वाकाटक ब्राह्मण होते का?
अजिंठ्याच्या शिलालेखांचे पहिले वाचन इसवीसनाच्या एकोणिसाव्या शतकात भाऊ दाजी लाड यांनी केले. त्यानंतर जर्मन पुरातत्व व्यक्ती योहान गाॅर्ग भूल्लर यांनीही वाचन केले. शेवटी विसाव्या शतकात श्री मिरासी यांनी या शिलालेखाचा अर्थ लावायचा प्रयत्न केला. मिरासी यांचे प्रतिपादनानुसार वाकाटक हे द्विज होते. म्हणजेच ब्राह्मण होते. आणि त्यांचे गोत्र विष्णुवृद्धि होते. त्याला पुरावा म्हणून मीरासी सांगतात की वाकाटकांनी अनेक प्रकारचे यज्ञ केले, म्हणून ते ब्राह्मण होते. अशाच प्रकारे सालवाहनांनाही ब्राह्मण ठरविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न या इतिहासकारांनी केला. वाकाटक ब्राम्हण असल्याचा कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही. शिवाय ब्राह्मणांमध्ये विष्णुवृद्धी गोत्र आहे की नाही हे कोणीच आज तरी छातीठोकपणे सांगत नाही. त्यामुळे वाकाटक हे ब्राह्मण होते हे सांगणे म्हणजे निव्वळ ऐतिहासिक सत्याशी प्रतारणा करणे. त्यानंतर केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशातून हेच मत मांडले. आमचे सर्वच संशोधक, इतिहासकार केतकरांना प्रमाण मानून संशोधन करत असल्यामुळे किंवा त्यांची धाव केतकऱ्यांपर्यंतच असल्याकारणाने सगळेजण डोळे बंद करून केतकऱ्यांनी जे म्हटले तेच पुढे रेटत राहतात. यांनी एखादी खोटी गोष्ट ठोकून द्यावी व ती पिढ्यानपिढ्या सत्य मानली जावी ही मोठी गंमतच आहे. ‘आम्ही सांगतो तोच इतिहास, कारण आम्ही सांगतोय ना?” अशा मनोवृत्तीतून इतिहास संशोधनास खेळत बसलीय.(वाकाटक ब्राह्मण होते का?)
द्विज म्हणजे ब्राह्मण हे मिराशींनी सांगितले आणि केतकरांनी त्यांचा कित्ता गिरवला व पुढे आमचे तमाम तथाकथित इतिहासकार व संशोधक तेच सत्य मानत राहिले. पण द्विज शब्दाचे इतरही काही अर्थ होतात का? व त्या अनुषंगाने अजिंठ्याच्या शिलालेखातून इतरही काही अर्थ निघतात का? हे ताडून पाहण्याची त्रासदी कुणी घेतली नाही. द्विज हा शब्द संस्कृत आहे. त्याचा ढोबळ अर्थ म्हणजे दोनदा जन्म झालेला प्राणी किंवा वस्तू. ज्यांचा ज्यांचा जन्म दोन वेळा होतो ते सगळेच द्विज. द्वि म्हणजे दोन आणि ज म्हणजे जन्म. द्विज म्हणजे ब्राह्मण हा केवळ एक संकेतार्थ होय. मतितार्थ नव्हे. त्याचा अर्थ असा की ब्राह्मण व्यक्ती जन्माने शूद्र असतो पण उपनयन संस्कार केल्याने त्याला ज्ञान प्राप्त होते व त्याचा नव्याने जन्म होतो. म्हणून तो द्विज. उपनयनापूर्वी म्हणजेच मौंजीबंधना पूर्वी ब्राह्मण सुद्धा शूद्रच. पण याचा थोडासा विस्तार केला तर असे लक्षात येईल की उपनयनसंस्कार केवळ ब्राह्मणांतच होतात काय? तर याचे उत्तर नाही असे आहे. उपनयनाचा अधिकार त्रैवर्णिकांना आहे. तो अधिकार पूर्वापार चालत आलेला आहे. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तिन्ही वर्णातील ज्या पुरुषांचे उपनयन झाले आहे ते सर्वच द्विज. त्यावरून द्विज शब्दाचे विशेषीकरण ब्राह्मण असे असले तरी सामान्यिकरण विद्वान पुरुष असेच आहे. द्विजचा अजूनही एक अर्थ आहे. द्विज म्हणजे पक्षी. पक्षांचा जन्म अंड्यातून होतो. म्हणजे पक्षी दोनदा जन्माला येतो. एकदा अंडी दिल्यावर आणि दुसर्यांदा अंड्यातून पक्षी बाहेर पडल्यावर. म्हणून द्विज या शब्दाचा अर्थ पक्षी असाही आहे. त्याचप्रमाणे सापाचाही जन्म अंड्यातून होतो म्हणून द्विज म्हणजे साप, असाही अर्थ होतो. तिसरे म्हणजे एकूणच सर्व अंडज म्हणजे द्विज. या शब्दाचा अर्थ सर्वोत्तम, उत्कृष्ट असाही होतो. त्याचप्रमाणे द्विज चा अर्थ दात असाही आहे कारण दात सुद्धा दोन वेळा येतात आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे या शब्दाचा अर्थ चंद्र असाही आहे. सारांश..द्विज शब्दाचे पुढील अर्थ स्पष्ट होतात. ब्राह्मण, उपनयन संस्कार झालेला पुरुष, विद्वान व्यक्ती, पक्षी, दात, उत्कृष्ट आणि चंद्र.
वर उल्लेख केल्याप्रमाणे अजिंठ्याचा शिलालेख वाकाटकांचा मंत्री वराहदेव याने संस्कृत भाषेत लिहिला. बर्याच इतिहासकारांना हे ठाऊक नाही की हा शिलालेख नेमका कोणत्या लिपीमध्ये लिहिला? तर तो शिलालेख ब्राम्ही लिपी मध्ये लिहिलेला आहे. शिलालेखातील द्विज शब्दाचा वेगळे वेगळे अर्थ लावून संदर्भ लागतो का बघूया.
मिराशींनी द्विज शब्दाचा ब्राह्मण हा आपल्याला सोयीचा अर्थ घेऊन इतिहासाची प्रतारणा केली. पण आपण उपरोक्त सर्वच शब्दांचे सर्व अवशिष्ट अर्थ घेऊन त्याचा संदर्भ तपासून घेऊया.
तो अर्थ असा होईल होईल..
वाकाटक ‘ब्राह्मण’ आहेत.
वाकाटक हे उपनयन झालेले पुरुष आहेत.
वाकाटक विद्वान पुरुष आहेत.
वाकाटक पक्षी आहेत.
वाकाटक साप आहेत.
वाकाटक अंडज आहेत. वाकाटक दात आहेत. वाकाटक चंद्र आहेत.इ
वरील प्रमाणे सर्व अर्थांचे शब्द जुळवून खातरजमा करून घेतली असता द्विज या शब्दाचे केवळ दोन संदर्भ येथे लागू पडतात.
‘ते म्हणजे वाकाटक हे विद्वान आहेत आणि वाकाटक हे चंद्र आहेत.’
आता वाकाटक हे विद्वान आहेत याचा अर्थ आपण समजू शकतो. पण वाकाटक हे चंद्र आहे त्याचा अर्थ नेमका काय लावायचा? तर लेखकाने तत्कालीन रूढीप्रमाणे या द्विज शब्दावर श्लेष केला आहे. तो कसा ते बघा..
वाकाटकांना ब्राह्मण ठरवण्यासाठी त्यांचे गोत्र विष्णुवृद्धी ठरविले जात असले तरीही आतली गोम वेगळीच आहे. ब्राह्मणात विष्णुवृद्धि गोत्रच नाही. आणि वाकाटकांचे खरे गोत्र विष्णुवृद्धि नसून वृष्णीवृद्ध आहे. शिलालेख चुकीच्या पद्धतीने वाचले गेल्याने ही फसगत झालेली दिसते. वृद्धी म्हणजे वाढ. वृष्णींपासून वृद्धिंगत झालेले ते वृष्णीवृद्ध. वृष्णी गोत्र यादव क्षत्रियांत मोडते हे आपल्याला ठाऊक आहे. वाकाटक स्वतःला वृष्णी गोत्रातील यादव समजत समजत आलेत.(वाकाटक ब्राह्मण होते का?)
यादव हे चंद्र वंशीय समजले जातात. वाकाटकांना द्विज हे विशेषण लावून लेखकाने द्विज या शब्दावर श्लेश केला आहे असे मी म्हटले आहे. माझा म्हणण्याचा हेतू एवढाच की ‘चंद्रवंशी, विद्वान असणारे वाकाटक’ असा त्या अलंकाराचा सरळ सरळ अर्थ आहे. पण विद्वान मिराशी असोत ती केतकर, यांनी सर्व महाराष्ट्रिकांचा कात्रजचा घाट करून इथल्या लोकांची दीडशे वर्षे फसवणूक केलेली आहे.
ब्राह्मणांची एकूण मुख्य गोत्रे सात असून त्यांच्या शाखा व उपशाखा धरून तीनशेच्या वर पोटभेद होतात. त्यापैकी कोणत्याही गोत्राचे नाव विष्णू वृद्धि नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो. पण आपण एखादी गोष्ट दडपून दिली म्हणजे महाराष्ट्रातील स्वयंघोषित इतिहासकार ते मान्यछ करतात हे मिराशी आदिंना पक्के ठाऊक आहे. संपूर्ण भारत खंडात म्हणजे उत्तर भारत व दक्षिण भारतातील मिळून जेवढी काही ब्राह्मण गोत्रे आहेत त्यात विष्णुवृद्धी नावाचे एकही गोत्र नाही. एवढेच नाही तर ब्राह्मणांच्या शाखा उपशाखा प्रवर आदी पोट भेदात सुद्धा विष्णुवृद्धी नावाचे ब्राह्मण कुळ अस्तित्वात नाही. वृष्णीवृद्धचे विष्णुवृद्धी करणारे इतिहासकार आणि ध चा मा करणारे पेशवाईचे कारस्थानी कारभारी हे मला सारखेच दिसतात. वाकाटकांचे कुळ, गोत्र बदलण्यामागे इतिहासकारांच्या मनातील वंशश्रेष्ठत्वाची व प्रतीशोधाची भावना दिसते. वाकाटकांचे प्राकृत प्रेम व बौद्ध धम्म सख्य या द्वेषाला कारणीभूत ठरलेले असावे.
संस्कृत ही देवाब्राह्मणांची अभिजात भाषा असून प्राकृत किंवा मराठी भाषा ही खेडवळ, गावठी व अनागर भाषा होय असे राजवाडे प्रणित स्कूल ऑफ हिस्टरीच्या विचारवंतांचे मत आहे. संस्कृत भाषा भीमानी गद्रे याचे उत्तम उदाहरण होय. सर्व ग्रंथ हे संस्कृतमध्येच असले पाहिजेत असा त्यांचा आग्रह असतो. पण हे असले मत म्हणजे वास्तवाच्या विरोधी सूर काढणे होय.प्राचीन काळापासून कधीही भारतात संस्कृत ही लोकव्यवहाराची भाषा म्हणून मान्यता पावली नाही. प्राचीन महाकाव्याचे बीज सुद्धा पैशाच्ची, मैथिली, सूरसेनी, मराठी भाषेत सापडते. प्राचीन संस्कृत नाटकात सुद्धा राजाराणी आदी मुख्य पात्रे वगळता बाकीची सर्व दुय्यम पात्रे प्राकृत भाषा बोलत असत. नाटक, नाट्य हे शब्द सुद्धा प्राकृत भाषेतूनच उचलले गेले आहेत. यासंदर्भात प्रोफेसर राजारामशास्त्री भागवतांचे मत विचारार्ह आहे.
“प्राकृत भाषेशिवाय नाटक नाही. कारण नाटक ही चीजच मुळात प्राकृत आहे”, असे ते म्हणतात.
भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात सतराव्या अध्यायात श्लोक क्रमांक 48 ते 52 अतिशय रोचक आहेत.” बाल्हिका दक्षिणात्याच्य सप्त भाषा प्रवर्तित:”
असं भरतमुनी म्हणतात. त्यानुसार मराठी आदी दक्षिणेतील सात भाषांपैकी कोणकोणत्या भाषांचा वापर नाटकातील कोणकोणत्या पात्रांच्या तोंडी केला पाहिजे याचे संकेत भरतमुनी सांगतात.
नाट्य शास्त्रानुसार राजाच्या अंत:पुरातले लोक मागधी भाषा, गुलाम, राजपुत्र आणि व्यापारी यांनी अर्धमागधी भाषा,दरबारातील विद्वान आणि पंडित यांची भाषा , ठकांची भाषा अवंती, मुख्य राजस्त्रियांची भाषा सुरसेनी, जुगाऱ्यांची भाषा बाल्हिक तर झुंजणारे लोक आणि नगरवासी यांची भाषा दक्षिणात्य मराठी असावी, असे संकेत आहेत.”
भरतमुनींनी ज्या काळात नाट्यशास्त्र रचले किंवा लिहिले त्या काळात दक्षिणात्य मराठी ही लढाऊ सैनिक, नगरवासी अशा रसिक लोकांची अभिजात भाषा होती. याचा अर्थ ती सुशिक्षितांची भाषा होती असं म्हणता येईल. ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्रियन लोकांसाठी अभिमानास्पद आहे. प्रोफेसर राजारामशास्त्री भागवतांच्या मते त्याकाळी मराठी लोक हिमालयापर्यंत पसरलेले होते आणि त्यांची भाषा विस्तृत प्रमाणावर वापरली जात होती. सूरसेन आणि पिशाच्च लोक हळूहळू त्यांच्यापासून वेगळे झाले. याचाच अर्थ मराठी ही सगळ्या प्राकृत भाषांची जननी ठरते.
यासंदर्भात चिनी प्रवासी युवान श्वांगचेही मत लक्षात घेण्यासारखे आहे. त्याच्या नोंदीनुसार,’ चालुक्य सम्राट पुलकेशीचे सैनिक व नागरिक हे अतिशय साधे सरळ असून शीघ्रकोपी आहेत. ते स्वाभिमानी तर आहेतच, शूरही आहेत. ते शत्रूला सावध करून नंतर आक्रमण करतात. उपकार कर्त्याबद्दल कृतज्ञ असतात. आपल्याला दुखावणारे, अपमान करणारे यांचा ते जीव धोक्यात घालून बदला घेतात. पण शरणागता ला प्राणपणाने सहाय्य करतात.’
मराठी लोकांच्या स्वभाववैशिष्ट्यांची अजून एक प्राचीन नोंद आढळून येते.
उद्योतनसुरीने इ. स. ७७८मध्ये ‘कुवलयमाला’ हा ग्रंथ लिहिला. त्यात ‘मरहट्ट’ भाषेचा उल्लेख आहे. या ग्रंथात पुढील वर्णन मिळते. ‘दढमडह सामसंगे सहिरे अहिमाण कलहसीले य। दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे।’ (बळकट, ठेंगण्या, सावळ्या अंगाच्या काटक, अभिमानी, भांडखोर, दिण्णले (दिले), गहिल्ले (घेतले) असे बोलणारे लोक म्हणजे मराठे)
सारांश. इसवी सनाच्या चौथ्या पाचव्या शतकात मराठीचे किंवा प्राकृत चे महत्त्व केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही प्रस्थापित झाले होते. यामागे वाकखटकांचे मरहट्टी प्रेम कारणीभूत आहे. याचा अर्थ संस्कृतचे अवास्तव महत्त्व कमी झाल्याने जो अभिजनवर्ग वाकाटकांवर वक्रदृष्टी धरुन होता, त्यांनी वाकाटकांचा वंशच बदलून त्यांच्यावर सूड उगवला. वाकाटक ब्राह्मण होते हे एक वेळ गृहीत धरले तरी, आज वाकाटकांचे ब्राह्मण वंशज नेमके कुठे आहेत व काय करतात हे कोण सिद्ध करणार? सबंध हिंदुस्थानात आम्हीच वाकाटकांचे वंशज आहोत असे सांगणारे कोणी ब्रह्मवृंदांपैकी पुढे आले काय? तर याचे उत्तर नकारार्थी आहे. आजच्या कोणत्याही ब्राह्मणात जर वाकाटकांचा अंश नाही तर वाकाटक नेमके गेले कुठे? ते असेच काळाच्या उदरात गडप झाले काय? असा प्रश्न शिल्लक राहतो.
वाकाटकांचे मूळ घराणे नंदिवर्धन म्हणजेच नगरधन होय असे सांगितले जात असले तरी ते खरे नाही. वाकाटक मुळचे वाशिमचेच. वाशिमचा प्राकृत उच्चार वच्छामी असा होतो. वच्छामी वरूनच प्राचीन साहित्यातील वच्छामी शैली विकसित झाली. ग्रंथकारांनी वच्छामि चे वत्सगुल्म असे संस्कृतीकरण करून टाकले. पूर्वीच्या काळी शिलालेख आणि ताम्रपट किंवा काव्ये नाटक इत्यादी लिहिणारे लोक संस्कृत भाषेचे अभिमानी असल्याने त्यांनी तत्कालीन व्यक्तीनामांचे व स्थलनामांचे संस्कृतीकरण करून टाकले. पण कधीकधी हे संस्कृतीकरण इतके विकृत केले की मूळ व्यक्ती किंवा स्थळाचा नेमका निर्देश होत नाही. प्राकृत व्यक्तींचे व स्थल नामाचे संस्कृतीकरण करताना मूळनामाचा अर्थ विलोप होऊ नये असा संकेत असतो. पण केवळ दुराग्रहापोटी हे संस्कृतीकरण सुयोग्य झाले नसल्यास मूळ स्थळ व व्यक्तींचा नेमका निर्देश होत नाही. याची अनेक पौराणिक व ऐतिहासिक उदाहरणे आहेत
वानगीदाखल संस्कृतमध्ये लिहिलेला, अगदी अलीकडचा ग्रंथ म्हणजे परमानंदाचे शिवभारत पाहूया. इतिहासकार स.मा. दिवेकर यांनी छत्रपतींच्या जीवनावरील समकालीन महत्त्वाचा असणारा हा ग्रंथ शोधून काढला तरी तो प्रकाशित करेपर्यंत स.मा. दिवेकरांना शिवभारतातील अनेक संस्कृत शब्दांचा नेमका संदर्भ लागला नाही. ‘ यातील अनेक व्यक्तिनामे व स्थल नामांचा आपल्याला अजिबात बोध होत नाही असे त्यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे. त्यापैकी प्रचंडपूर व क्षुद्रवंद्यपूर ही नावे नेमकी कोणत्या ठिकाणासाठी वापरली हे आपल्याला पडलेले कोडे आहे, असे दिवेकर म्हणतात. पण शिवचरित्राचा काळ अगदी अलीकडचा असल्याने व समकालीन अनेक पुरावे हाती उपलब्ध असल्याने प्रचंडपूर म्हणजे परांडा व क्षुद्रवंद्य पूर म्हणजे खुदावंतपुर होय हे आता स्पष्ट झाले आहे.
आता शिवभारत ग्रंथातील पराकृत व्यक्तिनामे व त्यांचे संस्कृतीकरण पाहूया..
रामजी पांगेरा – राम पांगारीक
वळखले कुंड वडखल परसोजी महाडीक- परशुराम महाद्रिक
सिदोजी पवार- प्रवार: सिधाजित्
मालोजीराजे – मालभूपाल मलिक अंबर- मनिअंबरेन बर्बर
मुधोजी फलटणकर- मुदाभिदेन फलस्थानाधिपती तानाजी मालुसरे – तानजित् मल्लसूर
शिवभारतातील आडनाव किंवा कुल नामाचे संस्कृतीकरण कसे झाले ते आता पाहू..
खंडागळे- खंडार्गल
घाडगे घंण्टिका
काटे- काटक
कोकाटे.- कोकाटक
भोसले – भृशबल
जगताप- जगस्थापक
गायकवाड- गोकपाट खटावकर- खट्वांगक रायबागन- राजव्याघ्री शहाजहान खुर्रम- कुर्म
आता प्राकृत स्थलनामाचे संस्कृतीकरण कसे झाले ते पहा
शिराळा – श्रियाल
शिरवळ- शिरबलं
राजगड -राजगिरी
बेदणूर- बिंदू पूर
होस्पेट – हंसकुट
कर्णूल- कर्णपुर
कराड – करहाट
इंदापूर -इंदिरा पूर
खारेपाटण- क्षार पतन चक्रवर्ती मंडल – चाकण प्रांत
बेलवडे- बिल्ववटं
नागोठणे- नागस्थान
वाकाटकांनी संस्कृत ऐवजी प्राकृतला महत्त्व दिल्याने भारतभर प्राकृत भाषांचा डंका वाजला. इतका की देश विदेशातील विद्वानांनी प्राकृत मरहट्ट भाषेची दखल घेतली. वाकाटकांनी बौद्ध धर्माशी सख्य केले हे आपल्याला माहित झाले. वाकाटकांनी संस्कृत ऐवजी प्राकृतला महत्त्व दिले त्यामुळे संस्कृत अभिमानी लोक दुखावले गेले. त्यामुळेच वाकाटकांना इतिहासकारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. हे सगळे ठीक आहे.
पण मग प्रश्न उरतो तो वाकाटक होते कोण? आणि त्यांचे खरे आडनाव किंवा कुलनाम काय होते? वाकाटकांनी दान केलेल्या ताम्रपटावर व शिलालेखात त्यांचे कुलनाम वाकाटक असे लिहिलेले आढळले आहे. आपण जेव्हा या दिशेने विचार करायला लागतो तेव्हा वाकाटक हा शब्द संस्कृत असेल तर त्यांचे मूळ कुलनाम प्राकृत मध्ये काय होते याचाही शोध घेतला पाहिजे. या ठिकाणी पुन्हा आपल्याला शिवभारतकार परमानंद उपयोगाला येतात. जर मालुसरेचे संस्कृत रुप मल्लसूर होत असेल, घाडगे चे घांटिक होत असेल, फलटणकर चे फलस्थानाधिपति होत असेल, काटे चे काटक होत असेल आणि कोकाटे चे कोकाटक होत असेल तर वाकाटक या संस्कृत शब्दाचे प्राकृत रूप असेल ‘वकटे.’
मग माझा शोध सुरू झाला की वकटे आडनावाचे कोणी लोक महाराष्ट्रात आहेत का? तिकडे मराठवाड्यात वकटे आडनावाचे कोणी नाहीत. पण वाकाटक मुळातले विदर्भातले जर वकटे आडनावाचा किंवा कुलनामाचा शोध घ्यायचा असेल तर तो विदर्भातच घ्यायला हवा. या दिशेने माझे प्रयत्न सुरू झाले. विदर्भात पाण वकटे आडनावाचे लोक आहेत का याचे अनेक दिवस मला उत्तर मिळालेच नाही. पण एके दिवशी अचानक श्री केबी देशमुख यांचे ‘महाराष्ट्रातील क्षत्रिय मराठ्यांचा इतिहास’ हे पुस्तक वाचताना अद्भुत खजिना हाती लागावा तसेच झाले. त्यांनी वकटे हे क्षत्रिय मराठा असून त्यांना धमाले कुळात समाविष्ट केलेले दिसले. तरीही वकटे आडनावाचे देशमुख हे मराठा क्षत्रिय घराणे तेही वाशिम- अकोला शहराच्या लगतच उगवा या त्यांच्या पूर्वजांच्या गावी वस्ती करून असल्याचे समजले. वाकाटक वाशिमचे तसेच वकटे देशमुख सुद्धा वाशीम-अकोल्याकडचेच. आता वाकाटकांचा शोध संपला होता. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापासून ते पाचव्या शतकाच्या अखेरपर्यंत संबंध मध्यभारतावर वर्चस्व गाजवणारे, साहित्यातील वच्छमि शैलीचे निर्माते, प्राकृत भाषांना उर्जितावस्था आणणारे, मरहटीचे आश्रयदाते अशा वाकाटकांचे वंशज विदर्भातील वाशिम जवळच्या उगवा गावचे वकटे देशमुख असून तिथे आजही वसती करून राहतात हे जेव्हा मला समजले तेव्हा माझ्या आनंदाला पारावर उरला नाही.(वाकाटक ब्राह्मण होते का?)
वाकाटक कोण होते? वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
वाकाटक ब्राह्मण होते का? वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
संजय देशमुख कामनगावकर