महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,53,646

सिंहगड पायथ्याच्या विष्णूमूर्ती

By Discover Maharashtra Views: 1424 3 Min Read

सिंहगड पायथ्याच्या विष्णूमूर्ती –

पुणे आणि सिंहगड यांचं नातं खूपच घट्ट. अनेक पुणेकर वर्षानुवर्षे सतत सिंहगडाची वारी करत असतात. शिवाय भटके-हौशे-नवशे तर कित्येक. इतिहास काळात सिंहगडाचा मुख्य दरवाजा हा कल्याण दरवाजा होता. पुण्याहून कोंढणपूर मार्गे गेल्यावर कल्याण नावाचे गाव लागते. सिंहगडपायथ्याच्या या कल्याण गावाजवळच्या पेठ-भिलारवाडी इथे वसला आहे एक प्राचीन दुर्लक्षित वारसा. सिंहगड पायथ्याच्या विष्णूमूर्ती. अभ्यासकांच्या मते या मूर्तींचा काळ अंदाजे १४ वे शतक असावे.

या भिलारवाडीपासून अगदी जवळ काळूबाई मंदिर आहे. त्या मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार झाला. त्या वेळी पाया खणताना गावकऱ्यांना बऱ्याच भग्न झालेल्या मूर्ती सापडल्या. या भग्न मूर्तीबरोबरच काही चांगल्या स्थितीतल्या मूर्तीही मिळाल्या. मूर्ती अधिक चांगल्या दिसाव्यात, म्हणून त्याला काळा रंगही लावला. या दोन मूर्तीची काळूबाई मंदिराशेजारी एक छोटे मंदिर बांधून प्रतिष्ठापना केली. शेजारी शेजारी असलेल्या या मूर्तीपैकी डावीकडची मूर्ती ‘श्रीधर’ विष्णूची तर उजवीकडची मूर्ती ‘पद्मनाभ’ विष्णूची आहे. या मूर्तीसमवेत आढळलेले मूर्तीचे भग्नावशेष एका लांबलचक ओट्यावर मांडून ठेवले आहेत. त्यांना शेंदूरही लावला आहे. काळूबाईच्या मंदिराच्या पुढयातच एक गद्धेगाळही आहे. या दगडाच्या खालच्या भागात कदाचित शापवचनं असलेला शिलालेखही असू शकेल.

सहसा विष्णुमूर्ती प्रामुख्याने केशव व नारायण रूपात आढळतात. श्रीधर, पद्मनाभ अशा मूर्ती फारच क्वचित घडविल्या जातात. त्यामुळे इथं एखादं मोठं विष्णुमंदिर असावं आणि त्याच्या बाह्यांगावर चोवीस विष्णुमूर्ती बसविलेल्या असाव्यात. म्हणूनच एकाच प्रकारे घडविलेल्या व विध्वंसातूनही शाबूत राहिलेल्या श्रीधर व पद्मनाभाच्या मूर्ती इथे आता दिसत आहेत.

स्थानिक गावकऱ्यांशी बोलताना असे जाणवले की, मंदिराचा पाया खणतेवेळी आणखीही काही मूर्ती व भग्नावशेष इथे होते. परंतु ह्या सर्व अवशेषांना वर काढणं योग्य नाही, असं सर्वार्थ मत पडल्याने हे काम केले गेले नाही.

श्रीधरमूर्तींचा पचगश (म्हणजे पद्म-चक्र-गदा-शंख) आणि पद्मनाभ मूर्तीचा शपचग (म्हणजे शंख-पद्म-चक्र-गदा) असा आयुधक्रम सहज ध्यानात येतो. दोन्ही मूर्तीमध्ये करंडक मुकूट, कर्णपत्रे किंवा पत्रकुंडलं, खांद्यावरची स्कंदपत्रे,गळ्यातील माळा, छातीवरचं पादचिन्ह, कमरेवरचं वस्त्र हे सारं ठसठशीत आहे. मात्र रंगविलेपनामुळे त्यांचे बारकावे झाकले गेले आहेत. दोन्ही मूर्तीमध्ये विष्णूच्या उजव्या पायाशी गरूड आणि डाव्या पायाशी लक्ष्मी किंवा श्रीदेवीची प्रतिमा चामरधारिणीसारखी खोदलेली आहे.

अशाच प्रकारची एक प्राचीन विष्णुमूर्ती सिंहगडाच्या पायथ्याशी खानापूर जवळील मणेरवाडी इथे १९८१ साली आढळली होती. ती सध्या राजा केळकर संग्रहालयात ठेवलेली आहे.

पेठ भिलारवाडीच्या या मूर्ती पाहण्यासाठी अवश्य जावं. मूर्तीचं दर्शन घेऊन सिंहगडाच्या कल्याण दरवाजानं सिंहगडावर यावं. या बाजूने सिंहगडचे अगदी वेगळे दर्शन होते. एक वेगळं ठिकाण आणि निराळ्या मार्गाने सिंहगड बघणे हे सुद्धा यानिमित्ताने होऊन जाईल. हे सगळं अर्ध्या दिवसात बघून होईल.

आशुतोष बापट

Leave a Comment