विश्वकर्मा लेणे किंवा सुतार लेणे –
वेरूळ लेणी समूहातील ‘विश्वकर्मा’ या नावाने ओळखले जाणारे १० क्रमांकाचे बौद्ध लेणेहे चैत्यगृह असून भारतीय शैलगृहातील अखेरची कलाकृती असल्यामुळे व त्यामध्ये चैत्यगृहाच्या पद्धतीत जो बदल झाला तो व्यक्त होत असल्यामुळे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. विश्वकर्मा लेणे या लेण्यास ‘सुतार लेणे’ असेही म्हणतात. या लेण्यामध्ये लाकडी बांधणीच्या चैत्यगृहाच्या ठसा उमटलेला दिसतो. या लेण्यात लाकडी फासळ्याऐवजी दगडात कोरलेल्या फासळ्या दर्शविल्या आहेत.
प्रवेशमंडपाच्या पाठीमागच्या भिंतीत चैत्यगृहात जाण्यासाठी दरवाजा आहे. आंत गेल्यावर गजपृष्ठाकृती आकाराच्या चैत्यगृहामध्ये एका प्रचंड स्तूपांच्या दर्शनी भागांत एक भव्य धर्मचक्राप्रवर्तनातील बुद्धमूर्ती बोधिवृक्षाखाली प्रलंबपाद आसनामध्ये सिंहासनावर विराजमान झालेली दिसते. दोन्ही बाजूस बोधिसत्वाच्या प्रतिमा आहेत. आणि त्यावर अंतरालात विहार करणारी गंधर्वमिथुने कोरली असून बुध्दावर फुलांचा वर्षाव करीत आहेत.
Rohan Gadekar