महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,375

भटकंती गौताळा परिसराची !!!

Views: 2559
5 Min Read

भटकंती गौताळा परिसराची !!!

भटकंतीचा आनंद घेण्यासाठी प्रत्येकवेळी महाबळेश्वर, माथेरान, कोकण अशाच ठिकाणी जायला हवं असं नाही. महाराष्ट्रात सर्वदूर अशी बरीच ठिकाणं आपली वाट बघत आहेत. खान्देशच्या उंबरठ्यावर असलेला गौताळा अभयारण्य परिसर हे त्यातलेच एक. औरंगाबाद पासून वेरूळ-कन्नड मार्गे ११० कि.मी. तर चाळीसगावपासून जेमतेम २० कि.मी. वर असणारा हा सगळा प्रदेश. सातमाळा अजिंठा डोंगररांगांच्यामध्ये वसलेले हे अभयारण्य खूपच रमणीय आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेले आहे. श्रद्धाळू, पर्यटक, ट्रेकर्स, पक्षी निरीक्षक आणि पुरातत्व अभ्यासक या सगळ्या लोकांच्या जिव्हाळ्याची ठिकाणे याठिकाणी उपलब्ध आहेत.(भटकंती गौताळा परिसराची)

कन्नडच्या पुढे गेल्यावर एक रस्ता पितळखोरा लेणीकडे जातो. या लेणीच्या समोरून जाणारा कच्चा रस्ता सरळ डोंगराच्या खाली धवलतीर्थापाशी असलेल्या पाटणादेवी मंदिरापाशी उतरतो. जवळजवळ एक ते दीड तासांची ही डोंगरातली मस्त भटकंती आहे. इथे दुसऱ्या बाजूने पण जाता येते. पितळखोऱ्याकडे न जाता सरळ जाऊन औट्रम घाट उतरून पाटणे गावामार्गे आपण पाटणादेवीला जाऊ शकतो. या सगळ्या प्रदेशाला गौताळा-औट्रम घाट अभयारण्य असे नाव आहे. पाटणे गावाच्यापुढे ३ कि.मी. वर पाटणादेवी मंदिर आहे. पितळखोऱ्याच्या बाजूने असो किंवा पाटणे गावाकडून असो अभयारण्यात जाताना चेकपोस्ट लागते आणि तिथे नाममात्र शुल्क आकारले जाते. अभयारण्यात मुक्कामासाठी वनखात्याचे विश्रामगृह असून त्याचे आरक्षण औरंगाबाद इथे होते. शिवाय पाटणे गावात पाटणादेवी मंदिर ट्रस्टचे भक्तनिवास आहे. तिथेसुद्धा राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय होते.

हा परिसर फिरायचा तर किमान दोन दिवसांचा मुक्काम तरी करायला हवा. पाटणादेवी हे ठिकाण थोर गणिती भास्कराचार्य यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या चंडिका मंदिरात देवीची भव्य मूर्ती असून मंदिराच्या बाहेर दोन मोठ्या दीपमाळा आहेत. मंदिरात एक २४ श्लोकांचा देवनागरी लिपीतील शिलालेख असून तो भास्कराचार्यांचा नातू चंगदेव याने इ.स. १२०६ मधे कोरलेला आहे. त्यात तो भास्कराचार्यांची वंशावळ तसेच त्यांचे कार्य, त्याचसोबत यादव आणि निकुंभ राजघराण्याबद्दल माहिती देतो. याशिवाय सन १२०६ ला प्रभवनाम संवत्सर असताना श्रावण पौर्णिमेला चंद्रग्रहण होते त्यावेळी श्री सोन्हदेवाने आपल्या गुरूने स्थापिलेल्या मठाला दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. मठाला मंदिर दान दिलेली आहेच शिवाय पाटणे बाजारात जो व्यापार होई त्यावर काही कर बसवून तो मठाला दिल्याचा उल्लेखही इथे केलेला आहे. मंदिराच्या पाठीमागे उंचचउंच डोंगर उभे दिसतात. इथून एक रस्ता केदारकुंड या ठिकाणी जातो. अंदाजे २ कि.मी. ची जंगलातली पायपीट केली की तो रस्ता तीनही बाजूंनी असलेल्या डोंगरांनी बंद झालेला आहे. समोरच्या डोंगरावरून पावसाळ्यात धबधबा कोसळत असोत आणि त्याच्या पाण्यामुळे खाली मोठे कुंड तयार झाले आहे. ऐन जंगलात असलेले हे ठिकाण नितांत सुंदर असे आहे.

पाटणे गावातून देवीच्या मंदिराकडे जाताना वाटेत उजवीकडे रस्त्याचा फाटा एका महादेव मंदिराकडे जातो. इ.स. १२ व्या शतकात बांधलेले हे मंदिर कण्हेरगडाच्या मांडीवर वसलेले आहे. १० फूट उंचीच्या जोत्यावर असलेले हे मंदिर शिल्पसमृद्ध आहे. या मंदिराचे स्तंभ आणि बाह्यभागावर असलेली शिल्पकला केवळ सुंदर. या मंदिरातही एक २४ ओळींचा शिलालेख असून त्यात निकुंभ वंशातील राजांची वंशावळ दिलेली आहे. निकुंभ राजा इंद्रदेव याने हे मंदिर बांधायला सुरुवात केली आणि त्याचा पुत्र गोवन तिसरा याने ११५३ साली हे मंदिर पूर्ण केले असा स्पष्ट उल्लेख आहे.

मंदिराच्या शेजारून एक पायवाट कण्हेरगडाच्या डोंगराकडे जाते. पुढे ही पायवाट डोंगरावर चढते. चाळीसगाव इथल्या सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने जागोजागी फलक लावलेले आहेत. तसेच डोंगराचा चढावाचा भाग पायऱ्या खोदून सोपा केलेला आहे. इथे डोंगराच्या पोटात दोन लेणी खोदलेली आहेत. पाहिले आहेत ते नागार्जुन लेणे. हे जैन लेणे असून आत तीर्थंकरांची सुंदर मूर्ती, त्यांच्या बाजूला सेवक तसेच पुढे एका बाजूला सर्वानुभूती यक्ष तर दुसऱ्या बाजूला अंबिका यक्षी यांच्या सुंदर मूर्ती दिसतात. इथून आजूबाजूचा परिसर फार सुंदर दिसतो. या लेणीच्या काहीसे पुढे गेल्यावर सीतेची न्हाणी नावाचे अजून एक लेणे दिसते मात्र या लेणीत काहीही नाही. हीच पायवाट पुढे कण्हेरगड या किल्ल्यावर जाते. किल्ल्यावर तटबंदी आणि पाण्याचे एक टाके आहे. इथूनच समोर असलेला पितळखोरा लेणीचा डोंगर आणि त्याच्या माथ्यावर केलेले बांधकाम दिसते.

ह्या सगळ्या परिसरात असंख्य पक्षी आढळतात. मोर, सातभाई, कोतवाल, तांबट, हळद्या, खंड्या, धनेश, वेडा राघू, वटवट्या, बुलबुल अशा अनेक पक्षांचा कलकलाट सतत कानावर पडत असतो. ऐन थंडीत या ठिकाणी जाऊन एक वेगळेच विश्व अनुभवावे असे आहे. आपला आवाज बंद ठेवला तर जंगलाचा आवाज ऐकण्याची पर्वणी इथे अनुभवता येते. इथल्या अभयारण्यात बिबटे, तरस, डुकरे, लांडगे, ससा, माकड असे विविध पक्षी वसतीला आहेत. सातमाळा-अजिंठा डोंगराच्या कुशीत वसलेले हे गौताळा अभयारण्य आणि इथला परिसर हा आपला अनमोल ठेवा आहे. इथले वातावर गढूळ न करता आपण या वनसंपदेचा मनमुराद आस्वाद घ्यावा.

आशुतोष बापट

Leave a Comment