युद्ध शिल्पे –
घोटण (ता. शेवगांव, जि. नगर) येथील मल्लिकार्जूनेश्वर मंदिरावर पशु पक्षांची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पं असल्याचे याच मालिकेत पूर्वी लिहिलं होतं. याच मदिराच्या स्तंभांवर युद्ध आणि युद्ध सराव अशी काही शिल्पे आढळून आली. ही युद्ध शिल्पे पण वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पहिल्या शिल्पात तलवार घेवून लढणारे दोन योद्धे दिसत आहेत. त्यांनी शिरस्त्राण घातलेले आहेत. प्रत्यक्ष युद्धापेक्षा हा युद्ध सराव असावा. दूसरे शिल्प कुस्तीचे आहे. खेळा सोबतच युद्धाची तयारी म्हणून प्रशिक्षणाचा भाग असावा.
तिसर्या शिल्पात हत्ती आणि घोडा आहे. हत्तीने सोंडेत एक माणूस पकडला आहे. समोरचा घोडा उधळलेला आहे. हत्तीवर माहूत नाही. प्रत्यक्ष युद्धातीलच एक क्षण शिल्पात फोटोसारखा पकडला आहे. चौथे आणि शेवटचे शिल्पही असेच गतीमान आहेत. यात दोन अश्वस्वार दिसत आहेत. दोघांच्याही हातात भाले दिसत आहेत. दोघांच्या मध्ये जमिनीवर एक योद्धा आहे. घोडे मागील दोन पायांवर आहेत. युद्धाचा जोर इथे दिसून येतो. वीररसात ही शिल्पे न्हावून निघाली आहेत.
छायाचित्र सौजन्य Travel Baba Voyage.
– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद