वाकाटकांचं पुढे काय झालं ?
प्राचीन भारतीय इतिहासात सालवाहना इतकेच वाकाटकांचे स्थानही महत्त्वाचे आहे पण सालवाहनांना जो मान मिळतो तसा वाकाटकांना मिळत नाही. विद्यापीठातून शिकविल्या जाणाऱ्या इतिहासाच्या क्रमिक पुस्तकात सुद्धा वाकाटकांना अतिशय गौण महत्त्व दिलंय.केवळ मध्य भारताच्या जडणघडणीतच नाही, तर एकूणच देश पातळीवरच्या घडामोडीत वाकाटक हे दुय्यम का समजल्या गेले हे एक न सुटलेले कोडे आहे.वाकाटकांचं पुढे काय झालं ?
वाकाटकांबद्दल कुतूहल का निर्माण झाले?
मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमारेषेवर पैनगंगेच्या काठी एक अतिप्राचीन खेडं आहे.. त्याचे नाव शिऊर. सध्या हे गाव नांदेड जिल्ह्यात मोडत असले तरी, नांदेड, हिंगोली व यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यांच्या टोकावर वसलेले आहे. ही झाली या गावाची भौगोलिक ओळख. पण या गावाची ऐतिहासिक ओळख फार मोठी आहे. या गावाच्या शिवारात ‘भारतीय पुरातत्व विभाग’ व पुणे विद्यापीठ यांच्याकडून अनेक वेळा संयुक्तरीत्या उत्खनन झाले आहे. या उत्खनना मधून सुमारे दोन सहस्त्र वर्षांच्या मानवी वसाहतिच्या खाणाखुणा आढळून आल्या. अगदी पश्चिम महाराष्ट्रातील जोरवे संस्कृती एवढं जुनं नसलं तरी सुमारे दोन हजार वर्ष जुनं असलेले हे गाव. एरवीसुद्धा शेती नांगरतांना इथल्या लोकांना मातीची प्राचीन भांडी सापडतात. आज मितीस हे गाव अगदी छोटं असलं तरी तेथील एकूण भौतिक लक्षणांवरून तिथे एक फार मोठी मानवी वस्ती अस्तित्वात होती, जी काळाच्या उदरात गडप झाली, हे लक्षात ठेवायला हवं.
गावाच्या पश्चिमेला लागूनच एक टेकाड आहेपाषाणात खोदलेल्या अनेक लेण्यांतून हिंदू देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आढळतात. ‘इथूनच माहूरच्या किल्ल्याला जाणारी भुयारी वाट आहे,’ अशी इतरत्र बाळगली जाणारी बाळबोध अंधश्रद्धा इथेही आहेच. इथला पाषाण उत्तम प्रतीचा नसल्याकारणाने अर्धवट कोरलेल्या लेण्या व मूर्ती अतिशय भग्नावस्थेत आहेत. सर्वत्र मूर्त्यांना शेंदूर थापून बीभत्स केलेलं आहे. गावाच्या उत्तरेस नदीकाठी शिऊरेश्वराचे अनघड दगडात रचलेले एक पुरातन मंदीर सुद्धा आहे. मुबलक पाणी आणि समृद्ध काळ्या मातीचे वैपुल्य हे इथल्या शेतशिवाराचे वैशिष्ट्य असल्याने इथल्या माणसांना जगण्यासाठी फारसं काहीही न करता भरपूर पिकत असल्याने येथील लोकसंस्कृती मध्ये एक प्रकारचे कार्यशैथिल्य परंपरेने चालत आलेले
असावे. शिऊर येथील लेण्यांची नक्की माहिती येथील गावकऱ्यांना सुद्धा नाही. पण त्याच गावचे कै. गणेशराव देशमुख नावाचे अतिशय विद्वान असे गांधीवादी गृहस्थ होऊन गेले. सुमारे तीस वर्षांपूर्वी त्यांचा माझा कधीकाळी संवाद होत असे. त्यांच्यातील एक चतुरस्त्र अभ्यासक मला प्रभावित करीत असे. अध्यात्मावरील अनेक कठीण विषयात त्यांचा सहज संचार असे. एकदा बोलताना ते म्हणाले की या लेण्या वाकाटक कालीन असून वाकाटकांची राणी प्रभावती गुप्त हिने दिलेल्या आर्थिक मदतीतून या लेण्यांचे खोदकाम झाले आहे. पण मूर्ती शास्त्रातील अपुऱ्या ज्ञानामुळे वाकटकांबद्दलची जिज्ञासा मला स्वस्थ बसू देत नव्हती.
अशातच काही दिवसापूर्वी आमचे मित्र श्री सुरेश जोंधळे यांनी शिऊर येथील लेण्यांची काही चित्रे फेसबुकवर पोस्ट केली आणि माझे वाकाटकांबद्दलचे कुतूहल पुन्हा जागे झाले.
वाकाटकांची राणी प्रभावती गुप्त आपल्या लहान मुलांना गादीवर बसवून स्वत: राज्य करीत असे व तिची राजधानी विदर्भातील वत्सगुल्म ही होती एवढीच ऐकीव माहिती मला होती. पण ती माहिती चूक होती ही कल्पना मला नव्हतीच.
एखादा राजवंश सामान्य लोकांतून स्वसामर्थ्याने, आपल्या पराक्रमाने राजकीय क्षितिजावर उदयास येतो व दीप्तिमान होतो याचे वाकाटक हे उत्तम उदाहरण होय.
पुढील भाग – वाकाटक कोण होते? वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
संजय देशमुख कामनगावकर