राघोबादादांचा वाडा, हिंगणी –
राघोबादादा जेव्हा राजकारणातून निवृत्त होऊन कायमचे वास्तव्य करण्यासाठी कोपरगावला आले तेव्हा त्यांनी कोपरगावच्या पश्चिमेला तीन मैलांवर असलेल्या हिंगणी गावाजवळ भव्य वाडा बांधण्याचे ठरवले. गोदावरी नदी हिंगणी गावापाशी दक्षिणवाहिनी होते, त्या ठिकाणी नदीच्या पश्चिम तीरावरील जागेची निवड करून बांधकामाला सुरुवात झाली. वाड्याच्या तीन भिंतींचे बांधकाम झाल्यानंतर पूर्वेकडील चौथ्या भिंतीचे बांधकाम चालू असताना राघोबादादांचे ११ डिसेंबर १७८३ रोजी कोपरगाव बेटात निधन झाले. राघोबांनी ते आजारी असताना, त्यांचा अंत्यविधी या वाड्यात व्हावा व तेथेच त्यांची राख पडावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे राघोबांचे दहन या तीन भिंतींच्या वाड्यात केले गेले व त्या ठिकाणी सांबाची स्थापना करण्यात आली. राघोबादादांचा वाडा बांधताना चुना तयार करण्यासाठी वापरलेले मोठे दगडी चाक तेथे बघण्यास मिळते.
भिंतींच्या वाड्याचे बांधकाम मजबूत, भक्कम व उत्कृष्ट दर्जाचे आहे. भिंतीची लांबी दोन हजार फूट, रुंदी एक हजार फूट आणि उंची पंचेचाळीस फूट असून भिंतीची माथ्यावरील जाडी सात फूटांची आहे. सर्व बांधकामाला आतबाहेर कातीव स्वरूपाचा काळा दगड व चुना वापरला गेलेला आहे. वाड्याच्या उत्तर व दक्षिण भिंतीला एकेक उंच बुरूज बांधलेला आहे. उत्तरेकडील भिंतीमध्ये प्रशस्त प्रवेशद्वार ठेवलेले आहे. राघोबांच्या इच्छेनुसार बांधला जाणारा तो वाडा पूर्ण झाला असता तर प्रशस्त, भक्कम आणि रेखीव नक्षीकामाचा वाडा पाहण्यास मिळाला असता!वाड्याच्या उत्तर व दक्षिण भिंतीला एकेक उंच बुरूज बांधलेला आहे. उत्तरेकडील भिंतीमध्ये प्रशस्त प्रवेशद्वार ठेवलेले आहे. राघोबांच्या इच्छेनुसार बांधला जाणारा तो वाडा पूर्ण झाला असता तर प्रशस्त, भक्कम आणि रेखीव नक्षीकामाचा वाडा पाहण्यास मिळाला असता!
Rohan Gadekar