सातारा आणि कोल्हापूर राज्य स्थापनेमागील कारण । वारणा तह –
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या शौर्याने ९ वर्ष राखले, त्यांच्या बलिदानानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांनी तितक्याच धीरोदात्तपणे येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करून हे राज्य राखले प्रसंगी मोहिमा काढून काही प्रमाणात विस्तारही केला.(वारणा तह)
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर झुल्फिकारखानाने रायगडास वेढा घातला. संपूर्ण राजपरिवार एकाच वेळी शत्रूच्या ताब्यात सापडू नये हाच महाराणी येसूबाई यांचा निर्णय होता जो अगदी योग्य होता. ठरल्याप्रमाणे महाराणी येसूबाई आणि बाल शाहूराजे हे औरंजेबाच्या कैदेत गेल्या आणि त्यांनी राजाराम महाराज यांचे मंचकारोहन करून त्यांना जिंजीला जाण्यास सांगितले त्याप्रमाणे राजाराम महाराज हे महाराणी ताराराणी, अंबिकाबाई, राजसबाई, प्रल्हाद निराजी आणि खंडो बल्लाळ यांच्यासमवेत जिंजीला गेले. मागाहून मुघलांची फौज आणि वेढा हा होताच. पण छत्रपती राजाराम महाराजांनी मोठ्या स्थिरबुद्धीने प्रत्येक संकटांचा सामना केला.
सन १७०० साली शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांचे निधन झाल्यानंतर पुढे सात वर्षे महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाशी लढा दिला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शंभूपुत्र शाहूराजे मुघलांच्या कैदेतून सुटून आले व त्यांनी गादीवर आपला हक्क सांगितला. यातून वाद निर्माण होऊन १७०७ ते १७१० या काळात स्वराज्याच्या सातारा व कोल्हापूर या दोन गाद्या निर्माण झाल्या. या दोन्ही गाद्यांमध्ये श्रेष्ठत्वासाठी नेहमी लढाया व्हायच्या.
अखेर १७३० साली उभयतांत निर्णायक लढाई होऊन दोन्ही राज्यांना आपापल्या सामर्थ्याचा अंदाज आला आणि इ.स. १७३१ साली सातारचे छत्रपती शाहू महाराज यांनी पुढाकार घेऊन आपले बंधू कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांच्याशी तह केला. हाच तो इतिहास प्रसिद्ध ‘वारणेचा तह’ होय.
त्यावेळी तह जखिणवाडी गावी झाला होता. वारणा नदी दोन्ही राज्याची सीमा बनली. त्यानंतर दोन गाद्या निर्माण झाल्या. एक सातारची गादी आणि दुसरी कोल्हापूरची गादी. तो ‘वारणेचा तह’ म्हणून प्रसिद्ध आहे.
तह 13 एप्रिल 1731 रोजी झाला. त्यांपैकी काही अटींचे पालन झाले तर काहींचे नाही.
सदरील तहातील ५ वे कलम खूप काही सांगून जाते,
“तुम्हाशी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य आम्ही करावे. आम्हासी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य तुम्ही करावे. तुम्ही आम्ही एकविचारे राज्यभिवृद्धी करावी”.
तहाची आठवण म्हणून शाहुराजांनी गावाला दोन तलवारी भेट दिल्या होत्या. त्या गावच्या मळाईदेवी मंदिरात आहेत.
मळाई देवी मंदिरातील छत्रपती शाहू महाराजांनी भेट दिलेल्या तलवारी
या तहान्वये दोन्ही छत्रपतींनी दोघांचाही दर्जा समान असल्याचे मान्य केले व आपल्या राज्यांच्या सीमा ठरविल्या. यामुळे छत्रपती घराण्यातील भाऊबंदकी कायमस्वरुपी संपुष्टात आली. १७३१ नंतर कोल्हापूर व सातारा छत्रपतींदरम्यान एकही लढाई झाल्याचा किंवा वैमनस्य उद्भवल्याचे उदाहरण इतिहासात नाही. उलट दोन्ही छत्रपती नेहमी एकमेकांकडे रहायला जात असल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. दोन्ही छत्रपतींच्या बंधुत्वाचे व सलोख्याचेही अनेक पुरावे इतिहासात मिळतात.
त्यापैकी उदाहरण द्यायचे झाल्यास,
आपले बंधू छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीकरीता पन्हाळगडहून संभाजी महाराजांनी साताऱ्यास प्रयाण केले तर साताऱ्याहून शाहू महाराज संभाजी महाराजांच्या स्वागतासाठी जाखिणवाडी येथे आले. छत्रपती राजबंधूंच्या भेटीच्या दिवशी जाखिणवाडी व वाठार पर्यंत दोन लाख लोक उपस्थित होते. दि.२७ फेब्रुवारी १७३१ रोजी संभाजी महाराज व शाहू महाराजांची भेट झाली. तोफांची सरबत्ती झाली. शाहू महाराजांसोबत संभाजी महाराज साताऱ्यास आले. अदालत राजवाड्यामध्ये महाराजांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दोन महिन्यांच्या मुक्कामात छत्रपती संभाजी महाराजांना अनेक सरदारांनी शाही मेजवान्या व नजराणे अर्पण केले. शाहू महाराजांनी शेकडो जातीवंत घोडे, हत्ती, जडावांचा खंजीर, पोषाख व रोख दोन लाख रुपये महाराजांना भेट दिले.
छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज दुसरे (कोल्हापूर) यांच्या साताऱ्यात भेटीसमयीचे चित्र.
(सदरील चित्र नवीन राजवाडा कोल्हापूर येथे आहे)
त्याचबरोबर ताराराणीसाहेब या साताऱ्यात आपला पुतण्या शाहू महाराजांंसोबतच रहायच्या आणि छत्रपती शाहू महाराजांनी देखील आपली चुलती ताराराणी यांना आपल्या आईप्रमाणेच मानले आणि त्यांची काळजी घेतली, राज्यकारभाराच्या अनेक सूचना ताराराणी शाहूंराजांना द्यायच्या ज्या छत्रपती शाहू महाराज कटाक्षाने पाळायचे.
सातारा आणि कोल्हापूर घराण्यातील अजून काही सलोख्याचे प्रसंग म्हणजे दोन्ही घराण्यांत परस्पर दत्तकविधानं झाली होती, उदा. छत्रपती शाहू महाराजांना पुत्र नसल्याने ताराराणीसाहेब यांचा नातू रामराजे (दुसरे) हे शाहूंराजांनंतर सातारा गादीवर आले.
पुढे पेशव्यांनी दोन्ही गाद्या एकत्र करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यात यश आले नाही.
काही दिवसांपूर्वी BBC NEWS ने कोल्हापूर आणि सातारा गादीच्या स्थापनेची म्हणजेच वारणा तहाची माहिती देताना प्रक्षोभक मथळ्याखाली लेख लिहला होता ज्यामध्ये दोन्ही घराण्यांत भांडणे होत असल्याचा चुकीचा इतिहास जनमानसांत पसरवन्याचा प्रयत्न केला होता. यातून समाजात चुकीचा संदेश दिला जात होता. ते मुद्दे मला ससंदर्भ खोडून खरा इतिहास तुम्हांसमोर आणायचा होता.
वारणेच्या तहानंतर सातारच्या छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर राज्याची वारंवार काळजी घेतली होती. कोल्हापूर राज्याविरुद्ध कुणी सरदार काही हालचाली करत असेल तर त्यास शाहू महाराजांनी खडसावलेली पत्रे आजही आपल्याला पहायला मिळतात. शाहू महाराजांच्या अत्यंत लाडक्या बाजीराव पेशवे यांनी जेव्हा कोल्हापूर राज्याची काही गावे लुटली तेव्हा त्यांची कानउघाडणी करण्यासही शाहू महाराजांनी कमी केले नाही. उलट ते म्हणायचे की “आमच्या बंधूंशी (कोल्हापूरच्या छत्रपतींशी) युद्ध म्हणजे खुद्द आमच्याशी युद्ध”. या वाक्यातच कोल्हापूर – सातारा छत्रपतींच्या संबंधाचे सार सामावले आहे.
आजही दोन्ही घराण्यातील विद्यमान वंशजांना एकमेकांप्रति आदरभाव आहे.
संदर्भ : करवीर रियासत.
लेखन : रोहित पेरे पाटील