विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पिंपळवंडी
जुन्नर तालुका म्हणचे इतिहास आणि इथलं प्रत्येक गाव म्हणजे ऐतिहासिक खानाखुणांचा खजिनाच. तालुक्यातील असच एक गाव म्हणजे पिंपळवंडी. गावात अनेक जुनी मंदिरे आणि विरगळी आहेत. असेच एक मंदिर म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय.. तर विशेष अस की..
महाराष्ट्रातील बहुतांश विठ्ठल मंदिरात विठुराया आणि रखुमाई यांच्याच मूर्ती बघायला मिळतात. पण श्री विठ्ठलाच्या दोन्ही राण्या एकत्र क्वचितच बघायला मिळतात. विठुरायाची आरती म्हणतात आपण राही राखुणाबाई राणिया सकळां अस सहजच म्हणून जातो. यातच श्री विठ्ठलाच्या दोन राण्यांचा उल्लेख आहे हे सुद्धा बहुतेकांना महिती नसत. ही दुसरी राणी म्हणजे राही.
श्री विठ्ठल हे भगवान श्री कृष्णाचेच दुसरे रुप मानले गेले आहे. आणि श्री कृष्णाची प्रेयसी असलेल्या राधेलाच राही या नावाने संबोधून तिची मूर्ती श्री विठ्ठलाच्या सोबत उभारली जाते. महाराष्ट्रातील संत परंपरेत संत नामदेव हे सर्वव्यापी संत म्हणून गौरवले जातात, याच संत नामदेवांनी आपल्या गाथेतून आणि अभंगातून राही आणि राखुमाई या दोन राण्यांचा उल्लेख केलेले आहेत.
यांचे काही उदाहरणे देता येतील-
‘सत्यभामा राही रुक्माई जननी (९२९)’
‘राही रुक्माई परवडी वाढितसे (९३०)’
‘जीवींचे गुज राही रुक्माई पुसे (९४५)’
‘ विडा देती राही उभी उजव्या बाही (९४३)’.
अगदी संत नामदेवांच्या समाधी श्लोकात सुद्धा ते
पंढरीच्या राया प्रभु दिनानाथा । आज्ञा द्यावी आता येतो आम्ही ।।
राई राखुमाबाई सत्यभामा माता । आज्ञा द्यावी आता येतो आम्ही ।।
असा उल्लेख करतात,
महाराष्ट्रातील खूप कमी ठिकाणी भेटणारी अशी विठ्ठल रखुमाई आणि राही यांची मूर्ती या पिंपळवंडी गावातील मंदिरात आपल्याला बघायला मिळते. या तीन मुर्तीसोबतच मंदिरात अजून एक मूर्ती आहे आणि ती आहे श्री नरसिंह मूर्ती. इतर मूर्तींप्रमाणेच ही मूर्ती सुद्धा काळ्या पाषाणात घडवलेली आहे.
ऐतिहासिक जुन्नर भटकंतीमध्ये आवर्जून भेट देण्यासारखे हे ठिकाण नक्कीच आहे.
© श्रद्धा घनःश्याम हांडे, भ्रमणगाथा