशी आल्यापासुन हा दरवाजा सतत आपल्यावर नजर ठेवुन असतो. दरवाजा शेजारील तटबंदी खाली दरीपर्यंत बांधत नेली आहे. दरवाजासमोर नव्याने उभारलेल्या चौथऱ्यावर आठ फुट लांबीची तोफ ठेवलेली आहे. येथुन किल्ल्याच्या खालील भागात असलेली संपुर्ण तटबंदी व समोरील वाहनतळ नजरेस पडतो. परतण्याचा मार्ग जवळ असला तरी आपली अर्धी गडफेरी अजुन बाकी आहे. तोफेकडून पहिले असता दरवाजाच्या उजवीकडे दरी तर डावीकडे भगवा फडकत असलेले टेकाड दिसते.

रणमंडळ म्हणुन ओळखले जाणारे हे टेकाड गडावरील सर्वात उंच ठिकाण असुन या टेकडावरून गडाचा संपुर्ण परिसर नजरेस पडतो. येथे गडाची उंची समुद्र सपाटीपासून २४९० फुट असुन गडाचा परिसर दक्षिणोत्तर २५० एकरवर पसरलेला आहे. गडावरील मोकळ्या जागेत सपाटीवर पावसाळ्यात शेती केली जाते. टेकडी उतरून दरवाजाच्या आतील बाजुने दरीच्या काठावर असलेली तटबंदी पहात आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करावी. दुर्गंधी सहन करत वस्तीचा हा भाग पार केल्यावर आपण प्रशस्त वाटेला लागतो. या वाटेच्या सुरवातीस डावीकडे नृसिंह मंदीर असुन या मंदिरातील नृसिंहाची मुर्ती मात्र गायब आहे. घडीव दगडात बांधलेल्या या मंदिराचा आज केवळ चौथरा व आतील गाभारा शिल्लक आहे. वाटेने तसेच पुढे गेल्यावर उजव्या बाजुस भिंत घालुन बंदीस्त केलेले एक पटांगण पहायला मिळते. या पटांगणाच्या आसपास काही घरांचे अवशेष असुन समोर अजुन एक दर्गा पहायला मिळतो. दर्ग्याकडून उजवीकडे जाणारी वाट आपल्याला छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी अंबिकाबाई यांच्या समाधीकडे घेऊन जाते. दगडी बांधकाम केलेल्या या समाधीच्या वास्तुत एक चौथरा असुन त्यावर दोन पाउले कोरलेली आहेत.

छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाल्यावर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई उर्फ अहिल्याबाई येथे राजाराम महाराजांच्या पागोटयासह सती गेल्या. या स्मारकाचा १९४० साली जीर्णोद्धार करण्यात आला आहे. येथुन सरळ दरीच्या काठावर गेले असता खाली उतरण्यासाठी वाट असुन तेथे कातळात कोरलेले पाण्याचे लहान टाके पहायला मिळते. येथुन मागे फिरावे व सतीस्मारकाकडे यावे. येथुन सरळ जाणारी वाट आपल्याला विशाळगड​ (Vishalgad Fort) गडाच्या पश्चिम भागात घेऊन जाते. या वाटेने जाताना उजवीकडील टेकाडावर काही थडगी पहायला मिळतात. येथुन पुढे गेल्यावर उजवीकडे दरीच्या काठावर पाणी अडविण्यासाठी दोन उंचवटे जोडून धरणाची भिंत घातलेली पहायला मिळते. येथुन पुढे आल्यावर गडाचा हा संपुर्ण भाग तटबंदी व बुरुज घालुन बंदीस्त केलेला दिसुन येतो. या भागातील तटबंदी व बुरुज आजही सुस्थितीत आहेत. या भागात आपल्याला वाघजाई देवीचे उध्वस्त मंदीर पहायला मिळते. येथे असलेले मंदिराचे कोरीव खांब व मंदिरातील झीज झालेल्या मुर्ती पहाता या ठिकाणी प्राचीन मंदीर असावे. तटबंदीच्या या काठावर अजुन एका ठिकाणी भिंत घालुन पाणी अडविलेले आहे. गडाच्या पश्चिम टोकावर एक मोठा बुरुज बांधलेला असुन त्यावर चौकीचे अवशेष आहेत. या बुरुजाच्या अलीकडे दोन बुरुजात बांधलेला विशाळगडचा कोकण दरवाजा आहे. या दरवाजा समोरच माचाळदुर्ग असुन कोकणातून आल्यास या दरवाजातुन आपला विशाळगडावर प्रवेश होतो.

गडाजवळ असलेल्या माचाळच्या टेकडीमुळे या भागास मोठया प्रमाणात सरंक्षण दिलेले आहे. समोरील डोंगरामागे असलेल्या माचाळ गावातील गावकऱ्यांची या वाटेने सतत ये-जा असल्याने वाट चांगलीच मळलेली आहे. या दरवाजाने खाली उतरल्यावर कातळात कोरलेली ३० फुट लांब खोल गुहा पहायला मिळते. या गुहेचे आतील बाजुस असलेल्या तोंड माती पडुन बुजलेले आहे. गुहेकडील वाटेने दरीत उतरण्यासाठी तसेच समोर माचाळवर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. विशाळगडला भेट देणाऱ्या दुर्गप्रेमींनी या भागास अवश्य भेट दयावी. गडावर भुपाळतळे, अर्धचंद्रतळे, गौरीतळे व पासलतळे असे पाण्याचे चार तलाव असल्याचे उल्लेख येतात पण स्थानिकांना देखील या तलावाची ठिकाणे सांगता येत नाहीत. किल्ल्यावरून तळ कोकणातील खूप मोठा परिसर नजरेस पडतो. संपुर्ण विशाळगड पहाण्यासाठी सहा तास लागतात. गडावर जेवणाची व रहाण्याची सोय असली तरी ती आपल्यासारख्या दुर्गप्रेमींसाठी नाही. भगवंतेश्वर मंदीर परीसरात दोन तीन घरात आगाऊ सुचना केल्यास ही व्यवस्था होऊ शकते.

विशाळगडाची उभारणी इ.स.१०५८ मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली तर काही इतिहासकारांच्या मते शिलाहार राजा भोज दुसरा( ११७५ – १२१२) याने ह्या किल्ल्याचे बांधकाम केले. इ.स.११९०च्या सुमारास दुसरा राजा भोज याने आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलविली. त्यानंतर त्याने दक्षिण महाराष्ट्रात पंधरा किल्ले नव्याने बांधले त्यात घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी जे किल्ले बांधले त्यातील एक किल्ला होता किशागिला म्हणजेच आजचा खेळणा उर्फ विशाळगड. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी शिलाहारांचा पराभव करून किल्ला देवगिरीच्या यादवांच्या साम्राज्यात सामील केला. यादवांच्या अस्तानंतर कोकण प्रांत शिर्के आणि मोरे यांच्या ताब्यात असताना किल्ला मोरे यांच्या ताब्यात होता. बहामनी सत्ताकाळात इ.स.१४५३ मध्ये बहामनी सेनापती मलिक उतुजार राज्यविस्तारासाठी कोकणात उतरला. यावेळी शिर्क्यांचा पराभव करत त्यांचा किल्ला ताब्यात घेतला व त्यांना धर्मांतराची अट घातली. (यात किल्ल्याचे नाव नसल्याने नेमका कोणता किल्ला ते कळत नाही.) पण शिर्क्यांनी मलिक उतुजारला उलट अट घातली की माझा शत्रु खेळणा किल्ल्याचा शंकरराव मोरे याला प्रथम मुसलमान करा नंतरच मी मुसलमान होऊन सुलतानाची चाकरी करीन. एवढेच सांगून शिर्के थांबले नाहीत तर त्यांनी उत्तुजारला खेळणा किल्ल्यापर्यंतची वाट दाखवली.

शिर्क्यांनी मलिक उत्तुजारच्या सैन्याला विशाळगडच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट अरण्यात आणले. मैदानी मुलुखात आयुष्य गेलेल्या मुसलमान सैनिकांची सह्याद्रीच्या वाटांनी दमछाक केली. त्यातच मलिक उत्तुजार आजारी पडून त्यास रक्ताची हगवण लागली. अशा परिस्थितीत सैन्य असतांना शिर्क्यांनी खेळण्याच्या मोऱ्याशी संधान बांधले व मलिकच्या सैन्यावर दोन्ही बाजूनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मलिक उत्तुजार व त्याचे ७००० सैन्य मारले गेले. सह्याद्रीच्या सहाय्याने लढले गेलेले हे पहिले ज्ञात युद्ध. या संपुर्ण प्रसंगाचे फेरिस्ताने त्याच्या बुरहाने मसीर या ग्रंथात तपशिलवार वर्णन केलेले आहे. १४६९ साली बहामनी सुलतानाने बब्कीरे त्याचा सेनापती मलिक रेहान याला खेळणा किल्ला घेण्यासाठी पाठविले. ९ महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याने इ.स.१४७० मध्ये किल्ला जिंकून घेतला. या मलिक रेहानचा दर्गा या किल्ल्यावर आहे. त्यातील पर्शियन शिलालेखात वरील उल्लेख आढळतो. बहमनींच्या अस्तानंतर विशाळगड आदिलशाहीकडे आला. त्यानंतर जवळपास १९० वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही अशा मुस्लीम सत्तांच्या ताब्यात होता.

२८ नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला त्याचवेळी खेळणा किल्ला जिंकून त्याचे नाव विशाळगड ठेवले. ३ मार्च १६६० ला सिद्दी जौहारने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सूर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले होते. १३ जुलै १६६० रोजी भर पावसात पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व विशाळगडवर पोहोचले. त्याआधी पावनखिंडीत ३०० मावळ्यांसह बाजीप्रभूनीं सिद्दीचे सैन्य रोखण्यासाठी आपल्या प्राणांची आहूती दिली. शिवरायांनी विशाळगडाच्या मजबूतीकरीता ५००० होन खर्च केल्याचा उल्लेख येतो. शिवाजी महाराजानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी या गडाची डागडुजीही करून घेतली. इ.स.१६८६ मध्ये शिर्क्यांचे बंड मोडण्यासाठी संभाजी महाराजांनी कविकलशांना पाठविले परंतू पराभूत होऊन त्याने विशाळगडाचा आसरा घेतला. इ.स. १६८९ मध्ये संभाजी महाराज विशाळगडावरुन रायगडाकडे जातांना संगमेश्वर येथे पकडले गेले व त्यांची तुळापूरी निर्घृण हत्या करण्यात आली. इ.स.१६८९ साली रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांनी विशाळगडावर आश्रय घेतला.

छ. राजाराम जिंजीस गेले त्यावेळी त्यांच्या तीन राण्या अंबिकाबाई, राजसबाई व ताराबाई काही दिवस विशाळगडावर होत्या. पुढे रामचंद्रपंताने त्यांना सुखरूप जिंजीस पोहोचविले. सात वर्षे जिंजीस राहुन राजाराम महाराज २२ फेब्रुवारी १६९८ रोजी महाराष्ट्रात विशाळगडावर येऊन पोहोचले. राजाराम महाराजांच्या काळात रामचंद्रपंत अमात्यांनी विशाळगडास आपले मुख्य ठिकाण केल्याने विशाळगड​ (Vishalgad Fort) मराठ्यांच्या हालचालींचे प्रमुख केंद्र बनला. इ.स.१७०१ साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या. डिसेंबर १७०१ मध्ये औरंगजेब स्वत: मोठ्या फौजेनिशी विशाळगड घेण्यासाठी आला. पण विशाळगडाचे किल्लेदार परशुराम पंतप्रतिनिधी यांनी तब्बल सहा महिने किल्ला लढवून ६ जून १७०२ रोजी अभयदान व २ लाख रुपये घेऊन किल्ल्याचा ताबा औरंगजेबाला दिला. औरंगजेबाने विशाळगडाचे नाव बदलून सक्करलाना ठेवले. विशाळगड​ (Vishalgad Fort) जिंकून पन्हाळ्याला जातांना औरंगजेबाच्या सैन्याला सह्याद्रीने चांगलेच झूंजवले. येथुन पन्हाळ्याला जाण्यासाठी त्यांना तब्बल ३७ दिवस लागले. या काळात मुघल सैन्याचे अपरिमित हाल व नुकसान झाल्याची माहिती मोगल कागदपत्रात येते. यानंतर इ.स. १७०७ मध्ये ताराराणीने विशाळगड पुन्हा जिंकून घेतला.

मराठयांच्या धामधुमीच्या काळात ताराबाई व रामचंद्रपंत अमात्य हे दोघे विशाळगडवरून स्वराज्याची सूत्रे हलवीत होते. विशाळगडाच्या प्रतिनिधी घराण्याचा परशुराम त्रिंबक हा मूळ पुरुष होय. इ.स.१८४४ साली कोल्हापूरचे छत्रपती संभाजी यांनी जनार्दनपंत प्रतिनिधी यांच्या नावाने सनद देऊन किल्ल्याचे इनाम चालू ठेवले. पंतप्रतिनिधी हे विशाळगडचे जहागीरदार असल्याने त्यांचा मुक्काम गडावरच होता. याच साली ब्रिटिशांविरुद्ध कोल्हापूरात बंड झाले. त्यांनी विशाळगड घेतला पण ब्रिटिशांनी तो पुन्हा प्रतिनिधीस मिळवून दिला. या घडामोडीत किल्ल्याचे नुकसान झाल्याने प्रतिनिधीं मलकापूरला राहावयास गेले. संस्थाने विलीन होईपर्यंत विशाळगड कोल्हापूरच्या प्रतिनिधी घराण्याच्या ताब्यात होता. इतिहासामधे विशाळगडची किशागिला, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे येतात.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment