महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,140

पूर्वीच्या वाडा बांधकामातील अधिकारी वर्ग, त्यांचे कर्तव्य व जबाबदारी

By Discover Maharashtra Views: 1596 8 Min Read

पूर्वीच्या वाडा बांधकामातील अधिकारी वर्ग, त्यांचे कर्तव्य व जबाबदारी –

पूर्वी वाडा, गढीचे बांधकाम करताना पावसासह प्रतिकूल हवामानाचा त्यावर परिणाम होणार नाही. भूकंप झाला, महापूर आला, कितीही मोठ वादळ आलं तरी त्याची एक विट ही हलता कामा नये असे नियोजन आणि आरेखन तयार करत असणार. त्याचा बारकाईने अभ्यास केला की लक्षात येते. वाडा बांधताना वाडा बांधकाम जवळच उपलब्ध असणारे साहित्य वापरून ग्रामीण भागातील स्थानिक मजूर अत्यंत स्वल्प दरात आणि विपुल प्रमाणात मिळत असतं. अशा मजुरांनकडून उत्तम गुणवत्तेचे वाडे बांधलेले दिसतात. आणि ते पाचशे वर्षांनंतर टिकूनही आहेत.

रोजगार निर्मिती म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे गावोगावी बांधलेले वाडे. तत्कालीन गरजेनुसार स्थानिक पातळीवर उपलब्ध मनुष्यबळ व साहित्याचा वापर करून बांधले गेले होते. बारा बलुतेदारापैकी सुतार, लोहार, चांभार, कुंभार आणि स्थानिक मजुर गवंडी, पाथरवट, बेलदार, रंगारी, चितारी अशा कित्येकांचा थेट सहभाग बांधकामामध्ये असे. साध्या ग्रामीण मजुरांनी माती, दगड, लाकूड यांचा वापर करून तयार केलेली सर्वउत्कृष्ट निर्मिती म्हणजे वाडा. अत्यंत जुन्या वाड्याला लोखंडी खिळ्याचा सुद्धा वापर केलेला नाही. लोखंडाचा वापर नंतरच्या काळात दिसून येतो. अशा प्रकारे एकावर अवलंबुन असणारे दुसरे काम म्हणजे एक प्रकारचे टिमवर्कच होते.

वाडा बनवण्याच्या आगोदर तो कमीत कमी दोनतीनशे वर्षे टिकावा या दृष्टीने विचार केलेला दिसतो. त्यासाठी त्यांनी काय प्रायोजन केले असेल हे अभ्यासले असता असे लक्षात येते की, वाड्याचे नियोजनबद्ध कामकाज हेच त्याचे मुख्य कारण. वाडा बांधकामाच्या शास्त्राचा विचार केला तर या शास्त्रातील मंडळी तज्ञ असणार. ते सर्व कामांचे व्यवस्थित नियोजन करून काम पूर्ण करत असणार. पाच दहा वर्षे तरी वाड्याचे बांधकाम चालणार, ही प्रचंड कामे समर्थपणे तांत्रीक दृष्ट्या परीपुर्णतेने पेलु शकणाऱ्या व्यक्ती हाताशी असणार. आराखडा तयार केल्यानंतर कलावंत, स्थपती, वास्तुविशारद, बेलदार, पाथरवट, सुतार, गवंडी, रंगारी, चितारी यांच्यामध्ये अखंडपणे संवाद चालू असणार.

वाडा बांधकाम –

त्याकाळातील अभियंत्यांच्या शब्दकोशात “नाही” हा शब्दचं नसणार. त्या अभियंत्यांनी अनेक अडचणीवरही तोड काढलेली असणार. वाड्याची बांधकामे त्याकाळात मेन्टेंनन्स फ्री बांधकामे किंवा वन टाइम कन्स्ट्रक्शन कामे म्हणून ओळखली जातात. बांधकामे करताना अशा प्रकारची पद्धती वापरली गेली की बांधकामासाठी वापरलेला दगड एक वेळी झिजून जाईल परंतु बांधकामासाठी वापरलेले साहित्य जसेच्या तसे राहील असे बनविले गेले. उदा. मातीचे भेंडे, लाकडी काम,चपट्या सपाट विटा, भित्तीचित्रे ई. यावर काम करणारे खास लोक (R & D) रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभाग ही असावा हे निश्चित.

संगणक नाही, अत्याधुनिक साधने नाहीत, सिमेंटकाँक्रीट नाही, लोखंड नाही, खिळे नाहीत. फक्त दगड, माती, लाकूड यापासून वास्तू निर्माण करण्याचे धनुष्य तत्कालीन अभियंत्यांनी लिलया पेललेले दिसते. मालकाच्या मनातील भव्य वाड्याला निव्वळ प्रत्यक्षात आणले नाही तर मजबूतही बनवले. मजबूत किती. चारपाचशे वर्षांनंतरही अशा वास्तू त्या अभियंत्यांच्या विद्वत्तेची, कौशल्याची महती सांगत आजही ताठ मानेन ऊभी आहेत. अतिशय अवघड असे हे तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाविषयी फारशी माहिती ऊपलब्ध नाही, पण आपले पूर्वज फारचं प्रगत तंत्रज्ञान वापरत होते यात शंकाच नाही.

वाडा पुढच्या दोन-तिनशे वर्षांत ओसाड पडेल, असे तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटले नसेल. आजही भल्याभल्या अभियंत्यांना तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या वाड्याची रचना, बांधणी त्याकाळी कशी केली असेल या विचाराने थक्क व्हायला होते. जेव्हा आपण इतर संस्कृतीच्या त्यांनी निर्माण केलेली कलाकारी आपल्याला छान वाटते. पण आपल्या संस्कृतीने जगाला काय दिलेलं आहे ह्याचं थोडेही ज्ञान आपल्याला नसते. वाडा म्हणजे आपल्या संस्कृतीचा, कलेचा, प्रगतीचा, तंत्रज्ञानाचा सर्वोच्च अविष्कार आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आपण आपल्याच संस्कृतीत डोकावून बघत नाही, त्यामुळे आपल्या कलेचा सर्वोच्च अविष्कार आज आपल्या पिढीपासून दुर्लक्षित आहे.

दगड, माती, विटा, भेंडे, सागवान, शिसम वापरून बांधलेला वाडा जे आजही उत्तम प्रकारे दिमाखात उभे आहेत. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या वाड्यात असं काय आहे की जे बघण्यासाठी प्रत्येक परदेशी पर्यटक आतुर असतो. वाडे पहायला स्थपती, वास्तुविशारद, इतिहासकार, अभ्यासक, पर्यटक, मूर्तिकार, फोटोशूट, शुटींगसाठी लोक भेटी देत असतात. आजही चित्रपट, मालिका जुन्या वाड्याशिवाय परिपूर्ण होऊच शकत नाहीत, हे विशेष आणि अभ्यास करण्यासारखे आहे.

काळाच्या कसोटीवर म्हणजे उन, वारा, पाउस हया सोबत वादळ, भूकंप, स्तुनामी अश्या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून जागा शोधायची. त्या जागेमध्ये बांधकामाच्या साहित्यचां साठा निर्माण करायचा. काळाच्या कसोटीवर कसं उभं राहील हे बघायचं. हे सर्व पेलताना त्याची भव्यता राहिली पाहिजे. किती प्लानिंग आणि र्रीसोर्सेस यासाठी लागले असतील. बर त्या काळी संगणक नसताना सगळी गोळा बेरीज डोक्यात करून मग समोरच्याला ते सांगणे किती अवघड असेल.

सहज विचार केला की आपल्या डोक्यात असलेली एक साधी घराची कल्पना सांगण्यासाठी आज किती पर्याय उपलब्ध आहेत. कॉम्पुटर, ग्राफिक डिझायनिंग, फोटो, थ्रीडी मोडेल, थ्रीडी व्हू, cng मशनरी आहेत. आपल्याला हवं तसं चित्रकाराला चित्रित करायला सांगतो. नाही पसंत पडल की परत करायला सांगतो. त्यानंतर आपण आर्किटेक्टकडून प्लान तयार करतो. प्लान तयार झाल्यानतंर अभियंत्याकडून बनवायला सुरुवात करतो. तो कारागिरांना प्लान दाखवून जे चित्रकाराने दाखवलं आहे ते जिवंत करायला सांगतो. ही झाली आत्ताची पद्धत. म्हणजे बघा हया सगळ्याचा उपयोग करू तेव्हां आपण कुठे जाऊन आपल्याला काय हवे आहे हे इंटिरियर डिझायनरला कळते. तर तेव्हांच्या लोकांनी हे कसं केलं असेल. वाड्याच्या मालकाच्या मनात असलेली प्रतिकृती तशीच्यातशी उतरवणे आणि हे दिव्य पेलणे म्हणजे प्रचंड अशी कलासाधना तर आहेच. त्याशिवाय आपल्याला अवगत असलेल्या विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा तो सर्वोच्च आविष्कार आहे त्या शिवाय हे शक्यच नाही. याचा अर्थ, त्या काळात नकाशाशास्त्र किती प्रगत असेल याचा विचार करा. इतर कुठली एखादी पध्दत त्या काळात वापरली गेली, जी आज काळाच्या पडद्याआड गेलेली आहे. हे मात्र काही कळायला मार्ग नाही.

याशिवाय नकाशे, संकल्पित आराखडे काढणारे, चितारी, रंग भरणारे रंगारी वगैरे आवश्यक तंत्रज्ञान जाणणारी हुन्नरवंत माणसे ही असत. होत असलेले बांधकाम योग्य तऱ्हेने होत आहे अथवा नाही. आखलेल्या आराखड्यानुसार होत आहे अथवा नाही. हे पाहण्याचे काम स्थपती, वास्तुविशारद, मुकादम करत असणार. प्रत्यक्ष काम करताना काही सुधारणा आवश्यक भासल्यास ती करण्याची जबाबदारी सुद्धा यांच्यावरच असणार. त्याचा निर्णयही जागेवरच करत असणार. भला मोठा विस्तार व विविध प्रकारची बांधकामे बघीतली तर प्रश्न पडतो की, हे सगळे कसे निर्माण केले असेल. असंख्य कसबी हात या बांधकामाला लागलेले असायचे. बांधकाम पुर्ण होईपर्यंत ते स्थळ म्हणजे एक गजबजलेले गावच असणार. अधुनिक नव्या इमारतीचे काम जसे चालते तसेच वाड्याचेही बांधकाम पूर्वी होत असणार.

वरील सगळ्या गोष्टीचा विचार करता माझं मन सुन्न झालं. ही भव्यता आज पाचशे पेक्षा जास्त वर्षे टिकून आहे. आज सगळी टेक्नोलॉजी उभी केली तरी हया भव्यतेची कलाकृती उभारणं आजतरी शक्य नाही. आपल्या पूर्वजांनी कलेचा, तंत्रज्ञानाचा, सर्वोच्च अविष्कार हजारो वर्षापूर्वीच दिला आहे. आम्हीं तंत्रज्ञानात सर्वात पुढे आहोत हे म्हणणाऱ्यांना अशा वास्तू पाहिल्या की आधुनिक मानवाचे गर्वहरण झाल्याशिवाय रहात नाही.

ज्यावर बाहेरील देशातील लोक आपल्या कलेचा, ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करून पुस्तकं लिहितात. पण आपण भारतीय यात कुठेच नाहीत. एक साधी डॉक्युमेंट्री पण ह्यावर नाही हेच बरचं काही सांगून जाते. महाराष्ट्राच्या अस्मितेचा ठेवा म्हणून कलेचे, संस्कृतीचे विद्यापीठ असणारे वाडे भारताची प्रतिमा जास्ती उजळवते ह्यात शंका नाही. हा वारसा आपण हरवून बसलो आहोत तो मिळवण्यासाठी पुन्हा एकदा अभ्यासाची गरज आहे.

पूर्वीच्या वाडा निर्माणाचे स्थपती कोण, वास्तुविशारद कोण, ठेकेदार कोण आणि असंख्य इतर कलाकार कोण, यांचा कुठे ऊल्लेखही नाही. त्यांचा ना कुठे ऊल्लेख ना त्यांची कोणाला आठवण.वाडा बांधकाम.

विलास भि. कोळी.

Leave a Comment