वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai –
प्राचीन भारतीय मंदिरस्थापत्याचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विविध कालखंडात झालेली त्यांची निर्मिती किंवा एकाच मंदिरात विविध कालखंडात काही कारणाने झालेले बदल. हे असे बदल महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहायला मिळतात. वर्षानुवर्ष होणारे ऊन-पावसाचे तडाखे, त्यामुळे होणारी दगडाची झीज, परकीय आक्रमणांमुळे झालेली मंदिराची नासधूस अशा अनेक कारणांमुळे मंदिरांच्या वास्तूमध्ये हे बदल वारंवार होत गेले. अशा मंदिरांचा इतिहास आणि त्यांचं स्थापत्य यांचं नीट निरीक्षण केलं तर हे बदल चटकन लक्षात येतात. अशाच धाटणीचं एक सुंदर मंदिर वाईजवळच्या वाकेश्वर इथं पहायला मिळतं.Wakeshwar Temple, Wai.
वाकेश्वर मंदिराची मूळची रचना उत्तर यादवकालीन आहे. परंतु मंदिराचं शिखर साधारण पेशवाईच्या कालखंडात नव्याने बांधलेलं आहे. वाई आणि परिसरात तुरळक आढळणाऱ्या शिवपूर्वकालीन मंदिरांपैकी वाकेश्वर मंदिर एक आहे. अतिशय सुबक आणि भक्कम बांधणी असलेल्या या शिवमंदिराला तितकाच भक्कम तट आहे. मंदिराच्या मुख्य सभामंडपात प्रमुख असे चार खांब आहेत. हे चार खांब आणि आजूबाजूला असलेले वीस खांब यांच्या आधाराने मंदिराचे छत तोलले गेले आहे. हे मंदिर कुणी बांधलं, कधी बांधलं याचे फारसे लिखित पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु उत्तर पेशवाई कालखंडात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असं म्हणता येईल. सभामंडपातील खांबावर चौकोनी आकारात नक्षी कोरलेली आहे. छोट्याशा असलेल्या अंतरालातून काही पायऱ्या उतरून गेलं की आपण गर्भगृहात प्रवेश करतो. या गर्भगृहातील शिवलिंगाच्या मागच्या बाजूला पार्वतीची मूर्ती आहे.
मंदिराच्या बाहेरील बाजूस छोट्या जोत्यावर नंदीमंडप आहे. प्रदक्षिणा मार्ग किंबहुना सर्वच मंदिर परिसर घडीव अशा फरसबंदीने सज्ज केला आहे. याच प्रदक्षिणामार्गावर जाऊन बघितलं की यक्ष, शरभ, हत्ती, हरीण यांची शिल्पं कोरलेली आढळतात. मंदिराचे शिखर त्रिस्तरीय स्वरूपाचे आहे. या शिखरावर चुनेगच्ची बांधकामातील मूर्ती कोरलेल्या आढळतात.आज इतक्या वर्षानंतरही या शिखरावरील मूर्ती सुस्थितीत पहायला मिळतात. मुख्य मंदिराला लागूनच एक छोटसं कुंड आहे. परंतु हे कुंड उघड्या स्वरूपाचं नाही. या कुंडाच्या चारही बाजूंनी भक्कम दगडी बांधकाम केलेलं आहे. कुंडात उतरण्यासाठी छोट्या स्वरूपाचं सुबक असं महिरपी कमान असलेलं प्रवेशद्वार आहे. पूर्वीच्या काळी या कुंडाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मंदिराच्या परिसरात विठ्ठल-रुक्मिणी, दत्तगुरू यांचीदेखील छोटी छोटी मंदिरे आहेत. तसेच जवळच एका पारावर शंकराचेच छोटेसे मंदिर आहे.
याच परिसरातून एक फरसबंदी वाट खालच्या बाजूला नदीच्या दिशेने जाते. या वाटेने पुढे गेलं की कृष्णा नदीचं विस्तीर्ण पात्र लागतं.नदीच्या काठावर एक सुबक असा घाटदेखील बांधलेला आहे. मुख्य मंदिराच्या तटबंदीला बुरूज आहेत. नदीपात्राच्या दिशेला असलेल्या बुरुजांवर विविध रूपातील मारुतीच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात. प्राचीन काळापासून या भागामध्ये शैव आणि गाणपत्य मंडळींचं बऱ्यापैकी वास्तव्य राहिलेलं आहे. त्यामुळे मंदिराच्या बाहेरील बाजूस याच पंथांच्या काही सत्पुरुषांच्या समाधी पहायला मिळतात. वाकेश्वरचं हे मंदिर बावधन गावाच्या हद्दीत येतं. महाशिवरात्रीला इथं मोठ्या संख्येने भाविक येतात. श्रावण महिन्याच्या दर सोमवारीदेखील इथे भाविकांची गर्दी असते.
वाई, जिल्हा सातारा.
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
© आदित्य माधव चौंडे.