महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,185

विठ्ठल मंदिर विठ्ठलवाडी, पुणे

By Discover Maharashtra Views: 3071 3 Min Read

विठ्ठल मंदिर विठ्ठलवाडी –

पुणे हे ऐतिहसिकदृष्ट्या महत्वाचे शहर त्यात पुण्याची ओळख म्हणजे तेथील जुने वाडे आणि मंदिरं. पुण्यातील बरीचशी मंदिरं ही पेशवाई काळातील असून आज आपण जाणून घेणार आहोत पुण्यातलं सिंहगड रोड वरील विठ्ठल मंदिर ज्याला प्रतिपंढरपूर असेही ओळखतात. सिंहगड कडे जाताना राजाराम पुलावरून थोडं पुढे गेलं की उजव्या हाताला विठ्ठलवडी ची कमान लागते तेच हे विठ्ठलवाडी क्षेत्र.विठ्ठल मंदिर विठ्ठलवाडी.

हे मंदिर १७५ वर्ष जुने असून मुळा मुठा नदीच्या काठी वसलेलं आहे. अतिशय देखणा शांत असा मंदिराचा परिसर आहे. या मंदिराचा इतिहास असं सांगतो की संभाजी गोसावी नावाचे एक विठ्ठल भक्त येथे शेती करत असे. व्यवसायाने शेतकरी असलेले गोसावी न चुकता पंढरीची वारी करायचे पण वार्धक्या मुळे जाणे जमत नव्हते. याच विवंचनेत असताना एके दिवशी शेतात काम करताना त्यांचा नांगर एका ठिकाणी अडकला आणि तिथे खोदले असता साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले. हीच ती विठ्ठलाची मूर्ती.

ह्या मंदिराच्या देखभालीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी काही जमीन इनाम दिली. मंदिराच्या गाभाऱ्याच्या भिंतीवर हे सनदपत्र संगमरवरी फलकावर ठळकपणे दिसेल असं लावलेले आहे. मूळ सनदेच्या नकलेवरून हा फलक तयार केला आहे. त्यावरून ह्या मंदिराचं बांधकाम इ.स. १७३२ पूर्वी झाल्याचं कळतं. इ. स. १७३२ साली निजामाने पुण्यावर हल्ला करून भरपूर नासधूस केली होती, त्यात ह्या मंदिराचं पण नुकसान झालं. त्यानंतर थोरले माधवराव पेशवे यांनी मुळ मंदिराचा जीर्णोद्धार करून पेशवाई पद्धतीचं भव्य गढीवजा दगडी विठ्ठल मंदिर बांधलं.

मंदिराला अगदी खेटून मुठा नदी वहाते. मंदिर उंच दगडी जोत्यावर उभारलेलं आहे. मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. मंदिर अतिशय भव्य असून लांबच लांब ओवऱ्या असलेली भक्कम तटबंदी, एकाबाहेर एक असे दोन सभामंडप आणि चौकोनी गाभारा आहे. नांगर लागल्या कारणाने अजूनही गाभारातल्या मूर्तीच्या कपाळावर खाच दिसते. गाभाऱ्याबाहेरच्या आतल्या मंडपाला संपूर्ण जयपूर पद्धतीच आरसेकाम केलेलं आहे.

मंदिराच्या आवारात एक विहीर आहे ज्यात १२ महिने पाणी असते. १८४२ मध्ये मिळालेल्या ताम्रपटानुसार या मंदिराची देखभाल गोसावी कुटुंबीयांकडे आली. आजतागायत गोसावी कुटुंबीय विठ्ठलाची पूजाअर्चा करतात. गोसावी कुटुंबीयांनीच पुढे मंदिराच्या परिसरात दशावतार, महादेव मंदिर व हरिदास वेस बांधली. मंदिराच्या आवारात मारुती, गरुड आणि शनी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रारंगणात मावळी पगडी मधील एक प्रतिमा आहे हेच ते संभाजी गोसावी यांचे वृंदावन स्मारक.

संदर्भ –
मुठेकाठाचे पुणे – प्र.के. घाणेकर
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी
राउळी मंदिरी – शेफाली वैद्य

पत्ता –  https://goo.gl/maps/Va2pU31KoSVbCsXaA

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment